नवीन लेखन...

मी आणि माझं ‘सुशि’ प्रकरण….

तर……
गेले कित्येक दिवस डोकं ठिकाणावर नव्हतं.
आहो का म्हणून काय विचारता.
एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती जीवाला.
लोकं माझ्या आयुष्याशी जी व्यक्ती जोडत आहेत ती तरुणी नेमकी कोण असावी बरं.?
आणि माझ्या आयुष्याशी जी तरुणी लोकं जोडत आहेत,ती नेमकी मलाच माहीत नाही म्हणजे काय…?
साला आपण स्वप्नात एखादी लडतर तर करत नाही ना.?
आपलं एखादं छुपं अफेअर तर नाही ना.?
असेल तर आपल्याला माहीत कसं नाही.?
असे प्रश्न पडायला लागले आणि मी झरझरु लागलो.
तुम्हाला सांगतो कित्येक दिवस रात्रीची झोप नाहीये मला.
खूप टेन्शन येत होतं. टेन्शन आणि काळजीने माझं वजन या ३ महिन्यात ५ किलो घटलंय.
वाटायचं सालं हे नेमकं होतंय तरी काय..?
आणि कोणी धाडसाने ते सांगायलाही कबूल नाही.?
विचारलं तर लोक म्हणायचे.
जाऊ द्या ना सर…
संवेदनशील लोकांच्या आणि विशेषतः तुमच्या सारख्या कलाकारांच्या आयुष्यात येतात असले प्रसंग.
पण तुम्ही लिहीत रहा कायम.तुमचे शब्द, तुमचे लेख,कविता आम्ही अक्षरशः जगतोय.
काळजी करू नका.सगळं नीट होईल सगळं.
आम्ही सोबत आहोत तुमच्या. काही लागलं तर कळवा.अर्ध्या रात्री सुद्धा फोन करा हक्काने.
च्यायची ह्यांच्या….
एकतर सांगत नाहीत नेमकं काय झालंय.आणि वरून आम्ही सोबत आहोत असा धीर सुद्धा देत आहेत.
नेमकी भानगड काय आहे.? काहीच कळेना.
अस्वस्थ झालो.अन्नावरची वासना उडून गेली होती.मन दिवसेंदिवस बैचेन बैचेन वगैरे.
परवा एक मैत्रीण सुद्धा फोनवर म्हणाली.दत्ता काळजी करू नको रे…मी आहे की सोबत तुझ्या.ती गेलीय ना…
जाऊ दे.तू पुन्हा प्रेमात पड.आणि यावेळी प्रेमात जिंकशील तू. मला खात्रीय तशी.
अरे पण नेमकं मला सोडून गेलंय तरी कोण…?
मलाच कोण ते माहीत नाही.तू तरी सांग बरं कोण आहे ती..?
तर म्हणते कशी जाऊ दे ना दत्ता…
सगळंच सांगायचं नसत काही. असं तूच आपल्या कवितेतून सांगतोस ना लोकांना.
रागच आला….म्हटलं कुत्र्या सांग की नेमकं काय प्रकार आहे हा.? नेमकं काय झालय मला…?
अरे माझ्या कवी मित्रा…..
कवी बिवी गेला तेल लावत.तू आधी सांग मला नेमकं काय झालंय.?
मला बरं नाहीये का.? मला कोणता आजार वगैरे झालाय का…?
अरे नाही तसं काही.पण जाऊदे ना..कश्याला उगाच जुन्या आठवणी उगाळत बसूया.जे झालं ते झालं.तो तुझा भुतकाळ म्हणून विसरून जा.
आणि नव्याने सुरुवात कर.
आईचा घो तुझ्या… नीट सांग की नेमकं काय झालंय मला.
शिव्या का देतोयस…?
मग आरती करू का तुझी रताळे.
नीट सांग की.
बरं ऐक….
हां….
ही सुशि कोण…?
सुशि…?
कोण सुशि मलाच माहीत नाही.
असं कसं…? जिच्यावर इतकं उत्कट लिहितोस ती माहीत नाही म्हणजे कमाल आहे बरं. उल्लू नको बनवू आम्हाला.
अरे मी कुणावर लिहितो…?
सुशिवर.
आता ही सुशि कोण…?
ते तुलाच माहीत.
आता मला कसं माहीत कोण ती सुशि…
आता तुला माहीत नाही तर कोणाला माहीत असणार सुशि बद्दल.
अगं पण मी कुठल्या सुशि ला ओळखत नाही ग.
असं कसं…सांगायला लाज वाटत असेल तर सांगू नको दत्ता. लाजरा आहेस माहितीय.
आता गुच्ची हणू का तुझ्या नाकावर रताळे.
कोण सुशि…? काय प्रकार आहे हा नेमका.…?
मला खरंच सांगेल का कोणी.
घ्या…आता तुला काय सांगायचं. तूच तर लिहिलंयस तसं.
कुठे…?
तुझ्या बायोमध्ये.
कुठं…?
तुझ्या fb च्या बायोमध्ये.
एक सेकंदात fb उघडलं.
बायो वाचला.आणि कपाळावर हात मारून घेतला.
हसावं की रडावं हेच कळेना.
इथं सोशल मीडियावर व्यक्त होतांना मी आजवर खूप कविता लिहिल्या, आर्टिकल लिहिले.कित्येक लोकं ओळखीची झाली. काळजात बसली.काही दुरावली.
पण आजवर कुणीच इतकं टेन्शन दिलं नाही इतकं त्या सुशि नं दिलं.
मला झालेला प्रकार लक्षात आला.
मी शांतपणे क्रोध आतल्या आत दाबत म्हणालो.
मैत्रिणी…..
हे बघ रडू नको आता दत्ता. कळतेय तुझी नाजूक अवस्था.सावर स्वतःला. मी आहे ना…मी सुद्धा गेलीय या असल्या कठीण प्रसंगातून.
तू मेली का नाहीस काळे…? एव्हाना स्वर्गात पोहोचायला हवी होतीस जाडे.?
ए….शिव्या काय देतोस.शोभत का एका लेखकाला.?
शिव्या नव्हे हाणलीच असती आज तू समोर असतीस तर…
अरे पण माझं काय चुकलं.? मी तर तुला धीर देतेय.जी तुला सोडून गेलीय ना तिच्यावर इतकं भावूक होऊन लिहितोस म्हणून आज बोलले तुला.
बाकी काही नाही. काळजी वाटली रे तुझी.
मी पुन्हा क्रोध आतल्या आत दाबला. हतबल होऊन म्हणालो.
अगं सुशि म्हणजे कोणी बाई वगैरे नाही ग.
मग…?

अगं सुशि म्हणजे…..
सुहास शिरवळकर.

गेली कित्येक दशकं ज्या प्रतिभा संपन्न माणसाच्या शब्दांवर साऱ्या मराठी वाचकांनी भरभरून प्रेम केलं ते शब्दांचे जादूगार म्हणजे सुहास शिरवळकर.
ज्यांच्या नवीन पुस्तकांची खेड्यापाड्यातली लाखो आबालवृद्ध वाचकं आतुरतेने वाट पाहत होती ना…
त्या सर्व वाचनप्रेमी माणसांच्या काळजावर राज्य करणारं नाव सुहास शिरवळकर.

ज्या अफाट माणसाच्या पुस्तकांनी हा दत्ता आज लेखक म्हणून घडला ते सुहास शिरवळकर.
ज्यांच्या अफाट कलाकृतीवर दुनियादारी आणि समांतर चित्रित केलं गेलं ते सुहास शिरवळकर.

ज्या माणसाच्या लिखाणाचा एक अंश आपल्यात यावा म्हणून रोज देवाशी भांडणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या लेखकाचा गॉडफादर म्हणजे सुहास शिरवळकर.
सुहास शिरवळकर म्हणजे फक्त नाव नाही.

सुहास शिरवळकर म्हणजे साहित्य क्षेत्रात प्रवाहित झालेला साहित्याचा एक शुद्ध विचारप्रवाह आहे.
तो लेखकाच्या साहित्याच्या नदीतून वाचकांच्या मनाच्या अथांग सागरात अर्पित होतो.

त्याच सुहास शिरवळकरांच्या “निष्पर्ण” या कादंबरीतलं एक हिरवीगार पान म्हणजे तो बायो.
आणि तो बायो आणि त्यातील ते शब्द आहेत…

अति दुःख झालं की काळजातून जे व्यक्त होतं. ते कागदावर उतरलं की त्याचं महत्व कितीतरी पटीने वाढतं.

अगं सुशि म्हणजे कोणी तरुणी नसून…
ते आहे साहित्य क्षेत्रातलं एक शब्दांचं गजबजलेलं झाड.
त्या झाडाची शब्दफळं लाखो वाचकांनी चाखली.
वाटली. प्रवाहित केली.भेटीदाखल मनामनात पोहोचली.
मी ही त्या लाखो वाचकांच्या झुंडीत त्यांच्या शब्दांचं आचमन करणारा एक तहानलेला पांथस्थ लमाण वाचक.
आज त्याच बायोमुळे इतके दिवस मला, तुला, सर्वांना कोड्यात पाडलंय.
चूक तुमची नव्हेच.
चूक माझीच.
कसंय ना…
त्या बायोमध्ये त्या ओळी नंतर सुहास शिरवळकर हे नाव बसत नव्हतं.
म्हणून मी शॉर्ट लिहिलं.
सुशि.
आणि इतकं रामायण घडलं.
पण काही का असेना हे गैरसमजाचं रामायण ही मला खूप आवडलंय.
आपल्या प्रिय लेखकावर इतकं लिहिण्यासाठी सुशि नंच तर घडवलं नसेल हे सारं रामायण…?

माझ्या प्रिय..
सुशि.
तू अजूनही आहेस तर आमच्यामध्ये…
आमच्या काळजात.आमच्या हृदयात. आमच्या रक्ताच्या प्रवाहात. विचारात, कणाकणात.
ज्यांनी ज्यांनी तुला वाचलं तू त्यांचा झालास रे.
अरे तुझ्या असंख्य पुस्तकासारखीच ही किती रूपं तुझी.?
अमर झालास रे तू मरून सुद्धा.
आता हे एकेरी बोलतोय ते ही हक्कानं हं.
आणि हे जे मी लिहिलंय ते तूच लिहून घेत असशील तर…?
तर माझ्या असंख्य कविता ,लेख, माझं सगळं सगळं तुझ्या पायाशी अर्पण.
माझ्या काही शब्दांचे मोती तुला अर्पण करतांना खूप भरून येतंय बघ. आणि विलक्षण आनंद ही वाटतोय.

एक शब्ददल लिहिले..
ते सुशि चरणी स्थिर केले.
शब्द हे भारावले, भरूनी उर.

हा माझा वेल्हाळ शब्दवेलू..
किती तयास मोलू…
किती तुझ्यावर लिहू,बोलू…
कमीच पडे.

मी हा आजण बाळ…
ना कळेना ही काळवेळ.
हा लिहिला जो शब्दछळ.
स्वीकारावा.

—–

माझ्या कविता, माझे लेख वाचणाऱ्या असंख्य मित्रवर्गाला मला आज या निमित्ताने सांगायचं आहे की…
माझ्या बायो मधील सुशि ही कोणी तरुणी नसून…
ते आहेत साहित्यातील शब्दहिमालय ….
माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू.
स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी.
स्वर्गीय.मा.श्री. सुहास शिरवळकर.उर्फ सुशि.
माझ्यावर, माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या आणि सुशि बद्दल गैरसमज करून घेतलेल्या सर्वांना आजून एकदा आवर्जुन सांगतो की सुशि म्हणजे…..
कोणी तरुणी किंवा मला विरहात सोडून गेलेली माझी प्रेयसी नसून.
ते आहेत…
सर्वांचे लाडके, आवडते लेखक.
सुहास शिरवळकर.
याची नोंद घ्यावी.

*( ताजा कलम- या सर्व गैरसमजाने आणि हसू आणणाऱ्या या प्रकारामुळे…

मला का सांगितलं नाहीस तिच्याबद्दल.?मी जवळचा/जवळची होते ना.? म्हणून भांडून गेलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना सांगतो तुम्ही परत या तुमचं डोकंच फोडतो बघा रताळ्यांन्नो.
या सुशि नावाने झालेल्या गर्लफ्रेंड प्रकरणामुळे मला ३ महिने नीट झोपू दिलं नाहीत तुम्ही. वजन कमी, अन्नावरची माझी वासना उडवलीत तुम्ही नालायकांनो…
टोचीचा दगड फेकून डोक्यात टन्नू नाही उठिवला तर कोल्हापुरकर म्हणून नाव सांगणार नाही. याच तुम्ही मी वाटच बघतोय.
तूर्तास फुटणारं डोकं इम्याजीन करावं.
येतो)

दत्तात्रय श्रीकांत गुरव.
कोल्हापूर.
मोबा_८६०५५२३६१८.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..