अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित
खरं सांगायचं तर मीडियावाल्यांनी मीडियावाल्यांबद्दल काय बोलायचं ! आम्ही चांगल्या बातम्या मिळवण्यासाठी आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. पण, चांगल्या बातम्या वेतच नसतील तर… नपेक्षा सनसनाटी बातम्याच अधिक मिळत असतील तर… आणि अशा बातम्यांनाच हुकमी वाचक मिळत असेल तर… या जर-तरच्या हिशेबाला अंत नाही. पण, आम्ही आमच्यापुरती का होईना एक आचारसंहिता तयार केली आहे आणि ती पाळण्याचा काटेकोर प्रयत्न करत असतो. तो करत असताना आत्मपरिक्षणही करत असतो. या परिस्थितीत मीडियाच्या विशेषत: टीव्ही मीडियाच्या पत्रकारितेबद्दल बोलायचं झालं तर बरंच सांगता येतं. आमच्यापेक्षा ‘पीपली लाईव्ह’मधून ते अधिक प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. तरीही मोठ्या प्रमाणात सवंग लोकप्रियतेमागे पळणाऱ्या मीडियाबद्दल आम्ही वंदा रोखठोक भाष्य केलं. तसं करताना विश्वास मेहेंदळे, जयदेव डोळे, प. बा. सावंत, कुमार सप्तर्षी, बी. जी. कोळसे-पाटील अशा अनेक मान्यवरांना बोलतं केलं. त्यांनीही या क्षेत्रातल्या गैरव्यवहारांबाबत अनेक बारकावे टिपून दाखवले. यातून पुढे आलेल्या विचारमंथनाची ही एक झलक…
आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे. याचे कारण या माध्यमांचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकीकरण झाले आहे. येनकेनप्रकारेन पैसा मिळवणे हाच उद्देश समोर ठेवला जातो. त्यामुळे जाहिरातींचा भडीमार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोणत्या उत्पादनाच्या आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती प्रसारित कराव्यात याचेही भान माध्यमांना राहिलेले नाही. या साऱ्या परिस्थितीत भर पडली आहे पेड न्यूजची. पेड न्यूजच्या नावाखाली चालू असलेला व्यापार कोण आणि कसा थांबवणार हा खरा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे पेड न्यूजसाठी किती रक्कम घ्यावी किंवा एखाद्या बातमीसाठी किंवा चर्चेसाठी किती आकार घ्यावा यालाही काही नियम नाहीत. त्यामुळे तो पक्ष किंवा ती व्यक्ती देईल तेवढी रक्कम स्वीकारली जाते.
त्याबदल्यात त्या पक्षाचा किंवा व्यक्तीचा उदो उदो केला जातो. ते कसे श्रेष्ठ आहेत किंवा त्यांचे कार्य कसे मोलाचे आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते हे सांगायला नको.
आजकालचा जमाना जाहिरातीचा आहे. त्यामुळे प्रत्येक उत्पादनाची अधिकाधिक जाहिरात करण्यावर उत्पादकाचा भर असतो. त्यातही जाहिरातीसाठी दूरदर्शन हे प्रभावी माध्यम समजले जाते. त्यामुळे या माध्यमाकडे जाहिराती मोठ्या संख्येने येतात. याचाच फायदा घेऊन जाहिरातीच्या माध्यमातून मोठी रक्कम उभी करण्याचा प्रयत्न होतो. शिवाय ही माध्यमे भांडवदारांच्याच ताब्यात असतात. किंबहुना, एखादा भांडवलदार पाठीशी असल्याशिवाय चॅनेल सुरू होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. याचे कारण एक चॅनेल सुरू करण्यासाठी किमान तीस ते चाळीस कोटी रुपये भांडवलाची आवश्यकता असते. एवढा मोठा पैसा उभारायचा म्हणजे त्यासाठी धनाढ्य आसामी हवीच. मग ती आसामी म्हणेल त्याच पद्धतीने त्या चॅनेलचा कारभार सुरू राहतो. आपण स्वीकारलेल्या खासगीकरण आणि उदारीकरणाचा हा एक दुष्परिणाम म्हणायला हवा.
विविध वाहिन्यांवरून २४ तास सुरू असलेले कार्यक्रम पाहिले तर त्यातील मोजकेच कार्यक्रम महत्त्वाचे असतात असे दिसते. उर्वरित कार्यक्रमात केवळ धांगडधिंगा किंवा कुटुंबियांना पाहताना अवघड वाटावे असे कार्यक्रम प्रसारित केले जातात. काही दिवसांपूर्वी एक नवाच मुद्दा पुढे आला होता तो म्हणजे वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांमधील कलाकारांनी आपल्या कामाची वेळ ठरवून द्यावी अशी मागणी केली. कारण मालिकेचे चित्रिकरण दररोज सुरू असते. शिवाय त्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ सर्वजण १२ ते १४ तासपर्यंत राबत असतात. सतत इतके काम केल्यावर त्यांना शारीरिक आणि मानसिक थकवा येणे साहजिक आहे. मात्र, त्याचा विचार न करता त्यांना राबवून घेतले जाते. हे सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे. असे लक्षात आल्यावर आता त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. पण, केवळ अशा तक्रारी करून काही साध्य होईल असे दिसत नाही.
याचे कारण सर्व कलाकार एकत्र येऊन एकमुखाने आवाज उठवतील याचे खात्री नाही. शिवाय तसे झाले तर आम्ही अन्य कलाकार घेऊन मालिका पुढे सुरू ठेवू असेही सांगितले जाण्याची शक्यता आहे. खरे तर अशा प्रश्नासाठी ‘क्लोज शॉप पॉलिसी’चा अवलंब केला जायला हवा. ही पद्धत वेस्टर्न युनियनने सुरू केली होती. एखाद्या कंपनीत संप केला की तेथे अन्य कोणाला येऊ द्यायचे नाही किंवा आपल्या परवानगीने कोणालाही काही हालचाल करू द्यायची नाही असा कडक नियम लागू करण्यात आला. तो सर्वांनीच पाळल्यामुळे ही पद्धत कमालीची यशस्वी ठरली. कारण संपावर असलेल्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य कर्मचारी कामावर येण्यास तयार नव्हते. त्यामुळे पूर्वीच्या कामगारांच्या मागण्यांवर गांभिर्याने विचार करणे संचालक मंडळाला भाग पडले. आजही हा ट्रेंड कोठे कोठे वापरला जातो. त्यातल्या त्यात फ्रान्समध्ये हा ट्रेंड कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. अशी प्रबळ संघटना उभी राहिली तर कलाकार किंवा प्रेक्षक यांना हवे ते साध्य करून घेणे सहज शक्य होईल.
वाहिन्यांवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आणि त्यांचा दर्जा हासुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. लोकांना दाखवण्याजोगे अन्य काही नसल्यामुळे आजकाल वाहिन्यांवर तेच ते कार्यक्रम सतत प्रसारित केले जातात. त्यामुळे ते रटाळवाणे होत आहेत. मुख्य म्हणजे अलीकडे ही माध्यमे एखाद्याच्या वैयक्तीक किंवा कौटुंबिक समस्यांना सार्वजनिक स्वरुप देतात. त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील प्रसंग दाखवण्यापासून त्यावर चर्चा करण्यापर्यंत मजल जाते. खरे तर हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. शिवाय गोपनियतेच्या अधिकारावरही आक्रमण आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालायला हवा. मुख्य म्हणजे हे ज्या व्यक्तीबाबत घडत आहे त्यानेही याची संबंधित यंत्रणेकडे वेळीच तक्रार द्यायला हवी. खरे तर प्रसिध्दी माध्यमांच्या अशा अतिरेकीपणाला आवर घालायला हवा आहे. पण तशी कोणतीही यंत्रणा उभी केल्याचे दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अशी यंत्रणा अस्तित्वात येऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले. आम्ही स्वत:ची अंतर्गत यंत्रणा उभी करु असाही दावा प्रसिध्दी माध्यमांकडून करण्यात आला. आता तशी व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. पण त्या व्यवस्थेकडे अशा तक्रारी कितपत जातात आणि त्या संदर्भात किती प्रभावीपणे पावले उचलली जातात हा प्रश्न आहे. वास्तविक ही माध्यमे समाज प्रबोधन किंवा समाज शिक्षणात मोलाची कामगिरी बजावतील अशी आशा होती. पण ती फोल ठरली आहे. खरे तर समाजाला माहिती होणे आवश्यक असणाऱ्या अनेक बातम्या आहेत. त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्याऐवजी नसलेल्या बातमीला तसे स्वरुप दिले जाते. वास्तविक आज समाजासमोर अनेक महत्त्वपूर्ण समस्या आहेत. वाढती महागाई, भ्रष्टाचार यामुळे सर्वसामान्यांना जीणे अशक्य झाले आहे. शेतीक्षेत्रातही बरेच प्रश्न भेडसावत आहेत. या साऱ्यांवर प्रकाश टाकला जाणे गरजेचे आहे. पण त्या दृष्टीने वाहिन्यांनी फार प्रयत्न केले आहेत असे म्हणता येत नाही. एखाद्या दुर्घटनेचे भांडवल करून स्वत:चा टीआपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, यासारखी लाजिरवाणी बाब आणखी कोणती असू शकते? शिवाय प्रसारित ल्लेणारे सर्वच कार्यक्रम कुटुंबातील साऱ्यांनी एकाच वेळी पाहण्यालायक असतात असे नाही. आजकाल कधी कोणते कार्यक्रम दाखवावेत यालाही काही ताळतंत्र राहिलेले नाही. फक्त प्रौढांसाठी असलेले कार्यक्रम भर दिवसा दाखवले जातात. आजकाल लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रमांची चलती आहे. त्यातही स्पर्धात्मक कार्यक्रमांची संख्या मोठी आहे. मात्र अशा कार्यक्रमांमधून मुलांची वेषभूषा कशी असावी याचाही विचार गरजेचा ठरतो. त्यांना या वयात असे पोषाख घालण्याची सवय लागली तर पुढे काय होईल याचा विचार पालकांनी तसेच समाजातील विविध जागरूक घटकांनी करणे गरजेचे आहे. या साऱ्या बाबींचा विचार करता यापुढे वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी आता जनतेनेच रेटा लावणे गरजेचे आहे.
अद्वैत फिचर्स (SV10)
Leave a Reply