लेख स्पर्धा, लेखाचा विषय – माझी मराठी
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या.
माझी मराठी
पृथ्वीवर जोपर्यंत मनुष्य प्राणी आहे तोपर्यंत भाषा ही असणारच आहे. कारण संवादासाठी भाषा हे महत्वाचे माध्यम आहे. आता, आपण कुठली भाषा बोलतो हे देश, प्रांत यावर अवलंबून असते. पण भाषा ही कायमच जिवंत असणार आहे. फक्त प्रश्न आहे तो तिच्या दर्जाचा. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची भाषा ही मराठी आहे. अर्थात यामध्ये सुद्धा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा असे दोन वर्ग आहेत. पूर्वी प्राकृत आणि संस्कृत होते तसे. भाषेचा इतिहास तसा फार जुना तसेच मोठा आहे. त्यामुळे फार खोलात न जाता आपण सद्यस्थितीवर बोलूयात.
भाषा शुद्ध नसणे ही सध्याची मोठी समस्या आहे असे मला वाटते. बोली भाषा ही शुद्ध भाषा नाही असे देखील मानले जाते. परंतु तसे न समजता प्रमाण भाषेत जे नियम आहेत ते आपण पाळण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. सध्याची तरुण पिढी ही तर भाषेच्या पार चिंधड्या उडवते असे वाटते कधी कधी. आणि याबाबत जर आपण हटकले तर ‘काय फरक पडतो? मला काय म्हणायचे ते कळले ना झाले तर मग’ असे उत्तर ऐकायला मिळते.
यासाठी जेवढी शाळा जबाबदार असते तेवढेच पालकही जबाबदार असतात. घरात बहुतांश मराठी लोक मराठी भाषा बोलतात. मुलांची भाषा कशी आहे हे आपल्याला सहज कळते. त्यामुळे ते जर काही चुकत असतील तर त्याची दुरुस्ती आपण सहज करू शकतो . दुसरी गोष्ट म्हणजे वापरात म्हणी आणि वाक्प्रचार ठेवले तर त्याचा फार उपयोग होतो. या म्हणी वाक्प्रचार अनेक वाक्यांचे काम करू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर आणि त्यांचा अर्थ हे दोन्हीही मुलांना समजणे आवश्यक आहे.
अजून एक आवश्यक गोष्ट म्हणजे वाचन, मला आठवते लहानपणापासून आईने वाचनाची गोडी लावली. शिक्षिका असलेल्या आईचा कायम आग्रह असायचा की तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात भरपूर वाचन व्हायचं. शाळा कॉलेजमधील वाचनालयातील पुस्तके म्हणजे जणू काही खजिना आहे असा वाटायचे. या वाचनाचा फायदा असा झाला की पुढे जेव्हा मी लेखन करू लागले तेव्हा ते फार काही कठीण गेले नाही. वाचनामुळे, ऐकण्यामुळे काय वाईट काय चांगले याची समज थोडीफार का होईना येत गेली. त्यामुळे लेखन करताना काय लिहावे आणि लिहू नये हे ही समजत गेले.
हल्ली वाचनापेक्षा ऐकणे जास्त सोईस्कर झाले आहे. पुस्तकांचे स्वरूप देखील बदलले आहे. ई बुक्स ऑडिओ, किंडल सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केला पाहिजे. सोशल मीडिया जसे फेसबुक युट्युब यावर देखील भरपूर साहित्य उपलब्ध असते. त्यातून आपल्या आवडीचे साहित्य निवडता येते.
दूरचित्रवाहिनी मालिकांचा दर्जा बघता मला कायम एक प्रश्न पडतो. आपले मराठी साहित्य एवढे समृद्ध असताना त्याचा वापर या मालिकांमध्ये का बरं करत नाहीत? विषयांत, संवादात तोचतोचपणा असल्यामुळे मालिका बघाव्याशा वाटत नाहीत. लेखनात ताकद असेल तर कलाकार आपल्या अभिनयाने ती मालिका फुलवू शकतो पण जर कथेतच दम नसेल तर मात्र सगळेच फसत जाते असे मला वाटते. याला TRP देखील कारणीभूत आहे. तो अजून एक वेगळा मुद्दा आहे. प्रेक्षक वाहिन्यांवर खापर फोडतात आणि वाहिन्या प्रेक्षकांवर. खरोखरच न सुटणारा गुंता आहे हा.
शेवटी काय, तर आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्याची गोडी कळली पाहिजे तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. उगीचच ‘भाषेचे काय होणार, ती मरेल का’? असा गळा काढण्यात काहीही अर्थ नाही. भाषा टिकणारच आहे. तो प्रश्नच नाही. परंतु त्याचा दर्जा टिकवणे महत्त्वाचे आहे.
कवी वि. म. कुलकर्णी म्हणतात तसे
‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित’
असं मनापासून वाटले पाहिजे.
मेघना सावे – शहा
ठाणे
Leave a Reply