चंदगीराम गेले. भारतीय कुस्तीमधील एक महान पर्व संपले. सहा फूट उंचीचा, १९० पौण्ड वजनाचा आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांना जिंकणारा पैलवान अनंतात विलीन झाला. त्याने भारतीय कुस्ती क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटविला होता. १९७०च्या बँकॉक एशियाडमध्ये भारताला १०० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या महान कुस्तीगीराने भारतातील ‘हिंद केसरी’, ‘महाभारत केसरी’, ‘भारत भीम’, ‘रुस्तम ए हिंद’, ‘भारत केसरी’ हे सारे प्रतिष्ठेचे किताब जिंकले होते. चंदगीराम यांनी फडातल्या अनेक प्रतिष्ठेच्या कुस्त्याही जिंकल्या होत्या. पेशाने शिक्षक असलेल्या आणि पदवी परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या या कुस्तीगीराने आपल्या कुस्तीच्या आखाड्यातून अनेक पैलवान घडविले. त्यापैकी सात जणांनी ‘अर्जुन पुरस्कार’ पटकाविले होते.
बीजिंग ऑलिम्पिकमधला ब्राँझ पदक विजेता सुशीलकुमार हादेखील चंदगीराम यांचाच चेला. चंदगीराम यांनी अनेक मल्ल घडविले हे खरे; पण त्यापेक्षाही त्यांचे या क्षेत्रासाठीचे मोठे योगदान म्हणजे त्यांनी महिला कुस्तीसाठी अतोनात मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या तिन्ही मुलींना प्रथम आखाड्यात उतरविले. १९९० च्या सुमारास तुमच्या मुलींना आखाड्यात उतरविणार का, या प्रश्नाला त्यांनी अशा प्रकारे कृतीतूनच उत्तर दिले होते. त्यामुळे अन्य मुलींच्या पालकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. आखाड्यात मुलींना मुक्तपणे आणि दडपणाशिवाय सराव करायला मिळावा यासाठी त्यांनी आपल्या ‘चंदगीराम का आखाडा’मध्ये पुरुषांना प्रवेश देणेच बंद केले. त्यांच्या एका मुलीने-सोनिकाने २००० मध्ये एशियन त्यांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. शिकविण्याच्या पद्धत अत्यंत कडक होती. त्या पद्धतीबाबत मुली सांगतात, की ते कठोर होते. एकदा का एखादी गोष्ट शिकवली, की ती चेल्याकडून घोटून तयार करून घ्यायचे. कठोर परिश्रमाला त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
चुकीबद्दल शिक्षा द्यायचे; पण यशानंतर तेवढ्याच उत्साहाने कौतुकही करायचे. मोठ्या उदार मनाचा हा व्यक्तिमत्त्वाचा पैलवान होता. समोरच्या पैलवानाची दोन्ही हातांची दोन-दोन बोटे पकडून त्याला फिरविण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. आपला गुडघा प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर टेकवून त्याचे दोन्ही हात पकडून डोक्याला डोके लावून ते फिरवायचे. दिल्लीचे गुरू हनुमानदेखील चंदगीराम यांना मानायचे. ते म्हणायचे, हा वेगळ्या ढंगाचा पैलवान आहे. तो समोरच्या पैलवानाचा आदर करतो. त्याच्याकडून विनय शिकण्यासारखा आहे. कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही ते अभिवादन करायचे. त्यांनी अनेक मल्लांना पोसले. अनेक महिला कुस्तीगीर घडविले.
गेल्या महिन्यातच त्यांची शिष्या अलका तोमर हिने एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले. ती म्हणाली, मास्टर चंदगीराम यांचे सध्या एकच ध्येय होते. त्यांना आम्हाला नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळताना पाहायचे होते. ते त्यांचे स्वप्न होते. स्वतः चंदगीराम यांची कारकीर्ददेखील स्वप्नवत होती. त्यांच्या हाताचे पंजे मोठे होते. मनगटाची ताकद प्रचंड होती. त्यांच्या त्या ताकदीचा सर्वांना हेवा वाटायचा. त्यांची खेळावर श्रद्धाही मोठी होती. कुस्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या या अवलियाच्या निधनाने कुस्ती उत्तर भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात पोरकी झाली आहे.
Leave a Reply