नवीन लेखन...

आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणा‍रे कविवर्य वा. रा. कांत

कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा ‘रुद्रवीणा’ हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. ‘रुद्रवीणा’ या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन्‍ भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.

वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसि‌द्धी परांगमुखच राहिले. साठ वर्षाच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण १४ काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय १० अनुवादित ग्रंथ, ११ नाट्यकाव्यं, २ नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून ‘दोनुली’ हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिलं आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं – ‘मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो!’

ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षानं परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील ‘राजघाट’ ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढ्याच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लि‌हिलेली ‘भिंतीला फुटले पंख’ ही कविता – एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणाऱ्या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतििदर्शी, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदुःख, प्रीतितवियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंतःर्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होतं. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात ‘मावळते शब्द’मध्ये लिहतात –
‘जे शोधित होतो जीवनात दिन-रात
ते नाही सापडले कधीही शब्दात
शब्दातूनी शब्दच फिरूनी हाती आला
दोन्हीतूनी अंती अर्थ गळूनिया गेला
कविताही काय अंती एक निसटणे
लाटांची लीला गळ टाकोनी बसणे -‘

आपल्या साठ वर्षांच्या काव्यलेखनानंतरही कांतांची ही गळ टाकून बसण्याची अन्कयवितेची मासोळी गळातून निसटून जाण्याची व्यथा म्हणजेच अजूनही सर्वपूर्ण कविता हाती लागायची आहे ही अतृप्ती दाखवूते. विचारांची परिपक्वता, प्रतिभेची प्रगल्भता व व्यापक मानवतावादी दृष्टिरकोन या कलागुणांवर आरुढ असलेली कांतांची कविता पुढे जीवनानुभूतीचं गहिरेपण घेऊन विशाल पण तितकीच व्यापक अन्‍ गहनखोल जलाशयासारखी आहे. काठावर बसून या जलाशयावरचे तरंगच तितके आपल्याला पहायला मिळतील.

मराठी वाङ्मयाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केलं. निदान कांतांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात तरी या वास्तवाचा मराठी समीक्षकांनी व साहित्य रसिकांनी मोकळ्या व उदात्त मनाने स्वीकार करायला हवा आहे. प्रा. डॉ. उषा जोशींनी ‘पंचधारा’च्या कांत विशेषांकात कांतांच्या कवितेबद्दल आदरभाव व्यक्त करीत असताना लिहिलं आहे- ‘कांतांच्या काव्यरचनेत अनेक विभ्रम तसेच रचनेचे अनेकविध बंध आहेत. त्यांच्या विशिष्ट भाववृत्तीतून निर्माण झालेली कविता सदैव सतेज, टवटवीत, रसरशीत आहे. त्यांच्या कवितेची तुलना कुणा इतर कवीबरोबर करावी हा एकदम धोकादायक व निसरडा प्रांत आहे. कांतांची कविता ही अलौकिक सौंदर्याचे वरदान घेवून आलेली आहे. ती चिरतरुण, सुंदर व गुणसंपन्न आहे.’ डॉ. उषा जोशींचं कांतांबद्दलचं, त्यांच्या कवितेबद्दलचं मत सर्वथा बरोबर आहे. कारण स्वतः कविवर्य कांतांना शंभर वर्षांनंतर आपल्या कवितेचं भाकीत माहित होतं. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात कांत म्हणतात –
दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
-माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात
माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

वा.रा कांत यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मु.वा कांत / म.टा

वा.रा कांत यांची काही गाणी
त्या तरुतळी विसरले गीत
बगळ्यांची माळ फुले
राहिले ओठांतल्या ओठांत
सखी शेजारिणी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..