संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै १९११ रोजी झाला.
पोषक आहारतज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिदीर्चा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेजमधून पीएच्.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारं शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडलं. (त्याचबरोबर जागतिक भूक, अपुरा आहार, कुपोषण यांच्या जोडीनं विशेषत: सेवानिवृत्तीनंतर गरीबांसाठी पोषक आहाराकरिता ‘इंदिरा कम्युनिटी किचन’, खेड्यातली स्वच्छता यांसारखे प्रकल्प राबवले.) त्यासाठी लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सवेर्क्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडं आपल्या संशोधनाची दिशा वळवली. भारतात परतल्यावर ‘अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य’ या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली. पुढं दिल्लीच्या ‘भारतीय कृषीसंशोधन मंडळात’ (आय्.सी.ए.आर.) संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणी व जीवमितीशास्त्र या दोन्हींत बारकाईनं लक्ष घातलं. त्या आधारे उत्तर प्रदेशातल्या इटाह इथं ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या प्रमुखत्वाखाली चाललेला शेळीच्या दुधाचा, तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प, वाषिर्क संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचा सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणं अधिकाऱ्यांना जड गेलं. पण त्यातून सावरल्यावर ह्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या मंडळींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांवर टाकली. (ह्या प्रशिक्षण कार्यक्रमास बळकटी यावी म्हणून ‘स्टॅटिस्टिकल मेथड्स् फॉर अॅग्रिकल्चरल रिसर्च’ हे कृषी विद्यापीठं व महाविद्यालयातून लोकप्रिय ठरलेलं व पुढं ज्याची स्पॅनिश आवृत्ती निघाली, ते पुस्तक सुखात्मे यांनी लिहिलं.)डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीतीर् युनोच्या एफ्.ए.ओ.पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळं त्या संघटनेनं सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं.
कृषी सर्वेक्षणाच्या संदर्भात भूखंडाचा आकार आणि विस्तार याबद्दल सुखात्मे यांचे अग्रगण्य संख्याशास्त्रज्ञांशी तात्त्विक मतभेद झाल्यावर त्या मंडळींनी, संशोधनाच्या कोणत्याही उपयोजित क्षेत्रातला संख्याशास्त्रीय प्रस्ताव एका केंदीय यंत्रणेनं मंजूर केल्याशिवाय पुढे जाऊ नये असा धोरणात्मक निर्णय केंदशासनाकडून पारित करवून घेतला. त्यामुळे सुखात्मे यांचे बरेच अधिकार काढून घेतले गेले. तसेच कृषीसंशोधनात जवळजवळ संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या आय्.सी.ए.आर.चं ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स्’ असं नामांतर करण्यास वरील तज्ज्ञांसह केंद सरकारातल्या डुढ्ढाचार्यांचा विरोध. ह्या दोन्ही कारणांसाठी सुखात्म्यांची घुसमट वाढली व हा कोंडमारा इत:पर सहन होणार नाही म्हणून १९४८पासून त्यांना आलेलं एफ्.ए.ओ.चं संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम इथं रुजू झाले.
एफ्.ए.ओ.त दाखल झाल्यानंतर सुखात्मे यांनी विविध देशांना नेमून दिलेले कार्यक्रम तर फलद्रूप झालेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एफ्.ए.ओ.चे पहिले नोबेल पारितोषिक विजेते सरसंचालक लॉर्ड बॉईड यांनी विकसनशील देशातला अपुरा आहार, भूक व प्रथिनांची कमतरता लक्षात घेऊन, जगातले दोन तृतीयांश लोक भुकेनं बेजार होतात, हा काढलेला निष्कर्ष खोटा ठरवून त्यांनी प्रतिवादासाठी भुकेनं गांजलेल्या २० ते ३० वयोगटाच्या अन्नग्रहण आकडेवारीच्या मदतीनं अशी माणसं फक्त २० टक्केच असल्याचा दावा केला! अर्थातच एफ्.ए.ओ.तल्या वरिष्ठांच्या विरोधात जाणारा हा निर्णय त्यांच्या गळी उतरवण्यासाठी डॉ. सुखात्मे यांना, ‘जागतिक भूक’ हा या कामावर लिहिलेला निबंध वरिष्ठ नामवंत संख्याशास्त्रज्ञ हजर असलेल्या ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’ व ‘न्युट्रिशनल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन’ यांच्या संयुक्त सभेपुढं २७ मे १९६१ रोजी वाचून अग्निपरीक्षा द्यावी लागली. या दिव्यातून ते सहीसलामत बाहेर पडले इतकंच नव्हे तर, पुढं या दोन्ही संस्थांनी त्यांना ‘गाय पदकानं’ सन्मानित केलं!
डॉ. सुखात्मे यांच्या विशेष कामात, मुंबई विद्यापीठात, संख्याशास्त्र विभाग काढण्यात (१९४८) त्यांनी पुढाकार घेतला व इकडच्या तरुणांना संख्याशास्त्रीय नोकऱ्यांची दार खुली करून दिली याचा उल्लेख अनिवार्य आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता. त्यासाठी १) पुण्याच्या मंडईत ‘इंदिरा कम्युनिटी किचन’ हा अत्यंत अभिनव व पथदर्शक कार्यक्रम राबवून त्यात दुर्बल घटकांना रोजगार व गरीबांना आपण घरी रोज जे अन्न खातो तो प्रथिनयुक्त आहार २० ते २५ टक्के इतक्या स्वस्त दरानं पुरवला. २) खेडी व झोपडपट्ट्यांतली रोगराई निपटून काढण्यासाठी स्वच्छता व आरोग्य याकडं लक्ष देऊन त्यांचं जीवनमान पालटण्यासाठी सुखात्मे यांनी पुण्याजवळ किर्कतवाडी इथं १९७९ साली, शाळेजवळील कचऱ्याचे ढीग हलवून मुलांना होणाऱ्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त केला. गावात संडास व मुताऱ्या बांधून देऊन खेडूतांना उघड्यावर घाण करण्यातले धोके समजावले. विहिरीत क्लोरीन टाकून पिण्याचा स्वच्छ पाण्याची सोय केली. त्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले.
पां. वा. सुखात्मे यांचे निधन २८ जानेवारी १९९७ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply