ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला
मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला
वाटप-रांगेत धरी जोर चांगला
लांगुलचालन करून जोड सांधला
संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला
पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला
अखेरीस कँडिडेट-टिळा लागला
धुंदीला नच पारावार राहिला
प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला
पक्षानें आज खरा पांग फेडला. १
‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला
‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला
खांद्यावर झेंडा पक्षीय बांधला
उच्चनाद करत युद्ध-शंख फुंकला
दक्ष पूर्ण, लक्ष ‘मंद’ आजुबाजुला
‘भांग’ चढे , ‘खचित जय असेल आपला’
वृद्धिंगत करिन पक्ष-यशद-शृंखला.
पण फडात ‘दंगली’त नविन मामला
षंढ विरोधकगण, नव-डाव मांडला
माझ्याविरुद्ध ‘फ्रंट्’ एकत्र बांधला
उमेदवार फक्त-एक उभा ठाकला
दंड थोपटुन लढावयास पातला.
कुत्र्यांचा घोळका कितीक भुंकला
माशी-थवा जरी कितीक शिंकला
कितिक जरी अरिनें धरबंध सोडला
द्वंद्वाचा निश्चय मी ठाम ठेवला
प्रतिद्वंद्व्या, बघच रंगढंग आगळा
जंगजंग पछाडले , मी नसे बुळा
रंक न मी, खूप money, गाडी-बंगला
चीत कराया पुंडां , सज्ज मम व्हिला. २
लढतीचा मी गुलाल उंच उधळला
संत न मी, पंथ स्वीकरी बुराभला
गुंडझुंड-संगतीत खेळ मांडला
संच-मंच-वृंद एकसंध जुंपला
तंत्रबद्ध जंत्री-आधार घेतला
मंत्रघोष यंत्रवत् ‘जय-जय’ निनादला
शिणती गात्रें, तरि विश्राम लांबला
गुंग रात्रिही , नसे प्रचार थांबला
धनसंचय उधळाया संगं आणला
बांध फोडला, न हात तंग ठेवला
साम-दाम-दंड-भेद योग्य मानला
डाव बघुन, जन-तांडा दंग जाहला. ३
क्लांत जरि, न शांतता, संघर्ष वाढला
मोजणीत जय नि पराजय हिंदोळला
आस-निराशेचा थांबे न जरि झुला
मुगुट मनीं धरलेला, मी न सोडला.
रिझल्ट अखेरिस, तो भूकंप थोरला !
हाय हाय ! जय खूपच लांब राहिला !
दंतओष्ठ खात गड बुलंद लढवला
झुंज शर्थिची, परि बलदंड जिंकला
मंथर मतदार, दिली वंचना मला
संपलेंच स्वप्न , पंथ बंद , खुंटला
गंतव्याचा प्रवास विफल, थांबला
भरण्यांआधीच सुयश-कुंभ सांडला. ४
‘कमिशन’नें उंच जधिं निकाल टांगला,
ब्रह्मांडच आठवलें तत्क्षणीं मला !
तोंच, चंगळींत जो आकंठ डुंबला
चाटुकार-संघ, सांगतां न, पांगला
गजबज-संबंध नुरे, ओस चौफुला
‘हॉल’ हा सबंध खायला-उठे ‘दिला’
एकांतच फक्त हा सन्मित्र राहिला
शब्दहीन होतसे आक्रंद मोकळा
रुदन जरि न, नेत्रानें थेंब सिंचला
हुंदका फुटे न, मी तुरन्त दाबला. ५
सुन्न करी ऐसा रिझल्ट जन्मला
अनंत-उदासी-कुठार-घाव घातला
‘सोंग’ कोणतें पुढें , महत्व ना मला
सिंह कसा कोल्ह्यांशी ‘जंग’ हारला ?
टांग मारतां नशीब, जीव आंबला
मात्र अंक प्रथम, नाट्यपूर्ण संपला.
खंक जाहलो पुरा, न खंत ही मला
मानभंग होइ म्हणुन प्राण खंगला
यत्न व्यर्थ सर्वसर्व , गर्व भंगला
हन्त हन्त ! अंत मी असा न कल्पला. ६
*
द्यूत-आरंभाआधीच काढ अर्गला
ऐक, श्रेष्ठ-गुरु अनुभव सांगतो सला
पंडित प्रकांड नको हें कथायला –
राजकारणाचा कर बंद चोचला.
दु:खांमधिं जीव जे सांडत सुखातला
‘पढतमूर्ख’, बोंबलुन ‘किताब’ त्यांजला
मतमतांत संचरि तव गल्बला-खुळा
जाण परी, पॉलिटिक्स ही बुरी बला
अंग बद्ध, पंख बंद, पंक-नद खुला
लांघण्यास लागतो ‘महंत’ ‘पोचला’
सज्जन तूं, उंचसखल-वक्र कां वळा ?
परवडेल कधि नच धंदा असा तुला
फुकट आत्महत्या ही, धुंड नच हिला
बंधु, शांत संथ पथ नि:शंक तुज भला. ७
चुकलो मी, चुनावीय घाट घातला
तूंतरि हरव न आनंद अंतरातला . ८
– – –
मंग : मग
फड : कुस्त्यांच फड
दंगल : कुस्यांची ‘दंगल’ (स्पर्धा)
जधिं : जेंव्हां
जंग : लढाई
दिला : दिलाला, मनाला, हृदयाला
सला : सलाह्, सल्ला
पंक : चिखल
किताब : ख़िताब, पदवी
चुनाव : इलेक्शन, निवडणूक
संगं : संगें, साथीनें, सोबतीनें
आस : आशा
कमिशन : इलेक्शन कमिशन
बुरी बला : वाईट, त्रासदायक अशी गोष्ट / बाब.
अर्गला : कडी
— सुभाष स. नाईक