दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी कर्नाटक एसटीनं पुण्याहून सातारला चाललो होतो. समोरच्या सीटवर एक मध्यमवयीन स्त्री बसलेली होती. शिरवळ जवळ आलं तेव्हा तिने हळूच एक छोटी डबी काढली व त्यामध्ये बोट बुडवून तोंडात घातले व एकदा उजव्या बाजूला नंतर डाव्या बाजूला दातांवरुन ती फिरवू लागली. शिरवळला एसटी दहा मिनिटे थांबली, तोपर्यंत ती खाली उतरुन तोंड धुवून आली. तिला मी सहज विचारलं, ‘आपण सातारच्याच आहात ना?’ तिने होकारार्थी मान हलविली व उत्तर दिले, ‘माझं माहेर, सातारा. मुंबईला असते मी. तुम्ही कसं ओळखलं?’ मी बापडा काय उत्तर देणार? तंबाखूच्या मशेरीचं मूळ हे ‘सातारा’ आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे….
तसा मी सुद्धा सातारचाच. जन्म सातारा तालुक्यातील एका खेड्यात झाला. त्यामुळे साताऱ्याची परंपरा माहिती आहे. माझ्या लहानपणी आमच्या मोठ्या वाड्यात सर्वच बायका तंबाखूची मशेरी लावणाऱ्या. प्रत्येकीच्या बटव्यात मशेरीची डबी असायचीच.
दुपारी यांचा चुलीवर तंबाखू भाजण्याचा सार्वजनिक कार्यक्रम होत असे. एखाद्या वाया गेलेल्या तव्यावर किंवा पत्र्याच्या झाकणात तंबाखू खरपूस भाजली जाते असे. त्यावेळी तंबाखूचा जो धूर आणि वास येत असे तो मला नकोसा वाटायचा. मग ती भाजलेली तंबाखू एखाद्या लाकडी फळकुटावर घेऊन लोखंडी फुंकणीने ती जोर लावून वाटली जायची. त्यातूनही तंबाखूच्या ज्या काटक्या रहात असत, त्या पुन्हा भाजून त्या वाटल्या जात. मग ही मशेरी डब्यांत भरुन ठेवली जात असे.
सर्व साधारणपणे माणूस सकाळी एकदाच दात स्वच्छ करतो, मात्र हा नियम मशेरीवाल्यांसाठी साफ चुकीचा आहे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा जी मशेरी लावली जाते ती, पोट साफ होण्यासाठी. नंतर चहापाणी होते. मग स्वयंपाक सुरु करण्याआधी दुसऱ्यांदा मशेरी लावली जाते. त्यामुळे होत असं की, मशेरीची जी किक बसते..त्यामध्ये काही न बोलता स्वयंपाक पूर्ण होतो. मग जेवण झाल्यानंतर भांडी घासायला एनर्जी मिळावी म्हणून पुन्हा एकदा मशेरी. एव्हाना दुपार होते. काही बायका एकत्र येऊन शेंगा फोडणे किंवा धान्य निवडण्यासाठी एकत्र आल्या की, मशेरी लावून गप्पा मारता मारता कामं उरकतात. चुकून झोप झाली तर झोपेतून उठल्यावर मशेरी लागतेच. पुन्हा स्वयंपाकाचे वेळी, जेवणानंतर व झोपण्यापूर्वी मशेरीची ‘आवर्तनं’ चालूच असतात..
अशा कुटुंबातला मी असल्यामुळे माझ्या आई-वडिलांना मशेरीची सवय होती. आम्ही सदाशिव पेठेत आल्यावर आई स्टोव्हवर तंबाखू भाजत असे. मंडईतून तंबाखू आणायचे काम माझ्याकडे असायचे. आता जिथे मारणे हाईट्सची इमारत आहे तिथे ओळीने तंबाखूची दुकानं होती. तिथे पत्र्याच्या डब्यात तंबाखूची पाने उभी रचलेली असायची. मी पावशेर घेऊन येत असे. घरी आल्यावर त्यांचा चुरा करुन, काटक्या बाजूला काढून भाजण्याचा कार्यक्रम होत असे. तो वास बाहेर निघून जावा म्हणून मी हातात टाॅवेल घेऊन पंख्यासारखा फिरवत असे. कधी आईला मदत म्हणून मी तो चुरा वाटून देत असे.
आमचे शेजारी ‘जय भारत स्टोअर्स’चे बाबुलाल शेठजी, दाढीवाल्या ठाकूर शेठजींची पत्नी शांताबाई, माझ्या मोठ्या भावाचा मित्र, मकरंद हे तिघेही मशेरीची चव घेऊन मशेरीच्या ‘प्रेमात’ पडले. या तिघांनाही काही महिने आई मशेरी करुन देत होती. नंतर त्यांनी स्वतःहून व्यवस्था केली, मात्र मशेरी काही सोडली नाही.
माझ्या वडिलांचे पी. ए. पाटील नावाचे शिक्षण खात्यातील मित्र होते. त्यांनादेखील मशेरीचे व्यसन होते. त्यांना प्रत्येकवेळी ताजी आणि गरम मशेरी लागत असे. त्यासाठी ते थोडी तंबाखू घेऊन त्यावर कागदाचा तुकडा पेटवून ठेवत. असे दोन तीन कागद जाळून झाल्यावर त्या कागदाची राख फुंकून त्या गरम तंबाखूचे बोटांनीच चूर्ण करीत व त्याने दात घासत असत. अशी होती एकेकाची तऱ्हा…
सदाशिव पेठ सोडून आम्ही सातारारोडला रहायला आलो. इथे कुणाला तंबाखूच्या वासाचा त्रास होऊ नये म्हणून आई गॅलरीत स्टोव्हवर तंबाखू भाजू लागली. काही वर्षांनंतर दोघेही गावी गेले, तिथे देखील पुन्हा मशेरीचा कार्यक्रम होऊ लागला. मात्र जाताना त्यांनी आपला ‘वारसदार’ ठेवला होता…
माझी पत्नी ही सातारचीच आहे. तिला देखील लहानपणापासून मशेरीचं ‘बाळकडू’ मिळालेलं आहे. आता मंडईत तंबाखूची लांब पानं मिळत नाहीत. चुरा मिळतो. मला आठवड्यातून एकदा तो आणावाच लागतो. एखादी मिठाई हातातून ओढून घ्यावी तसा तो पुडा माझी सौभाग्यवती हातात घेते. रोज सकाळी मला तो तंबाखूचा धूर सहन करावा लागतो. त्याचा दिवसभर एकच फायदा होतो, सर्व कामं शांततेत होतात.
मी अनेकदा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तिला भीती दाखवली, डाॅक्टरांनी समजावून सांगितले मात्र काहीही उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी लाॅकडाऊनमध्ये तंबाखू मिळाली नाही, तेव्हा ‘गाय छाप’च्या पुड्या वापरुन ‘तल्लफ’ भागवली गेली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लाॅकडाऊनमध्ये तंबाखूसाठी खूप फिरावे लागले. जी मिळाली ती पुरवून वापरायला सांगितलंय…
आज ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ आहे. त्यानिमित्ताने मी माझी व्यथा सांगितली. तंबाखू ही वाईटच आहे. तिचं एकदा व्यसन लागलं की, मरेपर्यंत सुटत नाही.
गेल्या चाळीस वर्षात माझे कितीतरी जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी या व्यसनामुळे बरबाद झाले आहेत. मशेरी लावणे, तंबाखू-चुना दाढेखाली ठेवणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे हे सर्व प्रकार घातकच आहेत…
मशेरी घासताना ती तंबाखू पोटात जाते, तंबाखू दाढेखाली ठेवून तो भाग बधीर होतो, सिगारेटने फुफ्फुसे खराब होतात, गुटखा हे तर विषच आहे.
१९६० साली तंबाखूवर सरकारने कर बसवला, त्यातून सरकारला कोट्यावधी रुपये महसूल मिळतो. माझा अवधूत साने नावाचा सिने इंडस्ट्रीतील चांगला मित्र या गुटख्यामुळे लवकर गेला. तंबाखूमुळे आपले लाडके उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील अकाली गेले. सिगारेटने टीबी सारख्या आजाराला सामोरे जावे लागतेच. मग एवढं माहिती असताना, त्याचा अट्टाहास का?
जन्माला आलेला प्रत्येकजण जाणारच आहे, मग हे ‘मधलं आयुष्य’ व्यसनाने खराब का करायचं? शेवटची वर्षे खाटेवर खितपत पडून रहाण्यापेक्षा धडधाकट राहून शांतपणे गेलेलं बरं नाही का?
उशीर हा कधीही झालेला नसतो, आजच ठरवा आणि या तंबाखूला हद्दपार करा…
आजच्या ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवसा’ निमित्त माझी ही कळकळीची विनंती अंमलात आणा…
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
३१-५-२१.
Leave a Reply