मुलींच्या शाळेत मातृदिनाची लगबग चालली होती. मुली, शिक्षिका सगळेच उत्साही होते. सगळ्यांनी मिळून शाळा स्वच्छ केली. जिकडे तिकडे आरास केली. आजचा दिवस आईला वंदना देण्याचा होता. सगळ्यांची उत्सुकता ही होती की मुख्याध्यापिका कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविणार.
मुख्याध्यापिकांनी शिपायाबरोबर त्यांच्या माळ्याला बोलाविणे पाठविले. शिपायाने माळ्याला सांगितले “अगदी अर्जंट बोलाविले आहे.” गोपाळच्या म्हणजे माळ्याच्या हृदयात धडधडायला लागले. मोठ्या बाई इतक्या तातडीने बोलावित आहेत म्हणजे माझ्या हातून काहीतरी गुन्हा घडला असणार या कल्पनेनेच तो घाबरुन गेला. मोठ्या बाईंच्या समोर तो उभा राहिला तेव्हा तो थरथरत होता.
मोठ्या बाईंनी त्याच्या समोर काही कागद टाकले. त्या म्हणाल्या “शाळेमध्ये मातृदिनाची स्पर्धा होती. तुझ्या मुलीचा निबंध समोर ठेवला आहे. तो वाचून बघ.”
गोपाळ अगदी हीनदिन झाला. “मला लिहीता वाचता येत असते तर काय? तुमच्यामुळे मला निदान नोकरी मिळाली, घर मिळाले आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलीला तुम्ही मोठ्या मनाने तुमच्या शाळेत घेतलेत. तुमचे माझ्यावर लई उपकार आहेत. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या. पण माझ्यावर नाराज होऊ नका.”
मुख्याध्यापिका हसल्या आणि म्हणाल्या “ठीक आहे मी एखाद्या शिक्षिकेला बोलावून घेते.” काही वेळात एक शिक्षिका आल्या आणि त्या गोपाळच्या मुलीचा निबंध वाचू लागल्या.
मातृदिन:
आम्ही एका दूरवरच्या खेड्यातले. आमच्या गावात ना शिक्षणाची सोय होती ना कुठली वैद्यकीय उपचारांची. माझी आई मला जन्म देताच मरण पावली. आमच्या गावात अशा अनेक बायका मरतात. त्यांना वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. माझ्या बाबांनीच मला प्रथम उचलून घेतले. आईच्या तेवढेही नशिबात नव्हते.
माझ्या आजोबा आजींनी माझ्या वडीलांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला. नंतर साम दाम दंड सगळे वापरुन त्यांच्यावर दबाव आणला. माझ्या आजोबा आजींना मुलगा हवा होता. त्यामुळे ते माझ्या बाबांना त्रास देऊ लागले.
माझ्या बाबांना त्यांचा त्रास सहन होईनासा झाल्यावर मला उचलून त्यांनी ते गाव सोडले. आम्ही या शहरात आलो. बाबांजवळ फक्त मी होते. आपले घर दार सगळे सोडून बाबा माझ्या भविष्यासाठी इकडे आले.
त्यांनी मोल मजूरी केली. आम्ही खूप हालात दिवस काढले. जे काही मिळायचे, बाबा सर्व मला द्यायचे. मला वाटायचे त्यांना आवडत नसावे म्हणून.
मी सगळे जेवण खाऊन टाकायची. थोडी मोठी झाल्यावर मला कळले की त्यावेळी आमच्याकडे दोघांपुरतेही जेवण नव्हते. मला मिळावे म्हणून बाबा मुद्दाम त्यांना बरेच प्रकार आवडत नाहीत असे मला सांगायचे.
सुदैवाने बाबांना या शाळेत नोकरी मिळाली. त्याबरोबर रहायला जागाही. इथल्या मोठ्या बाईंनी उदार मनाने मलाही या शाळेत अॅडमिशन दिली. बाबांचे माझे भविष्य घडविण्याचे स्वप्न साकार होते असे वाटू लागले.
आज वर्ग शिक्षिकांनी आम्हाला आईची महती लिहायला सांगितली. निबंधाचा विषय मातृदिन असा असला तरी मी माझ्या बाबांबद्दल लिहीणार आहे. त्याचे कारण त्यांनी माझी आई बनून माझा सांभाळ केला आहे. आई म्हणजे प्रेम. बाबांनी ते मला भरभरुन दिले. आई म्हणजे सांभाळ. बाबांनी स्वतःच्या जिवापलिकडे माझा सांभाळ केला. आई म्हणजे संस्कार. बाबांनी मला सगळे उत्तम संस्कार दिले. त्यांनी हातचे असे काहीच राखून ठेवले नाही जे एक आई मला देऊ शकली असती.
आणि म्हणूनच या मातृदिनाच्या निमित्ताने मी माझ्या बाबांना आई समजून वंदन करु इच्छिते. कदाचित माझ्या भावना तुम्हाला विचित्र वाटतील. परंतु पुरुषांमध्ये सुध्दा मातृत्व असते जे माझ्या बाबांमध्ये आहे आणि त्यांनी ते सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळेच त्यांना मी माऊली म्हणते.
निबंध ऐकताना गोपाळच्या डोळ्यांतून सतत अश्रू वहात होते. मुख्याध्यापिकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला शांत केले. त्याच्यासाठी चहा मागवला आणि तो शांत झाल्यावर त्यांनी हळूच प्रेमाने त्याला विचारले “मग, गोपाळ, तू आमच्या मातृदिनाच्या सोहळ्याचा प्रमुख पाहुणा होशील ना? ”
गोपाळ जवळ बोलायला शब्द नव्हते. शाळेतल्या मुलींना व शिक्षिकांना जेव्हा प्रमुख पाहुण्याचे नाव कळले त्यावेळी सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply