लेखक – विनय वसंत देशपांडे, वाशी.
खरं तर झोपेत चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. अर्थात तो सगळ्यांना जमतोच असे नाही.या व्यायामाचे फायदे असे की याला प्रात:प्रात:काळी उठून घरच्या मंडळींसमोर फुकाचा आवेश आणून तयारी वगैरे करावी लागत नाही. दुसरे असे की या व्यायाम प्रकारात रात्रीच्या फुकट जाणा-या वेळेचेही उत्कृष्ट नियोजन होते. नींद की नींद . . . व्यायाम का व्यायाम. टू इन वन. एक के साथ दुसरा फ्री. बर याला ट्रॅक पँट, टी-शर्ट, शूज, झालच तर फीट-बीट, पिडोमीटर वगैरे असल्या फुटकळ वस्तूंची गरज लागत नाही. आपण जसे आहोत तसेच चालू लागू शकतो. विदाऊट एनी प्रोक्रॅस्टीनेशन. बरं या व्यायाम प्रकारात आज या मार्गे चालावे का व्हाया त्या मार्गे जावे असे किचकट प्लानिंग दररोज करावे लागत नाही. वाट फुटेल तो जॉगिंग ट्रॅक. सभौ भूमी गोपालकी. तेंव्हा झोपेत चालण्याच्या या व्यायाम प्रकारात जे काय आहे ते सर्व ऑटो मोड वर होत असते. आपल्याला जराही तोशिस नाही. पण व्यायामाचा जो काही फायदा असेल तो मात्र आपला. ह्या शिवाय रात्रीच्या वेळी रस्त्यांवर हैदोस घालणारी भटकी श्वान मंडळीही ” इसम डोळे बंद करून मुकाट झोपेत चालला आहे तर कशाला त्याला उगाच डिस्टर्ब करा ?” असा उच्च विचार करून भुंकत व गुरगुरत अंगावर धावून जाण्याचा त्रास देत नसावीत. आपण बऱ्याचदा बघतो की रात्रीच्या वेळी काही टगी आणि गुंड प्रवृत्तीची कुत्री जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर चवताळून जोरजोरात भुंकत असतात. पण तेच काही जणांना मात्र गुमान जाऊ देतात. त्यांना काहीमात्र करीत नाहीत. ते जे बिनदिक्कतपणे कुत्र्यांसमोरून जातात ना ते ह्या झोपेत चालण्याचा व्यायाम करणारे या प्रकारातले असतात असा अंदाज आहे. अंधाररात्रीच्या वेळी जे कुत्र्यांच्या भीतीने दबकत दबकत पार्श्वस्नायू आवळीत जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत असतात त्यांनाच ही कुत्री भुंकून भुंकून जेरीस आणित असतात.
इतक्या सर्व फायद्यांमुळे पुढील वर्षी झोपेत चालायचा संकल्प मी केला आहे. पुढल्या वर्षी अशाकरीता की झोपेत चालण्याची सिद्धी किंवा कला किंवा जे काय असेल ते कुठल्याही परिस्थितीत प्राप्त करायची असा संकल्प मी सांप्रत, नुकत्याच चालू झालेल्या, वर्षासाठी केला आहे. त्याकरिता या वर्षी प्रचंड झोपण्याची तपोसाधना करण्याचा निर्धार आहे. कारण झोपलोच नाही तर साधनाच होणार नाही आणि साधना न झाल्यास सिद्धी प्राप्त होणार नाही.
— विनय वसंत देशपांडे
वाशी.
Leave a Reply