सकाळी सकाळी क्षितिजावर एक बेट दिसू लागले होते. वीस पंचवीस मैलांवर असलेल्या त्या बेटा जवळ जायला आणखीन दोन एक तास लागणार होते. भूमध्य समुद्रात अशी अनेक लहान मोठी बेटे आहेत. काही निर्मनुष्य तर माल्टा किंवा सायप्रस यांच्यासारखे लहान लहान देश असलेली बेटं सुध्दा आहेत. समोर दिसणारे बेट लहान वाटत होते. बहुतेक बेटांच्या जवळपास पाण्याची खोली कमी होत जाते आणि त्यामुळे जहाज त्यांच्यापासून खूप अंतरावरून न्यावे लागते. परंतु भूमध्य समुद्रातील बरीचशी बेटे खडकांवर असतात. आजूबाजूला वाळू किंवा उतरता किनारा नसतो. काही काही बेटांवर तर दीपस्तंभ सुद्धा नसतात.
जसं जसं जहाज त्या बेटाजवळ जात होते तस तसं त्या बेटाचे वेगळे पण जाणवत होते. सुरवातीला एका विशाल टेकडीवर हिरवीगार झाडं दाटीवाटीने वाढलेली दिसत होती. संपूर्ण बेट मोठ मोठ्या आणि उंचच उंच झाडांनी आणि त्यांच्यावर पसरलेल्या वेलींनी अत्यंत हिरवे गार दिसत होते. साधारण चार एक मैलांवर गेल्यावर समुद्रातून एक मोठा पांढरा खडक बाहेर आल्यासारखे जाणवू लागले. एका प्रचंड मोठ्या दगडी सुळक्यावर बेट उभे असल्याचे स्पष्ट दिसायला लागले होते. खाली खडक आणि वर एवढी झाडे पाहून आश्चर्य वाटायला लागले. जास्तीत जास्त एक किंवा सव्वा स्क्वेअर किलोमीटरचा परीघ असेल एवढच क्षेत्रफळ असावे. खालून आलेल्या दगडी सुळक्यावर असलेली उंच टेकडी परफेक्ट बॅलन्स करून उभी आहे की काय असे वाटावे.
संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले. जहाजाने बेटा भोवती वळण घ्यायला सुरवात केली, उंच टेकडीच्या माथ्यावरून एक लहानसा झरा खाली वाहत येताना दिसला. वर निमुळता असलेला झरा खाली येताना रुंद रुंद होत गेलेला पांढरा स्वच्छ फेसाळणारा झरा झाडांच्या गर्दीतून सुद्धा स्पष्ट दिसत होता. एका उंच कड्यावरून थेट खाली समुद्रात पडणाऱ्या झऱ्याचे विलोभनीय दृश्य पाहून प्रत्येकजण अवाक होत होता. उंचावरून पडणारे पांढरे शुभ्र तुषार समुद्राच्या निळ्या पाण्यावर अलगद झेलेले जात होते. उंचावरून पडणाऱ्या जलधारांमुळे उठणारे असंख्य जलतरंग समुद्राच्या हळुवार पणे हेलकवणाऱ्या लाटांवर स्वार होऊन बेटाच्या कड्यावर आदळत होते. एखाद दोन दिवसांपूर्वी पाऊस पडून गेल्या सारखे वाटत होते, झाडांची पाने स्वच्छ धुतल्या सारखी हिरवीगार दिसत होती. वेलींच्या शेंड्यावर आलेले कोवळे कोंब आणि बहरलेली हिरवीगार पाने अशा सर्वांमुळे सूर्यप्रकाश खाली पोहचत नसल्यासारखे जाणवत होते. जहाज बेटा भोवती ३६० अंशाचे वळण पूर्ण करताना प्रोपेलर मुळे घुसळणाऱ्या पाण्यामुळे बेटा भोवती एक वर्तुळाकार रिंगण तयार झाले होते. कॅप्टन सह जहाजावरील प्रत्येक जण कधीही न पाहिलेल्या नितांत सुंदर अशा सृष्टीचे सौंदर्य पाहून संमोहित झाले होते. वाह, अप्रतिम, खूप सुंदर , अवर्णनीय असेच उद्गार ज्याच्या त्याच्या तोंडातून निघत होते.
निर्मनुष्य अशा बेटावरील सौंदर्याला आपल्यासह इतर कोणत्याही मनुष्याची नजर लागू नये असेच प्रत्येकाला मनोमन वाटत होते. जहाजाने बेटा भोवती एक प्रदक्षिणा घालून पुन्हा आखलेल्या कोर्स वर डौलदार प्रवास सुरू केला होता. जहाजाच्या मागे असलेल्या पूप डेक वरून संध्याकाळच्या सोनेरी किरणात मागे मागे जाणारे बेट बघता बघता आणखी एक तास कधी निघून गेला त्याचे भानच राहिले नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply