आवाजाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपाय योजल्यास शारीरिक परिणामांचे धोके टाळता येतात. ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रांवर कंपने रोखणे, निर्माण होणाऱ्या ध्वनीचे शोषण करणारे उपाय योजावेत. ध्वनीनिर्मिती कमी असणारी यंत्रणाच खरेदी करावी.
कारखान्यातील यंत्रे ध्वनीरोधक लाद्यांचा पाया वापरून व कंपरोधक स्प्रिंग वापरून बनवतात. जुन्या यंत्रांवर ग्लासवूलचे जाड आवरण टाकून ध्वनी प्रसरण कमी होते. यावर जर डांबराचे जाड आवरण केले तर डांबराच्या स्थितीस्थापकतेमुळे ध्वनीशोषण आणखीनच होते. ही यंत्रे ज्या खोलीत बसविली जातात त्याच्या भिंतीपासून ५ सें. मी. | अंतरावर सच्छिद्र लाकडाची (बगॅस बोर्डसारखी) चौकट लावली तर परावर्तित ध्वनी शोषला जाऊन आवाज आणखी कमी होतो. या तत्त्वांचा उपयोग आपण घरी, शाळेत, हॉस्पिटलमध्ये करू शकतो. खिडक्यांना जाड सच्छिद्र पडदे लावले तर बाहेरून येणारा आवाज कमी होतो. भिंतीवर जाड लोकरीच्या कापडावर विणलेली चित्रे लावली तर परावर्तित होणारा आवाज कमी होतो व सजावटही बिघडत नाही. विशेषतः पॉप म्युझिक ऐकताना ही दक्षता घ्यावी कारण तो आवाज ११५ ते १२० डेसीबल असतो. हल्ली खूप युवक आयपॉडस्चा वापर करतात व त्याचा व्हॉल्युम खूप मोठा ठेवतात. त्यामुळे त्यांच्यात बहिरेपणा निर्माण होऊ लागला आहे. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताप्रमाणे १२ ते १९ वर्षे वयोगटांतील २० टक्के मुळात बहिरेपण आढळले.
विशेषतः भाषा शिकण्यात, उच्चाराचा स्पष्टपणा कमी जाणवतो. सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये विशेषतः शहरातील नागरिकांना निरनिराळ्या स्त्रोतापासून निर्माण होणाऱ्या आवाजांना सामोरे जावे लागते. त्याचे शरीरावर होणारे परिणाम ‘स्लो-पॉयझनिंग’ सारखे होतात. ध्वनीची मर्यादा ‘डीबीए’मध्ये सकाळी ६ ते रात्री १०- निवासी क्षेत्र ५५, व्यापारी ६५, औद्योगिक ७५, शांतता ५०, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत, निवासी ४५, व्यापारी ५५, औद्योगिक ७०, शांतता ४०, शांतता क्षेत्र, शाळा, न्यायालये, हॉस्पिटल. तीव्र आवाजात काम करणाऱ्यांनी अॅस्पिरीन जास्त प्रमाणात घेतले तर बहिरेपणा येतो, असे अलीकडे लक्षात आले. पारा, शिसे, टोल्युन, झायलीन, कार्बन मोनॉक्साइड यांचाही तसाच परिणाम दिसून आला. यावर अधिक संशोधन चालू आहे.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply