दहावी-बारावीच्या परीक्षा जेव्हा व्हायच्या … तो काळ.. बारावीचा निकाल कालंच लागला होता.. दहावीची परीक्षा दिलेला “चिंटू” त्याच्या रीझल्टची वाट बघत होता.. त्याच सुमारास एका शनिवारची दुपार.. बेडरूम मध्ये चिंटू मोबाईलवर तर बाबा लॅपटॉपसमोर कामात… रोजच्याप्रमाणे घरकाम करायला आलेल्या वनिता मावशी काम आटोपून निघाल्या.. आई लगबगीने बेडरूम मध्ये.. आपली पर्स चाचपडत… “काय गं?? कसली गडबड?”.. बाबांचं कुतूहल. “काही नाही हो ss.. वनिताचा मुलगा काल बारावी पास झाला.. चांगले मार्क मिळालेत.. ती निघालीये..तर एक ५०० रुपयांचं पाकीट पाठवते तिच्याबरोबरच!!”.. “अरे वा ss छानच!!.. दे दे ss!!.. अगं आणि ते फ्रीजमध्ये चॉकलेट आहे बघ… ते पण दे त्याला!! ”.. आई बाबांचा हा संवाद ऐकून आणि त्यांचं दातृत्व बघून चिंटूला एकदम मस्त वाटलं..
संध्याकाळी सगळे हॉल मध्ये टीव्ही बघत बसले होते.. बेल वाजली.. बाजूच्या बिल्डिंगमधला चिंटूचा मित्र अमेय, दारात पेढे घेऊन उभा……
तो सुद्धा बारावीत होता.. आता पुढे काय करणार? वगैरे गप्पा सुरू होत्या सगळ्यांच्या…. इतक्यात अमेयला कोणाचा तरी फोन आला.. अभिनंदन करायला.. आई आतल्या खोलीत गेली.. हळूच बाबांना बोलावलं… कुतूहल वाटून चिंटू सुद्धा गेला मागे मागे…
“अहो.. किती घालू पाकिटात??… ५०० फारच कमी वाटतात ना त्याला?” “हो.. १००० घाल…. उगाच वाईट दिसायला नको!! “हो चालेल…. मला पण तेच वाटलं..म्हणून एकदा विचारलं!!” “नको.. नाहीतर १५०० चं दे पाकीट…..उगाच थोडक्यासाठी कमी नको वाटायला…. मोठं प्रस्थ आहे ते फार!! “..
अमेयचा फोन संपला.. त्यानी पाकीट घेतलं.. आईबाबांच्या गुडघ्याजवळ एकंच हात नेत सध्याच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे “गुडघ्याला नमस्कार” करून निघून गेला…. चिंटूला दोन्ही घटना बघून कसलीच “टोटल” लागत नव्हती…. पाकीटांतल्या पैशांची आणि त्यामागच्या विचारांची….
दुपार आणि संध्याकाळचे हे दोन प्रसंग.. एकसारखे असूनही वेगळे वाटणारे…. एकंच चित्र दोन वेगळ्या रंगात रंगवल्यासारखं.. शेवटी रात्री जेवणानंतर चिंटूला रहावलंच नाही…..
“आई बाबा.. रागावू नका पण एक विचारू का??”
“बोल ना बाळा बिनधास्त!!”
“वनिता मावशी इतक्या गरिबीत राहतात… कसंबसं भागवत असतील ते.. त्यांच्या मुलाला तुम्ही ५०० रुपये दिले…… आणि तो अमेय ss, त्याचे बाबा इतके श्रीमंत.. ३-३ महागड्या गाड्या आहेत.. अख्खा मजला पूर्ण असं भलं मोठं घर आहे.. त्याला १५००??… हे असं का sss???”
“अरे sss …ते श्रीमंत आहेत म्हणूनच तसं द्यावं लागतं!!”
“पण ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना जास्त द्यायला हवं ना, अमेय सारख्याना देऊन काय फायदा??…… एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला भांडंभर पाणी दिलं तर सार्थकी लागेल.. तेच भांडं समुद्रात ओतलं तर समुद्राच्या खिसगणतीत सुद्धा नसणार!!”… (दहावीत मराठी निबंधासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत कामी आली.)
“बाबा ss.. मला मान्य आहे की ५०० रुपये काही कमी नाहीयेत.. त्यांना नक्कीच उपयोग होईल त्याचा पण sss….. म्हणजे ss……..मला म्हणायचं आहे की आपल्याला जर २००० रुपये देणं शक्य होतं तर ते सगळे आपण वनिता मावशीच्या मुलाला देऊन अमेयला फक्त चॉकलेट दिलं असतं तर चाललं असतं ना!!…. मावशीना जास्त आनंद झाला असता… त्यांच्या मुलालाच पुढे शिकायला किंवा पुस्तकं घ्यायला ते पैसे वापरता आले असते!.. आई बाबा sss तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते???”….
काहीसा अस्वस्थ झालेला चिंटू आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आपल्या वयाला शक्य तेवढ्या सगळ्या शब्दांची जमावाजमव करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करत होता…
आपल्या मुलाचे विचार बघून आई बाबांना एकदम गलबलून आलं… आईनी चिंटूला जवळ घेतलं.. “हो रे चिंटू ss…… अगदी बरोबर आहे तुझं लॉजिक… काहीच चुकीचं नाही!!” “मग असं का केलं आपण??”…
आता बाबा सुद्धा त्यांच्या परीने समजावू लागले… “अरे बाळा ss…. तू लहान आहेस अजून… आत्ता कळणार नाही तुला… तुझं म्हणणं अगदी १००% खरं असलं तरी मोठ्या माणसांना काही “समाज बंधनं” पाळावी लागतात.. म्हणून मनात नसून सुद्धा, पटत नसूनही इच्छेविरुद्ध बरेचदा असे निर्णय घ्यावे लागताsss त!!”……… “चला बरं झोपा आता ss….. उशीर झालाय बराच!!!”…
आपण लहान असल्याने विषय फार ताणण्यात अर्थ नाही हे त्याला कळून चुकलं.. म्हणूनच फार काही पटलं नसलं तरी काहीही न बोलता चिंटू झोपी गेला…..
थोड्याच दिवसात चिंटूचा “दहावीचा रिझल्ट” लागला… अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले…. अभिनंदनाचे फोन, पेढेवाटप, भेटीगाठी, हॉटेल, पार्टी, देवदर्शन हे सगळे सोहळे पुढच्या १०-१२ दिवसात आटपले…
त्या नंतरच्या एका रविवारी बाबा बाहेर पेपर वाचत बसले होते….. ठरलेल्या वेळी वनिता मावशी काम करून निघाल्या… “चला ताई…. येते हां ss!!”
“मावशी sss.. थांबा ना एक मिनिट!!”… आतुन चिंटूचा आवाज..
“काय रेsss? काही हवंय का तुला? “… आईचा स्वाभाविक प्रश्न..
चिंटू खोलीतून येताना काहीतरी घेऊन आला… “मावशी हे घ्या.. तुमच्या मुलासाठी… त्याला कॉँग्रेचुलेशन्स सांगा माझ्याकडून “..
“चिंटू दादा ss काय रे हे?? “…….
“मी दहावी झालो म्हणून सगळ्यांकडून मला भेट मिळालेले हे पैसे!!”…. “अरे बाप रे!! नको नको ssss…. ते पैसे तुझे आहेत दादा……. हक्काचे, कौतुकाचे….. सगळ्यांनी बक्षीस दिलं ना तुला ss…तूच ठेव ते!!”..
“अहो नाही ss…मुद्दाम इतक्या दिवसांचे एकत्र जमवून ठेवलेत… तुम्हालाच द्यायला!!”.. वनिता मावशीना दाटून आलं नसतं तरच नवल…
आईनी वनिताला हळूच डोळ्यानी खूण करत ते पाकीट घ्यायला सांगितलं… मावशी निघून गेल्या…..भरलेल्या डोळ्यांनी आणि भारलेल्या मनानी…
“हे काय रे चिंटू???.. तुझ्या कष्टानी, हुषारीनी मिळवलेलं सगळं दिलंस ते??”…
“हो आई.. तुम्ही मागे म्हणालात ते थोडं पटलं मला…. मी लहान आहे म्हणून आत्ता समजत नसेल मला पण मोठेपणी कदाचित मनाला न पटणाऱ्या गोष्टी इच्छेविरुद्ध कराव्या लागत असतील…मलाही तेव्हा त्या कराव्या लागल्या तर??.. तेव्हा म्हंटलं मी आत्ता लहान आहे तोवरच मला जे खरंखरं वाटतंय,मनाला पटतंय ते करून घ्यावं… मला वाटलं की सगळे पैसे द्यावे मावशीच्या मुलाला….तसंही मी अभ्यास काही ते पैसे मिळण्यासाठी नव्हताच केला…जसं अमेयच्या बाबतीत म्हंटलं होतं ना मीss तसंच, आपल्यापेक्षा त्यांना जास्त गरज आहे याची…. म्हणून देऊन टाकले गं!! …पण आता मला खूप आनंद झालाय…. समाधान वाटतंय….सांगता येत नाहीये पण वेगळंच फिलिंग आलंय…….. असं आतुन एकदम छान वाटतंय हो बाबा sssss!!!!…
4
आज पुन्हा एकदा चिंटू त्याला जमेल तसा व्यक्त होत होता…. नकळत आई बाबांनी चिंटूला उराशी कवटाळलं….. “चिंटू sss…. “आदर्श भविष्य घडावं” म्हणून “मार्कं” मिळवणं महत्वाचं.. ते तू मिळवलेसच.. पण “आदर्श माणूस घडण्यासाठी” हे असे “गुण” महत्वाचे.. ते कायम असेच जपून ठेव!!!”
आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं… चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव… आपला चिंटू मोठा झाला…. “मार्कं आणि गुण”… या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला…….
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply