नवीन लेखन...

लेखक पु. भा. भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी धुळे येथे झाला. मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे.

भावे घराणं मूळचं कोकणातलं. पण नोकरीधंद्याच्या निमित्तानं त्यांच्या वाडवडिलांनी विदर्भात स्थलांतर केलं. भाव्यांचा जन्म धुळ्याचा. त्यांचे वडील भास्करराव लष्करात डॉक्टर होते. आज इथं तर उद्या तिथं असं भाव्यांचे शालेय शिक्षण झालं. इंग्रजी चवथीपर्यंत ते नागपूरला पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकले. नागपूरच्या ‘ सावधान ’ नावाच्या वृत्तपत्रातून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. इथेच त्यांच्या लेखणीला धार चढली. त्यांची स्वतंत्र अशी लेखनशैली बनली. ‘ सावधान ’ वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी स्वत:चेच ‘आदेश ’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. या आदेशमधून त्यांनी लेखणीच्या तलवारीने अनेकांना घायाळ केले, रक्तबंबाळ केले, अनेक शत्रू निर्माण केले; तसेच समविचारी मित्रही जोडले. पत्रकार भावे नाव निघताच ‘आदेश’ विरुद्ध ‘अत्रे ’, ‘ भावे’ विरुद्ध ‘ खांडेकर ’ असे अनेक वाद आठवतात . इंग्रजी चवथीनंतर भावे मुंबईत आले. तेथेही अनेक शाळा बदलत बदलत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि मुंबईच्या कॉलेजमधून बी. ए. एलएल.बी.ची पदवी संपादन केली. भाव्यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम. मराठी बोलण्याविषयी टोकाचा आग्रह. बोलताना, लिहिताना इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळणार. पण त्यांचे इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते, हे विसरून चालणार नाही.

भावे एल . एल. बी. झाले, पण काळा कोट चढवून त्यांनी कोर्टात वकिली कधीच केली नाही. त्यांनी आपले लक्ष वळवले साहित्याकडे. कथा, कादंबरी, वृत्तपत्रीय लेखन, वक्तृत्व, चित्रपट आणि नाटक अशा साहित्याच्या विविध क्षेत्रांत त्यांनी लक्षणीय कामगिरी केली .‘विषकन्या’ या आपल्या पहिल्या नाटकामधून भावे नाटककार म्हणून रंगभूमीकडे वळले. मुंबई-मराठी साहित्य संघाने हे नाटक रंगमंचावर आणले असावे. चित्तरंजन कोल्हटकर या नाटकात वेडय़ा मजनूची भूमिका करीत असत. एका प्रयोगाला पु. भा. भावे यांचे बंधू डॉ. भावे आले होते. त्यांना कोल्हटकरांचे काम खूप आवडले. त्यांनी नागपूरला पत्र लिहून पु. भा. भावे यांना कळवले होते. पेंढारकर त्या काळात ललितकलादर्श या आपल्या वडिलांच्या नाटक कंपनीच्या पुनस्र्थापनेच्या प्रयत्नात होते. त्यांनी न. ग. ऊर्फ बन्याबापू कमतनूरकरांचे ‘ श्री ’ नाटक पुन्हा रंगमंचावर आणले. पण त्यांना नवीन नाटकाची अत्यंत गरज होती. भाव्यांचे ‘स्वामिनी’ नाटक त्यांनी रंगभूमीवर आणायचे ठरविले. त्यात भूमिका करण्याचा भावे यांनी चित्तरंजन कोल्हटकरांना आग्रह केला. भावे यांचा शब्द मोडणे कोल्हटकरांना शक्य नव्हते. शिवाय स्वामिनी नाटकातील भूमिकेमुळे कोल्हटकरांनाही स्वतंत्र भूमिका साकारण्याची संधी मिळणार होती. अनेक नाटकांमधून त्यांच्या तळीराम, नूपुर, कामण्णा, खंडोजी अशा भूमिका गाजत होत्या. नाटके, चित्रपटातील भूमिका अशा अत्यंत व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून त्यांनी ‘स्वामिनी’च्या तालमी जमेल तशा केल्या.

भालचंद्र पेंढारकर, नटवर्य मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, मंगला संझगिरी , लीला मेहता, नलिनी बोरकर असा नटसंच होता. रंगीत तालीम साहित्य संघाच्या खुल्या रंगमंचावर मध्यरात्री सुरू झाली. पण अतिश्रमामुळे कोल्हटकरांना झोप आवरत नव्हती. अखेर रंगीत तालमीचा बट्टय़ाबोळ झाला. भाव्यांचे स्नेही बाळासाहेब काळे रंगीत तालमीला आले होते. ते म्हणाले, चित्तरंजनमुळे नाटक फसणार , परंतु चित्तरंजन कोल्हटकर यांनी अप्रतिम काम केले कारण त्याआधी पाठांतर नीट नसल्यामुळे चित्तरंजन यांची खरडपट्टी भावेकाकांनी काढली होती आणि या नाटकाने पु. भा. भावे यांना यशस्वी नाटककार आणि पेंढारकरांच्या जुन्या ललितकलेला नवे रूप मिळवून दिले. ललितकला या संस्थेनेच १५ मार्च १९६० रोजी भाव्यांचे ‘पडछाया’ हे नाटक रंगमंचावर आणले, पण ते फारसे यशस्वी झाले नाही.

‘वाकुल्या’ हा त्यांचा विनोदी लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे. भावे यांची कल्पनाशक्ती समाजात प्रतिष्ठा पावलेल्या अनेक प्रश्नांची दुसरी बाजू अचूक हेरते. त्याला अवलोकनाची जोड देऊन आपल्या प्रभावी भाषाशैलीने वाचकांसमोर मांडते.

भारतीय स्त्रीच्या पावित्र्याविषयी, समर्पणाविषयी, त्यागाविषयी त्यांना प्रचंड आदर होता. पण स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या छचोरपणाबद्दल त्यांना मनस्वी संताप होता.

त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.

पु. भा. भावे आणि वाद-संघर्ष असे जणू काही समीकरणच ठरून गेले होते. भाव्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भरलेले ५२ वे साहित्य संमेलन वादग्रस्त ठरले याची आठवण अनेकांना आहेच.

‘विषकन्या’, ‘स्वामिनी’, ‘पडछाया’, ‘महाराणी पद्मिणी’ आणि ‘सौभाग्य’ ही त्यांची एकूण पाचच नाटके. त्यातील ‘सौभाग्य’ हे नाटक त्यांच्या निधनानंतर रंगमंचावर आले. म्हणूनच अहमदनगर येथे भरलेल्या १९७४ सालच्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

‘महाराणी पद्मिनी’ हे भाव्यांचे ऐतिहासिक नाटक. अल्लाउद्दीन खिलजी आणि चितोडची महाराणी पद्मिनी यांच्या जीवनावरचे नाटक. प्रभाकर पणशीकर यांच्या नाटय़संपदा या संस्थेने २८ मे १९७१ रोजी ते रंगमंचावर आणले. नाटक चांगले होते, पण चालले नाही. भाव्यांची लेखणी मात्र या नाटकात बहरली होती. भावे हे प्रखर हिंदुनिष्ठ होते. हिंदूंच्या मानसिकतेची त्यांनी केलेली परखड मीमांसा समजून घेणे ही आजच्या काळाचीच गरज आहे.

भावेकाका डोंबिवलीत रहात असत . गोरा लालसर वर्ण , निळे डोळे असे भावे काका भाजीबाजारात भाजी घेताना बघणे हा एक वेगळाच आनंद होता. शं . ना. नवरे हे त्यांचे जवळचे मित्र होते. आचार्य अत्रे यांनी त्याच्या शेवटी सर्व वैर विसरण्याचे ठरवून पु.भा. भावे यांना बोलवणे पाठवले परंतु भावेकाका त्यांना भेटायला गेले नाहीत. एकदा एखाद्याचा हात सोडला की परत ते तेथे जात नसत. आपल्या तत्वासाठी ते अत्यंत कठोर होते. भाषण करताना त्यांचा आवाज विलक्षण वेगळा होत असे . त्याच्या त्या आवाजातल्या काही ओळी आजही आठवतात . ते म्हणाले होते , ‘ म्हणे शिवाजी महाराजांनी खानाचा विश्वासघात केला , खानाने कट्यार लपवून आणली होती ते काही महाराजांना फळे कापून देण्यासाठी नाही , किंवा महाराजांनी वाघनखे आणली होती ती खानाची पाठ खाजवण्यासाठी नाही , शत्रूचा नेहमी विश्वासघातच करण्याचा असतो .’ आजही त्याचा तो आवाज माझ्या कानात घुमतो आहे.
पु. भा. भावे यांचे रक्त आणि अश्रू , विठ्ठला पांडुरंगा हे लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे अकुलीना, व्याध , दर्शन , वर्षाव , अडीच अक्षरे , दोन भिंती , रखमाच्या मुली या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची सतरावे वर्ष ही लघुकथा खूपच गाजली. पु. भा. भावे यांनी अनेक लघुकथा लिहिल्या पुढे त्यांची पुस्तके झाली. त्यांची नावे परंपरा , प्रतारणा, सार्थक , साडी, ठरीव ठशाची गोष्ट अशी होते. त्याचे ‘ प्रथम पुरुषी एकवचनी ‘ हे आत्मचरित्र प्रकशित झालेले आहे. पु. भा. भावे हे डोबिवलीत रहात होते .आजही अनेक जुन्या डोबिवलीकरांना त्यांची आठवण आहे ते कसे भाजी घ्यायला बाजरात यायचे , कुणाकडे गेले तर हाताने कडी वाजवणार नाहीत की बेल वाजवणार नाहीत तर हाताने दरवाज्यावर टकटक करत असत. कारण त्याच्या आधी येणाऱ्याने ‘ अस्वच्छ ‘ हाताने बेल वाजवलेली असेल तर ? म्हणून ते दारावर टकटक करत. पु. भा. भावे हे असे एकमेव लेखक की ज्यांनी कधी नोकरी केली नाही , ते नोकरीला ‘ चाकरी ‘ म्हणत .त्याबद्दल त्यांची स्वतंत्र मते होती.

भावे काका खूप आजारी होते तेव्हा त्यांनी निक्षून सांगितले होते माझ्या मृत्यूनंतर माझा फोटो काढायचा नाही. म्हणून त्याची आजारी असतानाच दूरदर्शनने छोटी चित्रफीत केली होती .

पु. भा. भावे यांचे १३ ऑगस्ट १९८० रोजी डोबिवलीत निधन झाले.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..