मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं. नाशिक केंद्र निवडल्याने आम्ही सगळेजणही निवडले गेलो. पण नाशिकमध्ये परीक्षा दिली असल्याकारणामुळे मुंबई-पुण्यात किंवा इतर शहरांत कुठेही नोकरी न मिळता प्रादेशिक केंद्रावर अलिबाग मधील रोह्याजवळ ‘धाताव’ या गावात मला ‘बँक ऑफ इंडिया’त नोकरी मिळाली. तेव्हा बँकेची परीक्षा दिल्यानंतर कुठली बँक निवडायची हे योगायोगाने आपल्या हातात असल्यामुळे; तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे अनेक कलाकार बँक ऑफ इंडियामध्ये होते, म्हणून मी बँक ऑफ इंडियाची निवड केली होती. आता धातावला गेल्यानंतर तिथे नाटक बंद, सिनेमा बंद, टीव्हीवरील कार्यक्रम बंद असं असल्यामुळे मला काही फार चैन पडेना, पण तरीही त्या वर्षात आपण नोकरीच करावी आणि टिकून राहावं असं वाटल्यामुळे मी तिथे धातावला जाऊन स्थिर झालो. आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला, आपला मुलगा नोकरी करतोय म्हटल्यानंतर. दिनांक होती 31 जुलै जेव्हा मी रुजू झालो. तारीख लक्षात राहण्याचं अजून एक कारण म्हणजे नेमकी त्याच वेळेस मला काही दूरदर्शनचे कार्यक्रम विचारले गेले होते. तेव्हा प्रायव्हेट वाहिन्या अशा कुठल्या नसल्यामुळे फक्त दूरदर्शन; त्यामुळे ते कार्यक्रम करावे की नोकरी करावी असा संभ्रम माझ्यापुढे निर्माण झाला. तरीही काही महिने आपण नोकरी करू असं ठरल्यामुळे मी ही नोकरी तिथं स्वीकारली. तिथे एक केमिकल इंडस्ट्रियल एरिया होता ज्या एरियामध्ये फक्त त्या लोकांसाठी म्हणूनच बँकेची शाखा होती. तिथे ही माझी नोकरी सुरू झाली. तो विभाग असा होता की त्या विभागामध्ये एखाद्याला जीवे मारलं तरी सुद्धा दहा दिवसानंतर कळेल; अशा पद्धतीच्या एक खूप आतल्या भागात ती नोकरी मी स्वीकारली. मी राहायला रोह्यामध्ये होतो आणि रोह्यातून एसटी पकडून धातावला जाऊन नोकरी करत होतो. रोह्यातील भाटे वाचनालय जे होतं त्या वाचनालयाने माझं तिथलं जगणं सुसह्य केलं असं मला नक्कीच म्हणता येईल.
एक दिवस बँकेच्याच कामाच्या निमित्ताने स्टेशनरीच्या काही ने-आणीसाठी मी मुंबईला आलो होतो. तेव्हा आर. पी. वैद्य म्हणून मुंबईच्या मुख्य शाखेत एक मोठे पदाधिकारी होते, नेमकी तेव्हा दिवाळीचे दिवस सुरू होते आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला म्हणून फक्त आत गेलो आणि तेव्हा ते म्हणाले की, ‘सहसा फारसं कोणी फक्त शुभेच्छा द्यायला येत नाही. तुम्ही एवढ्या लांबून येऊनही मला आवर्जून शुभेच्छा द्यायला आलात, तर काय तुमच्यासाठी करू शकतो मी?’ तर त्यावर मी त्यांना म्हटलं की मी मूळचा मुंबईकर आहे रोह्यात आपल्या बँकेच्या शाखेत नोकरी करतो. पण नाटक सिनेमाची आवड असल्यामुळे मला तिथे फारसं काही करता येत नाही. त्यावर ते म्हणाले, ‘अच्छा, एवढच?’ तेव्हा खाली प्रभू म्हणून एक जण होते त्यांना त्यांनी भेटायला सांगितलं आणि आश्चर्य म्हणजे सहा महिन्याचा माझा प्रोबेशन पिरियड संपायच्या आतच आमच्या हेड ऑफिस मधून रिजनल ऑफिसला पत्र आलं – विजय कदम नावाचे आपल्याकडे जे कर्मचारी काम करतात त्यांची बदली करायची आहे आणि योगायोग म्हणजे जी मुख्य शाखा बँक ऑफ इंडियाची होती, तिथेच माझी बदली करण्यात आली ती सेफ डिपॉझिट वॉल्टच्या तळघराच्या कक्षामध्ये! तिथे जवळजवळ 6,000 लॉकर्स. ज्याला आपण म्हणतो की सुखं सगळ्या बाजूंनी येतात ती अशी की, ललिता बापट ज्या मराठी नाटकांच्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये खूप चांगली समीक्षणं लिहायच्या त्या माझ्या नशिबाने माझ्या मुख्य अधिकारी! त्यावेळी नेमकं मला पुरुषोत्तम बेर्डे यांनी टुरटुर नाटकासाठी विचारलं होतं आणि तालमी होऊन त्याचे प्रयोगही सुरू झाले होते. त्यावेळी बाई स्वतःहून मला म्हणायच्या की, ‘अरे तुझा दीनानाथला 4 चा प्रयोग आहे ना? तर 2:30 वाजता निघ आणि तुझी जी काही टर्म असेल ती दोन वेळा कर म्हणजे इतर कुणावरती भार पडणार नाही.’ आणि असं फक्त सही करून मी दीनानाथच्या प्रयोगाला 2.30 वाजता निघायचो, ठाण्याच्या प्रयोगाला 2 वाजता निघायचो. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, मी सकाळी तेव्हा 11 वाजता बँकेत यायचो सही करून सगळी कामं आटोपून पटकन दुपारच्या प्रयोगाला निघायचं आणि रात्री परस्पर घरी जायचं; तर कधी कधी दुपारच्या ट्रेनने पुण्याला जावं लागायचं – संध्याकाळच्या प्रयोगासाठी! जेव्हा दौरा असायचा तेव्हा मी कॅज्युअल लिव्ह घ्यायचो. मेडिकल लिव्ह जी आम्हाला वर्षातून 15 दिवस तेव्हा मिळायची, ती मी अर्धी वापरायचो, म्हणजे 30 दिवस ती मला मिळू शकायची. इतर जर अजून जास्तीचे काही प्रयोग असतील तर मग सुट्ट्या! आणि हे थोडी थोडकी नव्हे तर जवळजवळ 12 वर्ष असं सगळं सुरू होतं आणि ज्या डॉक्टरांकडून मी मेडिकल लिव्हसाठी सर्टिफिकेट घ्यायचो, ते डॉक्टर शेवटी कंटाळले मला म्हणाले, ‘कदम, सगळे रोग तुम्हाला होऊन गेले. बाळंतपणाचं कारण फक्त राहिलंय आता. तुम्ही बाई असता तर तेही दिलं असतं लिहून!’
विजय कदम (ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी)
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply