सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ किर्लोस्करवाडी येथे झाला.
किर्लोस्करवाडी येथील वातावरणाचा, ग्रामीण जीवनाचा, निसर्गाचा सुधीर मोघे यांच्या घडणीत फार महत्त्वाचा वाटा होता. त्यांचे वडील कीर्तनकार होते. त्यांचे संस्कार मोघे यांच्यावर झाले.
पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९७२ च्या सुमारास ते पुण्यात आले. त्यांची “आत्मरंग‘, “गाण्याची वही‘, “पक्ष्यांचे ठसे‘, “लय‘, “शब्द धून‘, “स्वतंत्रते भगवती‘ असे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. “अनुबंध‘, “गाणारी वाट‘, “निरांकुशाची रोजनिशी‘ हे गद्य लेखन वाचकांसमोर आलेले आहे.
पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी’, ‘दयाघना’, ‘आला आला वारा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ यासारख्या रचनांनी लोकप्रिय झालेले मा.सुधीर मोघे यांनी काव्य-गीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम संगीत, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्कार, दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन अशा विविध क्षेत्रांत यांनी मुशाफिरी केली. आपला वेगळा ठसा उमटवला.
एकाच वाटेवर न रमणारे अन् नवनव्या वाटा सतत शोधत राहणारे मनस्वी कलाकार अशी त्यांची ओळख होती. ते उत्तम चित्रही रेखाटत असत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शन आजवर भरली होती; पण “मुळात मी कवी आहे‘ असे ते सांगत. स्वत:पेक्षा इतरांच्या कवितांवर ते भरभरून बोलत, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण होते.
सुधीर फडके, श्रीधर फडके यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय अशा पन्नासहून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं. झी मराठीवर गाजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाचं यशस्वी सादरीकरणही केलं होतं.
सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला होता. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे हे त्यांचे ज्येष्ठ बंधू.
सुधीर मोघे यांचे १५ मार्च २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुधीर मोघे यांची काही गाणी.
कुण्या देशीचे पाखरु, गोमु संगतीने ने, मी सोडुन सारी लाज, ओकांर अनादी अनंत, ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपारम, नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार, सूर स्पर्श सूर श्रवण, एक झोका चुके काळजाचा ठोका, गुज ओठांनी, ओठांना सांगायचे, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रासझुला
दिसं जातील दिसं येतील, दृष्ट लागण्याजोगे सारे, देवा तुला शोधू कुठं, भन्नाट रानवारा, रात्रीस खेळ चाले.
Leave a Reply