नवीन लेखन...

मास्तर, शिक्षक आणि गुरुजी

‘ इतिहासाची पुनरावृत्ती होते ” हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय . याला माझ्या पेक्षा माझे शालेय जीवन ,शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत . ‘इतिहास ‘ तसा रंजक विषय पण आमच्या काळी इतिहासच काय पण समग्र शिक्षणाच्याच सानिध्यात रंजकता येऊ नये अशी ठाम भूमिका सर्वानी घेतली असावी ! युद्ध वर्णना पेक्षा सनावळी आणि तहाची कलमेच ज्यास्त ! या सनावळी आणि तहाच्या कलमानी , आमची या विषयाची आवड ‘कलम ‘ केली ! आम्ही फक्त परीक्षे पुरत्याच आमच्या ‘कलमा ‘ झिजवल्या हे बारीक खरे आहे !

बरे इतिहास हा पूर्ण वेळ अन स्वतंत्र विषय नसायचा . इतिहासाच्या ‘ढवळ्या ‘ सोबत भूगोलाचा ‘पवळ्या ‘ असायचा ! इतिहास – भूगोल वेगळे विषय असले तरी तास अन मास्तर एकच ! ( या बाबतीत आम्ही मात्र भाग्यवान होतो . तास एक असलातरी मास्तर  वेगवेगळे होते . ) हे कमी म्हणून कि काय  पुढे पुढे ‘नागरिक शास्त्र ‘च शेपूट पण या ढवळ्या -पवळ्या सोबत कोण्या दुष्टाने चिटकवून दिल हो ! त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला , तिन्ही विषय कच्चेच राहिले !

पण या कच्चेपणात सिहाचा वाटा आहे तो बोकील सरांचा ! (खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा आमचा खारीचा वाटा !) बोकील सर ! आमचे इतिहासाचे मास्तर ! निव्वळ ऐतिहासिक दहशत हो ! वर्गातली सगळी कार्टी गाढव आहेत हा गृह त्यांनी का करून घेतला होता कोणास ठाऊक ? बरोबर उत्तराला पण एक छडी मारायचे !चुकीच्या उत्तराला चार ! ( मी अन वश्यानी मागल्या बाकड्यावर बसून त्या काळातल्या  मास्तरांचे वर्गीकरण केले होते . कारणाने किंवा विनाकारण मारणारे ते ‘मास्तर ‘, ‘बाकावर उभे रहा ‘, ‘ कान धरून उभा रहा (अर्थात स्वतः चेच !), ‘वर्गा बाहेर जा ‘ ‘कोंबडा हो ‘ असल्या शिक्षा करणारे ते ‘शिक्षक ‘, अन खरेच मायेन शिकवणारे ,चार चारदा समजावून सांगणारे ते ‘गुरुजी . हे वर्गीकरण ‘पुढे काही दिवसांनी सगळ्या शाळेत , अन मग गावातल्या सगळ्या शाळांमध्ये पण पसरलं ! वश्याने ‘सुरश्या  हा बोकिल्या न मागल्या जूलमी हिटलर होता !’ म्हणून सांगितले होते ,कानात ! असो .) हिंदीत शिक्षणाला ‘शिक्षा ‘ का म्हणतात हे आम्हाला इतिहासाच्या तासाने शिकवले ! इतर (म्हणजे गणिताच्या ) तासा  पेक्ष्या हा तास  मोठ्ठा वाटायचा ! सहा फुटी बोकील , अफजलखाना सारखा ,दोन्ही हात पसरून ‘ शिवाजी ‘ शिकवायचा तेव्हा अंगात स्फुरण चढण्या ऐवजी अंगावर काटा यायचा !परकीयांनी जितके अत्त्याचार शेकडो वर्ष भारतीयांवर केले नसतील त्या पेक्ष्या ज्यास्त या मास्तरांनी आमच्या कोवळ्या मनावर केवळ पन्नास मिनिटाच्या तासात केलेत ! त्या मुळे  आजपावेतो ‘इतिहास ‘ दुरावला तो दुरावलाच !

भूगोल म्हटले कि दोन गोष्टी डोळ्या समोर येतात . एक भोसले सर आणि दुसरे -भारताचा नकाशा ! आजपर्यंत भारताचा नकाशा बरोबर काढणारा शिक्षक मला दिसला नाही !अन असला शिक्षक असलाच तर भोगोलाचा असणार नाही , कला शिक्षक असेल ! पण आमच्या गणिताच्या गुरुजींनी हा नकाशाचा प्रश्न आमच्यासाठी सोडवला होता . क्रूस सारखी एक उभी आणि एक आडवी रेषा काढून आम्हाला ‘भारत जोडो ‘ शिकवले होते .

रोज इस्तरीचे कपडे घालणारे काही शिक्षक त्या काळी  आमच्या शाळेत होते , त्यातलेच एक भोसले सर . घोटीव दाढी , कडक कपडे ,एकदम टकाटक ! त्यांची शिकवण्याची एक ‘स्टाईल ‘ होती . एक हात पॅन्टच्या खिशात , एका हातात उघडलेले भूगोलाचे पुस्तक , चष्म्या समोर धरलेले . समोरचे विद्यार्थी आणि त्यांचा चेहरा यात एखाद्या पार्टीशन सारखे ! बेधडक वाचून दाखवायचे , एकाग्र चित्ताने ! समोर पोरानं कडे डुंकूनहि पहात नसत ! सुराचे मात्र पक्के होते . पहिल्या शब्दाला जो सूर (बहुदा काळी काडी चार !) असे  तो तास  संपायच्या  टोलाच्या समे  पर्यंत ! कोठे चढ नाही , कोठे उतार नाही आणि कोठे ‘थांबा ‘ नाही . गाडी कशी एका लयीत ! परफेक्ट ‘सा ‘ धरून वाचायचे . मागल्या बाकड्या वरली जेष्ठ मंडळी ‘आ ‘ करून झोपायची ! इतकं निर्जीव ,निराकार नंतरच्या आयुष्यात दुसरं काही सापडलं नाही ! (माझ्या सहनशीलतेचे  मूळ हेच असावे असा माझ्या कयास आहे !) ज्याचे शिकवणे हीच शिक्षा असा दुसरा शिक्षक होणे नाही !तसाही माझा आणि ,भूगोल या विषयाचा  उर्वरित आयुष्यात फारसा समंध आला नाही . कॉलेजात असताना एकदा  वश्या म्हणाला होता कि
” जिचा भूगोल चांगला असतो , बहुदा तिचा इतिहास वाईट असतो ! “हाच काय तो शेवटचा’उल्लेखनीय ‘ सम्बन्ध !

घोडके गुरुजी म्हणजे आमच्या शाळेतील ‘जोकर ‘ ! संस्थेच्या बावन्न  शिक्षकातला ! कोणताही विषय द्या पोरांना सोपा करून सांगण्याचा त्यांचा हातकंडा ! गणिता पासून पी .टी . पर्यंत कायपण शिकवु शकायचे !किशोर कुमार सारखे कुरळे केस , मागे  फिरवलेले . हा ढ अन तो हुशार हा भेदभाव त्यांच्या पाशी नव्हता . सगळेच  पोर विद्यार्थी ! आम्हा पोरात रमणारे ,आमचे गुरुजी ! त्यांची कधी भीती वाटली नाही , वाटलं तो आधार अन आदर ! सकाळी उशिरा आलेल्या पोरांना पट्ट्या मारून शिक्षा करण्याचे , पी.टीचे सर म्हणून त्यांचे काम असायचे . पोरींना एखादी टपली असायची , वांड पोरांना मात्र डोक्या इतका उंच हात करून हलकेच पट्टी मारायचे ! ‘उद्या पासून  वेळेवर येत जा ‘ अशी समाज मात्र कठोर अन उच्य स्वरात द्यायचे . मुलांसोबत खो-खो ,कब्बडी , व्हॉलीबॉल , त्यांच्यातलाच एक खेळाडू होऊन खेळायचे . शिक्षक म्हणून ते कधी अंपायर झाले नाहीत . तरी त्यांचा निर्णय आम्ही कधीच डावलला नाही . ज्या उल्हासाने मुलांसोबत खेळायचे त्याच उल्हासाने मुलींच्या सोबत दोरीवरच्या उड्या , व लंगडी पण खेळायचे ! त्यांच्या शिवाय कधी खेळ ,नाटक , ध्वजारोहण झाले नाही . एका झेंडावंदनाला आजारपणा मुळे येउ शकले नव्हते त्या दिवशी तो झेंडा सुद्धा मलूल झाल्या सारखा वाटत होता !
एकदा ते गणिताच्या तासाला बदली शिक्षक म्हणून आले . गणित राहील बाजूलाच , त्यांनी आम्हाला ‘इन्सानियत ‘ सिनेमाची गोष्ट सांगितली होती . हि गोष्ट पुढे आठवडाभर चालली . त्या आठवड्यात आमच्या वर्गाची उपस्थिती शंभर टक्के !

आज शाळा सोडून जवळ पास पन्नास वर्ष झालीत , तेथे मिळालेल्या शिक्षणाचा पैश्याच्या जगात फारसा उपयोग झाला हि नसेल पण तेथे मिळालेल्या शहाणं पणाच्या  तहान लाडू -भूकलाडूची भक्कम शिदोरी पुरून उरलीय ! आज मारकुट्या मास्तरांचे अन शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचे कुठलेही ओरखडे मनावर नाहीत , पण गुरुजींचे संस्कार मात्र सोबत आहेत . मला माझ्या शाळेच्या अभिमान पेक्ष्या प्रेमच ज्यास्त आहे ! मन अजूनही घोडके  सरांच्या ‘ इन्सानियत ‘च्या तासाला जाऊन बसत , अन बोकील सरांच्या तासातून खिडकीतून उडी मारत ! बाहेरच्या जगात !

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..