अरे, एव्हाना ती यायला हवी होती !
अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !
ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.
आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.
सुरू होते पूजा अर्चना
आणि सरस्वतीची आराधना.
मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.
खाऊ झालाच समजा सफाचाट.
कधी कधी ऐकू येतो गलका.
माझ्या कानांना मस्त बसतो दणका.
थोड्या वेळाने परतायची वेळ होते.
आमचं मन खट्टू होते.
मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.
आणखी एक आवर्तन पूर्ण होते.
उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो
आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.
पण आता सगळं सुनसान आहे.
सर्वत्र स्मशानकळा आली आहे.
सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.
सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.
इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.
माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.
त्यामुळेच मनात काहूर उठलंय
की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?
कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.
मी एकटी, मी एकाकी.
प्रत्येक गावा गावातील शाळा.
प्रत्येक शहरा शहरातील शाळा.
— शरद दिवेकर
कल्याण
70457 30570
Leave a Reply