आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड!
या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर पसरून ठेवतो अन मध्यभागी फतकल मारून बसतो! एक एक चित्र त्याची जन्म कथा ऐकवते. हे समोरच निष्पर्ण वृक्षाचे चित्र पाहून, जे. डी. म्हणाला होता, ‘तू हे अशी बोडखी झाड का काढतोस ?’ हल्ली जे. डीचा संपर्क कमी झालाय. फोन केला पहिजे. समोरचे खडकाचे चित्र, माझे सध्याचे फेवरेट, जमता जमेना, खूप कागद,वेळ ,रंग, मेहनत वाया गेली. हवा तो दगडाचा पोत साधत नव्हता. रागा, रागा कागदाचा वेडा -वाकडा बोळा केला, बशीतल्या काळ्या शाईत बुचकळला,अन drawing पेपरवर करकचून दाबला, सुकल्यावर फाईन tuning केल, शेजारी एक वाळक झाड काढल. मस्त इफेक्ट साधला.!
एक ना अनेक आठवणीना उजाळा मिळतो. ‘ तुम्ही चित्रे का काढता ? काय फायदा होतो ?’ मागल्या आळीतील पंच्याहत्तरीतील म्हाताऱ्याने विचारले. काय फायदा?
‘अहो आनद मिळतो.’
‘कसला बोडक्याचा आनद?फुकटचा टाइम पास, त्या पेक्षा एखाद्या दुकानी किर्दी लिहित जा. तेव्हढाच संसाराला हातभार!’
गोष्ट पैशात रुपांतरी होत असेल तरच करावी -या तत्वाचे पुरस्कर्ते कमी नाहीत. मी टाइम पास म्हणून चित्रे काढत नाही. या बाबतीत मी खूप गंभीर आहे. पुस्तके, नेट, डेमो, सराव सर्व करतो. मला माहित आहे कि, माझ्या साठी “दिल्ली बहुत दूर “आहे. साठीत सुरवात करून top ला पोहोचणे कठीण आहे. पण मी निघालोय. दिल्ली,नाहीतर पुण्या पर्यत, मी पोहचेन. मला ठिकाणा पेक्षा प्रवास महत्वाचा आहे. कोणी काही म्हणो, मी हा मार्ग सोडणार नाही!
हा वरच्या बाजूचा पोस्टर कलर मधला गणपती. फेसबुक वर पोस्ट केला होता. बर्वेची कॉमेंट -चित्र बरे आहे पण सोंड जरा वाकडी झालीय,अन दोन जागी outline बिघडली आहे. झाल. संतापलो. साल, याला काय कळत चित्रातल? चुका काढायला बहाद्दर. दोन सरळ रेघोट्या दाखव मारून! तावातावाने फोन लावला. चांगल झापायची तयारी केली. पण फोन लागला नाही. ते बरेच झाले. थोडा थंड झालो. मी बर्वेला ओळखतो. तसा तो सोबर आहे. नावे ठेवणे,चुका काढणे, त्याचा स्वभाव नाही. मग हि टीका? क्षणात उत्तर सापडले! आपल्या मित्राचे चित्र निर्दोष असावे असे त्याला वाटणे स्वाभाविक होते. चित्रातले दोष कमी झालेतर त्यांचा दर्जा वाढतो. त्याच्या कॉमेंटला लगेच उत्तर दिले -Thanks Barveji, I shall take care in future. Pl keep commenting on my posts. फोन लागला असतातर एक मित्र गमावला असता.
मी या चित्रांच्या संगतीत रमतो, शांत होतो, प्रसन्न होतो. माझी चिडचिड कमी होते. जमलतर पहा एखादा छंद जोपासा. या चित्रांच्या संगतीत असताना, एखाद्या T V च्या रिपोर्टरने, नाका पुढे माईकचे बोंडूल धरून विचारले “या क्षणी तुम्हाला कसे वाटते आहे ?” तर माझी प्रतिक्रिया अशी असेल– “आत्ता मला गांधारी झाल्या सारखे वाटतय! माझे शंभर पुत्र माझ्या भोवती बागडत आहेत ! ”
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच. Bye.
Leave a Reply