माझ्या भारतीय मित्रांनो,
सलाम !
मला माहित आहे, मी तुम्हाला ‘मित्र’ म्हटलं म्हणून तुम्ही बहुदा दचकले असाल आणि तुम्हाला कदाचित घामही फुटला असेल. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तुमच्या या महान देशात दहशतवाद पसरविण्याची जी ‘किंचितशी’ सुरवात केली आहे त्यामुळे तुम्ही मला मित्र मानायला तयार नसलात तरी तुम्ही मात्र माझ्यासाठी अत्यंत जवळचे मित्र आहात. अनेक वर्षांपूर्वी इंग्रजांची सत्ता झुगारून देण्यासाठी देशभक्तीची प्रखर ज्वाला जशी प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात पेटली होती तशीच ती आजही असती तर आमच्यासारख्यांना अतिरेकी कारवाया यशस्वीरित्या पार पाडणं जवळपास अशक्यच झालं असतं. पण आता नो प्रॉब्लेम ! आता तुमच्या देशात खऱ्या अर्थाने अस्सल भारतीय हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही शिल्लक न राहिल्यामुळे आमचं काम खूपच सोपं झालं आहे. दहशतवादाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नरसंहार करणारे उत्पात घडवून आणण्यासाठी जमीन किती भुसभुशीत आहे याचा ‘सर्व्हे’ करण्याच्या उद्देशाने देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मी फिरलो. माझ्या या भटकंतीत ज्या अनेक अनोळखी देशवासियांची रस्त्यांवर, हॉटेल्समध्ये, धाब्यांवर, बाजारांमध्ये भेट झाली त्यांना मी एकच प्रश्न विचारला – ‘तुम्ही कोण?’ मित्रांनो, मला तुम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होतो की एकाही व्यक्तीने ठामपणे ‘मी भारतीय.’ असे उत्तर दिले नाही. माझ्या प्रश्नाला जी उत्तरं मिळालीत ती अशी होती : मी हिंदू, मी मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, महाराष्ट्रीयन, तेलगु, कन्नड, तामीळ, पंजाबी, बंगाली, ब्राह्मण, कुणबी, सोनार, कोष्टी इ.इ.! मी आतुरतेने वाट बघत होतो की कमीत कमी एक तरी अगदी ठासून ‘मी भारतीय आहे’ असं म्हणेल, पण तसं काही घडलं नाही. एखाद्या सार्वजनिक स्थळी ‘गर्व से कहो हम भारतीय है!’ असा एखादा फलक दृष्टीस पडेल अशी आशा होती, पण तीही फोल ठरली आणि मी अत्यंत आत्मविश्वासाने ‘कामाला’ लागलो. ज्या देशात राष्ट्राभिमान कशाशी खातात हे देशवासियांना माहित नसतं त्या देशातील जमीन दहशतवादाचं पीक घेण्यासाठी अत्यंत सुपीक असते !
जरा विचार करा मित्रांनो. आम्ही आमच्या अड्डयांवर डिश टी.व्ही.चा उपयोग करून विविध न्यूज चॅनेल्सवरील बातम्या बघत असतो तेव्हा आमची काय प्रतिक्रिया होत असेल? अगदी खरं सांगायचं तर त्या अतीउत्साही बातमीदारांचं कर्तृत्व बघून आम्ही चेष्टेने फिदीफिदी हसत असतो. आतंकवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन देशातील विविध संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षेची काय उपाययोजना करण्यात आली आहे याची बित्तंबातमी आम्हाला या बातम्यांमधून जरी मिळत असली तरी या बातम्या आमच्यासाठी शिळ्या असतात व गोपनीय माहिती मिळविण्यासाठी आम्ही त्यांच्यावर कधीच अवलंबून राहत नाही कारण ती माहिती आमच्यापर्यंत त्याआधीच पोहचलेली असते! ज्या विकाऊ देशवासियांना किमतीची लेबले लटकलेली आहेत त्यांना विकत घेण्यास असा किती वेळ लागणार? तुमच्या देशाची गुपितं काही नोटांच्या बदल्यात अत्यंत निर्लज्जपणे आम्हाला विकणारे शुरवीर ‘देशभक्त’ आमचे जवळचे मित्र असताना काळजी कशाची? २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट या दोन महत्त्वाच्या दिवशीच उत्पात घडविण्याची आमची इच्छा असते असा एक मोठ्ठा गैरसमज तुमच्या देशातील काही उच्चपदस्थांमध्ये पसरला आहे. अहो, नरसंहार घडविण्यासाठी मुहूर्त बघण्याइतके आम्ही अंधश्रध्द आहोत की काय? मोठ्या प्रमाणात निरपराध नागरिकांच्या हत्या घडवून आणण्यासाठी आम्हाला कोणताही दिवस चालतो. मुंबईतील लोकल्समधील मुठभर प्रवाश्यांना आम्ही यमसदनी धाडलं तो दिवस गुरुपोर्णिमेचा होता हा निव्वळ योगायोग!
१३ डिसेंबर २००१ रोजी आमच्या काही सहकाऱ्यांनी संसद भवनावर केलेला हल्ला आठवतो? कारपासची साधी फोटोकॉपी वापरून व एक लाल दिवा लावून आम्ही लोकांनी कार सरळ संसद भवनाच्या आवारात घुसवून बेछूट गोळीबार सुरू केला व तुमच्या सुरक्षा रक्षकांचे मुडदे पाडले. ही लज्जास्पद घटना घडल्यानंतर दीड वर्षानंतर तुमच्या समस्त देशवासियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आणखी एक घटना त्याच संसद भवनात घडली. ८ ऑगस्ट,२००३ रोजी फिल्मस्टार व मंत्री श्री. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखा दिसणारा त्यांचा डुप्लिकेट कोणतेही प्रवेश पत्र जवळ न बाळगता संसद भवनाच्या परिसराचा फेरफटका मारून आला. त्याची तपासणी करण्याऐवजी सुरक्षा रक्षकांनी त्याला झुकून सलाम केला व त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रत्येक जण धडपडू लागला. तो जेव्हा संसद भवनातून बाहेर पडला तेव्हा त्याची मुलाखत घेण्यासाठी आतूर झालेल्या टी.व्ही. चॅनल्सच्या प्रतिनिधींना त्याने एकच प्रश्न विचारला- ‘‘आज जर माझ्याजवळ शक्तिशाली बॉम्ब असता तर?’’ तुमच्या देशात खुर्चीच्या राजकारणाला इतकं सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे की त्यासमोर सामान्य भारतीय नागरिकाचा जीव ही अत्यंत नगण्य गोष्ट झाली आहे. संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर सुरक्षेविषयी तातडीने हालचाल करण्यासाठी एकाही नेत्याजवळ वेळ नव्हता, कारण निवडणुकीच्या प्रचार सभा व संपूर्ण देशात अशांतता पसरविणार्या ‘शांती यात्रा ’ही त्यांची प्राथमिकता होती. देशाच्या भल्याविषयी काहीही देणंघेणं नसलेले असे व्यस्त नेते हे अप्रत्यक्षरित्या अतिरेकी कारवायांना भरघोस मदत करत असताना आमच्यासारख्या अतिरेक्यांना कशाला नावं ठेवायची?
तुमचा देश सुरक्षेवर येवढा प्रचंड पैसा खर्च करतो तरी देशभरातले बॉम्बस्फोट काही थांबत नाहीत याचं एकमेव कारण म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेपेक्षाही कितीतरी पट अधिक अत्याधुनिक साधनांनी आम्ही दहशतवादी सज्ज आहोत. मुंबईत आणि इतरत्र झालेले स्फोट हे टाईमबॉम्बचा वापर करून किंवा रिमोट कंट्रोल प्रणालीने घडवून आणणे ही आमच्या दृष्टीने अत्यंत मामुली गोष्ट होती. खरं तर स्फोटकांचा स्फोट होऊ नये यासाठी दहशतवाद्यांची रिमोट कंट्रोल डिव्हायसेस ‘जॅमर’ वापरून निकामी करता येतात. पण आम्ही रिमोट कंट्रोल साधनांची फ्रिक्वेन्सी बदलवून तुमच्या जॅमर्सलाच निष्प्रभ करून टाकतो व अगदी हुकमी स्फोट घडवून असंख्य निरपराध नागरिकांना क्षणार्धात यमसदनी पाठवितो. मुंबई विमानतळावर उड्डाणाच्या तयारीत उभ्या असलेल्या विमानांवर विमानतळाला खेटून उभ्या असलेल्या झोपड्यांमधून जर निकट भविष्यात बॉम्ब फेकल्या गेले तर त्यात दोष कोणाचा असेल? आमच्यासारख्या दहशतवाद्यांचा की गठ्ठा मतांवर डोळा ठेवून झोपडपट्ट्या हटविण्याला विरोध करणाऱ्या निगरगट्ट राजकारण्यांच्या रुपातील अतिरेक्यांचा? जम्मू- काश्मीर व मुंबईमधील बॉम्बस्फोटांपासून तुम्ही जर वेळेत घडा शिकला नाहीत व केवळ वरवरची मलमपट्टी करण्यातच धन्यता मानू लागलात तर लवकरच लाखो भारतीय प्राणास मुकतील व त्या नरसंहाराला दहशतवाद्यांइतकेच तुम्हीही जबाबदार असाल!
मित्रांनो, मी सतत ‘तुमच्या देशात’ या शब्दांचा उच्चार करतो आहे त्यामुळे मी या देशाचा नागरिक नाही असा तुमचा नक्कीच समज झाला असेल. पण वस्तुस्थिती पूर्णत: वेगळी आहे. माझा जन्म भारतातीलच एका झोपडपट्टीत झाला. कोणाचाही आधार नसताना प्रचंड कष्ट करून शिक्षण घेतलं व एका शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखत आटोपल्यानंतर त्या शाळेचा अध्यक्ष असलेल्या एका बड्या नेत्याने माझ्या गरीबीची तमा न बाळगता अत्यंत निर्लज्जपणे जेव्हा मला तब्बल आठ लाख रुपयांची मागणी केली तेव्हा उपासमारीपासून माझ्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी अत्यंत नाईलाजास्तव मी स्वत:ला विकले. मी ज्याला आजपर्यंत ‘माझा देश’ असे अत्यंत अभिमानाने म्हणत होतो त्या देशावर हल्ले चढविण्यासाठी शेजारच्या देशातून आलेल्या अतिरेक्यांना मी मदत करण्यास सुरवात केली. अत्यंत गोपनीय माहिती पुरविणे, स्फोटकांची ने-आण करणे अशा कामांमधून मला बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. मी अतिरेकी कारवायांमध्ये सक्रीय असलो तरी माझ्या जन्मदात्यांना व भावा-बहिणींना मी सामुहिक आत्महत्या करण्यापासून वाचवलं याचं मला प्रचंड समाधान आहे. राजकीय नेत्याने मला आठ लाख रुपये मागितले नसते तर अतिरेकी बनण्याऐवजी भावी पिढीला मार्गदर्शन करणारा मी एक आदर्श शिक्षक झालो असतो व माझ्या प्रिय देशाला ‘तुमचा देश’ असं संबोधण्याची अत्यंत दुर्देवी वेळ माझ्यावर आली नसती. स्वत:ला नेते म्हणवणारे सैतान आज तुमच्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अमाप भ्रष्टाचार करून तरुण पिढीला अतिरेकी बनविण्याचे कारखाने उघडून बसले आहेत. या भ्रष्टाचारी गिधाडांच्या घशात घालायला पैसे नसल्यामुळे माझे अनेक जवळचे मित्र अतिरेकी होण्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना भेटलात व त्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर अक्षरश: हादरून जाल. सरकारने जाहीर केलेल्या योजनांमधील प्रत्येक रुपयात कमीशन मागणाऱ्या लांडग्यांसमोर झुकण्याऐवजी अतिरेकी बनून पैसे कमविण्यात काय चूक आहे? असा प्रश्न जर शेतकऱ्यांची मुलं विचारू लागली तर थोडंही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. जशी प्रजेची लायकी तशाच लायकीचा राजा कोणत्याही देशाला मिळत असतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेते निवडून देताना आपले मत नेत्यांची निवड करणार आहे की अतिरेक्यांची याचे भान जर तुम्हा भारतीयांना बाळगण्याची इच्छा नसेल आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यातच धन्यता मानायची असेल तर आम्ही दहशतवादी टपून बसलेले आहोतच तुमचा देश बेचिराख करण्यासाठी !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply