माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय !
माझी आजी म्हणजे माहेरची “द्वारका” ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, तरी “द्वारकाकाकू, द्वारकामावाशी” ह्याच नावाने सर्वत्र सुपरिचित होती. एकोणीसशे दहा सालचा तिचा जन्म ! त्या काळामध्ये लवकर विवाह व्हायचे. लाक्षणिक शालेय शिक्षण जरी नसले, तरी ती आदर्श गृहपत्नी होती.
शिवनेरी, लेण्याद्री जिथे आहे ते जुन्नर हे माझे आजोळ ! तेथील वरल्या आळीमधील श्री मुरलीधराचे मंदिरात ज्येष्ठी पौर्णिमेला तीन दिवसांचा हा उत्सव असायचा . माझी आजी तीन दिवस उपवास करायची. त्यावेळी वट सावित्रीच्या ह्या ३५० ओव्या, तीन भागामध्ये अर्थात तीन दिवसात, ती म्हणायची आणि ते ऐकण्यासाठी खूप गर्दी व्हायची. आजीचा आवाज गोड होता, श्लाघ्य होता, आजही तिचा तो मधाळ स्वर कानामध्ये घुमतोय !
नंतर काही वर्षे, पुण्यातील सदाशिव पेठेतील श्री खुन्यामुरलीधर मंदिरात तिने वटसावित्रीच्या ओव्या म्हणल्या होत्या. दिनांक १०, ११, १२ जून १९६८ ह्या तीन दिवसामध्ये माझ्या आजीने, तीन भागातील ह्या वट सावित्रीच्या ओव्या, पुण्यातील शनिवार पेठेतील गोळे राम मंदिरामध्ये सादर केल्या होत्या. त्याचे वार्तांकन आणि छायाचित्र, पुण्याच्या सकाळच्या सि. पु. थत्ते ह्यांनी केले होते, १३ जून १९६८ रोजी “सकाळ”मध्ये ते प्रसिद्ध झाले होते ! फोटोमध्ये आजीच्या डावीकडे, ओव्या लिहिलेली वही उघडून बसलीय ती माझी आई, उषा पंडित चिंचोरे !
जुन्नरच्या सराई पेठेमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा घाटपांडे पारुंडेकर मावशी ह्या तिच्या नातेवाईक, त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने “वटसावित्री”च्या ओव्या शिकल्या होत्या. त्या पारुंडेकर मावशींनी माझ्या आजीची जिद्द हेरून, तिला ह्या ओव्या शिकविल्या. माझी “आनंदीआजी घरातील सगळी कामे झाल्यावर, दररोज दुपारच्यावेळी पारुंडेकर मावशींच्या घरी जायची. त्या माझ्या आनंदी आजीला रोज एकेक ओवी म्हणून दाखवायच्या. ते ऐकून, माझी आजी ती ओवी घोकून घोकून पाठ करायची. विशेष म्हणजे, ओव्या शिकवत असतांना, पारुंडेकर मावशी माझ्या आनंदी आजीच्या पुढ्यात, त्यांचे निवडणं-टिपणं ठेवायच्या. आजी एकीकडे ते काम करता-करता, “परळी-आडणी या विस्तारली ताटं” अश्या ओव्या पाठ करायची. ओवी पाठ झाल्यावर, माझी आजी आपल्या स्वतःच्या घरी यायची की संध्याकाळची कामं – तेलवात, कंदील तयार ठेवणे, अशी कामे करायची. दुसया दिवशी दुपारचेवेळी, आजी मावशींच्या घरी गेल्यावर, आधल्या दिवसाची ओवी आधी म्हणून दाखवायची मग पुढची ओवी शिकायची, अश्या मौखिक पद्धतीने “वट सावित्रीच्या साडे तीनशे ओव्या” तोंडपाठ व्हायला तिला सहा महिने लागले !
आनंदी आजीची अफाट स्मरणशक्ती शेवटपर्यत तल्लख होती. आज मनात विचार येतो, आजकाल साक्षर मुलांना सर्व सुख-सुविधा उपलभ्द असूनसुद्धा साधी तीन कडव्यांची शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ नसते.
“आनंदी”आजी नाव सार्थक करणारी होती, माझे आजोळ जणू “द्वारका” नगरी होती ! माझ्या आजीची गणपतीवर भारी श्रद्धा होती. गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय तिच्या मुखाखाली कधीही घास उतरला नव्हता. “मोरया मोरया” असा अविरत जप करणा-या माझ्या आजीला देवाज्ञा झाली, ती सुद्धा भाद्रपद चतुर्थीला १५ सप्टेंबर १९७२ रोजी आणि तेही अहेवपणी, जणू तिने घेतलेल्या, सत्यवान सावित्रीच्या वश्याची सांगता झाली !
— उपेंद्र चिंचोरे
19 june 16
Leave a Reply