नवीन लेखन...

‘बर्थ कंट्रोल’ शब्दाची जननी मार्गारेट सॅनगर

‘बर्थ कंट्रोल’ शब्दाची जननी

लेडी ऑफ कॉन्ट्रासेप्शन’ किंवा ‘कुटुंबनियोजनाची जननी’ किंवा गरिबांची वाली म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात सुप्रसिद्ध झालेली अमेरिकेतील महिला म्हणजे मागरिट सॅनगर! कुटुंबनियोजनासारखा तत्कालीन अश्लाघ्य विषय मागरिटने हाताळल्याने अत्यंत धाडसी आणि शूर महिला म्हणून तिची गणना साऱ्या विश्वात केली गेली आहे.

कुटुंबनियोजनासारख्या विषयाकडे मागरिट सॅनगर आकर्षित होण्याची कारणे कोणती असावीत?

पहिले कारण म्हणजे तिच्या आईचे जीवनच! अकरा मुलांची माता असलेली आणि सात वेळा गर्भपातास जिला तोंड द्यावे लागले अशी मागरिटची आईच मागरिटला कुटुंबनियोजनाच्या कार्यास प्रेरक ठरली. आपल्या आईला अठरा वेळा ज्या प्राणांतिक वेदना झाल्या त्या मागरिटला हलवून गेल्या. तिची आई अकाली, वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षीच निधन पावली होती.

मार्गारेट अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत होती. तिच्या निवासाशेजारील वस्तीतील अत्यंत दरिद्री लोकांचे महाभयानक दुःख तिने पाहिले. तिच्या आईप्रमाणेच असंख्य गरिबांच्या घरातील स्त्रियांना अकाली आलेले आलेले मृत्यू मागरिटने पाहिले होते.

लादलेल्या प्रसूतीवेदनांमुळे, प्रसूतींमुळे मृत्यूच्या आणि अनारोग्याच्या विळख्यात सापडलेल्या स्त्रियांसाठी आपण काहीतरी करायला हवे, या जाणिवेने मागरिटला झपाटले होते. किंबहुना या विचाराच्या ठिणगीने तिच्या भविष्यातील कृतिशील जीवनास प्रज्वलित केले गेले होते.

मागरिट सॅनगर ही अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रातील एक साधीसुधी परिचारिका होती. परंतु चर्चद्वारे बाप्तिस्मा मिळाल्यानंतर या साध्यासुध्या परिचारिकेची गरिबांसाठी क्रांतिकारक स्वरूपाचा आवाज उठवणारी स्त्री झाली. सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर व्हावे तसे मागरिटच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तन झाले.

वास्तविक मार्गारेटचे स्वप्न किती साधे होते! सुखवस्तू घरातील स्त्रियांप्रमाणेच कुटुंबनियोजनाचा मार्ग गरिबांच्या घरातील स्त्रियांनाही एक ना एक दिवस मिळावा, एवढेच साधे स्वप्न मागरिटच्या मनी वसत होते. परंतु हे साधे वाटणारे स्वप्नच क्रांतिकारक ठरले. या क्रांतिकारक विचारांनेच स्त्रियांना अपत्य जन्मप्राप्तीचा हक्क मिळवून देण्याच्या चळवळीचे नेतृत्व मागरिटकडे गेले.

२० व्या शतकातील लाखो स्त्रियांच्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी तिला त्या स्त्रियांचे नेतृत्व स्वीकारावेच लागले.

मागरिट सॅनेगरचा विचार करताना आपल्याला सतत र. धों. कर्वे यांची आठवण येते. र. धों. कर्वे यांचा जन्म १४ जानेवारी १८८२ चा. आणि मृत्यू १४ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला आहे. त्यांच्या कुटुंबनियोजनाच्या कार्याचा प्रारंभ १९२१ मध्ये झाल्याची माहिती डॉ. अनंत देशमुख या त्यांच्या चरित्रकाराने दिली होती. मागरिटप्रमाणेच अमेरिकेत डॉ. राबिनसन्स आणि इंग्लंडमध्ये मेरि स्टोप्स यांनी कुटुंबनियोजनाचे कार्य केल्याचेही डॉ. अनंत देशमुख म्हणाले होते. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, र.धों. कर्वे च्या अगोदरच मागरिट सॅनगरने कुटुंबनियोजनाबाबतचे महत्त्वपूर्ण पायाभूत स्वरूपाचे कार्य केले आहे.

काही अमेरिकन जाणकारांना मागरिट सॅनगरचे कार्य मदर टेरेसाच्या कार्याशी साम्य असल्यासारखे जाणवते. अतिशय शांत जीवन जगणारी, परिचारिकेच्या व्यवसायातील आणि गृहिणीपद सांभाळणारी मागरिट सॅनगर आपल्या कुटुंबासह जेव्हा इ. स. १९१० मध्ये न्यूयॉर्क शहरात राहण्यास आली तेव्हा तिचे सारे आयुष्यच नाट्यमयरीत्या आमूलाग्र बदलून गेले.

न्यूयॉर्क शहराच्या पूर्व दिशेच्या खालील परिसरात विसाव्या शतकाच्या प्रारंभीच झोपडपट्टीचा प्रारंभ झाला होता. या झोपडपट्टीत परिचारिका म्हणून मागरिट वारंवार भेटी देत होती. याच काळात झोपडपट्टीतील गरोदर, बाळंतपणात मृत्यूमुखी पडणाऱ्या आणि बाळंतपणामुळे विकल शरीराच्या झालेल्या स्त्रिया मागरिटने पाहिल्या. त्यामुळे हवे तेव्हा आणि हवे असेल तरच अपत्यास जन्म देण्याच्या स्त्रीच्या अधिकाराबाबत मागरिटला लक्ष घालणे आवश्यक वाटले. झोपडपट्टीतील ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी मागरिट झगडत होती, त्या स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनाशी झगडत होत्या. त्या बिचाऱ्यांना कुटुंबनियोजनाचा मार्गही ठाऊक नव्हता. कुटुंबनियोजनाविषयी नुसते अज्ञानच नव्हते, तर कुटुंबनियोजन म्हणजे काय हे समजून घेण्याची पात्रताही त्यांच्यापाशी नव्हती. त्यांच्या ज्या कुटुंबात दोन किंवा तीन मुले होती त्या कुटुंबात आणखीन एक आणि आणखीन एक आणि आणखीन एक मूल जन्माला येत राहिले! ज्या मुलांचे पालनपोषण करता येत नाही, अशा मुलांना जन्म देणाऱ्या त्या माता अनेक गर्भारपणांमुळे अकाली वृद्ध झालेल्या होत्या हे मागरिटने पाहिले. स्त्रियांवर होणाऱ्या या अन्यायामुळे त्यांची वैयक्तिक हानी तर होतच होती; परंतु सामाजिक व आर्थिक क्षेत्रातही समस्या निर्माण झालेल्या होत्या. गरिबांच्या कुटुंबात जन्मास आलेल्या मुलांना जगण्यासाठी रस्त्यावर येऊन भीक मागण्याखेरीज अन्य मार्ग उरला नव्हता, हे मागरिटला तीव्रतेने जाणवत होते. परंतु नुसती हळहळ व्यक्त न करता वा गरीब स्त्रियांची वंचना तटस्थपणे न पाहता मागरिटने त्या स्त्रियांसाठी कार्य करण्याचा निश्चय केला. त्या स्त्रियांना अत्यंत आवश्यक असलेला कुटुंबनियोजनाचा सल्ला ती देऊ लागली. त्यामुळेच मागरिट सॅनगर ही त्या गरीब स्त्रियांना आपली उद्धारकर्ती वाटू लागली. अल्पावधीतच झोपडपट्टीवासी स्त्रिया ऋषितुल्य म्हणून मागरिटकडे पाहू लागल्या.

‘वुमन रिबेल’ नावाच्या नियतकालिकाची निर्मिती १९१४ मध्ये करून मागरिट सॅनगरने आणखी एक धाडसी पाऊल टाकले. ‘वुमन रिबेल’मधून स्त्री-शरीररचना आणि अपत्यनिर्मितीबाबत उघडउघडपणे वा स्पष्ट शब्दांतून मागरिट बोलू लागली. आजच्या दृष्टीने वरवर पाहता अत्यंत निष्पाप वाटणाऱ्या मागरिटच्या या कृतीमुळे अश्लीलतेच्या आरोपांखाली त्या काळी तिला अटक करण्याचे फर्मान निघाले. अखेरीस अटक होण्याचे टळले. मात्र स्त्री-शरीरावर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या संस्थेची निर्मिती करण्याच्या विचाराची ज्योत मागरिटच्या मनात जागृत झाली.

इ. स. १९१६मध्ये न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन विभागातील ब्राऊनव्हिले येथे मागरिट सॅनगरने कुटुंबनियोजन केंद्राची स्थापना केली. जगातील पहिल्याच कुटुंबनियोजन केंद्राची मागरिट सॅनगर ही अशाप्रकारे निर्माती ठरली होती. विशेष म्हणजे तिच्या या कुटुंबनियोजन केंद्राच्या उद्घाटनाबाबत तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी इटालियन, यिडिश (Yiddish) आणि इंग्रजी भाषांतून हस्तपत्रिकांचे वाटप केले होते.

आपल्या कुटुंबनियोजन केंद्राच्या संदर्भात स्त्रियांकडून मिळालेल्या प्रतिसादाबाबत मागरिटने लिहिले होते, “कुटुंबनियोजन केंद्रात स्त्रियांनी झुंबडच उडविली. आपल्या आरोग्यास विघातक ठरतील अशी आणि आपल्या पतीचा आधार ज्या आपल्या अपत्यांना नसेल अशी अपत्ये आपण होऊ देणार नाही, असा निश्चय मनाशी केलेल्या स्त्रियांची ती झुंबड होती!”
या स्त्रियांविषयीच्या सामाजिक कार्याबद्दल त्या वेळच्या सरकारने मागरिटला कोणते बक्षीस दिले? तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिला सरकारने अटक करून तीस दिवस तुरुंगात ठेवले!

मागरिटच्या वकिलाने तिची या अटकेतूनच नुसती सुटका केली नाही, तर न्यायाधीशांकडून एक ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णयच मिळविला! न्यायाधीशांनी मागरिटला दिलेल्या न्यायामुळे आणि दिलेल्या निर्णयामुळे कोणत्याही डॉक्टरांना आपल्या पेशंट्सना कुटुंब नियोजनाबाबतची माहिती देणे शक्य झाले. आपली अटकेतून सुटका झाली आणि आपल्या कार्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करून ऐतिहासिक न्याय दिला तरी आपण अजून खरी लढाई जिंकलेली नाही, हे मागरिट जाणत होती. अद्याप फारच थोड्या स्त्रियांना कुटुंबनियोजनाचा मार्ग खुला झाल्याचे तिला जाणवत होते. त्यामुळेच तिची लढाई ती अधिक जोमाने लढू लागली. मागरिटने अनेक दशके उपहास, उपरोध, चेष्टा, टवाळी आणि तुरुंगवास सोसल्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर सरकारला वाढत्या लोकसंख्येची काळजी वाटू लागली आणि मागरिटच्या विचारांतील तथ्यांशाची जाणीवही झाली. शेवटी, ज्या स्त्रियांना आवश्यक वा गरजेचे वाटेल त्यांना कायदेशीररीत्याच डॉक्टरांतर्फे कुटुंबनियोजनाबाबतचे मार्गदर्शन लेखीस्वरूपात देण्यास न्यायालयाने १९३६ साली परवानगी दिली! अशाप्रकारे मागरिटने एक ऐतिहासिक लढाई जिंकली होती. आपल्या कुटुंबाचे नियोजन करण्याचा अधिकार मागरिट सॅनगरने आपणास मिळूवन दिला. या कृतज्ञतेच्या जाणिवेने अखिल स्त्रीवर्गाने मागरिटला धन्यवादच दिले. इतकेच नव्हे, आजही जगातील कोणत्याही भागातील स्त्री मागरिट सॅनगरला संतच मानते.

मागरिट सॅनगरने अखिल स्त्रीवर्गासाठी जिंकलेली लढाई म्हणजे स्त्रियांसाठी नव्या युगाचा प्रारंभच होता. १९१० ते १९१५ या अवघ्या पाच वर्षांच्या अवधीत तीन लाख स्त्रिया प्रसूतीकाळात अमेरिकेत मृत्यू पावलेल्या होत्या. अमेरिकेतील क्रांतीपासून पहिल्या महायुद्धापर्यंत अमेरिकेत मृत्यू पावलेल्या एकूण सर्व माणसांच्या संख्येपक्षा प्रसूतीकाळात मृत्यू पावलेल्या स्त्रियांची संख्या जास्त होती हे सत्य जाणल्यास मागरिट सॅनगरच्या कार्याची महती लक्षात येते.

मागरिटला कुटुंबनियोजनासंदर्भात असंख्य स्त्रिया भेटत असत. तिचे मार्गदर्शन घेत असत. ज्या स्त्रियांना तिला प्रत्यक्ष भेटणे अशक्य होत असे, अशा स्त्रिया तिला पत्र पाठवून मार्गदर्शन घेत असे, अशा स्त्रिया तिला पत्र पाठवून मार्गदर्शन घेत असत. २० मे १९२१ रोजी मिनसोटा येथील एस. जे. नामक स्त्रीने मागरिटला लिहिलेले पत्र फार बोलले आहे. एस. जे. ने लिहिले होते.

“प्रिय श्रीमती सॅनगर,

जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर तू मला मदत करावीस, हे तुला सांगणे मला आवडेल. मी एक अकरा मुलींची माता आहे. माझी दहा मुले आज जिवंत आहेत. मी चौतीस वर्षांची उमदी तरुणी असून सध्या तीन महिन्यांचा गर्भ माझ्या पोटात आहे. माझ्या आयुष्यातील पुरुषास ही माझी चूक आहे असे वाटते; कारण आम्हास मुले आहेत. मला मान्य आहे की, ती माझीच चूक आहे! मी आज घराबाहेरील शेतावर आहे. माझ्याजवळ पैसे नाहीत आणि डॉक्टरांकडे जाण्याचा मार्गही खुंटलेला आहे.

मला जगण्याचाच विलक्षण तिटकारा वाटत असल्याने आता मी विष घेणार आहे. माझी मुले अतिशय सुदृढ आणि शक्तिमान आहेत. मी एकटीच अशी आहे, की मला दुःख सोसावे लागत आहे. तू मला काही सांगू शकशील का? किंवा मला तुणी काही मदत होऊ शकेल का? मला १७ आणि १५ वर्षांच्या मुली आहेत. त्यांना (कुटुंबनियोजनाबाबत) माहिती मिळावी आणि माझ्यापेक्षा त्या उत्तम अवस्थेत राहाव्यात अशी माझी इच्छा आहे. कारण मी अनुभवते आहे तो नरक!

-श्रीमती एस. जे. मिनेसोटा”

मागरिट सॅनगरने आपल्या जीवनकार्याचे सूत्र केवह एका वाक्यात सांगितलेले होते. ती म्हणाली होती, “मी जे सर्व काही करते ते एकाच ध्येयाने. ते ध्येय म्हणजे, सर्व मुले ही हवीशी आणि लाडकी असावीत!” “मागरिट सॅनगर, सेंटर इंटरनॅशनल, २६ ब्लीकर स्ट्रीट, न्यूयॉर्क सिटी” हा फलक असलेले आजचे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे केंद्र म्हणजे मागरिट सॅनगरच्या कार्याचे एक स्मारकच आहे!

विरोधाभास असा की, आज अमेरिकेत गर्भपाताला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच मागरिट सॅनगरच्या कार्याचे आजही शतकापूर्वीइतकेच महत्त्व वाटते. भारतात तर लोकसंख्येचा राक्षस सर्व क्षेत्रांतील प्रगती गिळूनच टाकीत आहे! निधर्मी म्हणविणाऱ्या भारताच्या लोकशाहीत जात-पात-धर्म यांचा विचार न करता कुटुंबनियोजनाचा कायदा अमलात यायला हवा? चीनसारखे धोरण भारत सरकारने अमलात आणायला हवे; परंतु भारतात हे घडणार नाही! जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावाने निवडणुका लढवून तथाकथित लोकशाहीचा डंका मिरविणाऱ्या भारतातील राजकारण्यांना कुटुंबनियोजन सक्तीचे करणे मानवणार नाही! त्यामुळेच इतर कोणत्या क्षेत्रांत नसला तरी भारत लोकसंख्येबाबत जागतिक विक्रम करीत राहील !

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..