आजी आजोबा होते थकलेले
थकलेल्या वाड्यात रहात होते.
काळाने केला भयानक घात
सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात
पण पडताना वाड्याने हात टेकले
आजी आजोबांना त्याने वाचविले
जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले
आजी मात्र एकटीच राहिली धीराने
वाडा नाही सोडला तिनं हट्टाने
म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं
आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो
एके दिवशी आजीने देह सोडला
आणि आमचा उन्हाळा करपून गेला
एकाकी वाडा खूणवत होता
आतुरतेन आम्हाला बोलवत होता.
खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
मातीचा देह मातीला शरण गेला.
– डॉ. सुभाष कटकदौंड