नवीन लेखन...

माया महाजाल

Maya Mahajaal

“काय म्हणतात? महाजाल?”

“हो! इंटरनेटला मराठीत महाजाल म्हणतात!”

“गंमतच आहे!”

“हो, आणि बेवसाईटला संकेतस्थळ!”

“ओ होऽऽ! हाऊ रोमँटिक!”

“ते जाऊ दे, आता कर बरं टाईप, अन उघडून दाखव तुझं पेज फेसबुक वरचं! नायतं थांब, मी काँप्युटर पूर्णबंद करते, मग पहिल्यापासून काँप सुरू करून एफबी वरचा अकाउंट आणि स्वतःचं पेज उघडेपर्यंत सगळं जमलं पाहिजे तुला!”

“ठीक आहे.”

वनिता – म्हणजे स्पेलिंगमध्ये वनिथा – कारण ती आंध्रातली होती-सायलीवर खूष झाली. भराभर सायलीनं काँप ऑन करून गूगल क्रोम मधून एफबी वर लॉग ऑन केलं आणि शाबासकीसाठी एखाद्या हुशार विद्यार्थ्यानं मास्तरकडे पहावं तसं वनिताकडे पाहिलं.

“व्वाऽऽऽ! आणि मधेच मायक्रोसॉफ्टचे दोन शहाजोग मेसेज आले ते तू कोपर्‍यातली फुली क्लिकून घालवलेस ते तर फारच छान!”

“थँक्स!” सायली डोळे नाचवत म्हणाली. खूष झाली होती ती!

“हे पहा, आता डेस्कटॉपवरच्या या ‘पिक्स’ फोल्डरमध्ये आपण काही आयकॉन्स एकत्र केलेत, ते आता तुझ्या प्रोफाईल मधे टाकायचेत. हे बघ इथे ‘सेटिंग्ज’ लिहिलं आहे, ते क्लिक कर आणि मग….” जवळ जवळ तास दीडतास सायली शिकत होती आणि वनिता म्हणजे वनिथा – तिला शिकवत होती. होत्या दोघीही मास्तरणीच – शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेत. पण आता एक बनली होती मास्तरीण आणि दुसरी तिची विद्यार्थिनी!

‘फेसबुक’ वर फेरफटका करायला लागल्यापासून सायलीचा एकलकोंडेपणा खूपच कमी झाला. तिने स्टेटस मुद्दामच “कमिटेड” असं घातलेलं होतं, वनिताच्या सल्ल्यानं. शिवाय नाव ‘अनामिका’ असं टोपण नाव ठेवलं होतं. प्रायव्हसीमध्ये फक्त ‘मित्र’ म्हणजे ‘फ्रेंड’ म्हणून स्वीकारलेल्यांनाच तिची माहिती – म्हणजे प्रोफाईल – पहायची परवानगी होती, पण पत्ता आणि इतर माहिती पहायची कुणालाच परवानगी नव्हती. म्हणजे अगदी पारखून घेतल्याखेरीज ती कुणाशी फार मैत्री करणार नव्हती. कारण तिच्या घटस्फोटानंतर सायली तशी खूपच एकलकोंडी झालेली होती आणि गेली आठ वर्षं ती एकटी राहात असल्यानं आणखीनच स्वयंकेंद्रित झाली होती.

पण सहा महिन्यांपूर्वीच वनिथा उर्फ वनिता नावाचं एक उत्साही वादळ त्यांच्या शाळेत दाखल झालं आणि शेवटी अगदी सायलीचा देखील नाईलाज होऊन तिला आपल्या कोषातून बाहेर यावं लागलं. वनिता होतीच तशी! विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या प्रिंसिपॉल पारकर मॅडमपर्यंत सगळ्यांना तिनं कसं आणि केव्हा आपल्या उत्साहात सामील करून घेतलं कुणाला कळलंसुद्धा नाही. मग सगळ्यांशी तुटकपणे वागणारी सायली देखील तिच्याशी नीट बोलायला लागली आणि त्या दोघीही लवकरच चांगल्या मैत्रिणी बनल्या. वनिता म्हणजे अगदी नवीनातल्या नवीन गोष्टींमध्येसुद्धा अगदी अद्यावत माहिती असलेली. तिनं ज्यांचे फेसबुक अकाऊंट नाहीत त्यांना रिकाम्या वेळात धरून त्यांच्या स्टाफरुममध्ये दोन इंटरनेटला जोडलेले काँप्यूटर्स होते तिथे नेऊन त्यांना मदत करत भराभर प्रत्येकीचे फेसबुकवर पेजेस करून दिले आणि शेवटी सायलीला देखील तिच्या प्रेमळ आग्रहामुळे मान तुकवावीच लागली.

पण इंटरनेटला मराठीत ‘महाजाल’ म्हणतात आणि वेबसाइटला ‘संकेतस्थळ’ हे ऐकून तिला अगदी पहिल्या क्षणापासूनच या सगळ्या उद्योगात खूपच रस वाटला. काँप्यूटरवर पॉवर पॉईंट प्रझेंटेशन्स तयार करणे, वर्डमध्ये नोटीसेस, पत्र वगैरे छापणे, एक्सेलमध्ये रोल नंबर्स, नांवं घालून रिझल्टशीट्स बनवणे वगैरे काँप्युटर्सची जुजबी ओळख तिला होतीच, त्यामुळे ती इंटरनेटवर सर्फिंग करायला भराभर शिकली – म्हणजे या ‘महाजाला’ चे धागेदोरे तिला सहजासहजी समजले. मग वनिताच्या आग्रहाखातरच तिनं वनिताच्या मैत्रिणीचा एक सेकंड हँड लॅपटॉप आणि वर्षभराचं वायरलेस ब्रॉड बँडचं कनेक्शन घेऊन टाकलं. त्यांची शाळा चांगली शहरातल्या प्रतिष्ठित शाळांपैकी होती. इंग्रजी माध्यमाची. बहुधा सगळ्या शिक्षिकाच होत्या. शिक्षक नावापुरतचे 7-8 जण.

तिनं फेसबुकवर स्वतःचं पान बनवताच आठवडा भरातच तिला फ्रेंडशिप रिक्वेस्ट यायला लागल्या. बहुतेक सगळ्या तिच्या विद्यार्थिनी. त्यांच्या शाळेतून तिच्या हाताखालून चौथी-पाचवीतून गेलेल्या अन् आता कुठेतरी दुसर्‍या शाळेत किंवा कॉलेजात असलेल्या. क्वचित एकदोन विद्यार्थी, म्हणजे मुलं देखील. ती आपली सगळ्यांची मैत्री-विनंती भराभर ‘अ‍ॅक्सेप्ट’ वर क्लिक करून मान्य करायची आणि मग एका रात्री ती लॅपटॉप उघडून बसली होती. वनिताशी गप्पा झाल्या होत्या आणि ती तिच्या कलीग्जपैकी कोणी काय फोटो टाकलेत ते बघत होती. तिनं एक जांभई देऊन आता बास झालं. सकाळी उठायचंय. झोपायला पाहिले. म्हणून लॅपटॉप बंद करायची तयारी केली. एवढ्यात तिचं लक्ष नुकत्याच फ्रेंडशिप अ‍ॅक्सेपट केलेल्या रोशनी सामंतच्या वॉलवर खिळून राहिलं. तिथे तिच्या एका मैत्रिणीनं, सरिता बारगेनं काहीतरी विनोदी व्हिडीओ टाकून कमेंट लिहीली होती.

सरिता.

सायली बघतच राहिली.

तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

चांगल्या आणि वाईट!

चांगल्या तशा कमीच, वाईटच जास्त! कारण सरिता बारगे तिची मुलगी होती! तिचा नवरा विजय बारगे! आणि त्यानं घटस्फोट होतांना तिची सरिता तिच्याकडून हिरावून घेतली होती. सरिताची कस्टडी त्याला मिळाली होती! त्यावेळी तिला त्याचं काही वाटलं नव्हतं. कधी कल्पनाही केली नाही अशा घटस्फोटाला सामोरं जावं लागल्यामुळे आणि तो निर्णय तिनंच नाईलाजानं घेतल्यामुळे तेव्हा ती अगदी ढासळून गेली होती. तिला आपण मुलीची जबाबदारी नीट पार पाडू की नाही याची शंका देखील होती! तो काय- तो घरचा खूप श्रीमंत होता, फक्त तिच्या प्रेमात पडल्यानं त्यानं तिच्याशी आपल्या आईच्या मर्जी विरुद्ध लग्न केलं होतं आणि लग्नानंतर सायलीला आपल्या सासूचं घरात केवढं प्रस्थ आहे हे कळलं होतं. विजयला वाटलं होतं की आईनी, म्हणजे नलिनी बाइंनी सायलीला स्वीकारलंय, पण नलिनी बाईंचा विक्षिप्त स्वभाव त्याला लहानपणापासून त्यांच्या देखरेखीखालीच वाढल्यामुळे कधी जाणवायचा देखील नाही – नव्हे, तो विक्षिप्तपणा त्याच्यात देखील थोडाफार उतरला होता.

पण नंतर एकटी रहात असतांना तिला सारखं वाटायचं की आपण मुलीवरचा आपला हक्क उगीच सोडला!!

तिनं सरिताचं पान उघडलं. तिच्या प्रोफाईल वरून सरिताला एक फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली, आणि लॅपटॉप बंद करून दिवे विझवून, फ्लॅटचं दार नीट लागलंय याची खात्री करून ती झोपली -पण तिला झोपच लागेना! विजय बरोबरचं पहिलं मोठं भांडणच तिच्या डोळ्यापुढे तरळत होतं! या भांडणापासूनच विजय बाबतचा तिचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली होती!

सायलीचे डोळे रडून लाल झाले होते. ती विजय ऑफिसमधून परत येण्याची वाट पाहत होती. सरिता थोडंसं रडून झोपून गेली होती. आज सकाळी ऑफिसला जातांना सायली, विजय आणि सरिता याचं हसणं खिदळणं पाहून नलिनी बाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. विजयच्या लग्नानंतर त्यांचा आधीचा विक्षिप्त स्वभाव आणखी विचित्र झाला होता. विजयला पहिली मुलगी झाली म्हणून हा राग होताच. कारण सोनोग्राफीमधून मुलगा की मुलगी सांगायला, आणि मुलगी असली तर ‘गर्भामुळे आईच्या जिवाला धोका’ असं प्रमाणपत्र देऊन गर्भपात करायला नलिनीबाईंच्या ओळखीचे एक डॉक्टर तयार होते. पण याला सायली तयार नव्हती आणि पहिल्यांदा विजय नं देखील आईच्या ‘हो’ त ‘हो’ मिळवली आणि तिला नलिनीबाईचं म्हणणं तिनं एैकावं असं सागितलं तेव्हा ती तर आश्‍चर्यानं थक्कच झाली! हा तिचा प्रियकर विजय नव्हता. वेगळाच कुणीतरी होता – हा तिचा नवरा होता. त्या कामवाल्या बायका काय म्हणतात नवर्‍याला? बरोबर! मालक! हा तिचा मालक होता. धनी? बरोबर! हा तिचा मालक, तिचा धनी होता आणि ती त्याच्या मालकीची एक वस्तू होती. निर्जीव. प्रियकर आणि नवरा दोघांमध्ये इतका फरक असतो? प्रियकराचा नवरा झाल्यावर त्याच्यातली माणुसकी नष्ट होऊन जाते? की पुरुषाच्या मनात ती कधी नसतेच? की या पुरुषप्रधान समाजानं ती पूर्णपणे ठार करून टाकली असते? पण ती जेव्हा उफाळून विजयला ‘हेच तुझं प्रेम का?’ म्हणून विचारायला लागली तेव्हा मग तो जरा शुद्धीवर आल्यासारखा झाला आणि त्यानं तिला त्या सोनोग्राफीसाठी जबरदस्ती केली नाही. इतकंच! पण तेव्हापासून त्यांचा एकत्र जुळलेला स्वर बिघडला तो बिघडलाच!

सरिताच्या जन्मानंतर मात्र विजय आणि सायलीच्या संबंधामधला रुक्षपणा कमी होत गेला. लहानशा सरितानं मोठी होता होता एक वेगळंच विश्‍व स्वतःभोवती निर्माण केलेलं होतं. त्यात विजय गुंतून जात होता आणि ते नलिनी बाईंना सहन होत नव्हतं. विजयचे वडील त्याच्या लहानपणीच वारलेले असल्यानं त्यांच्यानंतर विजय पूर्ण शिकून अगदी एम.बी.ए. होईपर्यंत नलिनीबाईंनी त्याला अगदी आपल्याशी बांधून ठेवलेलं होतं. विजयच्या वडिलांच्या सर्व उद्योगांची विक्री करून विजयच्या एका दूरच्या काकांनी सर्व संपत्ती स्थावर आणि जंगम स्वरूपात नलिनीबाईंच्या नावे करून दिली होती. त्याचं व्याज सुद्धा खर्च करणं कठीण होतं इतकी ती संपत्ती होती आणि त्यावरच सगळं चाललेलं होतं. विजय कॉमर्स ग्रॅज्युएट आणि नंतर एम.बी.ए. झाला तेव्हा त्याच्या काकांनी “बारगे एंटरप्रायझेस” ही केमिकल फॅक्टरी तेवढी विकली नव्हती, ती विजयच्या ताब्यात दिली. पण विजय कधी ती नीट चालवू शकला नव्हता. सारखे काही तरी प्रॉब्लेम्स येत होते. नलिनीबाई विजयला सतत ती फॅक्टरी विकून पाटील  बिल्डर्सच्या चंद्रकांत पाटलांच्या मुलीशी, मनालीशी, लग्न करून आपल्या तशाच पडलेल्या जमिनीवर पाटलांच्या मदतीनं फ्लॅट्सच्या स्क्रीम्स सुरु कर म्हणून तगादा करत असत आणि विजयला हे मुळीच नको होतं. एक तर त्याला चंद्रकांत पाटील  हा माणूस बिलकुल आवडायचा नाही. आणि मनाली ही दहावीतच दोनदा नापास होऊन शिक्षण सोडलेली आणि पूर्ण बिघडलेली मुलगी होती. दिसायलाही ती चांगली नव्हती आणि तिच्याविषयी प्रवाद देखील खूप होते. मग कुठल्यातरी एका लग्नात विजय आणि सायलीची गाठ पडली आणि ते दोघे एकमेकांना खूपच आवडले आणि अगदी चित्रपटात दाखवतात तसे दोन चार योगायोग अक्षरशः घडले आणि लागोपाठ त्यांची एकमेकांशी भेट होत राहिली आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं. आणि नलिनीबाईंना जेव्हा कळलं की आता आपला मुलगा काही आपलं ऐकणार नाही, तेव्हा त्यांनी ते लग्न धडाक्यात भरपूर पैसा खर्चून बारगेंच्या श्रीमंतीला शोभेशा थाटात पार पाडलं. पण मनातल्या मनात त्यांनी ठरवलं होतं, की बघू ही सायली कशी टिकते, मी हिला हाकलणारच माझ्या घरातून बाहेर! त्यांचा पहिला डाव वाया गेला होता, सायलीनं सरिताला जन्म दिला होता आणि विजय-सरु-सायली पुन्हा जरा सुखी व्हायला लागले होते आणि त्यादिवशी त्यांनी मग आपला दुसरा डाव सुरु केला होता. त्यांनी सकाळपासून सायलीशी भांडण सुरू केलं होतं. मुद्दा त्यांनी आधीच बर्‍याच वेळा उगाळलेला होता, की तुम्ही सरिताला बिघडवता आहात. लहान मुलांना आधीपासूनच शिस्त लावली पाहिजे, त्यांना हट्टी बनू देता कामा नये! त्यादिवशी सायली आली आणि तिला सरिता कुठे दिसेना! नलिनीबाई टी.व्ही. वर कुठलातरी ‘धर्म’ चा चॅनेल पाहत बसलेल्या. कुठलातरी महाराज काहीतरी पिवळ्या कपड्यात गुंडाळा, पाण्यात वाहवून टाका – अकरा गोमतीचक्र आणा. पिवळी फुलं आणा – असलं काहीतरी सांगत होता. समोर नलिनीबाईंची वही आणि पेन होतं. काही स्वतःला पाहिजे असलेलं अशा धर्म वगैरे चॅनेल्स वर आलं की नलिनीबाई ते वहीत लिहून घ्यायच्या. चोवीस तास घरकामाला असलेली शेवंताबाई सकाळीच मोठी लिस्ट घेऊन, जातांना दळण टाकून, मग मॉल मध्ये खरेदी करायला गेली होती ती अजूनही परत आलेली दिसत नव्हती.

“आई सरिता कुठे आहे?” सायलीनं विचारलं. नलिनीबाईंनी उत्तरच दिलं नाही.

“आई, सरिता कुठे गेलीय? शेजारी खेळायला तर तुम्ही पाठवलं नाही नं?”

“नाही.”

“मग कुठे आहे ती?”

नलिनीबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त टीव्हीचा आवाज वाढवला. सायली अस्वस्थ झाली. हॉलमधून बंगल्याच्या समोरच्या व्हरांड्यात आली आणि तिला सरिताच्या रडण्याचा अस्पष्ट आवाज दुरुन आल्यासारखा वाटला. तिला वाटलं आपल्याला भास तर होत नाही ना? पण पुन्हा तोच आवाज! अन् मग एकदम तिच्या लक्षात आलं. व्हरांड्याला लागून डाव्या बाजूला असलेल्या जिन्यानं ती दडदडत गच्चीवर चढून गेली. गच्चीच्या दरवाजाला बाहेरून कडी होती, आणि त्या दरवाज्या मागून सरिताच्या रडण्याचा आवाज येत होता! सायली दरवाजाची कडी उघडून धावतच गच्चीवर गेली. पाण्याच्या टाकीपाशी काँक्रीटच्या तीन पायर्‍या बांधलेल्या होत्या, त्यावर सरिता उन्हात रडत होती.

“सरिताऽऽ!” सायली ओरडली, त्याबरोबर सरितानं वरं पाहिलं आणि ती धावत येऊन आपल्या आईला बिलगली. “काय झालं बेटा? काय झालं?” सायलीनं तिला उचलून घट्ट छातीशी धरून तिचे डोळे पुसत म्हटलं.

“आजीनी मला वरती कोंडून ठेवलं! मी चॉकलेट खाणार होते. आजीला मागितलं तर तिनं दिलं नाही. म्हणून मी खुर्ची फ्रीजजवळ नेऊन फ्रीज उघडायला गेली तर आजीनं मारलं, अन् मला दंडाला धरून ओढत वर आणून अर्धा तास उन्हात बसायची शिक्षा म्हणून गच्चीवर कोंडून ठेवलं!”

सरितानं रडत रडत तुटक तुटक सांगत आपली हकीकत पूर्ण केली. तोपर्यंत सायली सरिताला छातीशी घट्ट चिकटवून आपल्या खोलीत गेली होती, आणि तिनं दार आतून लावून घेतलं होतं. सरिताच्या गोर्‍यापान दंडावर गच्च धरून ओढल्यामुळे दोन निळसर वण पडलेले होते. सायलीनं त्यावर आयोडेक्स हळुवारपणे लावून सरिताला शांत करून झोपवलं आणि मग ती बाहेर गेली. आपल्या खोलीचं दार ओढून.

ती हॉलमध्ये गेली आणि तिनं टी.व्ही. च्या मागे जाऊन प्लगशेजारचं बटन बंद करून टीव्ही बंद करून टाकला. नलिनीबाई धाडकन सोफ्यावरून उठल्या आणि सायलीजवळ आल्या. तिनं काही न विचारताच म्हणाल्या,

“काही चुकलं नाही माझं. सरुचा हट्टी स्वभाव बदलायलाच हवा. आता काही चॉकलेट खाण्याची वेळ नाही. तिनं मी सांगितलेलं ऐकायला हवं होतं.”

“पण म्हणून तिला अर्धा तास इतक्या कडकं उन्हात नेऊन बसवायचं? तिला असं दरादरा ओढत न्यायचं? आई तुम्ही तिच्या दंडावरचे निळे वळ पाहिले तुमच्या बोटांचे?”

“हे बघ सायली, एकदा अशी शिक्षा दिली की ती सुधारेल. टीव्ही सुरु कर मुकाट्यानं!”

सायली विस्फारलेल्या डोळ्यांनी नलिनीबाईंकडे बघतच राहिली. “टीव्ही सुरु कर म्हणून सांगितलं नं तुला?” नलिनीबाई विचित्र आवाजात ओरडल्या.

“नाही करत!” सायली म्हणाली,

“त्याबद्दल मला काय शिक्षा देणार तुम्ही?” ती तिरस्कारानं थुंकल्यासारखी बोलली. नलिनीबाई पुढे झाल्या आणि त्यांनी एकाएकी हात उगारून खाऽड्कन सायलीच्या गालफडात एक जोरदार थप्पड लगावली आणि टीव्हीचं भिंतीवरचं स्विच ऑन करून त्या पुन्हा शांतपणे सोफावर जाऊन बसल्या.

“….ऐसा करनेसे घरमें सुखशांती प्रस्थापित होगी. जय विंध्यवासिनी!”

टीव्हीवरचा महाराज एकाएकी मोठ्या आवाजात सांगायला लागला. भयचकित झालेली सायली आतल्या आपल्या खोलीत पळाली आणि दार आतून लावून घेऊन हुंदके देत पलंगावर कोसळली. तिनं निरागसपणे झोपलेल्या सरिताच्या मऊ गालावर हात फिरवला आणि ती विजय परत येण्याची वाट पाहत रडत राहिली. ती मनातल्या मनात काहीतरी पक्कं ठरवत होती.

विजय संध्याकाळी आला आणि सगळं त्यानं शांतपणे ऐकून घेतलं. पण आपल्या  आईला काही सांगण्याचं त्यानं स्पष्टपणे नाकारलं. “हे पहा, आईचं अन् तुझं काय भांडण असेल ते तुमचं तुम्ही सॉर्ट आऊट करा! मी काही मध्ये पडायला तयार नाही!”

“विजय! तू काय म्हणतोयस? तुझं माझ्या सांगण्याकडे लक्ष नाही का?”

“माझं लक्ष वगैरे आहे. पण तू म्हणतेस तसं वेगळं राहणं मला शक्यच नाही.”

“मग निदान सरिताच्या पालनपोषणात आईंनी थोडाही हस्तक्षेप करायचा नाही हे आईंना मान्य करायला लाव!”

“अग शेवटी ती देखील आजी आहे सरुची! लहानपणीच थोडी शिस्त लावली तर ते काही वाईट नाही!”

“हो! आजी म्हणे! गर्भावस्थेतच सरूला मारायला टपलेल्या होत्या त्या! मी खंबीर होते म्हणून ते जमलं नाही!”

“हे पहा, उगीच कटकट करू नकोस! आधीच त्या फॅक्टरीत गोंधळ चाललाय सगळा, अन् घरी पण कटकट मला नकोय. निदान घरी तरी मला जरा शांतपणा हवाय! दरवर्षी तोटा वाढतच चाललाय, अन् तो हरामखोर पाटील बिल्डर मला मुद्दाम अडचणीत आणायला पाहतोय सगळीकडून!” विजय म्हणाला, “कुठून लग्न केलं असं झालंय मला!” तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, पण ते सायलीनं ऐकलंच!

असं तिचं विजयशी झालेलं पहिलं मोठं आणि गंभीर भांडण! त्या भांडणापासूनच तिचा विजय बाबातचा भ्रमनिरास तर झाला होताच, पण ती मनानं अगदी सुन्न होऊन गेली होती. ते भांडण तिच्या डोळ्यासमोर तरळत असतांनाच आता 15 वर्षांची झालेली सरिता तिच्या डोळ्यांसमोर आली. फेसबुकवरचा तरुण सरिताचा गोड चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला आणि तिला बरं वाटलं. मग हळूच ती गाढ झोपेत बुडाली!

त्यानंतर बरेच दिवस नलिनीबाई शांत होत्या. पण पुन्हा एकदा त्यांनी सायलीशी काहीतरी कुरापत काढून भांडण उकरून काढलं आणि त्या भांडणातच सायलीनं त्यांच्या आरोपांना उत्तर देताच तिच्यावर हल्लाच चढवला. तिचा हात मुडपून पाठीवर पिरगाळला आणि तिच्या गालफाडात दोन-चार थोबाडीत ठेवून दिल्या. सायली सुन्न झाली. संध्याकाळी विजयला सांगितल्यावर त्यानं पुन्हा तुमची दोघांची भांडणं तुम्हीच सोडवा, मी मध्ये पडणार नाही. ही जुनीच रेकॉर्ड वाजवली. वेगळं राहण्याचा तिच्या प्रस्तावाला देखील अगदी स्पष्ट नकार दिला. सायलीचे आई-वडिल नव्हतेच. तिच्या लहानपणीच गेलेले होते. तिच्या एका काकांनी तिला व तिच्या भावाला वाढवलं होतं. तो भाऊ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता.

या भांडणानंतर सायली निराशेच्या खोल गर्तेत कोसळली. तिची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. काहीही बोललं तरी तिचं लक्ष नसायचं. सरिताची सुद्धा ओळख तिच्या नजरेत दिसेनाशी झाली. नलिनी बाईंनी विजयचे कान चांगलेच फुंकले आणि जर त्यानं सायलीला घटस्फोट दिला आणि अजूनही बिल्डर पाटलांच्या मुलीशी लग्न केलं तर सगळे त्रास कसे संपतील ते त्याच्या लक्षात आणून दिलं. विजयनं शेवटी-“कर तुला काय करायचं ते!” -म्हणून वैतागून संमती दिल्याबरोबर नलिनीबाईंनी सायलीच्या ऑस्ट्रेलियातल्या भावाला बोलावून घेतलं. सायलीची भ्रमिष्ट अवस्था पाहून तो देखील हादरला. त्यानं घटस्फोटाला काही हरकत घेतली नाही. सायलीला बरं करणं एवढंच त्याला महत्त्वाचं वाटत होतं. तो तिला घेऊन तडक ऑस्ट्रेलियाला गेला आणि मग तिथे मानसोपचार तज्ज्ञाकडे योग्य उपचार घेताच सायली पुन्हा पूर्ववत झाली, तेव्हा तिनं तिच्या भावाला खरी हकीकत सांगितली. पण तोपर्यंत घटस्फोट – दोघांच्याही संमतीनं होऊन गेला होता आणि वरकरणी परिस्थिती अशी दिसत होती की सरिताची कस्टडी विजयलाच देणं योग्य वाटावं ! आणि त्या वेळची लहानशी सरिता आता दहावीत शिकत असतांना सायलीला ती ‘फेसबुक’ वर भेटली होती !

सायलीची ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ सरितानं लगेच मान्य केली. विजय बारगे आता मुंबईला गेला होता. नलिनीबाई वारलेल्या होत्या आणि सरिताच्या आईचं माहेरचं आडनाव पाटील  होतं! कोड्याचे सगळे तुकडे कसे एकमेकात अगदी चपखल बसले होते! तुटलेले धागे या ‘महाजाला’त कसे अगदी बेमालूम पुन्हा सांधले गेले होते! घटस्फोटानंतर आणि ऑस्ट्रेलियाहून पूर्ण बरी होऊन परत आल्यानंतर सायलीनं शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली होती आणि लग्नाआधी देखील ती तशी आर्थिकदृष्ट्या चांगली होतीच! शिवाय ऑस्ट्रेलियातल्या भावाची मदत होतीच! त्यामुळे सायलीनं विजयचं पुढे काय झालं याची थोडी देखील चौकशी केली नाही आणि आता मात्र ती सरिताशी अगदी सावधपणे मैत्री वाढवत होती तेव्हा तिला हळूहळू मधे काय झालं ते कळत होतं! पण लहानपणी आपल्याला वेगळी कुणी आई होती, हे सरिताच्या आठवणीत देखील नव्हतं आणि आपली आताची आई ही आपली खरी आई नाही, हे तिला माहितच नव्हतं! सरिता आणि सायली यांची ‘फेसबुक’ वरची मैत्री वाढतच राहिली. नंतर त्यांनी एकमेकींचे ई-मेल अ‍ॅड्रेसेस घेतले आणि दोघीही एकमेकांना लांबलचक पत्रं लिहायला लागल्या. सरिताची पत्रं वाचून सायलीला तिच्यात आपलं प्रतिबिंब पाहिल्यासारखं वाटायचं. सरिताला देखील सायली खूप आवडायची. -जिच्यामुळे सायलीला सरिताचं नाव आणि चेहरा अचानक संगणकाच्या पडद्यावर दिसला होता- त्या रोशनीला देखील खूप आश्‍चर्य वाटायचं. ती सरिताला विचारायची देखील, की मित्र-मैत्रीणींशी जरा रिझर्व्हड् राहणारी, जरा अलिप्तच राहणारी सरिता या सायली मॅडमशी इतकी सलगीची दोस्ती कशी करू शकतेय? त्यावर सरिता म्हणायची,

“कोण जाणे! मला एकदम पाहिल्यावरच सायली मॅम खूप आवडल्या होत्या तुझ्या!” मग दहावीच्या परीक्षेच्या सुट्टीनंतरच्या आठवडाभरासाठी पुण्याला येण्याचा बेत ठरला आणि सायली मॅमला भेटायला मिळेल म्हणून सरितानं पण पुण्याला येण्याचं ठरवलं. तसं तिनं सायलीला कळवताच आपल्याला आपली छोटीशी सरू परत भेटणार म्हणून सायली अगदी हरखून गेली! गच्चीवर उन्हात रडत बसलेली आणि तिनं गच्चीचं दार उघडताच धावत येऊन रडत रडत तिला बिलगलेली सरू! हीच सरिताची आठवण तिच्या मनात रुतून बसलेली होती. त्यानंतरच्या तिच्या सरिताच्या प्रत्यक्षातल्या आठवणी अगदी कोर्‍या होत्या!

ते चार दिवस सायली जणू स्वर्गात होती. आपलं रहस्य तिनं फक्त आपली जिवलग मैत्रीण वनिता हिला सांगितलं होतं. शाळेतून चार दिवस सुट्टी घेतली होती. सरिताच्या पुण्याच्या आठवडाभराच्या मुक्कामात तीन दिवस ती तिच्या नातेवाइकांबरोबर राहिली असली, तरी उरलेले चार दिवस सायली बरोबर राहिली होती. दोघी मिळून सिंहगडला गेल्या होत्या, भाड्यानं कार घेऊन. एक दिवस महाबळेश्‍वर पाहिलं. सरिताच्या आवडीचे पदार्थ सायलीनं तिला खाऊ घातले.

आणि या चार दिवसात सायलीला विजयच्या सध्याच्या स्थितीबद्दल सगळं कळत गेलं.

“बाबा किनी, चांगले आहेत तसे, माझे सगळे हट्ट पुरवतात, पण खूप गंभीर आहेत!”

“गंभीर?”

“हां! म्हणजे तसे गंभीर नाहीत, पण हसत नाहीत कधीच!”

“आणि आई?”

“आई तर काय खूपच बिच्चारी आहे. सारखी आजारी आजारीच असते!”

“हो? काय झालंय तिला?”

“मॅम, मला बाबांनी एकदाच नीट सांगितलं होतं. तिला किनी माझ्यानंतर बाळ होतांना कॅन्सर झाला होता, आणि तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं आणि मग केमोथेरपी का काय म्हणतात नं, त्यामध्ये तिला खूप त्रास झाला आणि ती खूप जाडी झाली. तिच्या स्किनवर पण खूप डाग पडले, आणि थोडी हालचाल करून पण तिला धाप लागते!”

“अरेरे! बिच्चारी!” सायली कळवळून म्हणालीख्

“हो नं! बाबांनी मला हे सगळं सांगितलं नं तेव्हापासून मी खूप काळजी धेते तिची! बिच्चारी! नाहीतर आधी मी तिची नक्कल करून चिडवायची तिला! ती जेव्हा केव्हा ओरडायची नं, तेव्हा! पण आता किनी, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते. माझे लाड करते! मी तिला जबरदस्तीनी फिरायला नेते. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करून घेते. गेल्या दोन वर्षात तिची प्रकृती पण खूप चांगली झालीय! पण जाऊ द्या नं मॅम,  काय सिरीअस विषय काढलाय! आज आपण संध्याकाळी लांब कुठेतरी जाऊ! कँपात जाऊ या! आणि माझं शॉपिंग तर अजून राहिलंय!”

“अं! तू मुंबईची! तुला पुण्यात शॉपिंगला काय मजा येणार?”

“नाऽऽ ही! मॅऽऽम! मला खूप मजा येते मला! तुमच्याबरोबर शॉपिंगला तर केऽवढी मजा येईल! अन माहितीय? माझ्या एका मैत्रिणीनं मला कँपातल्या दोन-तीन दुकानांचे पत्ते दिलेत. तसलं काही मुंबईत मिळतच नाही! अरे हो! अन् कोरेगाव पार्कला जाऊन ओशो चप्पल पण घ्यायच्यात- चटई चप्पल्स! माहितीय? मी माझ्या चार मैत्रिणींना नक्की आणीन म्हणून सांगितलंय!”

“ओक्के बाबाऽ! जाऊया आपण! अन् मी तुला एक स्पेशल गिफ्ट देणार आहे!”

“नाही, नाही. मी नाही घेणार तुमच्याकडून.”

“का बरं? मी तुझी आई असती तर घेतली असती नं?”

“हो! पण तुम्ही कुठे माझी आई आहात?”

“समज, आईसारखीच आहे म्हणून!” सायली आवंढा गिळत म्हणाली.

“ओके, ओके”, सरिता आपल्या नेहमीच्या स्टाईल नं म्हणाली.

त्यावर सायलीनं नेहमीचा विनोद केला,

“ओके ओके,

दूध पिऊन गेले

चार काळे बोके!”

आणि दोघी ही खळखळून हसल्या!

“सायली मॅमकडे राहिलीस? कोण या सायली मॅम?” विजयनं आश्‍चर्यानं सुट्टीवरून परत आलेल्या सरिताला विचारलं.

“त्या नं, रोशनीच्या मॅम होत्या, ती पुण्याला शिकायला असतांना. मग फेसबुकवर रोशनीनं त्यांना पाहिलं, आणि मग आमची दोघांची पण त्यांच्याशी फ्रेंडशिप झाली.”

“मला दाखवशील त्यांचा फोटो? फेसबुकवर?”

“नाही न! ती तर त्यांची काय मिस्टरी आहे, कळत नाही! त्या फोटोच नाही टाकू देत फेसबुकवर! आणि पुण्यात आम्ही इतकी मजा केली, पण मला फोटोच काढू नाही दिले आपले. अगदी महाबळेश्‍वरला पण! मी चुपचाप काही काढले होते, तर एकदा माझ्या मोबाईलवरचे बाकीचे पाहतांना त्यांना दिसलेले, तर कसल्या चिडल्या त्या आणि मला शपथ घातली आपली! मग मी डिलीट केले सगळे आणि नंतर काढले नाहीत!”

“त्याचं आडनाव तरी माहितीय?”

“हो ऽऽ! सायली कीर्तने!”

विजयचा संशय खरा ठरला. कीर्तने!

सायली कीर्तने – नंतर सायली बारगे बनेलली आणि डिव्होर्स नंतर पुन्हा माहेरचं नाव लावणारी! सरिताची खरी आई!

काय करावं? तो अस्वस्थ झाला. सायलीला भेटण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात उफाळून आली. ती गेल्यानंतरचं आयुष्य म्हणजे तर एक रंगहीन, कळहीन चित्रच बनलेलं! एक कंटाळवाणी शिक्षाच बनलेलं! त्याला लग्नाआधीचे त्यांचे प्रेमाचे फुलपाखरी दिवस आठवले. त्याच्या मनात पुन्ही आशेची पालवी फुटली.

पालवी – सायली!

पण सायली जर फोटोबद्दल देखील इतकी काळजी घेत असेल तर जरा सांभाळूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत!

काय करावं?

विजय विचारमग्न झाला.

मग हळूहळू त्याच्या मनात एक योजना तयार झाली.

“मला वाटतं तू त्याला एकदा भेटावंस.” वानिथा- नाही- वनिता सायलीला म्हणाली.

“तू पण असं म्हणतेस? तुला इतकं सगळं समाजावून सांगितलं तरीही?”

“तो काय म्हणतोय ऐकून तर घे! थिंक पॉझिटिव्ह या ऽ र! काय म्हणता तुमच्या मराठीत! सकारात्मक विचार! बरोबर?”

अन् शेवटी सायलीनं विजयला भेटायचं ठरवलं.

विजयला पाहून सायली दचकलीच. केवढा बदलला होता तो! सरिता म्हणत होती ते खरंच होतं. हसणं जणू विसरुनच गेला होता तो! गंभीर झालेला होता. कपाळावर आठ्याचं जाळं. केस कपाळावरून खूप मागे गेलेले. वाढणारं टक्कल. झुकलेले खांदे आणि जगण्याची लढाई पूर्ण हरल्याचा एक पराभूत आणि केविलवाणा भाव.

पण सायलीला पुन्हा पाहून तो एकदम ताजा झाल्यासारखा वाटला. डोळ्यातली चमक पुन्हा परत आली. खांदे जरा सरळ झाले. कपाळावरच्या दोन आठ्या कमी झाल्यासारख्या वाटल्या. त्यानं मग आधी तर खूप वेळा तिची क्षमाच मागितली. सायली आधीच मनाशी ठरवून आपलं मन अगदी घट्ट करून आली होती.

आपल्या आयुष्याचा नाश करणार्‍या या राक्षसाला मुळीच दया दाखवायची नाही असं तिनं ठरवलं होतं. मग त्यानं सरिताची आणि तिची भेट कशी योगायोगानं झाली, आणि दैवात असतं ते कुणाला चुकवता येत नाही, असं एक लांबलचक व्याख्यानच लावलं. तिनं मुंबईला शिफ्ट व्हावं, असं तो सुचवत होता. तिची मैत्री झाल्यापासून सरितामध्ये कसा फरक झाला आणि आधी जरा गुर्मीत असलेली सरिता आता कशी आनंदी आणि हसती खेळती झाली याचं वर्णन तो करत बसला. तिची स्तुती करत बसला. ती अजूनही प्रतिक्रिया दाखवत नव्हती. पण विजयच्या बोलण्यावरून तो खरोखरच पश्‍चात्तापदग्ध आहे हे अगदी स्पष्ट कळून येत होतं.

“मी मनालीशी लग्न आईच्या सांगण्यावरून केलं. माझे सासरे – म्हणजे पाटील  बिल्डर यांनी तर मला कचाट्यात पकडल्यासारखंच केलं होतं.” विजय सांगत होता, “मी मनालीशी लग्न करणार हे तर आमच्या ओळखीचे आणि त्यांचे आणि आमचे नातेवाईक गृहीतच धरायचे! मग नरेन पगारियाच्या म्हणजे माझ्या मित्राच्या आणि तुझ्या मैत्रिणीच्या भावाच्या, लग्नात आपली पहिली गाठ पडली! ” विजयचा स्वर एकदम बदलला.

“आठवतेय तुला आपली पहिली भेट ?” रटाळ आवाजात आतापर्यंत कंटाळवाणं बोलणार्‍या विजयच्या आवाजात कसलातरी जादूई बदल झाला. सायलीच्या अंगावर झर्रर्रकन् काटा फुलला. दोघांचीही नजर एकमेकांना भिडली. डोळ्यात डोळे हरवले. मधला सगळा काळ, सगळा अवकाश नष्ट होऊन भूतकाळातला तो पहिल्या प्रेमाचा पहिला क्षण रसरशीतपणे जिवंत झाला. पण दुसर्‍याच क्षणी ऑस्ट्रेलियातल्या सुन्नपणाचं झाकोळ तिच्या मनात दाटून आलं. स्वतःला सावरून तिनं त्याच्या नजरेतली नजर काढून भिंतीवरच्या हेब्बरच्या घोड्यावर लावली.

ब्लू डायमंडच्या लाऊंज मधल्या कोपर्‍यात मुलाखत चाललेली होती त्यांची.

“मला जुनं काहीही आठवत नाही.” ती रूक्ष स्वरात म्हणाली.

त्यानं एक उसासा सोउला.

“मनाली !” तो म्हणाला,

“मनालीशी लग्न केलं नसतं तर मला तुरुंगात अडकवण्याची योजना तिच्या बापानं केली होती!”

“हं.”

“लग्नानंतर सुद्धा मनाली माझ्याशी कधीच नीट वागली नाही. तिचा क्लब, तिच्या मैत्रिणी, तिचे मित्र यातच ती गुंग असायची. तिचे वडील वारले आणि तिला प्रेग्नन्सीमध्ये कॅन्सर झाला तेव्हापासून ती खूप बदलली.”

बराच वेळ विजय बोलत राहिला. खाण्या पिण्याकडे दोघांचं ही फारसं लक्ष नव्हतं. वेटर्स अधून मधून येऊन काही डिशेस घेऊन जात होते आणि काही नवीन डिशेस ठेवून जात होते, एवढंच !

“मी मनालीला घटस्फोट देतो, ” विजय म्हणाला,

“आणि आपण पुन्हा लग्न करू !”

सायलीनं दचकून पुन्हा वर पाहिलं. थेट त्याच्या डोळ्यात. तिच्या हातातला चमचा टेबलावर आणि काटा डिशवर मोठा खणखणाट करून गळून पडला.

“आई तर काय खूप बिच्चारी आहे. सारखी आजारी आजारीच असते!”

सायलीच्या मनात सरिताचे मनालीविषयीचे शब्द घुमायला लागले.

तिच्या डोळ्यात तिरस्कार उमटलेला विजयला स्पष्ट दिसला. तो आक्रोश केल्यासारखा म्हणाला,

“सायली, मी खरंच सांगतोय. मनालीची सुद्धा याला तयारी आहे.”

सायलीचे डोळे विस्फारले.

“म्हणजे? तू तिला हे सगळं सांगितलंयस्?”

“हो. खरं तर ती कॅन्सरमधून बरी झाली, आणि तेव्हाच तिचे वडील वारले. तेव्हापासून ती मला बरेचदा तुम्ही मला सोडून द्या, दुसरं लग्न करा असं म्हणायची. पण मी कधी तसं केलं नाही. मला माझ्या दैवाचे फासे कसे पडतात याची सतत भीतीच वाटत रहायची. तुझा शापच मला भोवतोय असं माझ्या मनानं घेतलं होतं तेव्हा.”

सायली सुन्नपणे ऐकत राहिली. लहानशी सरिता मनालीची काळजी घेतेय, तिला रागावून जबरदस्तीनं व्यायाम करायला लावतेय असं चित्र तिला डोळ्यापुढे दिसायला लागलं. अगदी वाईटात वाईट माणसांमध्ये देखील चांगुलपणा असतो का? पण तिचं मन एकाकएकी सावध झालं! पुन्हा विषाची परीक्षा कोण घेणार? हा समोर बसलेला प्रियकर विजय, नवरा विजय झाल्यावर तसाच राहील? की काही दिवसांची नवलाई संपल्यावर पुन्हा राक्षस बनेल? तिला गच्चीवर रडणार्‍या सरिताचा आवाज ऐकू यायला लागला. तिच्या डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. नलिनी बाईंनी मारल्यानंतरचा असहाय पणा तिला जाणवला. हॅरी पॉटरमध्ये वाचलेले डिमेंटर्स तिच्यावर झेपा घ्यायला लागले. ऑस्ट्रेलियातला सुन्नपणा परत मन झाकोळून टाकतो की काय अशी स्थिती झाली. तिनं भिंतीवरच्या पिकासोच्या पेंटींगच्या कॉपीवर लक्ष केंद्रीत केलं. डोळे झाकून काही क्षण दीर्घ, हळूहळू श्‍वासोच्छश्‍वास केला. ती पुन्हा पूर्ववत झाली.

विजय काहीतरी बोलत होता. ती उठून उभी राहीली.

“ठीकै. मी निघते.” ती म्हणाली.

“पण मला अजून खूप बोलायचंय. तू काही सांगितलंच नाहीस.”

तिनं त्याच्या केविलवाण्या, मठ्ठ चेहर्‍याकडे पाहिलं. दैव! दैवात असेल ते होतंच! झाल्याशिवाय रहात नाही म्हणे! केवढं पाल्हाळ लावलं होतं त्यानं सुरूवातीला. जे काही घडलं त्याला “दैव” असं नाव देऊन दुबळे लोक स्वतःचं समाधान करून घेतात! सायलीला एकाएकी वनिताचं वाक्य आठवलं! काय खरं? काय खोटं? आणि मोह? मोह तर जबरदस्त होता! जणू दैव हार मानून तिच्या समोर हात जोडून उभं होतं. दहावीतली तरुण, गोऽड सरिता! सतत तिच्याबरोबर राहणार! तिला आई म्हणणार! हा समोर दिसणार विजय तर काय आधीच्या विजयचं टरफल असल्या सारखा होता. तिला सरिता मिळाली असती. उरलेलं सगळं आयुष्य सरिताची आई म्हणून काढता आलं असतं! सरिताचं शिक्षण, तिचं लग्न, तिची मुलं! त्यांची ती आजी! विजय म्हणत होता.

“सांग नं! तू काही सांगितलं नाहीस!”

“मी निघते आता,” ती पुन्ही रुक्षपणे म्हणाली.

“मी नंतर कळवीन. पण तू सरिताला काहीही बोलू नकोस. या वयात मुलं फार सेन्सिटिव्ह असतात.”

आणि मग चटकन वळून ती ताड ताड चालत निघालीच. कधी त्याच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर होतोय असं तिला झालं. तुझा शाप मला भोवला असं वाटत राहिलं. विजय म्हणत होता आणि तिनं विजयला होकार दिला तर मनालीचा शाप तिला लागणार नाही? सरिताला लागणार नाही? ती घाबरली. रिक्षा घेण्याचं सुद्धा तिला सुचत नव्हतं. सरिता-मनाली एकत्र! केवढं सुंदर चित्रं होतं ते ! त्यावर एक काळ्या रंगाचा सपकारा आपण मारायचा! पण आपण… सरिताची आई. सतत तिच्याबरोबर रहायचं. पण लग्नानंतर विजयच्या देखील काही अपेक्षा असणारच! तिचं शरीर बंड करून उठलं आणि तिच्या मनाला किळस आली. फुटपाथ वरच्या गर्दीला टाळत ती प्रतिक्षिप्त क्रियेच्या सराईत पणानं वेगानं वाट काढत होती. तिचं मन वावटळीत सापडल्यासारखं झालं होतं. तिच्या अवती भोवती रात्रीचं शहर पेटलं होतं. तिच्या सगळ्या इच्छा फूत्कार टाकल्यासारख्या तिच्या अवती भोवती घोंगावत होत्या. एका म्हातार्‍या भिकारणीनं हात लावून तिला आपला तुटलेला दुसरा हात दाखवून भीक मागितली तेव्ही ती जोरात ओरडणारच होती!

दिवा लाल झाला आणि तिचे विचार थांबल्यासारखे झाले. तिच्या शेजारीच लांबलचक कार ब्रेक दाबून थांबली. बंद कांचामधून दबक्या आवाजातलं. “धब धब” रॉक म्युझिक ऐकू येत होतं. ती थांबली. तिला थकून गेल्यासारखं झालं. आपल्या आयुष्याचा अर्थच तिला कळेनासा झाला. तिनं पाहिलं तर तिला एका दुकानाचं बंद शटर दिसलं. पायातली शक्तीच हरवल्या सारखी ती त्या दुकानाच्या पायर्‍यांवर मटकन बसली आणि ताणलेल्या डोळ्यांनी तशीच बसून राहिली. तिच्या भोवती शहर, त्या भोवती देश, त्या भोवती पृथ्वी विस्तारतांना तिला जाणवत होती. पृथ्वी भोवती गिरक्या घेणारे सॅटेलाईटस्. त्यांनी जोडली गेलेली शहरं. फेसबुक. सायली, सरिता– मनाली, विजय — आणि एकमेकांच्या इच्छांना जोडलेली ती असंख्य माणसं. ते महाजाल. सॅटेलाईटस् नी एकत्र जोडलेल्या कॉम्प्युटर्स सारखा इच्छांनी, वासनांनी, भावनांनी, वात्सल्यानी, तिरस्कारानी एकमेकांशी जोडला गेलेला माणसांचा तो प्रचंड समूह! ते महाजाल जाणवताच ती हताश झाली! आपण काय निर्णय घ्यावा तिला कळेनासं झालं. ती त्या विश्‍वाच्या महाजालातली एक बिंदू बनून राहिली.

आणि ते शहर आपलं जादूई रंगीत मायाजाल तिच्याभोवती विणतच राहिलं!

— अनिरुद्द बनहट्टी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..