भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. वडिलांची बदली RMS (रेल्वे मेल सर्व्हीस) च्या सोलापूर स्टेशन जवळील, रेल्वे पोलिसांच्या कचेरीपाशी भल्या प्रशस्त केबिनमध्ये झाली. ते मार्चमध्ये रुजू झाले आणि आम्ही शैक्षणिक वर्ष संपल्यावर रेल्वे लाईन्स या परिसरात वास्तव्याला आलो. तोपर्यंत मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांची शाळांसाठी शोधाशोध सुरु झाली होती. विशेषतः माझे अकरावीचे वर्ष असल्याने शोध अधिक महत्वाचा होता.
सगळ्या सहकाऱ्यांनी साहेबांना दोनच नांवे सुचविली- हदेप्र आणि सिद्धेश्वर हायस्कूल! त्यांतही बोर्डात यायचे मनाशी ठरविलेले असल्याने हदे हा पर्याय निवडला. वडिलांनी काहीतरी करून माझा आणि लहान भावाचा प्रवेशयोग हदे मध्ये जुळवून आणला. तुलनेने भावाला सातवीत प्रवेश तितकासा अवघड नव्हता. माझीही समस्या योगायोगाने सुटली- दहावीत उच्च गणित आणि संस्कृत असल्याने ११ई तुकडीत (मराठी माध्यम) प्रवेश मिळून गेला.फक्त ऑगस्ट उजाडला असल्याने बॅकलॉग भरून काढायची अट शाळेने घातली होती. ऑगस्ट १९७४ ते फेब्रुवारी १९७५ एवढाच कालावधी मी या शाळेत घालविला.
मनात सतत भुसावळच्या न्यू इंग्लिश स्कूल ची तुलना हदे शी सुरु असायची. भव्य मैदान, शाळेचं प्रशस्त आवार, वर्गखोल्या, प्रयोगशाळा – कोठेही माझी भुसावळची शाळा तुलनेत बसत नव्हती. छोटं मैदान,फक्त आठ वर्गखोल्यांची एकच इमारत अशा वातावरणातून मी आलेलो. महत्वाचं म्हणजे वर्गात पाच मुली. आजतागायत को-एड ची सवय नव्हती. नवीन असल्याने बुजणे, सगळ्यांमध्ये सामावणे जरा अवघडच. युनिफॉर्मने गोची अधिक वाढविलेली. वर्गात आम्ही चौघे हाफ पॅण्ट वापरायचो आणि बाकीचे मित्र फुल पॅण्ट! पंचकन्या साडीत,त्यामुळे अधिक कोंदटल्यासारखे व्हायचे. हे वाटणे वर्षभर सोबतीला.
चार शिक्षकांनी मनात घर केले- वर्गशिक्षक आणि हिंदी विषय शिकविणारे आनंदी/हसरे सू. रा. मोहोळकर सर, मराठीचे गंभीर आणि शक्यतो खुर्चीवर बसून शिकविणारे, फळ्याचा अपवादाने वापर करणारे देव सर, इंग्रजीच्या अध्यापक बाई आणि गणिताचे बुरटे सर!
सगळे आपापल्या विषयातील तज्ञ, हातोटी भरभरून देणारी, झपाटून शिकविण्याची रीत. अगदी माझ्या भुसावळच्या शिक्षकांसारखेच! आपण “सुरक्षित” हातांमध्ये सुखरूप आणि अलगद पडलो आहोत, हे वाटणे शांतावणारे होते. नवागताला मित्रांनीही सामावून घेतले. मुलींशी बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही की प्रयत्न केला नाही.
आणखी एक सुदैवी घटना घडली- त्या सुमारास ग.य.दीक्षित सर मुख्याध्यापक म्हणून बदलून आले. चैतन्यमय,प्रयोगशील प्रसन्न व्यक्तिमत्व ! उंचेपुरे, धिप्पाड, गोरेपान आणि पुरुषी सौंदर्याचा नमुना असलेले दीक्षित सर लवकरच शाळेला व्यापून उरले. क्वचित वर्गात येऊन ते काहीतरी “नवं” सांगायचे आणि आम्ही हरवून जायचो. अन्यथा शाळेत चक्कर मारणारी त्यांची पाठमोरी आकृती, मैदानावरील कवायत वरील गच्चीवरून निरखणारे सर एवढेच त्याकाळी पुरेसे होते.
वर्गात माझा निबंध वाचून दाखविणाऱ्या,इतर तुकड्यांमध्ये त्याची शिफारस करणाऱ्या अध्यापक बाई आजही मनात आहेत. सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात सहकुटुंब भेटणारे दिलखुलास मोहोळकर सर माझ्या आई-वडिलांशीही तितकीच आपुलकी दाखवीत बोलत असत.
उशिरा प्रवेश घेतला असल्याने वर्गातील सगळ्यात मागच्या बाकावर मला स्थान दिले होते. पण सहामाही आणि नऊमाही (प्रिलिम) मध्ये वर्गात मी पहिला आलो आणि दोन गोष्टी झाल्या- नवीन मुलाबद्दलचे आकर्षण वाढले आणि दोस्तीचे हात पुढे आले. ते आज पंचेचाळीस वर्षांनंतरही घट्ट आहेत. दुसरे म्हणजे पूर्वसुरी टॉपर्स असूयेने दुखावले गेले, जणू त्यांचे अढळपद मी हिरावले होते.
लक्षात राहिलेले आणखी एक वेगळे प्रकरण म्हणजे – सिद्धेश्वर मधील सेवानिवृत्त एलाजा सरांनी सुरु केलेला एक नवा प्रयोग- सोलापूरच्या विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्डाच्या क्षितिजावर झळकविण्याचा प्रयोग. सगळ्या शाळांमधील अकरावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्याकाळी पुढाकार घेऊन “सुपर कोचिंग क्लास ” सुरु केला होता. ही टिपिकल “ट्युशन “नव्हती. मुलांच्या शंका सोडवायच्या, जुन्या प्रश्नपत्रिका, निबंध लिहिण्याची सवय लावायची असा हा प्रयत्न होता. विविध शाळांमधील चुने हुए शिक्षक तेथे शिकवायला येत असत. त्याचा काहीसा प्रभाव जरूर पडला- आमच्यापैकी काहीजण ८० टक्क्यांची वेस सहजी ओलांडून गेले, पण अर्थातच कोणीही बोर्डात मात्र आले नव्हते.
हिकमती करून माझ्या वडिलांनी मला या क्लासमध्ये प्रवेश मिळवून दिला. एलाजा सर कुरकुरत होते,पण माझी शैक्षणिक वाटचाल बघून ते तयार झाले. वर्गमित्र आणि काही शिक्षकही या प्रयोगाची हेटाळणी करीत.
मुळे हॉल नामक देखण्या वास्तूत जाण्याचे प्रसंग त्या काळी क्वचितच आले. विशेषतः निरोपसमारंभ ठळकपणे आठवतोय.
रिझल्ट संध्याकाळी लागला. अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी मिळाल्याने काही दिवस हिरमुसलेपण घेऊन हिंडलो. तरीही ७६ टक्के मिळवून वर्गातील पहिला क्रमांक टिकवला. शेवटी गंमत अशी झाली या छोट्याशा वास्तव्याशी जोडणारी –
शाळेच्या पुढील वर्षीच्या स्नेहसंमेलनात संस्कृत भाषेत पहिला क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याला रोख बक्षीस देण्याचा प्रसंग होता. दरम्यान मी दयानंदला पी. डी. सायन्सला प्रवेश घेतला होता. एक दिवस शाळेतून घरी निरोप आणि निमंत्रण आले या समारंभाचे! मला टॉयफॉईड झालेला असल्याने आई-वडील शाळेत गेले, माझ्यावतीने बक्षीस स्वीकारायला. तब्बल दोन-तीन बक्षीसे होती म्हणे संस्कृतमध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी! रकमेची बेरीज होती २५५ रुपये, जी १९७५ च्या मानाने खूप मोठी होती. आणि त्याचे मानकरी आम्ही चक्क पाच विद्यार्थी होतो- १०० पैकी ८३ गुण मिळविलेले! त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला ५१ रुपये आले होते.
आजही माझा शाळेशी दोन प्रकारे संबंध आहे – आमचा “हदे -७५” हा ग्रुप शाळेत अधून-मधून स्नेहमेळावा आयोजित करीत असतो. मी ती संधी सोडत नाही. शेवटचा स्नेहमेळावा १८-१९ जानेवारी २०२० साली (कोरोनाच्या अगदी अलीकडे) झाला. उत्तरायणाकडे सरकलेले शिक्षक-शिक्षिका आवर्जून काही वेळ आमच्यात सामील झाले आणि आठवणीत रमले. त्यांचे आम्ही सत्कार केले. हे सगळं अविस्मरणीय होतं- डोळ्यांच्या कडा ओलावणारे ! त्यानिमित्ताने निघालेल्या स्मरणिकेचे मी आणि माझ्या वर्गमित्रांनी संपादन केले. पुन्हा ४५ वर्षांपूर्वीचे दिवस, सहवास जगलो.
शाळेशी असलेल्या संपर्काचे दुसरे कारण म्हणजे पुण्यातील “दिव्य जीवन संघ ” या संस्थेच्या शाखेच्या वतीने गेली सोळा वर्षे आम्ही राज्यपातळीवरील आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करतो. दरवर्षी माझे पत्रक शाळेला जाते (कालही गेले). काही विद्यार्थी सहभागी होतात. क्वचित प्रसंगी त्यांना पारितोषिकेही मिळतात. मी सुखावतो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply