गेले दीड वर्ष कोरोनामुळे शाळेला सुट्टीच होती. सेंट अमुक तमुक इंटरनॅशनल स्कूल असं नाव असल्याने ती एक प्रकारची ब्रँडेड इंग्लीश शाळाच होती. ऑनलाईन का होईना पण शाळा सुरू असायची. शेवटी आठवी पासून पुढले वर्ग सुरू करायला परवानगी मिळाली आणि नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होतात न होतात तोच दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे नकुल दिवसभर घरातच राहणार असल्याने आरती ने दिनूला आठवडाभर सुट्टी घ्यायला लावली. सुरवातीला दोन दिवस शॉपिंग मॉल , खरेदी यामध्ये वेळ निघुन गेला. त्यानंतर आरतीचे दोन दिवस फराळ करण्यात गेले, ती फराळ करत असताना दिनू लॅपटॉप मध्ये आणि नकुल मोबाईल मध्ये डोळे खुपसून असायचे. घरात इन मीन तीन जण आरतीने यंदा घरातच फराळ करायचे ठरवले होते तसा तिने केला सुद्धा, पण नकुल आणि दिनु ने प्लेट मध्ये चव चाखण्यासाठी दिलेल्या फराळातील एखाद दुसरा पदार्थ खाल्ला आणि कोरडे पणाने ठीक झालाय म्हणून प्लेट जशाच्या तशा ठेऊन दिल्या.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आरती ने नवी कोरी साडी नेसून दागदागिने घातले, बाराव्या मजल्याच्या पॅसेज मधील चकचकीत इटालियन मार्बल वर दारासमोर सुबक आणि सुंदर रांगोळी काढली , पाटावर लक्ष्मीचा फोटो, बँकेच्या एफ डी, पासबुकं, घरात असलेले पैशांच्या नोटा, दागिने व ईतर मौल्यवान वस्तू मांडल्या. आरतीने नकुल ला नमस्कार करायला सांगितला, दिनुच्या पाया पडायला सांगितले. नकुल आरतीने सांगितल्यावर दिनूच्या पाया पडला , पण नकुल आता तू आईच्या सुद्धा पाया पड असं सांगायची वेळ दिनुवर आली.
दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती, हल्ली टी व्ही सिरियल मध्ये सणासुदीला त्याच दिवशी त्याच सणांचे प्रसंग चित्रित करून दाखवले जातात. एका सुप्रसिद्ध मराठी मालिकेतील एका सीन मध्ये एक मोठं कुटुंब दिवाळ सण साजरा करण्याचे दृश्य सुरु होते, खेडेगावातील एक मोठं कुटुंब त्यात अर्धा डझनभर सख्खे आणि चुलत भाऊ आणि त्यांना ओवळणाऱ्या तेवढ्याच अर्धा डझन भर सख्या आणि चुलत बहिणी. त्या सगळ्यांचे आईवडील, आजी, आजोबा आणि नोकर चाकर. त्या सगळ्या भावंडांचे बाप त्यांच्या बहिणींना आणि भाच्याना माहेरी घेउन येतात त्यांचे सिरियल खेडेगावातील असल्याने कलाकारांचे ओढून ताणून काढलेले गावाकडचे हेल, बटबटीत मेक अप आणि भरजरी पेहराव बघून आरतीला खरोखरच उबग आला. सिरियल मध्ये दाखवले जाणारे एकत्र कुटुंब त्यांच्यातील एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोडी आणि हेवेदावे म्हणजे अतिशयोक्तीपणाचा कळस असल्याचे तिला नेहमी जाणवायचे पण आज भाऊबीजेच्या दिवसाचे चित्रीकरण बघताना ती तिच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेली.
दिवाळी जवळ आली की त्यांच्या घरी सुरु होणारी लगबग, घरातील पोटमाळ्यावरील जळमटे काढण्यापासून ते अंगणातील कोपरा न कोपरा धुवून स्वच्छ निघायचा. तिचे तीन काका , तिन्ही काकू आणि सगळ्यांचीच किमान दोन किंवा तीन मुलं धरून एकुण दहा भावंडं आणि आजी आजोबा अशी वीस एक जण त्यांच्या भल्यामोठ्या वाड्यात एकत्र राहायचे. सगळ्या भावंडांना दिवाळीच्या सुट्टीचे वेध महिनाभर आधीच लागायचे. घरात सगळ्यात लहान काका जे ठरवेल ती पूर्व दिशा असायची आरतीचे वडील किंवा तिचे दोघं मोठे काका त्याच्या निर्णयाला पाठिंबा द्यायचे. तसेच तिची दोन नंबरची काकू घरातल्या सगळ्या महिला मंडळाची बाजू सांभाळायची आणि ईतर सगळ्या जणी तिच्या हो मध्ये हो मिसळायच्या. लहान मोठ्या कुरबुरी व्हायच्या पण त्या वाड्यात आरतीच्या आजीच्या आवाजा पेक्षा मोठ्याने बोलण्याची कोणाची हिम्मत नसायची. आजीने एखाद्याला शांत रहा म्हणून सांगितले की त्याच्या किंवा तिच्या तोंडातून साधा ब्र सुद्धा निघायचा नाही.
आरती आणि तिच्या तीन चुलत बहिणी आणि ईतर सगळे भाऊ दिवाळीचा फराळ करायला घेतल्यावर सगळा वाडा डोक्यावर घ्यायचे. फराळ करताना आरतीची आई आणि तिन्ही काकूंना सगळे त्रास द्यायचे, त्रास म्हणजे बेसनाचे लाडू करायला घेतले की सगळेच्या सगळे लाडू फस्त केले जायचे कारण पोरं तर पोरं पण आरतीचे वडील आणि काका सुद्धा लाडवावर लाडवांचा फडशा पाडायचे ना कोणाला डायबेटिसची चिंता ना कुठल्या आजाराची भिती.
फराळाच्या प्रत्येक पदार्थाचे तोंडभरून कौतुक व्हायचे. आरतीची मोठी काकू सुगरण होती आरतीसह तिची ईतर सगळी भावंडं त्यांना कोणत्याही वेळेला भुक लागली तर तिच्याचकडे जायची, मोठी आई मला खायला दे करून तिच्याकडून चमचमीत पदार्थ बनवून मजेत खायची. तिच्या मोठया आईने सुद्धा माझी मुलं, तिची मुलं असा भेदभाव कधीच केला नाही की सगळ्यांचं मीच बघते म्हणून कधी मोठेपणाचा आव आणला नाही. तिच्या भावजयांनी देखील कधी मनात आणले नाही की आपली मुलं आपल्याऐवजी मोठया ताईंकडे का जातात. घरातल्या प्रत्येकाची एकमेकांवर वेगळीच माया होती. घरातील प्रत्येक पुरुष त्यांच्या परीने घर खर्चाला हातभार लावत असे, मी जास्त खर्च करतो किंवा तो घरात काय आणतो याचा विचार कोणाच्याही मनात येत नसे. सगळ्यांचेच व्यवसाय नोकरी आणि त्यातून होणारे अर्थार्जन काही सारखे नव्हते, तरीही प्रत्येक जण स्वतः च्या मिळकतीवर समाधानी होते. चौघांनाही एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास होता. दिवाळीलाच नाही एरवी सुद्धा वाड्यातील माजघर वाण सामानाने भरलेले असायचे. कपडे लत्ते गरजेच्या वस्तू यासाठी कोणी कोणाला सांगत नसायचे ज्याला जे पाहिजे ते कोणाकडेही मागायचे. मला चांगल तुला उरलेले असा भेदभाव वाड्यात नसायचा. सुंदर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जायच्या. कोणी रंग मिसळायचे तर कोणी रंग भरायचे प्रत्येकीच्या अंगात नुसता उत्साह संचारलेला.
भाऊबीजेच्या दिवशी आरतीचे वडील आणि तिन्ही काका पहाटेच उठून त्यांच्या दोन्ही आत्यांना आणायला जायचे . आरतीच्या मोठया आत्या कडे सकाळची न्याहारी आणि भाऊबीजेची ओवाळणी झाली की , चौघे जण त्यांच्या मोठया बहिणीला घेऊन त्यांच्या धाकट्या बहिणीकडे जायचे. तिथं दुपारचे जेवण आणि ओवाळणी उरकली की तिथून धाकट्या बहिणीला आणि भाचे कंपनीला घेऊन सगळे जण संध्याकाळ पर्यंत वाड्यावर पोचायचे. संध्याकाळी वाड्यातील प्रत्येक जण त्यांच्या परतण्याची आतुरतेने वाट बघत बसलेले असायचे. दिवसभरात आरतीचे आणि तिच्या चुलत भावंडांचे मामा यायचे आणि जेवण करून त्यांना सोबत चलण्याचे आग्रह करत निघून जायचे, फराळाच्या पिशव्यांची देवाण घेवाण व्हायची. आजी आजोबांना नमस्कार आणि त्यांचेआशिर्वाद व्हायचे. एकमेकांची ख्याली खुशाली आणि गप्पा गोष्टीत तासन् तास निघून जायचे.
संध्याकाळ होता होता आरतीचे वडील , काका आणि दोन्ही आत्या त्यांच्या मुलांसह वाड्यात पोहचायचे. आरतीची आजी तिच्या दोन्ही लेकींच्या आणि त्यांच्या मुलांच्या अंगावरुन भाकर तुकडा ओवाळून मगच वाड्यात प्रवेश द्यायची. आरतीची आई आणि तिघी काकू दिवाळसणाला आलेल्या त्यांच्या नणंदाना जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्यासारख्या कडकडून मिठी मारायच्या.
सगळी आरतीची चुलत भावंडं आणि आते भावंडं मिळून चौदा जण व्हायची. आरती सह सहा जणी आणि आठ भावंडं. वाड्यातल्या व्हरांड्यात आठ पाट एका लाईनीत मांडले जायचे आणि एका मागोमाग एक सहा जणी एक एकेला ओवाळायच्या. एकमेकांच्या मस्करीने आणि चिडवण्याने आणि उडणारे हास्याच्या कारंज्यांनी अख्खा वाडा दुमदुमून जायचा. लहान मोठ्या भावांचे ओवाळून औक्षण केले जायचे. लहान मोठ्या गिफ्ट पॅक मधून ताटात पडणाऱ्या आठ ओवळण्या, त्यात काय आहे यापेक्षा काहीतरी आहे या भावनेने सगळ्या बहिणी उत्साही आणि आनंदी व्हायच्या.
भाऊबीजेची ओवाळणी झाल्यावर सगळी भावंडं फटाके वाजवायला सुरुवात करायची. फटाके वाजवून झाल्यावर सगळ्यांची पंगत बसायची. पंगतीत कोणीही कोणाच्याही ताटात एकत्र जेवायला बसायचे. एक एका ताटात तीन तीन जण जेवायचे. पुरुषांचे आणि पोरांचे झाल्यावर घरातल्या बायका जेवायला बसायच्या आणि त्यांना जेवण वाढायचे काम मात्र आरतीचे सगळे भावंडंच करायचे. आरती आणि तिच्या बहिणी त्यावेळी घरातील पसारा आवरून अंथरूण पसरायच्या कामाला लागायच्या.
दिवसभर थकून भागून रात्री कोणालाही झोप लागायची नाही. रात्री उशिरा पर्यंत सगळेजण गप्पा मारायचे. कोणी कोणी तर पहाटे पहाटे पर्यंत अंथरूणात पडून एकमेकांशी गप्पा मारत बसायचे. खासकरून दोघीही आत्या. त्यांना माहेरी आल्यावर जणु काही नव्याने कंठ फुटायचा. किती बोलू आणि किती सांगू असं व्हायचं. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी सगळे लवकर उठून शेकोटी भोवती गर्दी करायचे.
दहा वर्षांपूर्वी नकुल सहा वर्षांचा असताना दिनुचे आजोबा वारले त्यानंतर दिनुचा मोठा भाऊ आणि त्याच्या लहान बहिणीचे प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले , जे एवढे विकोपाला गेले की त्याच्या धक्क्याने दिनुची आई सुद्धा दोन महिन्यातच देवाघरी गेली. दीनुच्या आईचे दिवस कार्य झाले आणि तेव्हापासुन दिनु त्याचा भाऊ आणि बहीण या तिघांनी एकमेकांशी भांडण करून वडिलोपार्जित प्रॉपर्टी पैकी जे जे मिळवता येईल ते ते मिळवले आणि एकमेकांशी असलेला संबंध आणि सम्पर्क तोडला तो कायमचाच. आरतीने दिनुला प्रॉपर्टी साठी भांडू नकोस म्हणून खुप समजावले, परंतु त्याने ऐकले नाही.
आरतीच्या माहेरी जो गोतावळा होता तो अजूनही तसाच टिकून आहे पण दिनु आरतीशी आणि नकुल सोबत कितीही चांगला वागत असला तरी त्याला आरतीचे माहेरी जाणे फारसे आवडत नसे. आरतीला सुरवातीला त्याच्या अशा वागण्याचा त्रास वाटायचा तिला सहन होत नसे पण जेव्हा तिच्या मोठ्या आईने तिला समजावले तेव्हापासुन तिने स्वतः च तडजोड करायचे ठरवले. आरतीच्या डोळ्यात एकीकडे तिच्या बालपणीच्या आठवणींनी पाणी भरले होते तर दुसरीकडे तिचे मन नकुलच्या एकटेपणामुळे चिंतेने व्याकूळ झाले होते.
आरतीचा लहान भाऊ तिच्या मोठ्या बहिणीकडे जाऊन मग आरती कडे भाऊबीज करायला यायचा.
वाड्यात दिवाळीला आठ आठ भावंडांना ओवळणारी आरती तिच्या एकुलत्या एक सख्ख्या भावाची ओवाळणी करताना नकुल मोबाईल मध्येच रमलेला असायचा.
आरतीला तिचं रम्य बालपण आठवताना स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचे, नकुलचे एकाकी पण जाणवायला लागले. तिला त्याच्या वागण्याचे आणि एकटेपणाची भिती वाटायला लागली. एकत्र कुटुंबात वाढलेली असल्याने , एकमेकांच्या मायेची, ममतेची आणि त्यातून वाटणाऱ्या आपलेपणाची व सुरक्षिततेची भावना तिने अनुभवली होती. केवळ सुख अनुभवण्यापेक्षा दुःख शेअर करण्याने मिळणारे समाधान महत्वाचे वाटत होते.
उत्सव हा नात्यांचा असतो पण आता नातीच टिकत नाहीत तर उत्सव कसला आणि उत्सवासाठी उत्साह कुठला.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन , भिवंडी, ठाणे.
Leave a Reply