रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी!
मी नावाखाली दिलेल्या चाळीतल्या शेजार्याच्या Request किंवा C/o फोनवर मला प्रोड्युसरचा फोन आला, ” तुमची कथा आम्ही घेतोय, आपण उद्याच भेटतोय वगैरे …” लगेच कोणाचा तरी गालगूच्चा घ्यावा किंवा चीमटा काढावा वाटल. अनायसा फोनवाल्या शेजारीणबाईं माझ बोलण ऐकायला फोन जवळच उभ्या होत्या आणि त्यांचा गालही माझ्या टप्प्यात होता. पण परिणामांची जाणीव झाली आणि खर तेच सांगतो त्या माउलीला फक्त थँकस् म्हणुन घरी परतलो. बायकोला सांगीतल तर तीनी यशाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या पायगुणावर टाकली आणि लायकी नसताना पदरात पडलेल यश पचवण मलाही थोड थोड सोप वाटत गेल.
दरमँन फोनवाल्या बाईंचा लाउड स्पीकर घराघरात गरजुन चाळभर बातमी पसरली आणि जो तो गँलरीतुन मी दिसतोय का याचा अंदाज घेउ लागला. मी शेलीब्रिटी झालो.
थोडासा अंधार पडल्यावर दोन जिने उतरलो तर दबा धरुन बसलेल्या चाळीतल्या वसंतानी चक्क वाट आडवली आणि कुत्रा, मांजर, हेमा मालीनी, राजकुमार वगैरेंचे आवाज काढुन दाखवले आणि म्हणला तुमच्या कथेत विनोदी भुमिकेसाठी एवढी झलक पुरेशी आहे. आँडिशनला भेटुच आपण म्हणला आणि माझ्या कानात उगाचच कुर्र्ररर करुन पसार झाला. मला बोलायला चांसच नव्हता.
कसा बसा घरी पोहोचतोय तो पर्यंत बेल वाजली. हनुवटीवर सिलव्हर कलरचे खुंट वाढलेला, गळ्यातल्या पिशवीत दोन चार वर्तमानपत्र असलेला आणि केंव्हातरी कंपनीत बघीतलेला आर के लक्ष्मणच्या काँमन मँनसाररखा दिसणारा साठी पासष्ठीचा वयस्कर गृहस्थ घरात आला. पूर्वपरिचय काहीच नव्हता. माझ अभिनंदन करुन स्वत:ची कवी म्हणुन ओळख करुन दिली आणि २०१० सालची जुनी डायरी हातात घेउन कवीता वाचु लागला ” तात म्हणतात गवतात का …….वगैरे.
प्रत्येक सीनसाठी वेगवेगळ्या आशयाच्या कवितांचे ५-६ पर्याय माझ्याकडे तयार असतात तेंव्हा तुम्ही कथेवर लक्ष द्या आणि गाण्यांच माझ्यावर सोडा म्हणला. मी कळकळीनी समजवायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यानी प्रोड्युसरचा नाव, नंबर मागितल्यावर मात्र मी स्पष्ट नकार दिला. तरी पण, जाताना, दोन दिवसानी चक्कर टाकतोय म्हणलाच.
पुढे येउ घातलेल्या प्रसंगांची जणु नांदीच होती ती.
दुसर्या दिवशी आँफिसला पोहोचल्यावर माझ्या टेबलावर झेंडूच्या फुलांचा एक बुके आणि कमी वासाची बरीचशी फुल सांडल्यासारखी मांडली होती. साहेबांनी हार घातला, माझ अभिनंदन केल आणि नंतर बोलु अस पोक्तपणे बोलले. साहेब नजरे आड झाल्या बरोबर टेबलावरचा बुकेही गुल झाला. मी बायकोसाठी सुट्टी फुल गोळा करुन डब्याच्या पिशवीत भरली आणि कामाला लागलो. साहेबांनी बोलवण धाडल. कामाची भरपूर स्तुती केली आणि हळुच स्वत:च्या मुलाचा फोटो आणि intro दिली. शिवाय माझी कथा न वाचताच अगदी तुमच्या कथेतल्या हिरो सारखा आहे असही म्हणले. अपरेझलचे दिवस होते; मी ही हो ला हो केल आणि बाहेर आलो. काय कराव सुचेना! शिप्ट संपली आणि गाडीनी घरी पोहोचलो.
घरी पोहोचल्यावर पहातो तर बायको बरेच दिवसानी तंबोर्याच कव्हर काढुन सुर लावताना दिसली. मी बेसावधपणे तिच्या सुराशी सुर मिळवत विचारल यमन कल्याण का? तर मला म्हणाली छे हो सुमन कल्याणपूरच एकही गाण पाठ नाहीये माझ. मी डास मारतोय अस दाखवत कपाळावर हात मारला. तरी पण मुद्यावर आलीच आणि म्हणली घरच्या चित्रपटात बाहेरची गायीका नकोय आणि माझ्या बरोबर ड्युएटमधे मेल व्हाँइसही स्वप्नीलचाच बर का !
थोडी विश्रांती घेउन प्रोड्युसरला मोबदला वगैरे विषयी काय आणि कस बोलायच याचा विचार करत होतो. तेवढ्यात बायकोनी सांगीतल चाळीतले लोक भेटायला आलेत. त्यातल्या जेष्टानी मला हार घातला आणि आँटोग्राफ साठी पेंसिल आणि दुरेघी वहीतला चार घड्या केलेला कागद पुढे केला. मला मधे ठेउन एक सेल्फीही झाला. मी मुकाट्यानी सगळ सहन केल. घर सोडताना सगळ्यांनी एक मुखानी दोनच मागण्या केल्या; आपल्या वसंतला काँमेडियन म्हणुन घ्यायच आणि शुटींगसाठी आम्हाला सगळ्यांना पासेस द्या.
या नंतर कमालच झाली. चक्क साहेब घरी आले. म्हणले रजेच किंवा अपरेझलच मनावर घेऊ नका. तुमच काम होउन जाइल आणि माझा मुलगाही स्क्रिनवर चमकुन जाइल. मी चलतो, मुलाला अजुन बातमी द्यायचीये.
कथेच्या बदली मला मिळणारा मोबदला आणि कथेतील बदल हे सगळ ठरायच्या आधीच नको त्या पात्रांनी आपापल्या जागा गृहीत धरुन आडवल्या सुध्दा.
मनात विचार येणार की नसलेली पात्र फिक्स झाली आणि हिरोइनचा अजुन पत्ता नाही. विचारच करत होतो तोच बेल वाजली. मी, की होलमधुन पाहिल तर एक लाल टपोरी बिंदी लावलेली, ब्लँक ब्राउनिश कलर डाय केलेली, चंदेरी साडीवर कॉन्ट्रास्ट मँचिंग स्लीव्हलेस ब्लाउज, कानात मोठ्या इयर रिंग आणि पायात उंच टाचेचे सँडल घातलेली रुपवती दार उघडायच्या प्रतिक्षेता होती. मी दार उघडायला जाणार तोच ….बायकोचे परिचयाचे शब्द “उठा आता नाहीतर आजही बस चुकेल” आणि सव्वा पाचचा गजर एकाच वेळी कडाडले. झक मारत डोक्यावरच पांघरुण काढल आणि पटा पट आवरुन 6.10ची बस पकडुन 6.55ला कार्डही पंच केल.
तात्पर्य, रात्री झोपताना आपल्याला झेपतील असेच विचार डोक्यात ठेउन झोपत चला नाहीतर बंगल्यातला निर्माता सोडुन चाळीतल्या लेखकाकडे हीरोइन येईल आणि तुम्ही डोळे चोळत उठाल!
— प्रकाश तांबे
8600478883