कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात.
हा दिवस साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.
इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण स्पष्ट बोलून दाखवत नाही.
मराठीसंबंधी आपण सगळयांनी मनावर घ्यायला पाहिजे नाहीतर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते. १९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत.
यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. आपण हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार?
शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात. पण हे लक्षात न घेतल्यामुळे आपली भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही निजभाषकांचा तीवर विश्वास बसत नाही. मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे आणि तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
भाषेचा प्रश्न हा मूलत: आर्थिक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते. आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून.
चला संकल्प करू या आजपासून मी माझ्या रोजच्या जीवनात मराठीचा वापर करीन. अगदी रोजच्या जीवनात नाही जमले तरी माझ्या सामाजिक जीवनात म्हणजेच व्हॉट्सअप,फेसबुक पासून मी मराठीचा वापराची सुरवात करीन.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
व्हॉट्अपसाठी मराठीतील कळफलक (keyboard)
https://play.google.com/store/apps/details?id=com.klye.ime.latin
Leave a Reply