किती हस्यास्पद वाटते. हे एकून. परंतु एक महान सत्य. आम्ही दोघेही अतिशय सामान्य व्यक्तीमत्वाचे. सर्व साधारण जीवन क्रमाने जाणारे. शेजारच घर सोडल तर आमचा तसा परिचय दुसऱ्या घराला सुद्धा नाही. आगदी आज दोघानी वयाची पंचाहत्तरी पार केलेली असताना.
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.
माझा प्रिय मित्र डॉ. मारुती शंकरराव अतकरे वय ७५ वर्षे पुर्ण करुन, पुढे गेलेले. वयाच्या सात वर्षापासुनचा मित्र. म्हणूनच मी त्याला चड्डीयार म्हणालो. खूपजण आगदी बालपणापासून मित्र असतात. ते वयाच्या अखेर पर्यंत . आज पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर मी त्याचा व आमच्या मित्रत्वाचा आलेख काढू लागलो. खुपशा आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. गम्मत वाटली, कौतूक वाटले, आश्चर्य वाटले. विलक्षण असे मनोरंजन झाले. केवळ त्या आलेखानेच मला कळले की जीवन म्हणजे काय असते. प्रत्येक प्रसंग निराळा, चमत्काराने परिपूर्ण, अगम्य, आणि कल्पनातीत असलेला. प्रत्येक प्रसंगाने विचाराना चालना मिळत गेली. प्रासंगीक अंदाज बांधले गेले. कदाचित् त्या घटनाना, भविष्याची जोड देताना, फक्त त्या त्या वेळेचा विचार व भावना यांचा आधार घेत कल्पना करीत गेलो. दुरद्दष्टीची कमतरता होती हे नंतर जाणवले.
डॉ. मारुती शंकरराव अतकरे याच्या केवळ बाल वयाच्या काळाला अनुसरुन मी टिपणी करु इच्छीतो. आमच्या जीवनाची सुरवातच मुळी वेगवेगळ्या टोकाची, अतिशय भिन्न वातावरणाची. जर त्याच वर्णन बघीतल, तर आम्ही दोघे जवळ येऊन मित्र होऊ शकू कां? हा प्रश्न येतो. परंतु हे घडले. आर्थिक भिन्नता, कौटूंबीक वेगळेपणा, खाण्यापिण्याचा दोन टोकाच्या सवई, धार्मिकतेचा प्रचंड पगडा, ह्या साऱ्या बाबी अनुभवत आम्ही पुढे गेलो.
आजच्या क्षणी मी जेव्हा गंभीर होऊन विचार करु लागतो, तेंव्हा एक गोष्ट प्रखरतेने जाणली जाते, मारुतीची व माझी मैत्री होणे हे स्वाभाविक व परिस्थितीनुरुप असू शकेल. थोडासा आपलेपणा, प्रेम , हे सारे ठिक. परंतु ती समांतर चालत जाणे आणि पुढे पासष्ट वर्षापेक्षाही जास्त काळ, आज तागायत टिकणे, हे मात्र विलक्षण वाटू लागते. एकदम आश्चर्य जनक.
कारण बाल वयांत दोघांच्या जीवन रेखा एकदम वेगळ्या व परस्पर एकदम भिन्न. दोन वेगवेगळे संस्कार. भिन्न मार्ग, भिन्न प्रयत्न, भीन्न वातावरण, भिन्न परिस्थिती. तीचे पैलू केव्हांच जुळण्याची वा जवळ यैण्याची सुतराम शक्यता नव्हती. सारेच आघात
करणारे. आणि काळ म्हणाल तर तो एकोणीसशे पन्नास ( १९५० ) च्या भोवती घुटमळणारा.
फक्त एकच समाईक धागा दोघाना बांधून ठेवीत होता. तो म्हणजे वैचारीक स्वभाव, भावना, व विचाराची ठेवण. ह्याच इतक्या जमणाऱ्या व जुळत्या होत्या की त्याचे एक मेकाशी आकर्षण निर्माण झाले होते, आणि ते नैसर्गिक होते.
कृत्रीमतेला तेथे वाव नव्हता.
कोणती कृत्रीमता ? त्यावर विचार करु लागलो. मला आज तागायत मारुतीची जात कोणती हे माहीत नाही. आणि मी केंव्हाही तशी विचारणा केली नाही. फक्त आजकालच्या शैक्षणीक चोकटीमध्ये तो स्वतःला ‘ मागास ‘ ह्या वर्गांत टाकतो. तेव्हांच ध्यानी आले की त्याची जात मागास वर्गात मोडणारी आहे. मी मात्र अस्सल ब्राह्मण कुळातला. तथाकथीत सवर्ण, श्रेष्ठ, हा जन्मजात शिक्का पाठीवर घेऊन फिरणारा. आजच्या प्रचंड व अतिशय वेगाने बदलत जाणाऱ्या समाज धारणेत, त्याला फारसे महत्व मुळीच राहीले नाही. स्पर्ष अस्पर्षता तर पुर्ण बाजूस पडलेली आहे. आजकाल कुणाच्या डोक्यांत खऱ्या अर्थाने जाती पातीचा विचार डोकावत नसतो. हां ! मात्र जेंव्हा कांही योजनेचा फायदा घेणे हे समोर येते, तेव्हांच तो प्रश्न ऐरणीवर येतो. संघर्ष होतो. नसता दैनंदीन वागण्यामध्ये, सामाजीक जीवन हालचालीमध्ये, व्यवहारामध्ये त्याला मुळीच महत्व दिले जात नाही.
१९५० चा तो काळ, अर्थात ६५- ६६ वर्षापूर्वीचा तो काळ आठवा अथवा त्याचा अभ्यास करा. समाज अस्तीत्वाची, परिस्थीतीची जाणीव प्रखरतेने कळू लागेल. “ समाजपरिवर्तन समाजजीवन सुधारणा, प्रतिगामी वृत्तीपासून पुरोगामी संकल्पनेकडे, विज्ञान आधारीत द्द्रिष्टीकोन “ या बाबी तर चालूच होत्या. मात्र परिवर्तनाचा वेग खूपच हलके होता. कडवटपणा धर्माला चिटकून राहण्याचा संदेश देत होता, तर वैज्ञानीक विचारधारा अंद्धश्रद्धेला खतपाणी घालण्यास विरोध करीत होत्या. सवर्ण आणि मागासवर्ग ह्या गोष्टी सतत धगधगणाऱ्या होत्या. ज्याच्या त्याच्या विचारधारणे प्रमाणे प्रतिगामी व पुरोगामी यांचा वैचारीक संघर्ष असे. समाज सुधारणेच्या वाटेवर होता. आजही चालत आहे. फक्त वेगाचा फरक.
मी बाल वयातला. बाल मनाचा व विचाराचा. जाती पातीच्या संघर्ष समजण्याच्या वया पेक्षा बराच लहान. व दूर असलेला. मला फक्त दिसत होते ते प्रेम, अपुलकी, वैचारीक सारखेपणा, आणि आवड निवड.
मारुतीने आग्रह केला “ माझ्या घरी ये की एकदा. “ मी त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेलो. माझ्या विचार ठेवणीला, राहणीमान ठेवणाला एक जबरदस्त झटका बसला, तो त्याच्या घरी प्रथम पाऊल टाकले त्या क्षणी.
अतिशय अस्वच्छ परिसर. सर्वत्र झोपड्या. कोणत्याही झोपडीस दार नव्हते. खिडक्यांचा तर प्रश्नच नव्हता. झाडांच्या फांद्या, वाळलेली पाने, गवताचे भारे, लाकडे वा वेळूचे खांब, काथ्या दोऱ्यांनी बांधलेले, कोठे कोठे पत्र्याचे तुकडे, वा कौलारु टाकलेले दिसून आले. ह्या सर्व झोपडपट्टीत एक झोपडी मारुतीची होती. मला आत नेले गेले. आत छोटीशी जागा. फाटकी घोंगडी व पोते अंथरलेले होते. तेथे बसलो. समोर एक पाण्याचे मडके होते. वरील भाग तुटलेला दिसत होता. त्यावर एक लाकडाचे फळकुट पाण्यावर झाकण म्हणून ठेवलेले होते. त्यावर एक ग्लास ऊलटा ठेवलेला. मारुतीने मला त्या मडक्यामधून पाणी काढून पिण्यास दिले. मी तहानलेला होतो. भरपूर पाणी प्यालो. घरांत कोपऱ्यांत मातीची चुल होती. गोळा केलेली काही लाकडे व शेणाच्या गवऱ्या होत्या.
मारुतीचे वडील कोपऱ्यांत बसले होते. फाटके, कळकट धोतर,. एक अंगरखा बऱ्यांच ठिकाणी फाटलेला, खालती शेणाणे सारऊन कांही जागी ऊकरलेल्या जमीनीवर बसलेले होते. समोर कटींग दाढी करण्याची एक धोपटी होती. तुटलेली खराब दिसत होती. मारुती म्हणाला “ भगवान हे माझे बाबा. नाव्ही आहेत. ते रोज सकाळी बाहेर फिरत रस्त्यावर पोटपाण्याचा धंदा करतात. केस कापणे ( हजामती हा शब्द मारुतीने त्यावेळी वापरला ) आणि दाढी करुन पैसे आणतात. आम्ही नाव्ही ( Barber ) आहोत. आत्ताच ते आले आहेत. जेवण करुन पुन्हा जातील. मी त्याना माझ्या संस्काराप्रमाणे वाकून नमस्कार केला. त्यानी हात वर करुन आशिर्वाद दिला. कोण आहे हा मुलगा. “ हा भगवान माझा मित्र “
आज ज्यावेळी मी त्या भुत काळाचा विचार करतो, माझ्या अंगावर शहारे येतात. झोपडीमध्ये गरीबीचे इतके ह्रदयद्रावक चित्र स्पष्ट दिसत होते, की अंगाचा थरकाप होत होता. एक प्रचंड गरीबी, सार घर, सार रहाणीमान, खाणं- पिणं, बघीतल्या नंतर सर्व कांही एक चिखल, एक दलदल झालेला पसारा वाटू लागला. आणि हे सारे त्यावेळी मी माझ्या डोळ्याने बघत होतो. आज काठावरुन बघताना, त्याच दलदलीमधून एक सुंदर, टपोरे, कमळाचे फुल फुललेले दिसले. प्रचंड मोठी पाने पसरलेली. त्याच पानावर मोती बिंदू वाटणारे पाण्याचे थेंब धारण केलेले. अभिमानाने डोलणारे फुल दिसत होते. मनाला आकर्षित करीत होते. त्या फुलाचे नांव होते “ डॉ. मारुती शंकरराव अतकरे “
आज जेंव्हा ज्येष्ठ नागरिक ह्या जीवनाच्या वळणावरुन मी माझ्या बालपणाकडे बघू लागलो, तेंव्हा आश्चर्याचे अनेक प्रसंग, धागे, व गुंता समोर येऊ लागला. ६५ वर्षापुर्वीचा काळ. एकीकडे बालमन, जे सरळ, साध्या, आणि नैसर्गिक घटनामध्ये व्यस्त होते. त्याच वेळी सभोवतालची वडीलधारी मंडळी यांचे संस्कारमय विचार, ह्या दोन्हीचा संघर्ष मी त्या वयांत अनुभवला. विजय होत गेला तो बालमनाचा. ज्यात होती एक प्रचंड व विलक्षण
जिद्द, हट्ट, लपलेल्या अज्ञात अधिकाराची जाण, उगवत्या सुर्याचे अल्हाद वाटणारे तेज, परंतु थोड्याच वेळानंतर चमकणार, तेजाळणार, ही जाणीव.
तसा मी भावंडामधील लहान.परंतु academic currier च्या द्दष्टी कोनातून वरच्या पायरीवर सतत असे. तथाकथीत हूशार विद्यार्थी. वर्गामध्ये नेहमी प्रथम क्रमांक टिकवून ठेवणारा. त्यामुळेच कदाचित् माझ्या ईच्छेला, विचाराला, भावनेला महत्व दिले जात असल्याची, मला देखील जाणीव झालेली होती. वडील माझ्यावर खुप प्रेम करायचे. आणि इतर भावंडापेक्षा मी त्यांचा फार लाडका होतो.
“ कोण बा तुला सांगणार ? तुला बोल लावणार ? “ ही मजसंबंधी टोमणेयुक्त भाषा सतत इतर भावंडाकडून बोलली जायची.
मला आजही तो दिवस चांगला आठवतो. वडीलानी केलेला प्रेमळ उपदेश व मार्गदर्शन. ज्यांत रुजली होती एका वेगळ्यांच दिशेची वाट. मी सहावी ही इयत्ता प्रथम क्रमांक मिळवून पास झालो होतो. वडीलाना पेढा देण्यास गेलो. ते म्हणाले “ छान. एकदम आनंद वाटला. अशीच प्रगती सतत करीत रहा. एखादी गोष्ट मिळवणे जसे समाधान कारक असते, त्यापेक्षा ते यश टिकवणे फार गरजेचे राहते. सतत योग्य प्रयत्न, जिद्द, चिकाटी व स्वभावामधला समजूतदारपणा, जीवनाला यशस्वी करतो. “
ते थांबले व पुन्हा सांगु लागले “ एक प्रयत्न कर. एक दोन चांगल्या मित्रांची सतत संगत असावी. ते हूशार, समजदार व अभ्यासू वृत्तीचे असावे. अशांचा विश्वास संपादन करावा. आणि सांघीक पद्धतीने अभ्यास व्यायाम व खेळणे ह्यावर मन केंद्रीत करावे. यश निश्चीत मिळते. ” वडीलांचा हा उपदेश मी मनांत पक्का कोरुन ठेवला होता.
मला तो दिवस चांगलाच आठवतो. घरा जवळ एक शाळा होती. व तेथे एक मोठे मैदान होते. संध्याकाळी मी रोज तेथे खेळण्यास जात असे. एक वयस्कर मुलगा सर्व समवयीन मुलांचे गट करुन त्यांच्याकडून हूतूतू, आट्या पाट्या, खो खो हे देशी खेळ खेळऊन घेत असे. तो फक्त मार्गदर्शन करी. वयाच्या मानाने मी खूप लठ्ठ होतो. त्यामुळे खेळण्यातील चपळायी वा चैतन्यमय हलचाली याला कमी पडत होतो. खेळण्यातील एक Back Footed विद्यार्थी म्हणून माझ्या गटात असे. परंतु तो ग्रुप लिडर माझ्याकडे विषेश लक्ष देऊन होता. मला सतत उत्साहीत करीत असे. प्रत्येक खेळण्यात सहभागी करुन घेत होता. आणि त्याचमुळे मला त्यावेळी खेळण्याची आवड निर्माण झाली होती.
खो खो चा खेळ रंगला होता. मी थोड्याच वेळांत बाद झालो.जवळच असलेल्या एका दगडावर जाऊन बसलो. मी तो खेळ बघत बसलो होतो. माझ्याच वयाचा एक मुलगा खो खो खेळत होता. शरीर यष्टी अती रोड. हाडकुळा अंगकाठीने. अतीशय चपळाईने खेळत होता. शेवटपर्यंत बाद झाला नाही. त्याच्या खेळाकडे बघून मला त्याच्या बद्दल आपुलकी व प्रेम वाटू लागले. आपण देखील असेच खेळावे, पळावे, हा विचार
डोक्यांत येऊ लागला. खेळाची वेळ होतांच त्या लिडर विद्यार्थ्याने शिट्टी मारली. खेळ संपला. तोच चपळ मुलगा दम टाकीत मज जवळ आला व शेजारच्या दगडावर बसला. मी त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
“ काय नांव तुझ “ “ मारुती ”
“ कोठे राहतो “ “ जवळच धोंडापुरां गल्लीत.”
“ रोज खेळण्यास येतो का “ “हो ! मी रोज येथेच खेळत असतो “
“मला हा खो खो चा खेळ शिकवशील का ? “ तो हसत म्हणाला “ मी काय शिकवणार. खेळत जा. जिद्दीने खेळावे. हळू हळू सर्व खेळ आपोआपच येतो. आपल्या चुका आपल्यालाच कळतात. आपणच त्यांत सुधारणा करतो. हेच तर खेळ शिकणे आहेना.”
तो गप्प झाला. परंतु मला त्याच्या बोलण्याचा विश्वास वाटला. त्याच्या बद्दल आपुलकी वाटू लागली.
वडीलांचे शब्द आठवले. “चांगले मित्र करावे. चांगले संस्कार होतात. आपणपन चांगले बनू लागतो.”
ह्या मारुती बद्दल एक वेगळीच भावना मनांत येऊं लागली. बस याच्याशीच मैत्री करावी.
“ तु रोज संध्याकाळी येथे येतोस ना, मी पण येत जायीन.” मी म्हणालो.
तो फक्त “हो येईन “ म्हणाला. आणि लगेच निघून गेला
हीच डॉ. मारुती शंकरराव अतकरे व डॉ. भगवान केशवराव नागापूरकर यांच्या मित्रत्व रोपणाची प्रथम पायरी. जी पुढे पुढे जात समांन्तर चालत गेली. आज वयाची पंचाहत्तरी पुर्ण करीत पुढे जात आहे. वयानी जरी शारिरीक दुर्बलता दाखवण्यास सुरवात केली असली, तरी आमची मने आजही टवटवीत आहेत. जशी बाल वयांत होती, शाळकरी विद्यार्थी म्हणून होती, विद्यालयीन दशेत असतानाची होती, मेडीकल महाविद्यालयीन शैक्षणीक साम्राज्यात होती, पदव्युत्तर शिक्षण काळांत होती. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे दोघानीही शासनांत कार्य करीत मोठी पदे भुषवित निवृत्ती घेई पर्यंत, साऱ्या साऱ्या जीवन चक्रांत आमच्या मनाची टवटवी सतत जागृत व चैतन्यमय राहीली.
मला खेळाचाच दुसरा प्रसंग आठवतो. मुलांचा गट बनवला जायचा. जे चांगले खेळडू असायचे, ते त्या खेळाचे गट प्रमुख व्हायचे वा समजले जायचे. दोन गटप्रमुख एकमेका समोर ऊभे रहात असे. प्रथम एकाने दुसऱ्या गटप्रमुखाच्या हातावर टाळी देत मुलांच्या ग्रुपमधून एका खेळाडूची निवड करायची. नंतर दुसऱ्या गटाच्या प्रमुखाने टाळी देत त्याच्या गटासाठी भिडू निवडायचा. ह्यांत जे कच्चे खेळाडू असत, त्याना मागणी अर्थातच शेवटी होत असे. मी असाच कच्चा खेळाडू. म्हणून मला बऱ्याच वेळानंतर मागणी येई. त्याची मला जाण असल्यामुळे मी सहसा त्या प्रसंगी बाजूस जाऊन बसे. दोन गटप्रमुखांत मारुती देखील होता. मी बाजूस दगडावर बसून गम्मत बघत होतो. मला आश्चर्याचा धक्का बसला. मारुतीने पहील्याच मागणी टाळीमध्ये माझे नांव घेतले.
“ भगवान “ मला खूप आनंद झाला. मी धावत जाऊन त्याच्या गटांत सामील झालो. त्यावेळी मला माझी क्षमता, योग्यता, चंचलता, खेळाडू कौश्यल्य, याची मुळीच जाणिव आली नाही. फक्त समाधान व आनंद वाटला की मला गटांत ताबडतोब घेतले गेले. मी कौतूकाने मारुतीकडे बघत राहीलो.
हाच तो क्षण, जेंव्हा जीवनाचा बनत चाललेला गुंता बळकट होऊ लागला होता. “ मारुती व भगवान “ हे रसायन-समिकरण तयार होऊ लागले होते. पुढे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्या घेऊन आज तागायत टिकून राहीले आहे.
माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा झालेला होता. ते जात पात ह्या संकल्पनेला केव्हाच मानीत नव्हते. शिज्ञण व ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने संस्कारीत करत असते ही त्यांची धारणा. धर्म व कर्मकांड जर पाळावयाचे असतील तर ते फक्त घराच्या चौकटीतच असावे ही त्यांची धारणा.
( काळाप्रमाणे चालावे लागते म्हणतात , माझी आजी अर्थात त्यांची आई हीचे देखील केशवपन झालेले होते. ती खुप धार्मिक व जुनी विचारसरणी सांभाणारी होती. मात्र हे सारे स्वतः भोवतीच असे. देवघर व स्वयंपाकघर हेच तिचे लक्ष होते. )
माझ्या आग्रहाने मारुती प्रथम माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबकेपणा स्पष्ट दिसत होता. भव्य घर, प्रशस्त हॉल, फर्नीचर, सोफासेट, पंखे, पडदे, नोकर चाकर, हे बघून मारुती हादरुन गेला. सभोवतालची भव्यता त्याचे डोळे टिपून घेत होत असलेले जाणवले. त्याला मी खुर्चीवर बसवले. समोर आराम खुर्चीवर वडील पेपर वाचीत बसले होते. मी त्याना सांगितले. “ हा मारुती माझा मित्र. आम्ही रोज शाळेच्या मैदानांत एकत्र खेळतो. “ वडीलांनी त्याच्याकडे नजर टाकली.
“ छान खुप खेळत जा. अभ्यासही मन लाऊन करीत जा. ज्ञान व आरोग्य ह्या अत्यंत महत्वाच्या जीवनातील गोष्टी “
मारुतीने उठून त्यांच्या पुढे जात वाकून नमस्कार केला. आईने नोकरातर्फे कांही फळे बशामध्ये घालून पाठविली, ती दोघानी खाली. नंतर मारुती व मी दोघेजण बाहेर खेळण्यासाठी गेलो.
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
संपर्क- ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply