१९७१ साली मी नटराज टाॅकीजला गजानन जहागिरदार दिग्दर्शित, ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा कृष्णधवल चित्रपट पाहिला. त्यामध्ये श्रीकांत मोघे व आशा पोतदार, प्रमुख भूमिकेत होते व एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत एक नवीन चेहरा पहिल्यांदाच दिसला. तेव्हाच मला खात्री पटली होती की, हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे. आणि घडलंही तसंच. आज त्या चित्रपटाला ५१ वर्षे पूर्ण झाली. तरीही, याची घोडदौड सुरूच आहे.
४ जून १९४७ साली मुंबईत या कलाकाराचा जन्म झाला. त्याची मोठी बहीण, ही अशोक कुमार उर्फ दादामुनींची जबरदस्त फॅन होती. तिने आग्रह धरला की, माझ्या भावाचं नाव ‘अशोक’च ठेवायचं. हाच तो, आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा, बहुरंगी व बहुढंगी भूमिका, लीलया साकारणारा. अशोक सराफ!
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या इच्छेखातर, स्टेट बॅंक आॅफ इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या अशोकला नाटकात काम करण्याचं वेड होतं. ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकात, त्यांची नाना पाटेकरशी घनिष्ठ मैत्री झाली. त्यावेळी अशोकला २५० व नानाला ५० रुपये नाईट होती.
‘दोन्ही घरचा पाहुणा’ नंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ पासून, अशोक सराफ यांचे दिवस पालटले. त्यातील दादांचा बेरकी मित्र, महादू हवालदारची भूमिका तुफान गाजली. पुढचा ‘राम राम गंगाराम’ चित्रपटातील ‘म्हमद्या खाटीक’ला कुणीतरी विसरणं शक्य आहे का? ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटानंतर अशोक, पुन्हा कधीही दादांबरोबर दिसले नाहीत.
दरम्यान अशोक यांनी अनेक मराठी चित्रपट केले. महेश कोठारे यांच्या ‘धुमधडाका’ पासून लक्ष्मीकांत बेर्डेशी त्यांची जोडी जमली. दोघांनी एकत्र मिळून वीस वर्षे प्रेक्षकांचं मनमुराद मनोरंजन केलं.
सचिन पिळगांवकर सोबत अशोक यांनी विविध भूमिका साकारल्या. ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटातील अशोक यांची भूमिका, अविस्मरणीय अशीच आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील धनंजय मानेनं धम्माल केली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ मध्ये अशोक, कंडक्टर झालेले आहेत.
अशोक यांनी सर्व चित्रपटात हिरोचीच भूमिका साकारली आहे असं नाहीये. ‘कळत नकळत’ मध्ये छोट्या भाच्यांच्या, मामाची भूमिका करताना स्वतःच्या आवाजात एक बालगीतही म्हटलंय. ‘चौकट राजा’ मध्ये नंदूला समजून घेणाऱ्या अशोक यांच्या, गणाच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येतं.
अशोक आणि रंजना, ही जोडी ‘मेड फाॅर इचआदर’ अशीच होती. त्यांची ‘केमिस्ट्री’ पडद्यावर पहायला, धमाल मजा यायची. ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासू वरचढ जावई’, ‘खिचडी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’ हे चित्रपट कधीही पहा, तुम्ही ‘ताणतणाव’ विसरुन जाल, हे नक्की.
अशोक यांनी खलनायकही रंगवले आहेत. ‘अरे संसार संसार’ मधील साकारलेला, वासनांध सावकार पाहून ‘मदर इंडिया’ मधील कन्हैयालाल आठवतो. ‘अनपेक्षित’ नावाचा चित्रपटही तसाच वेगळा आहे.
दूरदर्शनच्या ‘हम पाॅंच’ मालिकेतील, शोभा आनंदचे पती झालेले अशोक, अनेक वर्षे हसवत होते. हिंदी चित्रपटात देखील अशोक यांनी लक्षवेधी भूमिका केलेल्या आहेत. ‘दामाद’ पासून त्यांनी हिंदीत पाय रोवले. ‘मेरी बीवी की शादी’, ‘करण अर्जुन’, ‘खुबसूरत’, ‘कोयला’, ‘येस बाॅस, ‘सिंघम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी अजोड भूमिका केलेल्या आहेत. ‘करण अर्जुन’ मधील ‘राणाऽ तो, अब गयोऽ’ हे पालुपद, त्यांच्या खास शैलीत ऐकायला धमाल वाटते. ‘सिंघम’ मधील, त्यांचा मराठी हवालदार लक्षात राहतो.
अलीकडे अशोकजी निर्मिती सावंत बरोबर ‘व्हॅक्युम क्लीनर’ या धमाल विनोदी नाटकातून भेटत आहेत. आजचा शिवाजी मंदिर मधील प्रयोग, प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवलेला होता.
त्यांच्या चित्रपटांची पेपर पब्लिसिटी केल्यामुळे, प्रिमिअर शोचे वेळी अशोकजींची अनेकदा भेट झाली, मात्र बोलणं असं कधी झालं नाही. ज्यांच्या फक्त नावावर चित्रपट चालतात, त्यांना जाहिराती कुणी केलेल्या आहेत किंवा कशा झालेल्या आहेत याबद्दल फारसं स्वारस्य नसतं.
अशोक सराफ यांनी, स्टेट बॅंक ऑफ इंडियाची नोकरी सोडलीच नसती तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी व रंगमंच एका ग्रेट कलाकाराला मुकला असता. तरीदेखील अशोक सराफ यांच्या खात्यावर कोट्यावधी रसिक प्रेक्षकांचे, अब्जावधी हशे आणि टाळ्या जमा आहेत.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-६-२२.
Leave a Reply