पुणे येथील मानसतज्ज्ञ आणि करिअर काऊन्सेलर मयुरेश उमाकांत डंके यांचा WhatsApp वरुन आलेला लेख
१० वी-१२वी चे निकाल आता लवकरच जाहीर होतील. मुलं फारच कमी आणि अर्धवट माहितीवर करिअरचे निर्णय घेतात, असं दिसतं. हे फारच धोकादायक आहे. उत्तम शिक्षणाकरिता आपलं गाव, आपला जिल्हा, आपलं राज्य ओलांडून पुढं जाणं आवश्यकच आहे. पण मुलं आणि पालक दोघंही असा काही निर्णयच घेत नाहीत.
आपण जो काही शैक्षणिक अभ्यासक्रम निवडीचा निर्णय घेऊ, तो निर्णय घेताना शिक्षण संस्थांविषयीची माहितीसुद्धा घेतलीच पाहिजे. या अभ्यासक्रमाचं सर्वोत्तम शिक्षण देणा-या संस्था भारतात कुठं-कुठं आहेत, याची माहिती विद्यार्थी आणि पालक अजिबातच घेत नाहीत.
जवळपासच्या कॉलेजचा अट्टाहास कशासाठी?
‘आपलं बाळ’ ही मानसिकता आता पालकांनी बदलायला हवी. घराचा उंबरा ओलांडायलाच हवा.
माझ्या आताच्या आंध्रप्रदेशच्या प्रवासात मी अनेक कॉलेजेसना भेटी दिल्या. तिथली शैक्षणिक व्यवस्था खरोखरच अप्रतिम आहे. कॉलेजेसचे कॅम्पस सुद्धा सुंदर आहेत. लायब्ररीज् उत्कृष्ट आहेत. पण, तिथं मराठी मुलं जायलाच तयार नाहीत. मी काही मुलांशी आणि पालकांशी चर्चा केली. ‘रोज आमटी-भात कोण खाणार? मला नाही जमणार.’ अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
मी तिथं हत्तींवरच्या उपचारांचं आणि प्रशिक्षणाचं केंद्र पाहिलं. चहा आणि कॉफीवरच्या प्रक्रियेची प्रशिक्षण केंद्रं पाहिली. केळी प्रक्रिया प्रशिक्षणाचा कोर्स पाहिला. नारळ प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र पाहिलं. मुलं तिथं या गोष्टी शिकत आहेत.
पर्यटन व्यवसाय आणि अन्नप्रक्रिया व्यवसायात आता प्रचंड मोठी क्रांतीच तिथे घडून येत आहे, असं दिसलं. आपल्याकडच्या मुला-मुलींना याविषयी कणभरही माहिती नाही,याचं वाईटही वाटलं.
२०-२२ वर्षं वयाची मुलं जेव्हा स्वतःचा व्यवसाय तिथं चालवताना दिसतात, मला फार आश्चर्य वाटतं. अशाच एका मुलाची माझी मैत्री झाली. श्रीनिवास. वय २०. कॉफी विकतो. मासिक उत्पन्न फार काही नाहीय,फक्त ७५,००० रूपये. त्याचे तीन कॉफीचे स्टॉल्स आहेत. वडील, तो स्वतः आणि त्याचा धाकटा भाऊ (वय १८) हे तिघे तीन स्वतंत्र स्टॉल्स पाहतात. अन्य दोन स्टॉल्सवरही साधारण एवढीच विक्री होते. कुटुंबाचं एकत्रित मासिक उत्पन्न २,२५,००० रूपये फक्त. वडील जीप ड्रायव्हर होते. त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावर त्यांनी ड्रायव्हींग थांबवलं. मग श्रीनिवासनं हा व्यवसाय सुरू केला.
वयाच्या विसाव्या वर्षी अडीच लाखाची मासिक उलाढाल करणारा तो मुलगा आपल्याकडच्या मुला-मुलींना दिसणार नाही. त्यांना सैराटचे हिरो-हिरोईन्स दिसतील. हाच फरक आहे. कागदावरचं करिअर आणि प्रत्यक्षातलं करिअर यात फार मोठा फरक असतो.
‘मी काय रस्त्यावर उभारून कॉफी विकू का?’ असा प्रश्न विचारून आपल्याकडची मुलं वाद घालत बसतील. पण, प्रॅक्टीकल विचार करणार नाहीत.
एका गावात मल्टीप्लेक्स नाही, म्हणून एका मुलीनं इंजिनिअरींग ची मिळालेली अॅडमिशन सोडलेली मी पाहिली आहे. आणि वडीलांना पुण्यातच अॅडमिशन घ्यायला लावली. आता त्या मुलीचं कॉलेज मल्टीप्लेक्समध्येच भरत असणार आणि ही मुलगी ७० एमएम पडद्यावर इंजिनिअरींगचा अभ्यास करत असणार. वा रे विद्यार्थी !
याउलट, आपल्याकडच्या मुलांचे करिअर प्लॅन्स पहा. ‘पुणे युनिव्हर्सिटी पाहिजे. बाकीच्या युनिव्हर्सिटीज् ना व्हॅल्यू नाहीय ना’ असं मुलं-मुली म्हणतात. रिझर्वेशन पाहिजे, फी माफी पाहिजे, मार्क नसतानाही नामवंत कॉलेजात पाहिजे त्या ब्रँच ला अॅडमिशन हवी, नोकरीत रिझर्वेशन पाहिजे. या असल्या कुबड्यांवर करिअर होत नाही.
स्वतःचा व्यवसाय – नको. का बरं? कष्ट कोण करणार?
शेती – नको. का बरं? घाम कोण गाळणार?
ही मानसिकता मराठी विद्यार्थी कधी बदलणार?
आंध्रप्रदेशातल्या एका २६ वर्षांच्या मुलानं गोमूत्र प्रक्रिया उद्योग सुरू केला. महिन्याकाठी २ ते ३ लाखाचं उत्पन्न तो मिळवतोय. त्याची भेट झाली. तो ग्रॅज्युएट आहे आणि १०० गायींचा गोठा व्यवस्थित सांभाळतो आहे.
तिरूमलामध्ये कॉटनच्या स्पेशल साऊथ इंडीयन लुंग्या आणि कॉटन साड्या विकणारे बहीण-भाऊ मला भेटले. दोघेही कॉमर्सचा अभ्यास करतात, एक्सटर्नल स्टुडंट आहेत. दिवसभर स्टॉल चालवतात. साधारणपणे ५० हजार रूपयांची उलाढाल दर महिन्याला करतात. त्यांना तिरूमलामध्ये स्वतःचं शोरूम चालवायचंय. असेच कष्ट करत राहिले तर त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. समोर उपलब्ध असलेली संधी सोडायची नाही, हा मंत्र तिथल्या मुलांनी अगदी परफेक्ट उचललेला दिसतो.
पुस्तकी शिक्षणाच्या मर्यादा या मुलांनी अचूक ओळखलेल्या आहेत, हे माझ्या लेखी फार महत्वाचं आहे.
तिथल्याच एका मुलानं मला विचारलं की,पूर्ण मराठी स्वयंपाक करता येणा-या मुलांना माझ्याकडे पाठवता का? मी त्यांना काम देईन. मी विचारलं, ‘पगाराचं काय?’ तो म्हणाला, ‘राहण्याची सोय करीन आणि रोज ३००० रूपये देऊ शकेन.’ मी उडालोच. महिन्याला ९०,००० रूपये?
रिक्षा चालवणं, टमटम चालवणं, वडापाव किंवा कच्छी दाबेलीची गाडी चालवणं, यापेक्षा ही ऑफर मला जास्त उत्तम वाटली.
स्वप्नं पहावीत. जरूर पहावीत. पण, त्या स्वप्नांना वास्तविकतेचा आधार नको का?
खरं करिअर असं काही सहज सरळ मिळत नाही. घाम गाळावा लागेल, वेळेची पर्वा करून चालणार नाही,कष्टांची मोजदाद करायची नाही, तक्रारखोरपणा सोडून द्यायला हवा.. मगच घडेल उत्तम करिअर…! मराठी मुलं आणि त्यांचे पालक हे समजून घेतील का? आणि तो धन्य दिवस उगवणार कधी?
— मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ – करिअर काऊन्सेलर
आस्था, पुणे
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
Leave a Reply