काल सकाळी खूप दिवसांनी मित्रांबरोबर डेक्कनला गप्पा मारायचे ठरले होते. पाऊस, ड्राइविंगचा कंटाळा आणि कोरोना मिश्रित गर्दी, म्हणून सुरक्षित रिक्षाने निघालो. लकडी पुलाजवळ सिग्नलला रिक्षा थांबली. ७-८ वर्षांचा एक मुलगा सोनचाफ्याची पुडी घेऊन आला.
मला वाटलं तो आता गळ घालणार. पण त्याच्या वाक्याने मी अचंबित झालो.
” ओ, छत्री द्या नं ! ”
” काय?”
“छत्री पाहीजे.”
मी आणि रिक्षावाला बघत राहिलो.
“अरे, मग मला नको कां ? ”
” तुम्ही तर रिक्षात बसलाय. तुम्हाला कशाला हवी? पावसात मी भिजतोय.”
त्याचं हे औद्धत्य जन्मजात होते की कोरोनाजन्य, मला टोटल लागेना. लॉजिक लेकिन सही था !
आयुष्यात इतकी प्रदीर्घ चाललेली, आऊट ऑफ सिलॅबस असलेली ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच वाट्याला आलीय.
वाढत्या वयाबरोबर माझी माणुसकीही थकत चालली आहे बहुधा !
मागणाऱ्यांचे हात आणि माझी दुबळी झोळी !
त्या विनोद मेहेराचं काय जातंय पियानोवर म्हणायला-
” मैंने हसने का वादा किया था कभी
इसलिये अब सदा मुस्कुराता हूँ मैं ! ”
खिशात हात घालून त्याला पाच रुपये दिले आणि चाफाही घेतला नाही त्याच्याकडून.
सिग्नल सुटला आणि रिक्षा निघाली.
तासभर मित्रांबरोबर चाललेल्या गप्पा ” के दिल अभी भरा नहीं ” या टप्प्यावर सोडून घरी निघालो.
लकडी पुलाजवळ तो दिसला तर देण्यासाठी अजून दहा रुपये हातात ठेवले.
तो नव्हता.
बहुधा छत्री विकत आणायला गेला असावा.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply