नवीन लेखन...

मी मदत करू ? (लघुकथा)

कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून,  तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे भासले.

“मला माहित आहे, तुला काय सांगायचं आहे ते! मी अशक्त आहे, माझे शरीर अनेक व्याधीने ग्रासलंय, मीही लवकरच तुझ्या मार्गावर असेन, हे मी पूर्ण जाणून आहे! तरी त्या पूर्वी, तुझ्या मृत्यूला, जो कारणीभूत आहे त्याला मी शिक्षा देईन! तू त्यासाठी स्वतःला गुंतवून ठेवू नकोस!” तो त्या चितेला उद्देशून म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणी होते! त्याचा आवाज इतका आर्त होता कि, आसपासचे जग क्षणभर स्तब्ध झाले!

त्याच्या पाठीला एक गारव्याची झुळूक चाटून गेली. आणि त्याच्या मस्तकापर्यंत भीतीची लहर दौडून गेली.

“मी, करू तुला मदत?” कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजल.?

भूत? दिवस थंडीचे. गारवा आसमंतात भरून होता. पाठीला गार वार झोंबलं असेल. लगेच भुताचा संशय! मनाचा खेळ दुसरं काय? पण त्या पाप्याला दंड दिल्याशिवाय, तो मरणार नव्हता. त्या चितेच्या साक्षीने, तो शब्द त्याने, स्वतःलाच दिला होता!

इतकावेळ गारव्यात झाडामागे उभा राहून, त्याचे पाय गळाले होते. अंगात ताप असावा. थड्थडून थंडी वाजून येत होती. दोन्ही हात बगलेत गच्चं घरून तो, घराकडे परत निघाला. चालताना त्याचे पाय डगमगत होते. स्मशानाच्या रस्त्यावरचे ते पिवळे अंधुक दिवे, अस्पष्ट रस्ता दाखवत होते. आणि त्याला ज्याची भीती वाटत होती तेच झाले. त्याच्या डोळ्यासमोर, अंधाराचा एक मोठा ढग फुटला! तो चक्कर येऊन जागेवरच कोसळला!

“मी मदत करू? मी येऊ का?” कोसळताना पुन्हा कानात तोच आवाज आला!

“ये! मला सांभाळ! मी बहुदा पडतोय!” त्याच्या मनाने साद घातली. आणि त्याची शुद्ध हरवली. ती हरवताना, कोणीतरी आपल्याला खांद्याचा आधार देतंय असे भासत होते.

‘तो’ आला होता तर!

तो पूर्ण ग्लानीत गेला.

०००

इन्स्पेक्टर राघवन आपले फोनवरील संभाषण संपवले. आणि समोरच्या खुर्चीत बसलेल्या माणसाकडे आपला मोहरा वळवला. समोरबसलेली व्यक्ती चाळीशीच्या आसपासची होती. सूट- टाय, हातच्या बोटात पाचूची आंगठी. आसामी भविष्यकथनावर विश्वास ठेवणारी असावी. कपड्यावरून कोठेतरी मॅनेजर वगैरे पोस्ट वर असावा.

“बोला. काय काम आहे?”

“कस सांगू? म्हणजे हे कितपत गंभीर आहे, मलाही कळत नाही.”

“तुम्ही सांगा. कसेही सांगा. मी मला हव ते घेतो त्यातून.”

“तर, माझा एक कारकून आहे.”

“थोडं थांबा. आधी तुमचा परिचय, नाव सांगा. म्हणजे मला सन्दर्भ समजतील.”

“मी, बाजीराव. एका एक्स्पोर्ट कंपनीत मॅनेजर आहे. मला काल एकाने जीवे मारण्याची धमकी दिली!”

“काय? कशी काय? म्हणजे फोनवर कि प्रत्यक्षात?”

“माझ्या केबिन मध्ये येऊन दिली!”

“बापरे! ओळखता त्याला? काय नाव आहे त्याच?”

“हो तर! तो माझ्याच हाताखाली कारकून आहे! हेमंत नाव आहे त्याच.”

“मग बरोबर! तुम्ही त्याला त्रास देत असाल किंवा पगारवाढ देत नसाल! हे नेहमीचंच आहे.”

“त्रास देण्याचा किंवा पगारवाढीचा प्रश्न नाही. त्यासाठी, या कारकुनाची भक्कम युनियन असते!”

“मग? का मारू पहातोय?”

“कस सांगू? त्याची एक प्रियसी होती. काय झालं माहित नाही. तिने आत्महत्या केली.”

“कधी?”

“झाले असतील सात आठ महिने. त्यानंतर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. तो सारखा आजारी असतो. कॅन्सरच्या आणि मानसोपचारतज्ञाच्या ट्रीटमेंटची मेडिकल बिल, कम्पनीला रिइम्बर्समेंट साठी देत असतो.”

“पण तुमच्या त्यात काय संबंध?”

“माहित नाही! थोडा वेडसर आहे. पण काम ठीक करतोय. आणि त्याला नौकरीची गरज आहे, म्हणून ठेवलाय. आजवर ठीक चाललं होत. काल तर, त्यानं सरळ धमकीच दिली! बहुदा वेडाच्या भरात बोलून गेला असेल. काल पौर्णिमा होती ना? तरी तुमच्या कानावर घालाव वाटल म्हणून आलो होतो.”

एका वेडसर माणसाच्या धमकीवर कितपत विश्वास ठेवावा? राघव क्षणभर विचारमग्न झाला.

“बाजीराव, एक माणूस, तुमच्या संरक्षणासाठी ठेवता येईल. त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. किंवा तुम्ही हि सोय खाजगीत करून घ्या. लेखी तक्रार देणार असाल तर, संरक्षणाची सोय गरजेची आहे.”

“ठीक. मी भरतो पैसे, तुम्ही सोय करा. लेखी तक्रार कोठे करू?”

“जाधव काका म्हणून आमचे जेष्ठ सहकारी बाहेर असतील, ते तुम्हास सहकार्य आणि मार्गदर्शन करतील.”

बाजीराव राघवच्या केबिन बाहेर निघून गेले.

०००

आठ दहा दिवस उलटून गेले. बाजीराव सुरक्षित होते. मध्यंतरी राघवन फोनवर चौकशी केली होती. हेमंत काहीच झाले नाही, असे वागत होता, असा रिपोर्ट त्याच्या माणसाने दिला होता. बहुदा प्रकरण मिटले असावे. राघवच आपल्या कामाच्या रगाड्यात, बाजीराव केस विसरून गेला.

एके दिवशी रात्रीच्या आठच्या सुमारास, बावळट दिसणारा, सत्तावीस आठवीस वर्षाचा तरुण, पोलीस स्टेशनपाशी घुटमळताना, राघवला दिसला. त्याच्या गचांडीला धरून, राघवने  त्याला चौकीवर आणले. केबिन मध्ये, समोरच्या खुर्चीत बसवून, तो स्वतःच्या खुर्चीत बसला.

“काय करत होतास पोलीस स्टेशन बाहेर?”

“सर, मला तुम्हालाच भेटायच होत!”

राघवन त्याला जवळून न्याहाळले. डोळे खोल गेलेले. त्या भोवतालची काळी वर्तुळ, आजार किंवा काळजीत असल्याची संकेत देत होती. दाढीची खुंट वाढलेली. शरीर कृश झाल्याने, अंगावरचे कपडे बेढब झाल्या सारखे दिसत होते. त्याच्याकडे नजर टाकल्याबरोबर, पहाणाऱ्याचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे जात असे. कारण त्याच्या डोळ्याच्या बुबळात कमालीची चमक होती. आणि ते अस्थिर होते! एक प्रकारची वेडसरपणाची झाक त्यात होती. पण बोलताना मात्र तो नम्र आणि स्पष्ट उच्चारात बोलत होता.

“नाव काय तुझं?”

“मी हेमंत!” राघव सावध झाला. हेमंत! बाजीरावाचा कारकून! खुनाची धमकी देणारा!

“काय काम होत?”

“मी एक खून केलाय! आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायला आलोय!” तो शांतपणे म्हणाला.

राघव त्याच्या तोंडाकडे पहातच राहिला! त्याने अनेक वेडे पहिले होते. पण असा पहिल्यांदाच पहात होता.

“कोणाचा खून केलास?”

“माझा मॅनेजर! बाजीराव!”

“कधी केलास?”

“नक्की वेळ मला माहित नाही. पण त्याचा मुडदा पाडून, तडक तुमच्याकडे आलो!”

त्याचा आवाज शांत होता. खुनासारखे कृत्य केल्यावर सराईत गुन्हेगाराच्याही मनावर प्रचंड ताण येतो. पण हा तर, ‘मी आत्ताच जेवण करून, तडक तुमच्याकडे आलो.’ अश्या थाटात ‘खून करून आलो,’ म्हणून सांगत होता! येडाचा झटका आला कि काय?

तरीही राघवने केबिन बाहेर येऊन बाजीरावला फोन लावला.

“हॅलो, मी बाजीराव बोलतोय. बोला इन्स्पेक्टर साहेब.”

“बाजीराव, जरा मला व्हिडीओ कॉल करा.”

बाजीरावांनी मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. ते त्यांच्या घरात निवांत सोफ्यावर ड्रिंक्स घेत बसले होते!

बाय करून राघवन मोबाईल बंद केला. आणि परत केबिनमध्ये आला. आता तो रिलॅक्स होता. कारण बाजीराव सुखरूप असल्याचे त्याने आत्ताच पहिले होते.

“तू  ज्यांचा खून केलास, ते हेच का?” राघवने बाजीरावाचा घेतलेला स्क्रीन शॉट, त्याला दाखवला.

“हो! हाच तो! नीच माणूस! लोक म्हणतात पोलिसांना सगळं माहित असत! खरंच  दिसतंय!”

“तू, याला जीवांशी मारलस? तो तर जिवंतच आहे! मी आत्ता त्याच्याशी फोनवर बोललो!”

“जिवंत? ते शक्य नाही! मी त्याची नाडी तपासली होती. तो मेल्याची खात्री करून घेतली होती! तुम्ही खोटं बोलताय! तुम्ही पण मला, इतरांसारखा वेडा तर समजत नाही ना? तस असेल तर बोलण्यात काही अर्थच  नाही!”

” नाही! नाही! तू खूपच हुशार आहेस! त्याला नेमकं कस मारलस? ते मला ऐकायचं आहे.”

“सांगतो! मी माझ्या सोबत एक सोट्या, जाड प्लॅस्टिकची पिशवी, आणि मजबूत दोरी, खिशात ठेवून त्याच्या घरी गेलो. आणि त्याच्या घरची बेल वाजवली.”

“सोट्या म्हणजे?”

“सोट्या म्हणजे, माझी आई पूर्वी धुणं धुण्यासाठी, एक मूठ असलेला लाकडी ठोकळा वापरायची. तो घरात पडून होता. तोच मी घेतला.”

“मग?” राघव आता हेमंतला एन्जॉय करत होता.

“मला माहित होत. तो आज एकटाच घरी असणार, त्याची बायको माहेरी गेलेली आहे ना! मी बेल वाजवली तसे त्याने दार उघडले. ‘कशाला आलास?’ मला तो दारातूनच म्हणाला. ‘सर, महत्वाचं काम आहे. मी आत येऊ?’ मी त्याला विचारले.”

“एक मिनिट. तू हातात सोट्या घेऊन गेला होतास. त्याला संशय नाही आला?”

“मी माझे दोन्ही हात पाठीमागे बांधले होते ना! त्याला सोट्या कसा दिसणार?”

बापरे काय लॉजिकली सांगतोय? बाजीरावाला मोबाईलवर पहिले नसतेतर, याच्या कथनावर, कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवला असता.

“ठीक. मग काय केलंस?”

“तो ‘ये आत.’ म्हणून मागे वळला. मी हातातला सोट्या मागून त्याच्या डोक्यात मारला! हो खूप जोरात!माझ्यात होती तितकी शक्ती एकवटून! त्यामुळे तो खाली पडला. डोक्याला खोक पडली होती. केसातून रक्त बाहेर येण्याच्या बेतात होते. हे असेच घडणार मला माहित होते. मी पटकन खिशातली ती जाड प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढली. त्याच्या डोक्यावर घातली, मानेपर्यंत! पुढे खूप सोपं होत. पिशवीच्या तोंडाला, त्याच्या मानेवर दोरीने बांधून टाकलं. पक्क! एयरटाइट म्हणतात ना? तस! थोडावेळ तड्फड्ला!तो हाताने डोक्यावरची पिशवी काढू पहात होता ना! म्हणून मी त्याच्या छाताडावर बसून, त्याचे हात पकडून ठेवले!”

“तू, — तू इतकं एकट्यानेच केलंस? तू त्याच्या कडे गेलास तेव्हा, तो काय करत होता?” राघव अविश्वासाने त्याच्याकडे पहात म्हणाला.

“हो! तर मी एकट्यानेच केलं! मी गेलो त्यावेळीस, तो दारू पित होता.”

“कश्यावरुन दारू पीत होता?” हा प्रश्न राघवने मुद्दाम विचारला होता. त्याची लॉजिकल सांगण्याची परीक्षा घेण्यासाठी!

“कश्यावरुन काय? अहो, दार उघल्यावर मला वास आला ना! तो नेहमी डिप्लोमॅट पितो! मला माहित आहे! अन नन्तर मला बाटली अन एक ग्लास, त्याच्या सोफ्या समोरच्या टीपॉय वर दिसला.”

“हे सार ठीक. पण तू त्याला का मारलस?”

“त्याला शिक्षा देईन, अशी मी माझ्या राधेच्या, चितेसमोर प्रतिज्ञा केली होती! राधा! माझी राधा! माझं प्रेम! एका छोट्याश्या घरट्याची, आम्ही स्वप्न पहात होतो! माझी थोडीशी पगार वाढली कि, आम्ही लग्न करणार होतो. ती, मला आवडते म्हणून, बटाट्याची भाजी अन पोळी डब्यात घेऊन आली होती. मी गोडाऊनला गेल्याची संधी साधून, त्याने तिला स्टोअरच्या खोलीत नेली—– नीच! आपला नासवलेला देह तिने मारून टाकला! आत्महत्या केली तिने! तो नीच होता! मला त्याचा खून केल्याचा पश्चाताप मुळीच होत नाही. उलट एक अलौकिक समाधान मिळतंय! आता तुमच्या दृष्टीने हा गुन्हाच कि! म्हणून तुमच्या कडे सरेंडर होतोय!”

राघव क्षणभर सुन्न झाला. समोर बसलेला हेमंत मानसिक दृष्ट्या जरी अस्थिर वाटत होता, आणि बाजीराव जिवंत असला तरी, त्याच्या डोक्यात एक भयानक कट, अगदी मायनर डिटेल्ससह तयार होता! तो हे, त्याच्या न कळत हि, अमलात आणू शकणार होता! याला मोकळे सोडणे धोक्याचे होते! पण डांबून ठेवणे कायद्याच्या विरुद्ध होते. तरी काळजी घेणे गरजेचे होते. आता, तशीही रात्र झाली होती. रात्रभर याला पोलीस स्टेशनात ठेवून घेऊ. सकाळी याची काहीतरी सोय करता येईल. या निर्णयाप्रत राघव पोहंचला.

“ओके! हेमंत. आजची रात्र आमच्या सोबत रहा! जाधवकाका तुझ्या जेवणाची सोय करतील. एका कोठडीत झोपावे लागेल इतकेच!”

“थँक्स! या साठीच तर आलोय! आणि तसेही माझा आता जगण्याचा उद्देशच संपला आहे!”

राघव हेमंतची सोय करून निघून गेला.

०००

सकाळी सहाच्या दरम्यान इन्स्पे. राघवच्या फोनची रिंग वाजली.

“जय हिंद सर. मी श्याम अपार्टमेन्टचा सेक्युरिटी गार्ड बोलतोय. सकाळच्या राऊंडच्या वेळेस, बाजीराव सरांच्या फ्लॅटचे दार उघडे होते. बाजीराव सर, डोक्यावर प्लास्टिक कव्हर बांधलेल्या अवस्थे पडले आहेत. बहुदा ते जिवंत नसावेत!”

राघव वेळ न दवडता बाजीरावांच्या फ्लॅटवर पोहचला. समोर बाजीराव पडले होते. त्यांच्या डोक्याभोवती, बाजारात मिळणाऱ्या पाचकिलो आट्याची रिकामी पिशवी, गळ्याजवळ दोरीने गच्च बांधली होती! शेजारी सोट्या पडला होता! आणि सोफ्या समोरच्या टीपॉयवर डिप्लोमॅट व्हिस्कीची बाटली आणि ग्लास होता!

काल रात्री हेमंतने सांगितले, त्याच पद्धतीने बाजीरावाचा खून झाला होता!! हेमंततर पोलीस कोठडीत झोपलाय. मग बाजीरावला मारलं कोण?

राघवने मोबाईल काढला. बाजीरावांच्या प्रेताचा पंचनामा आणि इतर सोयीसाठी आदेश दिले. फिंगरप्रिंट्सवाले, फोटोग्राफर्स आणि इतर टीमला बोलावण्यात आले.

०००

रात्री जाधवकाकानी, आणलेला मिसळपाव आणि चहा पिऊन हेमंत, मिळालेल्या कोठडीच्या भिंतीकडे तोंड करून झोपी गेला! त्याला खात्री होती, ‘तो’ मदतीला येणार होता! आणि आपण या राघवला सांगितलंय तसेच घडवणार होता!!

आणि तसेच घडले होते!

आता हे त्या राघवला सांगितले तर? तो मला वेडा ठरवेल? हेमंत स्वतःशीच हसला.

०००

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..