बालसाहित्यिक
अलीकडे प्रसार माध्यमांचा जनमानसावर जबरदस्त पगडा असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. या प्रसार माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलेसुद्धा त्याच्या प्रभावापासून सुटलेली नाहीत. या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमांमुळे जग खूप जवळ आले असून यातील स्पर्धा, गती, विविधता आणि नावीन्याने आजची मुलं दिवसेंदिवस उत्सुकता, कुतूहलापोटी या प्रसार माध्यमांच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. या प्रसार माध्यमांच्या सहवासात ते तासनतास रमताना दिसत आहेत. हे आभासी विश्व त्यांना हवंहवंसं वाटू लागतं. प्रसार माध्यमांच्या या वाढत्या प्रभावामुळे आणि अतिरेकी वापरामुळे मुलांच्या मनाचा ताबा ही माध्यमं सहज घेतात. अशावेळी या माध्यमांच्या अतिवापरामुळे जसं मोठ्यांचं आयुष्य ढवळून निघाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या पाहाण्यात, वाचण्यात येतात. तसेच बालजगतावरसुद्धा या प्रसार माध्यमांचे दूरगामी झालेले इष्ट – अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याची कितीतरी बोलकी उदाहरणं आपण आजूबाजूला पाहत असतो, वृत्तपत्रातून वाचत असतो.
एक बातमी अशी की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं दूरच्या सातासमुद्रापलीकडल्या देशातील मुलांशी या माध्यमांच्या मदतीने शिक्षण विषयक संवाद साधतात. तर दुसरी बातमी अशी की, आई-बाबांनी मोबाईल विकत घेऊन दिला नाही म्हणून मुलीने आत्महत्या केली. दोन्ही बातम्या दोन टोकाच्या मोबाईल मुलीला जीवापेक्षा अधिक प्रिय झालेला दिसतो, हे केवढं भयावह वास्तव. समाजातील, बालजगतातील हे विदारक सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही.
या प्रसार माध्यमांतील मुद्रित या माध्यमप्रकाराचा, प्रिंट मीडियाचा बालजगतावर होणारा परिणाम येथे आपण अधिक विचारात घेऊ.
खरंतर, मुलांच्या समतोल शारीरिक वाढीसाठी जशी सकस, आरोग्यपूर्ण अन्नाची गरज असते तशीच त्याच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी उत्तम बालसाहित्याची गरज असते. म्हणूनच उत्तम बालसाहित्य मुलांच्या हाती वाचण्यासाठी देणं हे पालकांचं परम कर्तव्य आहे. पण उत्तम बालसाहित्य कुणाला म्हणावं हेच अनेक पालकांना ठाऊक नसते. ते जाणून घेण्यास आजच्या पालकांकडे सवड नसते, आणि आवडही नसते. त्याबाबत कमालीची उदासीनता मात्र असते. गुळगुळीत कागद, रंगरंगोटी, चित्रांचा भडिमार केलेली पुस्तकं म्हणजे उत्तम बालसाहित्याची पुस्तकं असा काही पालकांचा गैरसमज झालेला आपण पाहतो. पण खरंच कशाला म्हणावं उत्तम बालसाहित्य, हे पालकांनी समजून घेणे, फार महत्त्वाचे आहे.’ जे बालसाहित्य मानवी व्यवहार व मानवेतर सृष्टीविषयी मुलांची जिज्ञासापूर्ती करते. कल्पनारम्य व चमत्कृतिजन्य वातावरणाने मुलांचे मनोरंजन करते. तसेच मुलांमध्ये चांगल्या-वाईटाची जाण निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न करण्यास सहाय्यभूत ठरते, ते साहित्य उत्तम बालसाहित्य आहे, असे मला वाटते. असे बालसाहित्य आजच्या मुलांसाठी म्हणविणाऱ्या पुस्तकांच्या गराड्यात अपवादात्मक, कमीच आढळते.
बालसाहित्याच्या पुस्तकांत गद्य व पद्य हे दोन मुख्य प्रकार आढळतात. गद्य विभागात कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, लेख, निबंध, प्रवासवर्णन, पत्रे यांचा समावेश होतो. तर पद्य विभागात कविता, गीते, संगीतिका, काव्यकोडी इत्यादी प्रकार आढळतात. आजच्या घडीला गद्य विभागापेक्षा पद्य विभागातील पुस्तकांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे दिसून येते. कारण कविता लिहिणं हे कथा लिहिण्यापेक्षा सोपी गोष्ट आहे असा गैरसमज बराच प्रचलित आहे. पण बालकविता लिहिणं हे कोरीवकाम नाही. ती एक सहज सुंदर सृजन प्रक्रिया आहे, हे ध्यानात यायला हवे. बालकवितेला कथेसारखीच सुरुवात, मध्य आणि शेवट असतो हे तर काहींना ठाऊकही नसतं. जसं पहिलं कडवं तसंच शेवटचं. नुसतं यमक जुळवण्याची कसरत त्या कवितेत दिसून येते. कविता ही कार्यशाळेतून शिकता येत नाही. त्याचं तंत्र, मांडणी शिकता येते. कविता ही आतून फुलून येते.
हल्ली मुलांचं लक्ष पुस्तकाने वेधून घेण्यासाठी नको ते फंडे प्रकाशकाकडून वापरले जातात. मुलांना हाताळायला कठीण जातील असे पुस्तकांचे मोठ्ठाले आकार, नेटवरचीच कवितेला चिटकवलेली रेडिमेड मोठमोठाली चित्रं, फोर कलरच्या नावाखाली पुस्तकात अक्षरशः ओतलेले विविध रंग. आणि ज्यांचं रंगसंगतीशी काहीच देणंघेणं नाही अशाप्रकारे रंगांची वारेमाप उधळण करणारी व आतील आशयाला फारसं महत्त्व न देणारी पुस्तकं आपलं स्वत्व हरवून मुलांच्या भेटीला येताना दिसतात. अशी पुस्तकं मुलांची अभिरूची कशी वाढवतील? वाचनानंद कसा देतील? हाच मोठा यक्ष प्रश्न आहे.
प्रिंट मीडियामध्ये मुलांचा वयोगट, त्या वयोगटाचं भावविश्व, त्यानुसार पुस्तकांची भाषा, विषय, आशय, मुद्रितशोधन यांचा आजही फारसा गांभीर्याने विचार केला जात नाही, हे दुर्दैवाने सांगावेसे वाटते. बालसाहित्याच्या नावाखाली काहीही खपवलं जातं. पुस्तक जेवढं लेखकाचं तेवढंच ते प्रकाशकाचंही असतं, हा विचार अधिक चांगल्याप्रकारे खोलवर रुजायला हवा. म्हणजे बालसाहित्यातील उणिवांवर मिळून मार्ग काढला जाईल. पण आज बालसाहित्याला प्रकाशक मिळणेच मोठे कठीण काम झाले आहे. कवितेचं पुस्तक काढायला तर चक्क नाहीच म्हणतात काही प्रकाशक आणि रंगीतसंगीत पुस्तकं मुलांसाठी अल्प किमतीत काढणं आजच्या परिस्थितीत दुरापास्तही होऊन बसलेलं आहे. तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रकाशक ही जोखीम उचलून मुलांना रुचेल, पचेल, त्यांच्या मनाला भावेल अशी पुस्तकं काढताना दिसतात. पण ही संख्या खूपच अल्पस्वल्प आहे.
आजच्या बालसाहित्यात बालसाहित्याचे मुख्य प्रयोजन मनोरंजन, ज्ञानविस्तार आणि आनंद निर्मिती हेच आहे …. याचा विसरच पडलेला दिसतो. या प्रयोजनालाच बगल देऊन उपदेशाचे डोस पाजताना आजचं बरंचसं साहित्य आपल्या समोर येतं. कथेला तात्पर्य द्या असं म्हणतं. खरंतर गोष्ट एक असली तरी तात्पर्य मुलागणिक बदलू शकतात, हेच अनेकांना मान्य नसतं. प्रत्येक मूल स्वतंत्र विचारशक्ती घेऊन जन्माला आलेलं आहे, हे विसरून कसे चालेल.
बालसाहित्याची महत्त्वाची चार वैशिष्ट्येही बालसाहित्यकाराने जाणून घ्यायला हवीत. याचा विचार बालसाहित्य लिहिताना प्राधान्याने जेवढा व्हायला हवा तेवढा आजच्या घडीला होताना दिसत नाही.
१) कल्पनाशिलता – कल्पनारम्य वातावरण म्हणजे बालसाहित्याचा जणू प्राणच, असे म्हटले जाते.
२) अतार्किकता – अवास्तव गोष्टींची जाणीवपूर्वक वास्तवाप्रमाणे केलेली मांडणी. बौद्धिक तर्कपरंपरेला मोडणारी गोष्ट.
३) अननुमेयता – उत्कंठा वाढवण्यासाठी अनुमान न करता येणाऱ्या गोष्टींची निर्मिती.
४) बालमानस संबद्धता- मुलांच्या भावनांशी एकरूप होऊन, बालमनाची गुणधर्म लक्षात घेऊन लिहिण्याची क्षमता. या चार बालसाहित्याच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचा अंगीकार करुन बालसाहित्य लिहिताना बालमनाच्या गुणधर्मांचाही विचार होणं तितकंच गरजेचं आहे, असं मला वाटतं. नावीन्यप्रियता, मानवीकरण, जिज्ञासा, अनुकरणप्रियता, कृतिप्रधानता, अद्भूताची आवड, विनोदप्रियता, संघर्षप्रियता, सूक्ष्मावलोकनक्षमता, उत्कटता आणि निरपेक्ष प्रेमभाव ह्या बालमनाच्या गुणधर्मांनी युक्त असं बालसाहित्य मुलांना वाचायला मिळणं ही त्यांच्यासाठी एक पर्वणीच असणार आहे. पण हल्ली बालसाहित्याच्या पुस्तकांत गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मक वाढच जास्त झालेली आढळते.
वृत्तपत्रातील आठवड्याला निघणाऱ्या रविवारच्या पुरवण्यांमध्ये मात्र आजही बालकांसाठी हक्काचे पान राखून ठेवलेले दिसते. लोकसत्तामधील बालमैफल, सामना मधील बालधमाल, सकाळची बालमित्र पूरवणी, महाराष्ट्र टाइम्स मधील झीप झॅप झूम, नवशक्तिमधील धमाल, प्रहारमधील किलबिल, केसरीमधील छावा या पानांमधून मुलांसाठी ज्ञान, विज्ञान आणि रंजनपर भरपेट मजकूर असतो. अनेकदा लिहित्या चिमुकल्या हातांनाही या पुरवण्यांमध्ये संधी दिली जाते, हे विशेष. या पुरवण्यांमधील मजकूर आठवडाभर मुलं परवून पुरवून वाचतात. कात्रणसंग्रह करतात. चिकटवहीत पेपरातली गोष्ट, कविता, विनोद, कोडी चिकटवतात. हे अनेकदा मी पाहिलंय. काही वर्तमानपत्रं मुलांची दिवाळी, उन्हाळ्याची मोठी सुट्टी बरोबर कॅच करतात. मुलांची ही सुट्टी वाचनीय, आनंददायी करण्यासाठी त्यांची सुट्टीसंपेपर्यंत रोजच नवनवीन कथा, कविता, माहितीची मेजवानी ते देत असतात. ही प्रसार माध्यमातील जमेचीच बाजू आहे.
लोकमत मधील ‘सुट्टी रे सुट्टी’ हे पान मुलांचे सुट्टीत लाडके झाले. आजच्या घडीला मुलांच्या मनाचा, त्यांच्या आवडीनिवडीचा आजची वर्तमानपत्र विचार करतात, हे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सदरांतून दिसून येते. हल्ली मुलांनी काढलेली चित्रे बालविभागात प्रसिद्ध करण्याचा मार्गही बरेच वृत्तपत्र अनुसरतात.
मुलांची काही मासिकं अनेक वर्षांपासून आजतागायत निष्ठेने सुरू आहेत. किशोर हे पाठ्यपुस्तक मंडळामार्फत निघणारे मासिक अनेक शाळांमध्ये हमखास पाहायला मिळते. ह्या मासिकांचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्तम साहित्यिक मूल्य आणि किंमत अतिशय कमी, ती म्हणजे अवघी सात रुपये. आकाराने आणि गुणाने मोठे आणि किमतीने छोटे, असे हे लहानथोरांचे आवडते प्रयोगशील किशोर मासिक. तसेच नागपूरहून निघणारे आजोबा, वडील आणि आता मुलगा जयंत मोडक अशी तिसरी पिढी चालवत असणारे जुनेजाणते बालमासिक म्हणजेच ‘मुलांचे मासिक’. कथा, कविता, लेख, विनोद असा भरगच्च खाऊ हा अंक मुलांना प्रत्येक महिन्यात देत असतो. कुमार मुलांसाठी असणारे ‘छात्र प्रबोधन’ हे मासिकही दर्जेदार, सकस साहित्याने नटलेले पाहायला मिळते. ‘वयम्’ हे मुलांसाठी असणारे मासिकसुद्धा त्यातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे मुलांच्या मनाचा ठाव घेते. ‘कथामाला’, ‘बालविकास मंदिर’, ‘छोटू’, ‘निर्मळ रानवारा’ ही मासिकंही मुलांचं मनोरंजन करण्यासाठी मनःपूर्वक धडपड करताना दिसून येतात. चंपक, चांदोबाची जादू आजही कमी झालेली दिसत नाहीत. राजापूरहून निघणारे त्रैमासिक ‘खेळगडी’ हेही मुलांच्या अतिशय आवडीचे असल्याचे दिसून येते. मुलांच्या अंकांना जाहिराती फारशा मिळत नाहीत. वर्गणीही मुलांसाठी कमी ठेवावी लागते. यामुळे अनेक बालमासिके आर्थिक कचाट्यात सापडून बंद झालेली आहेत. आनंद, ठकठक, कुमार, बालमित्र, टॉनिक, गोकुळ ही मासिके काळाच्या प्रवाहात बंद पडली.
मुलासांठी निघणारे वार्षिक अंक जसे गंमत जंमत, बालरंजन, फुलपाखरू, चेरी लँड, छोट्यांचा आवाज, छावा, तसेच मोठ्यांच्या वार्षिक अंकात मुलांसाठी राखून ठेवललेली काही पानं आजही पाहायला मिळतात. चैत्रेय, सामना, लोकसंवाद यांसारख्या मोठ्यांच्या अंकात आवर्जून बालविभाग डोकावताना दिसतो.
एकूणच काय, प्रसार माध्यम हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे असं आपण मानतो. त्यामुळे वस्तूची, केलेल्या कामाची जाहिरात करण्याचे व्यसन जडायला वेळ लागत नाही. मग आपली पोस्ट कुणी कुणी पाहिली, किती लाइक मिळाल्या, कुणी कुणी कमेंट केल्या याची चढाओढ सुरू होते. माणूस मग यात गुरफटत जातो. मुलांच्या बाबतीतही असंच होतं. हल्ली जेवताना टीव्ही, मोबाईल लागतो मुलांना. त्याशिवाय जेवणार नाही ही धमकी असते त्यांची आईला. कार्टुन पाहत तर तासनतास टीव्हीकडे डोळे लावून त्यांची समाधी बसलेली असते कौतुकानं पालकांनी मुलांनी कशात तरी नंबर काढला की मुलांना मोबाईल घेऊन देणं, त्यात नेट पॅक टाकून देणं, फेसबुकवर त्यांचं अकाउंट उघडून देणं, असं चालवलेलं असतं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रसार माध्यम हे दुधारी शस्त्रासारखे आहे. त्याचे जसे चांगले तसेच वाईटही परिणाम आहेत, याची जाणीव पालकांना असायला हवी. मुलं मोबाइलवर काय पाहतात, कोणत्या साइटवर अधिकवेळ असतात, यावर पालकांचं लक्ष असायला हवं. संगणकावर ई-बुक्स, ऑडिओ बुक्स, ऑनलाइन वाचण्यासाठी शैक्षणिक पुस्तके याची मुलांना पालकांनी ओळख करुन दिली पाहिजे. अनेक वृत्तपत्र, किशोरसारखी चांगली बालमासिकं इपेपर, पीडिफ फाइल स्वरूपात वाचायला उपलब्ध असतात. या विश्वातून मुलांना सोबत घेऊन फेरफटका मारून आणला पाहिजे. असं असलं तरी पुस्तकांतून, अक्षर वाङ्मयातून होणारा संस्कार हा चिरकाल टिकणारा असतो..
अनेक मासिकं मुलांचं साहित्य सर्रास प्रसिद्ध करतात. मुलांना, पालकांना बरं वाटावं हाही एक हेतू असतोच. परंतु छात्रप्रबोधन सारखे मासिक वर्षातला एक अंक मुलांवरच सोपवून देतात. मुलंच संपादक, मुलंच चित्रकार, आणि मुलंच लेखक, कवी. सबकुछ मुलंच. त्या अंकात मोठ्यांची लुडबूड नसते. हा एक प्रयोगच आहे. मुलं एकत्र येऊन सर्व मिळून एक अंक तयार करतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
तसेच ‘व्यास क्रिएशन्स’ने काढलेली बालसाहित्याची २०० हून अधिक पुस्तकांची पेटी शाळाशाळांतून आपल्याला भेटते. पुस्तकपेटीची ही कल्पनाही आगळीवेगळीच आणि अभिनव आहे. डॉ. विजया वाड यांनी संपादित केलेले बालकोश हेही बालसाहित्यात महत्त्वपूर्ण भर घालतात. यामध्ये पालकांनी मुलांना वाचून दाखवण्यासाठी रोज एक गोष्ट आणि रोज एक कविता, अशा ३६५ गोष्टी आणि कविता वर्षभर पुरतील असा साठा या कथा आणि कविता कोशात आहे. किशोरचे विविध बालसाहित्य प्रकारातील किशोर खंडही अतिशय वाचनीय, संग्रहणीय असेच आहेत. मुलांच्याच गोष्टी, कवितांची संपादित केलेली पुस्तकेही हल्ली बाजारात दिसून येतात. असे विविध प्रकारचे प्रयोग बालसाहित्यात आणखी मोठ्याप्रमाणात व्हायला हवे, असे प्रकर्षाने वाटते.
आज बालसाहित्याला सर्वच ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं. मग ते साहित्य संस्थांचे पुरस्कार असतील नाहीतर शासकीय साहित्य पुरस्कार. मोठ्यांसाठी अनेक साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल दिसते. पण त्यामानाने बालसाहित्यावर खूपच तुरळक कार्यक्रम, उपक्रम होताना दिसतात.
सोपं लिहिणं ही खूप कठीण गोष्ट आहे. याची तर अनेकांना जाणीवच नसते. मुलांना गृहीत धरून नको ते साहित्य मुलांच्या गळी उतरवलं जातं. अनुवादित बालसाहित्यही मोठ्या संख्येने पुढे येत नाही. नवीनवीन विषयाला गवसणी घालताना दिसत नाही. आजचं बालसाहित्य आणि बालसाहित्यावरील विविध पस्तकं यांच्या परीक्षणांना अनेकदा वर्तमानपत्रात छोटासा कोपरा दिला जातो. बालसाहित्यावर नेमकेपणाने आणि गांभीर्याने समीक्षण होताना आजही फारसे आढळून येत नाही.
मला वाटतं, प्रसार माध्यमांनीच आजच्या बालसाहित्यावर होणारी ही ओरड थांबण्यासाठी पुढे यायला हवे. आणि समाजानेही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या कृतीला प्रसार माध्यमांची अर्थपूर्ण जोड द्यायला हवी. असे डोळस प्रयत्न झाले तर प्रसारममाध्यमं बालजगतासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरतील.
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेला लेख.
Leave a Reply