नवीन लेखन...

अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

“अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..!

आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले.

आचार्य अत्रे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाले होते,तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले होते. त्या काळात दै. मराठा या वृत्तपत्राची जबाबदारी शिरीषजीं वरच होती. त्यावेळी या दैनिकात काम करणा-या सहका-यांच्या मदतीने त्यांनी वडिलांच्या गैरहजेरीत काही अग्रलेख दै मराठामध्ये लिहिले आणि ते छापून आले. जेव्हा त्या अत्रे यांना तुरुंगात भेटायला जायचे तेव्हा ते त्यांच्या अग्रलेखांचे कौतुक करत. याच काळात शिरीषजींचा परिचय विजय तेंडुलकर, केशव मेश्राम, नारायण सुर्वे यांच्याशी झाला आणि त्यामुळे त्यांचे लिखाण अधिकाधिक चांगले झाले, असे खुद्द शिरीष ताईंनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. `चैत्रपालखी’, `सुखस्वप्न’, `मयूरपंख’, `हापूसचे आंबे’, `मंगळसूत्र’, `खडकचाफा’, `कांचनबहार’, `हृदयरंग’ अशा काही कथासंग्रहातून त्यांनी प्रामुख्याने स्त्री दुःखाचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला. `एकतारी’, `गायवाट’, `कस्तुरी’, `ऋतूचित्र’ मधील थंडीच्या कविता, `एका पावसाळ्यात’ या कविता संग्रहात आत्मकेंद्रित मनाचे ठाम वर्णन आणि प्रेमानुभवाचे चित्रण केले.

त्यांना `हायकू’ मुळे खरे तर जास्त लोकप्रियता लाभली. `हायकू’ म्हणजे जपानी काव्यप्रकार. त्याला मराठीचे रूप शिरीषताईंनी दिले. तीन ओळींच्या कवितेतून सारा आशय मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हायकू. `लालन बैरागीण’, `हेही दिवस जातील’ या त्यांच्या कादंब-या गाजल्या. छोट्या मुलांसाठीही त्यांनी `आईची गाणी’, `बागेतल्या जमती’ या बाल साहित्याची निर्मिती केली. लहान मुलांसाठी त्यांनी कथासंग्रह, ललित लेखन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्यासाठी नाटंकही लिहिली. `हा खेळ सावल्यांचा’, `झपाटलेली’, `कळी एकदा फुलली होती’ ही नाटकं लिहिली. `आजचा दिवस’, `आतला आवाज’, `प्रियजन’, `अनुभवांती’, `सच’, `मी माझे मला’ या ललित लेखनाने एक लेखिका म्हणून त्यांचे नाव झाले. आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणून लोकं ओळखतात, तेव्हा खूप बरे वाटते. कारण मला असे वाटते की, माझ्या पप्पांसारखे अफाट कर्तृत्व आणि दूरदृष्टी कोणाचीच नव्हती आणि त्यामुळेच `पप्पा’ आणि `वडिलांचे सेवेशी’ या पुस्तकातून आचार्य अत्रे कसे होते हे मांडण्याचा प्रयत्न केला असे शिरीषताईं आपल्या मुलाखतीमधून आवर्जून सांगतात.

पत्रकार, कादंबरीकार, कवयित्री, ललित लेखिका अशी अनेक रुपे असलेल्या शिरीष पै आज आपल्यात नाहीत. पत्रकारिता करताना आजुबाजूला नेमके काय घडतंय याची जाण असणे महत्त्वाचे तर इतर लेखन करताना तुम्ही समाजासाठी लिहित आहात हे लक्षात ठेवून तुमचे लिखाण समाजाला आवडणे अतिशय गरजेचे आहे अशी त्यांची भूमिका. `हायकू’ हा प्रयोग कवितेत करणा-या शिरीषताई यांचा आदर्श विंदा करंदीकर होते. विंदाचा `मृद्गंध’ हा काव्यसंग्रह वाचला आणि तेव्हापासून कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यांना लाभली. त्यांच्या कवितांनी मला घडविले, असे त्या सांगत. `हायकू’ हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार कमीतकमी तीन ओळीत जीवनार्थ सांगतो. हा काव्यप्रकार मराठीत चारोळ्याच्या जवळ जाणारा. या `हायकू’ला जे स्थान जपानीत मिळालं ते मराठीतही मिळालं, ते फक्त शिरीष पैंमुळेच. मराठीत `हायकू’ लोकप्रिय करण्याचं सारं श्रेय शिरीष पै यांनाच. त्यांनीच हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला आणि रुजवला.

जवळपास साडेतीन महिन्यांत दैनिकाची तयारी करून, कोणतेही भांडवल जवळ नसताना आचार्य अत्रे यांनी १५ नोव्हेंबर १९५६ ही तारीख निवडली, त्या दिवशी धडाकेबाज ‘मराठा’ सुरू झाला. शिवाजी पार्कच्या सभेत ‘मराठा’ दैनिकासाठी जनतेने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते आणि त्या सभेत थाळी फिरली होती. त्या थाळीमध्ये त्या दिवशी जमा झालेली प्रचंड रक्कम होती. पाच रुपये दहा आणे. मराठाचा जन्म असा पाच रुपये दहा आण्यातून झाला आणि त्यानंतर पुढील चार वर्षात महाराष्ट्राच्या शत्रूंना जेरीला आणून हे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात ‘दैनिक मराठा’ने सिंहाचा वाटा उचलला.

दुर्दैवाने काही दुष्ट डावपेच करून आचार्य अत्रे यांच्या पश्चात खोट्या मृत्यूपत्रातून ‘मराठा’ आणि ‘शिवशक्ती’ इमारत हडप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यांचा कायदेशीर सामना करताना आचार्य अत्रेच्या कन्या शिरीष पै या दाम्पत्याचे सगळे सामर्थ्य आणि आर्थिक शक्ती पणाला लागली. त्यात ‘मराठा’च्या कर्मचा-यांचा संपही डाव्या कम्युनिस्ट पक्षाने घडवून आणला. कर्जाचा डोंगर वाढत गेला. परंतु खोटे मृत्यूपत्र सादर करणा-यांना न्यायमूर्ती तुळजापूरकर यांनी सणसणीत निकाल देऊन उघडे पाडले. पण तिथपर्यंत महाराष्ट्र बँकेचे कर्ज ५० कोटींवर गेले होते. त्या काळात एवढे कर्ज फेडणे शक्य नव्हते.

आचार्य अत्रे यांच्या मृत्यूनंतर सलग सहा वर्षे अतिशय प्रभावीपणे चाललेल्या ‘दैनिक मराठा’चे संपादन शिरीष पै च करत होत्या आणि प्रशासकीय बाजू व्यंकटेश पै सांभाळत होते. पण या ‘मराठा’ला कुणाची तरी दृष्ट लागली. आर्थिक आणि कायदेशीर लढाईत पै कुटुंब पिचून गेले आणि नाइलाजाने ‘मराठा’ बंद करावा लागला. परंतु याही परिस्थितीत एकाही कामगाराचा एकही पैसा न बुडवता सर्वाचे सर्व हिशेब चुकते करून पै दाम्पत्याने प्रत्येक कामगारांची पै आणि पै चुकवली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचे लढवय्ये आचार्य अत्रे यांची स्मृती डोळयांसमोर नेहमी उभ्या राहतात .

शिरीष पै आपल्यातून निघून गेल्या..! ‘अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या’! हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कस्तुरी, ऋतुचक्र, चैत्रपालवी, आतला आवाज, कांचनबहार, पप्पा व वडिलांचे सेवेशी यांसारखी त्यांची पुस्तके आणि असंख्य हायकू वाचून काही वर्षे झाली, पण आजही ती आठवतात. विविध क्षेत्रातील त्यांचा मुक्त वावर लोभसवाणा होता..! येत्या दहा हजार वर्षांत अशा बाई होणार नाहीत. शिरीषताईंना भावपूर्ण आदरांजली!!

कवयित्री शिरीष पै यांची एक कविता सादर करतोय…

ह्रदय अर्पण करतात
ती माणसं निराळीचं असतात…
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेव्हा
नदीहून बेफाम होतात.
कोसळतात खोल तेव्हा
किती उंच जातात…

जशी हसतात फुलं,
पूर्ण उमलतात,
उधळतात रंग, गळून पडतात.
नियतीचा सहज स्वीकार
ह्रदय देणारेचं करतात…

अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून
त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण
त्यांच्यातून नित्य पाझरतात..
ज्यांची दारे बंद होतात
त्यांनाही आपले ह्रदय देतात…
ह्रदय अर्पण करतात
ती माणसं निराळीचं असतात..

– गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..