उमा काकू घरातील कामे भरभरा उरकून हळदीकुंकूवाला जायची तयारी करु लागल्या. पंत निवृत्त पेन्शन वर घर चालते. मुलींची लग्न झाली आहेत. मुले आपापल्या नोकरीत संसारात. चैत्र महिन्यात उमा काकू ना फारच भाव मिळतो. आणि गावातल्या प्रत्येक घरी जायचे म्हणजे लवकरच निघायला हवं. पिशवी घेऊन जाताना म्हणाल्या जाऊन येते. पंत पण फिरायला बाहेर पडले. पूर्वीचा काळ जिथे संध्याकाळी घरासमोर सडा रांगोळी तिथे जात. दोन्ही हातांनी ओटी भरली जायची. त्यामुळे भरपूर हरबरे कैरीच्या फोडी मिळाल्या पिशवी भरली जड झाली. आणि दिवेलागणीच्या वेळी धापा टाकत घरी आल्यावर हातातील पिशवी ओसरवर ठेवून हुश्श करत पदराने तोंड पुसत पुसत म्हणाल्या दमले बाई. तोच पंत म्हणाले. अरे व्वा बरेच हरबरे आलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही आज रात्री कैरीच्या फोडी घालुन मस्त पैकी उसळ करा. तशा उमाकाकू कडाडून म्हणाल्या. तर तर तुम्हाला काय होतय सांगायला माझ्या पायाचे तुडे पडले हिंडून हिंडून. म्हणे उसळ कर. तसे पंत हसत हसत म्हणाले की मी आहे म्हणून तुला हरबरे मिळालेत की. आणि आता तर काकूंना जास्तच राग आला. पण तिन्ही सांजेला वाद नकोत म्हणून स्वयंपाक घरात गेल्या..
पंतांचा रोख होता तो असा. ते आहेत म्हणून त्यांना ओटी मिळाली.कारण सवाष्ण असलेल्या बायकांना हळदीकुंकूवाला बोलावले जाते. ओटी भरली जाते. तर उमाकाकूंचे म्हणणे होते की त्या बाहेर खूप घरी गेल्या दमल्या म्हणून ओटीत एवढे आले. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. पण मी आहे म्हणून तुम्ही आहात असे देव कधी म्हणतो का? माणूस मी माझे माझ्या मुळे अशी बढाई मारतो. पण कधी हा विचार करायला हवा की तो आहे म्हणून जग आहे..
धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply