आर्या आंबेकरची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.
तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्स मध्ये तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती. आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली.
‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्याला माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. नुकतीच आर्या आंबेकर अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. ती सध्या काय करते या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply