नवीन लेखन...

मार्क ट्वेनची चरित्र कथा

साधारणपणे इंग्रजी शिकतांना टॉम सॉयरचे किंवा हकलबेरी फीनचे नाव प्रत्येकजण वाचतोच.
ते आहेत मार्क ट्वेनचे मानसपुत्र.
मराठीतले विनोद अथवा विनोदी लेखन वाचतांनाही कुठे ना कुठे सुप्रसिध्द अमेरिकन विनोदी लेखक म्हणून मार्क ट्वेनचा उल्लेख असतोच असतो.
अमेरिका तरी मार्क ट्वेनला आपला सर्वोत्तम विनोदी लेखक मानते, हे नक्की.
मार्क ट्वेनचे खरं नांव होत सॅम्युएल लॉंगहॉर्न क्लेमेन्स.
सॅम्युएलला एक मोठा भाऊ व एक बहीण होती पण सॅम्युएलची इतर तीन भावंडे लहानपणीच गेली.
त्याचे वडील जज्ज होते. तो अकरा वर्षांचा असतांनाच ते वारले.
त्यानंतर पाचवीत असतांना शाळा सोडून त्याला काम शोधावे लागले.
सुरूवातीला त्याने प्रिटींगच्या कामांत सहाय्यक म्हणून काम केले.
नंतर आपल्या भावाकडे वृत्तपत्रासाठी तो लिहू लागला व टाईपसेटींग करू लागला.
अठराव्या वर्षी न्यूयार्कमधे तो स्वत: प्रिंटर झाला.
त्याच काळांत तो संध्याकाळी न्यूयार्कच्या सार्वजनिक वाचनालयांत जाऊन वाचून स्वयंशिक्षण घेऊ लागला.
त्या काळी सर्वांत चांगला पगार मिळवून देणारं काम होतं ते वाफेवर चालणाऱ्या बोटीच्या पायलटच.
मिसिसीपीमधून बोट चालवणं कठीण काम होतं.
नदीची सर्व वळणं आणि दोन्ही बाजूंच्या तीरावरील प्रत्येक झाड व मधेच येणारा दगड माहित असावा लागे.
अंधारातही तो ओळखतां यावा लागे.
बोटीच्या कॅप्टनच्या कामाहून ते काम कठीण होतं.
सॅम्युएलने अशा पायलटचा सहाय्यक होऊन ते शिकण्यात दोन वर्षांहून अधिक काळ घालवल्यावर त्याला चालक म्हणून लायसेन्स मिळाले.
तो ज्याच्याकडे शिकला त्याचे नांव मार्श होते.
मार्शबरोबर त्याची मैत्री नंतरही कायम राहिली.
हे पायलटचं काम करतानाच सॅम्युएलला ‘मार्क ट्वेन’ म्हणजे चांगला बोटवाहक हे नांव मिळालं.
त्याच वेळी त्याने आपला धाकटा भाऊ ‘हेन्री’ ह्याला बोटीवर काम मिळवून दिले.
दुर्दैवाने त्या बोटीत बॉयलरचा स्फोट होऊन त्यांत हेन्री मरण पावला.
मार्क ट्वेनने नंतर असे म्हटले की त्याला ह्या अपघाताची आगाऊ सूचना स्वप्नांत मिळाली होती.
मग त्याने पॅरासायकॉलॉजीचा (परामानसशास्त्र) अभ्यास सुरू केला.
ट्वेन १८६१ पर्यंत बोट पायलट म्हणून काम करत होता.
भावाच्या अपघाती मृत्यूला ‘आपणच जबाबदार आहोत’ ही भावना कायम त्याचं मन कुरतडत असे.
१८६१ला अमेरिकेची “सिव्हील वॉर” सुरू झाली.
तेव्हां बऱ्याच उशिरा तो आपले पायलटचे काम सोडून कॉन्फेडरेट (दक्षिणेकडील राज्यांचा संघ) सैन्यात भरती झाला.
त्यानंतर पंधरा दिवसांनीच कॉन्फेडरेटचा पराजय झाला व अमेरिका एक राष्ट्र बनलं.
मग तो तिथून नेवाडाला थोरल्या भावाच्या वृत्तपत्रांत काम करायला आला.
त्याचा भाऊ ओरीयन तोपर्यंत नेवाडाच्या गव्हर्नरचा सेक्रेटरी झाला होता.
तिथे व्हर्जिनियातील एका चांदीच्या खाणीत त्याने काम करायचा प्रयत्न केला पण तो अल्पावधीतच अयशस्वी झाला.
मग त्याने व्हर्जिनीयात वृत्तपत्रांत लिहिणाऱ्या एका लेखकाचा सहाय्यक म्हणून “टेरीटोरीयल एंटरप्राईझ” ह्या वृत्तपत्रासाठी लिहायला सुरूवात केली.
तिथे प्रथमच त्याने आपले मार्क ट्वेन हे टोपणनाव वापरले.
तिथेच त्याला लेखनांत चांगले यश मिळू लागले.
पश्चिम अमेरिकेत त्याने खाणीत व इतर कामे करतांना अनुभव घेतले होते, त्यावर त्याने लिहायला सुरूवात केली.
कॅलिफोर्नियातील अनुभवावर त्याने “द सेलिब्रेटेड जम्पिंग फ्रॉग ऑफ कॅलव्हरस कंट्री” हे पुस्तक १८६५ मधे प्रकाशित केलं व ते वाचकांना आवडलं.
ते सॅटरडे प्रेस या साप्ताहिकाने प्रसिध्द केलं.
१८६७मधे तो वृत्तपत्रांसाठी काम करत असे व प्रवास करत असे.
वेगवेगळ्या ठिकाणांहून तो सतत पत्रे लिहित असे.
पुढे त्याच्या ह्या पत्रांचा संग्रह “इनोसंटस अब्रॉड’ ह्या नांवाने प्रसिध्द झाला व वाचकांना आवडला.
तेव्हाच तो युरोप व मध्यपूर्वेकडे गेला.
ह्याच प्रवासांत त्याची व चार्ल्स लॅंग्डनची भेट झाली.
चार्ल्सबरोबर त्याची बहिण ऑलिम्पिया होती.
मार्क ट्वेनच्या म्हणण्याप्रमाणे तो प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमांत पडला.
संपूर्ण १८६८ ह्या वर्षी दोघे सतत पत्रव्यवहार करत असत.
तिच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे प्रथम तिने त्याला नकार दिला पण १८७०मधे त्यांचा विवाह झाला.
ऑलिम्पिया सधन पण आधुनिक विचारसरणी असणाऱ्या कुटुंबातली होती.
तिच्यामुळे त्याला समाजातील आधुनिक विचारांच्या लोकांचा परिचय झाला.
मध्ये तो बफेलो येथे राहिला व तेथे बफेलो एक्सप्रेस ह्या वृत्तपत्राचा संपादक व वार्ताहर झाला.
त्याला चार मुले झाली पण मुलगा घटसर्प होऊन मरण पावला.
१८७२मधे तो बाटाव्हीया ह्या बोटीवर असतांना त्या बोटीने चार्ल्स वॉर्ड ह्या मालवाहू बोटीतील नऊ खलाशांना वाचवले.
मार्क ट्वेनने तो प्रसंग लक्षपूर्वक पाहिला व त्याने बाटाव्हीयाच्या कॅप्टनला व बचाव कार्य करणाऱ्या खलाशांचा सत्कार करण्याची शिफारस रॉयल ह्यूमन सोसायटीला केली.
त्यानंतर त्याने मुक्काम हार्टफोर्ड, कनेक्टीकट येथे केला.
हार्टफोर्डला तो सतरा वर्षे राहिला. तिथे असतांना उन्हाळयात त्याच्या कुटुंबाचा मुक्काम क्वारी फार्मवर त्याच्या मेहुणीकडे असे.
तिने त्याला लिहायला वेगळी खोली करून दिली होती.
तिथे त्याने त्याच्या अनेक प्रसिध्द कादंबऱ्या लिहिल्या.
टॉम सॉयर, प्रिन्स अँड पॉपर, ॲडव्हेंचर्स ऑफ हॅकलबेरी फीन्न, इ. सर्व तिथल्या वास्तव्यांत लिहिल्या व. प्रकाशित केल्या.
१९०४मधे ऑलिव्हीया मरण पावली.
त्याआधी त्याची एक मुलगी १८९६मधे मरण पावली.
त्यामुळे तो फार उदास झाला.
अनेक स्त्रियांनी त्याच्याशी कांही काळ मैत्री केली पण बहुतेक सर्वच टिकल्या नाहीत.
१९०६पासून शार्लोट टेलर ही लेखिका त्याला मदत करू लागली व त्याच्या मृत्यूपर्यंत बरोबर राहिली.
त्याला विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांत रस होता. त्याची निकोला टेसलाबरोबर मैत्री होती व तो निकोला टेसलाच्या प्रयोगशाळेंत बराच वेळ घालवी.
त्याने तीन छोटे शोधही लावले व त्याची पेटंटस मिळवली.
पहिला हा कपड्यांना लावायच्या “स्ट्रॅपस्”चा होता, ज्यामुळे पूर्वीच्या बांधावयाच्या सस्पेंडर्सची गरज राहिली नाही.
दुसरा इतिहासाच्या खेळासंबंधी होता तर तिसरा महत्त्वाचा कागदावर चिकटवणे सोपे जावे म्हणून शोधलेले “ॲडेसीव्ह” होते.
त्याला फींगरप्रिंटसच्या उपयोगाबद्दल खूप विश्वास होता व त्याने ती कल्पना आपल्या कथा कादंबऱ्यांतून अनेक वेळा वापरली आहे.
‘कनेक्टीकट यांकी इन किंग आर्थरस् कोर्ट’ ह्या कादंबरीत त्याने ‘टाईम ट्रॅव्हेल’ (काल-प्रवास) ही संकल्पना वापरली व तिथून पुढे अशा दिशेने जाणाऱ्या अगणित कथांची, चित्रपटांची निर्मिती होऊ लागली.
१९०९मधे थॉमस एडीसन त्याला कनेक्टीकट येथे येऊन भेटला आणि त्याने त्याच्यावर अगदी छोटी फील्म तयार केली.
ती पुढे प्रीन्स ॲंड पॉपरच्या दोन रील्समधे वापरण्यात आली.
विज्ञानांत प्रयोग करणाऱ्या मार्कने एक चांगले टाईपसेटींग मशीन बनवले.
त्याने काम उत्तम होत असे परंतु ते वरचेवर बिघडत असे.
हे मशीन बनविण्यासाठी त्याने खूप पैसा गुंतवला होता.
त्यांत सुधारणा करण्यासाठी आणखीही पैसा गुंतवला.
ते परिपूर्ण व्हायला बराच दीर्घ काळ गेला आणि शेवटी जेव्हां ते परिपूर्ण झाले, तोपर्यंत “लिनोटाईप”ची सुरूवात झाल्यामुळे त्याची विक्री होणे अशक्यच झाले.
ह्या व इतर कांही व्यवहारांत मार्कचे बरेच नुकसान झाले.
त्याचे लिखाणापासून मिळालेले उत्पन्न खूप होते तरी तो कांही काळ अडचणीत आला पण त्याने लिखाणावरच आपले वैभव परत मिळवले.
त्यापूर्वी हार्टफोर्डमधील खर्चिक घर सोडून कमी भाड्याच्या लहान घरांत ते येऊन राहिले.
त्यावेळी त्याची हेन्री रॉजर्स ह्या उद्योजकाबरोबर मैत्री झाली होती.
त्याने त्याला प्रथम नादारीचा अर्ज करायला सांगितले.
ते झाल्यावर मार्कला त्याच्या सर्व लिखाणांचे हक्क मार्कच्या पत्नीच्या नांवावर करायला सांगितले.
हक्क पत्नीकडे गेल्यानंतर लिखाणाचे रॉयल्टीचे मिळणारी सर्व रक्कम तिच्या खात्यात जमा होऊ लागली.
असे करत करत हेन्रीने हळूहळू त्याचे सर्व आर्थिक व्यवहार स्वत:कडे घेऊन त्याला कर्जातून पूर्णपणे मुक्त केले.
शेवटची चौदा वर्षे मार्क मॅनहॅटनला राहिला.
तिथे त्याची दुसरी मुलगी १९०९मधे वारली.
त्यामुळे उत्तर आयुष्य दु:खात गेलं
१९०६मधे मार्क ट्वेनने लहान मुलींसाठी एक क्लब काढला.
त्यांना तो आपल्या मानलेल्या नाती म्हणत असे.
तिथे दहा ते पंधरा वर्षाच्या दहा-बारा मुली येत असत.
त्यांना थिएटरला नेणे, कन्सर्ट पहायला नेणे, त्यांना खेळायला नेणे, त्यांना पत्रे लिहिणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, इ. गोष्टी करत असे.
त्याने लिहिले आहे, “माझ्या आयुष्यांतला तो फार मोठा आनंद होता.”
डोरोथी क्विक नांवाची अकरा वर्षांची लहान मुलगी त्याला बोटीवर भेटली, तीही त्यात सामील झाली व तिने सदैव त्याला शेवटपर्यंत सहाय्य केले.
१९०७मधे ट्वेनला डी. लीट्. ही मानाची पदवी ऑक्सफर्डतर्फे देण्यांत आली
ट्वेनचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास होता
त्याचा जन्म ‘हेली’ हा धुमकेतु दिसल्यावर दोन आठवड्यांनी झाला होता(१८३५).
तो म्हणत असे की त्याचा मृत्यूही ‘हेली” धुमकेतु पुन्हा दिसेल, तेव्हा होणार.
तो म्हणे, “दोन विचित्र गोष्टी बरोबर आल्या व बरोबरच जाणार.”
१९१०मधे “हेली” धुमकेतु पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर असतांना मार्क ट्वेनचा हृदय बंद पडून मृत्यू झाला.
मार्क ट्वेनला “फादर ऑफ अमेरिकन लिटरेचर” असं म्हणतात.
त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे.
त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते.
त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती.
काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते
साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे.
अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली.
त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले.
त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही.
त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे.

— अरविंद खानोलकर.

https://youtu.be/ROJm8urmhZs

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..