दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही.
मुळात अरबी-पर्शियन किंवा भारतीय भाषांमधील लोककथा आधी संकलित होऊन प्रसिद्ध झाल्या इंग्रजीत. त्यावरून पुढे त्यांचे जे मराठी भाषांतर झाले ते फार कमअस्सल आणि बेजबाबदारीने केले आहे, आणि त्यामुळे मराठी वाचकांचेच कसे नुकसान झाले ते अनेक उदाहरणे देऊन दुर्गाबाई सांगतात. रिचर्ड बर्टनच्या ‘अरेबियन नाईट्स’चे उदाहरण प्रसिद्धच आहे. इंग्रजीतून कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ या नावाने मराठीत भाषांतर केले.(चित्रशाळा १८९०) पण त्यावर कुठेही रिचर्ड बर्टनचे नाव नाही. ते इतके लोकप्रिय झाले की त्याची संक्षिप्त रूपांतरे पुढे येत गेली आणि मराठीत बर्टनचे नावच वाचकांना कळले नाही. मूळ अरबी कथांचा हा इंग्रजी मार्फत झालेले संक्षिप्त लोकप्रिय रूपांतरच मराठीत रुजल्यामुळे अरबी भाषेतील कथांच्या मूळ रूपापासून मराठी वाचक वंचित राहिला आणि बर्टनप्रमाणे अभ्यासपूर्ण भाषांतराचा मार्गच मराठीत बंद झाला, ही दुर्गाबाईंची खंत होती. (पुढे गौरी देशपांडे यांनी नव्याने अरेबियन नाईट्सचे मराठी भाषांतर केले, ते मात्र मी स्वतः पाहिलेले नाही. माझ्याकडे चिपळूणकरांचे खंड आहेत.)
मराठीत ‘हातीमताई’ फार लोकप्रिय पुस्तक आहे. ते मूळचे फारसीतील. डंकनने ते प्रथम इंग्रजीत आणले. त्यावरून ह्याचे मराठीत संक्षिप्त रूपांतर कृष्णराव माधवराव प्रभू यांनी केले आणि ते इतके लोकप्रिय झाले की मराठी भाषकांना आता डंकनच्या नावाचे विस्मरण झाले आहे. ‘गुलबकावली’ हे हातिमताई एवढेच लोकप्रिय असे पुस्तक. ते गुजरातीतून प्रथम विनायक सदानंद नवलकर यांनी मराठीत रूपांतरित केले. ग्रामीण भागात हे पुस्तक फारच लोकप्रिय आहे. पण त्या कथेचे मूळ रूप मराठी संशोधन क्षेत्रासाठी दुर्लक्षितच राहिले.
‘पर्शियन नाईटस’ उर्फ ‘किशबरशिया’ या ग्रंथाचे रावजी मनोहर ताकभाते यांनी इंग्रजीवरून मराठीत रूपांतर केले आहे. ‘इसापनीती’चेही इंग्रजीवरूनच मराठीत पहिले मराठी भाषांतर सक्खन पंडित यांनी ‘बालबोध मुक्तावली’ या नावाने केले. सक्खन पंडित हे तंजावरच्या सरकोजी राजांच्या दरबारी होते. बिरबल व बादशहा यांच्या कथांचे भारतीय भाषांत पहिले भाषांतर मराठीत परशुराम भिकाजी साठे यांनी केले आहे.
मूळ ग्रंथाचा स्रोत माहीत नसल्यामुळे बनावट लोककथासुद्धा भाषांतर होऊन मराठीत कशा रूढ झाल्या, त्याचे उदाहरण म्हणजे विल्फ्रेड डेक्स्टर यांचे मराठी हे मराठी लोककथांवरचे “मराठी फॉक्टेल्स’ हे इंग्रजी पुस्तक. या पुस्तकात एक लोककथा वगळता इतर सर्व ‘आनंद’ मासिकात आलेल्या उपदेशपर गोष्टींचे (ज्या मुळात लोककथाच नाहीत!) भाषांतर आहे. परंतु दुय्यम साधने वापरून संशोधन करणाऱ्यांना मराठी संशोधकांना त्याही लोककथाच आहेत असे वाटते.
थोडक्यात मराठी अनुवादकांची मूळ ग्रंथाकडे जाण्याची तयारी नसल्याने आणि इंग्रजीसारख्या परभाषेवर अवलंबून राहिल्याने एकूणच सांस्कृतिक नुकसान कसे होते, ते अधोरेखित करतात.
– प्रमोद मुनघाटे
संकलन – शेखर आगासकर
Leave a Reply