तो दिवसा दिसत नसला तरी रात्री सोबतच असतो. लहान असताना आई त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायची बघ ‘चंदा मामा आलाय, आता रडु नको’ आणि आपलं नातं थेट रामायण काळाशी जोडलं जायचं. प्रभू श्रीरामानेही एकदा चंद्र हवा असा हट्ट धरला होता म्हणे, मग पाण्यात चंद्रबिंब दाखवून रामाची समजुत काढली गेली. तसा चंद्र प्रत्येकालाच हवा-हवासा वाटतो म्हणा. आपल्या दैनंदिन आयुष्यात चंद्राची विशेष जागा आहेच. निवांत रात्री जेव्हा आपणच असतो आपल्या सोबत, तेव्हा आपण आकाशात पसरलेल्या टपोरं चांदण्या न्याहाळत असतो. चांदण्यांचे हात हाती घेऊन आकाशाच्या अंगणात फिरणाऱ्या चंद्राशी आपण बोलू लागतो. कळत न कळत सुख-दु:खाच्या क्षणांची त्याच्या समोर उजळणी करतो. मग चंद्र देखील त्याच्या शितल प्रकाशात आपल्या मनातील दु:खाच्या छटा पुसुन टाकतो. प्रेमी जनांसाठी तर चंद्र म्हणजे व्यक्त होण्याची मोठी संधीच म्हणा ना. मग गझल सम्राट सुरेश भट म्हणतात…
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !
बर चंद्राच्या बद्दल अनेकांचे अनेक विचार. कारण प्रत्येकाचा चंद्र वेगळा, प्रत्येकाची अनुभूती वेगळी. वेगळ्या जाणीवा निर्माण करणारा चंद्र, जसे शिवाजी जवरे म्हणतात..
पाहिले वाकुन तू लाजत पाण्यावरती
दावला एक नवा चंद्र तलावात पुन्हा
तर अशा एक ना अनेक भावना चंद्राशी जोडल्या जातात. जसे चंद्र उगवल्यावर ईद साजरी होते, तर चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. चंद्र तोच असतो, त्याच्याशी जोडली जाणारी नाती मात्र निरनिराळी असतात. बाल्कनीतल्या खिडकीतून डोकावणारा चंद्र वेगळा असतो आणि झोपडीच्या फाटक्या कपड्यांतून दिसणारा चंद्र निराळा भासतो. कधी तर भाकरीतही चंद्र शोधला जातो. चाळणीतून चंद्र पाहिला जातो.
चंद्राशी संबंधित किती गाणी असावी याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला पण तो तोकडा ठरला. कारण एकतर संपूर्ण गाणं चंद्रावर लिहिलेलं तरी आहे किंवा गाण्यात चंद्र हा शब्द तरी आलेलाच आहे. अगदी लहान मुलांच्या,
‘चांदोबा चांदोबा भागलास का’ किंवा ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ पासून तर थेट अलिकडे आलेल्या चित्रपटांतील बहुतांश गाण्यात चंद्राशी संबंधित उल्लेख पहायला मिळतात, ऐकायला मिळतात.
चंद्र जसा आपला आहे, तसा तो सर्वांचा आहे. चंद्र जसा जवळ आहे, तसा तो लांबही आहे. चंद्र जसा माझ्याशी बोलतो, तसा इतरांशी देखील संवाद साधतो. चराचरातल्या सर्वांनाच चंद्र आपला वाटतो, हवा हवासा वाटतो. चंद्राचं रुप हे इतकं वैश्विक झालं आहे. गीतकार गुलजार म्हणतात…
रात में घोले चाँद की मिश्री,
दिन के ग़म नमकीन लगते हैं.
नमकीन आँखों की नशीली बोलियां,
गूंज रहे हैं डूबते साए.
शाम की खुशबू हाथ ना आए,
गूंजती आँखों की नशीली बोलियां.
— दिनेश दीक्षित
Leave a Reply