रविवार २९ जानेवारी २०१२.
श्रीविष्णूचे दशावतार म्हणजे १. मत्स्य, २. कूर्म. ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. राम ७. परशुराम ८. बलराम ९. कृष्ण १० कल्की.
काही ठिकाणी बलराम हा अवतार न मानता ९ वा बुद्धावतार मानतात.
या पृथ्वीवर साडेतीन अब्ज वर्षाआधी जमिनीवर, काही ठिकाणी, तापमान जास्त असले तरी, पाणवठ्याच्या जागी काही जीवाणू, बुरशी शेवाळ अशासारखे एक पेशीय सजीव आणि वनस्पती अस्तित्वात आल्या .
सुमारे साडेतीन अब्ज ते ३ अब्ज ८० कोटी वर्षांपूर्वी समुद्रात, शेवाळाच्या स्वरूपात जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ मानतात. त्या काळी जमिनीवरील तापमानात बरीच तफावत असल्यमुळे सजीवांना जगणे कठीण होत असावे. त्या मानाने समुद्राच्या तापमानात, दिवसा आणि रात्रीत फारसा फरक नसतो.
या सजीवांना काही कार्बनी पदार्थांचा आहार आणि पाणी, ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश याच्या सान्निध्यात या एकपेशीय सजीवांना जगणे शक्य झाले. उत्क्रांती होऊन लाखो वर्षानंतर मासे आणि इतर जलचर निर्माण झाले. मासा हा जलचर प्राण्यांचा प्रतिनिधी समजून, श्रीविष्णूच्या मत्स्यावताराची संकल्पना रूढ झाली. पहिला अवतार. पृथ्वी हळूहळू थंड होत गेली.
जमिनीवर वनस्पती वाढू लागल्या. जमिनीवर सजीव प्राणी जिवंत राहू शकतील, वाढू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून पाणी आणि जमिनीवर राहू शकणारे प्राणी… उभयचर प्राणी उदा. कासव, बेडूक, सुसरी वगैरे निर्माण झाले. कासव प्रतिनिधी मानून श्रीविष्णूचा दुसरा अवतार…..कूर्मावतार संकल्पिला.
नंतर जमिनीवर राहणारे असंख्य प्रजातीत सामावलेले प्राणी उत्क्रांत झाले. हे प्राणी फक्त जमिनीवरच राहू शकत होते. वराह प्रतिनिधी, मानून श्रीविष्णूचा तिसरा अवतार….वराह अवतार संकल्पिला.
आता आपल्याला माहित झाले आहे की हा काळ खूपच मोठा आहे. प्रकाशित झालेल्या अनेक विज्ञानीय पुस्तकात आणि ज्ञानकोशात सजीवांच्या उत्क्रांतीची माहिती मिळते.
डार्विनच्याही हजारो वर्षे आधी, आपल्या ऋषीमुनींना सजीवांच्याउत्क्रांतीची जाण होती. प्राचीन इजिप्तच्या पिरामीडच्या काळात, प्राण्याचे शरीर आणि मानवाचे शीर असा सजीव (स्पिंक्स) कल्पिला आहे. भारतात मानवाचे शरीर आणि प्राण्याचे शिर असलेला सजीव म्हणजे नरसिंह कल्पिला आहे. प्राण्यापासून मानवाकडे झालेले स्थित्यंतर, श्रीविष्णूच्या नरसिंह अवतारात कल्पिले आहे. हा श्रीविष्णूचा चवथा अवतार.
नंतरची उत्क्रांती म्हणजे पूर्ण मानव. श्रीविष्णूचा पाचवा अवतार……..वामन अवतार.
नंतरचे अवतार म्हणजे राम, परशुराम, बलराम, आणि कृष्ण, हे मानवाची प्रगती दर्शवितात. श्रीकृष्ण हा नववा अवतार मानतात.
मानवी मेंदूचा पूर्ण विकास. ज्ञानी, विवेकी, व्यवहारकुशल, मुत्सद्दी, असा परिपूर्ण मानव.
श्रीकृष्ण अवतार समाप्तीनंतर कलियुग सुरु झाले. श्रीकृष्णाचा अवतार, इसविसनपूर्व १८ फेब्रुवारी ३१०२ रोजी संपला असे आधुनिक संगणकतज्ञ सांगतात. कलियुगाची ४ लाख ३२ हजार असतील असे ऋषीमुनींनी लिहून ठेवले आहे. म्हणजे विसाव्या शतकानंतर कलियुगाची ५ हजार वर्षे झाली आहेत. म्हणजे ऋषीमुनींना विश्वोत्पत्तीच्या काळाचीही जाणीव होती.
कलियुग संपल्यानंतर श्रीविष्णूचा कल्की हा अवतार असेल असेही लिहून ठेवले आहे. ऋषीमुनींच्या भाषेत सांगायचे म्हणजे ४ लाख २७ हजार वर्षानंतर मानवात उत्क्रांती होऊन कसा सजीव निर्माण होईल याची कल्पना नसल्यामुळे कल्की अवताराचे स्वरूप सांगितलेले नाही.
त्यालाही विज्ञानीय आधार आहे. ७० लाख वर्षांपूर्वी माकडापासून मानव उत्क्रांत झाला. श्रीकृष्ण हा परिपूर्ण मानवाचा प्रतिनिधी समजला जातो. यापुढच्या ७० लाख वर्षांनी मानवापासून कोणता प्राणी उत्क्रांत होणार याची कल्पना नसल्यामुळे कल्की अवताराचे रूप माहित नाही. हे ऋषीमुनींना बरोबर कळले. अध्यात्मात झाकलेले विज्ञान ! श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील?
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!
८४ लाख योनीतून जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो असे अध्यात्म सांगते. विज्ञानीय दृष्टीकोनातून अगदी बरोबर आहे. या पृथ्वीवर साडेतीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी जीव (लाईफ) अवतरला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. तो जीवाणू (बक्टेरिया) बुरशी आणि शेवाळ यासारखा एकपेशी सजीव होता. पुढे त्यात उत्क्रांती होतहोत अनेक प्रजाती निर्माण झाल्या. आणि शेवटी ७० लख वर्षांपूर्वी मानव निर्माण झाला. हे सर्व आनुवंशिक तत्वाच्या अस्तित्वामुळेच घडले. हाच आत्म्याचा प्रवास. आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा.
Leave a Reply