नवीन लेखन...

मी व माझा मामा (कथा)

मी आणि माझा मामा

●मी
स्थळ : निपाणीचे एस टी स्टँड
वेळ : संध्याकाळचे पांच
काळ : 1972

सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलो आणि पुढील तीन वर्षासाठी  ₹ ५००/- वार्षिक शिष्यवृत्ती मिळाली आणि माझी रवानगी निपाणीला झाली.

भाड्याने खोली घेतली होती,खानावळीत जेवत होतो. वाटायचं एक रुपया हा बैलगाडीच्या चाकाएवढा मोठ्ठा आहे ! आणि तो मिळवणार मी क्षितिजपेक्षा मोठ्ठा आहे ! स्कॉलर विद्यार्थी म्हणून फी माफ! खोली ते खानावळ ते हायस्कुल असा सकाळचा प्रवास आणि हायस्कुलमधून परतल्यावर खोली ते खानावळ अशी पायपीट हा नित्यकर्म ठरलेला.

खेड्यातून शहरात आलेला मी, एक लाजरा, बुजरा पुस्तकी किडा, ना फुटबॉल खेळता यायचा ना क्रिकेट.
त्यामुळेच असेल कदाचित, कुणाशीही मैत्री होत न्हवती, कपडे, बारीक म्हणजे मरतुकडी अंगकाठी यावरून यथेच्छ टिंगल टवाळी व्हायची.हळूहळू मी कळत, नकळत स्वतःभोवती कोष विणत गेलो, स्वतःला, स्वतःमध्ये कैद करत गेलो.

दोन महिन्यातून एकदा गांवी जायचो, आई वडील, भावंड यांच्यासोबत मज्जा करायचो परत सोमवारी हायस्कुल मध्ये दाखल !
पण गांवी जायचे ते दोन दिवस म्हणजे सुखाची पर्वणी असायची.
अधून मधून गावांकडून आलेलं कुणी भेटलं की माझी कळी खुलायची!

त्यातच अशीच एकदा आई आली, मी तिला घेऊन खानावळीत जेवायला गेलो, तीचाहि हा पहिलाच प्रसंग! मस्त मज्जेत तो दिवस गेला, संध्याकाळी आई गांवी परत जाणार म्हणून तिला सोडायला निपाणीच्या स्टँडवर आलो, संध्याकाळचे ५ वाजले होते, त्याकाळी ५ ची बस साडे सहा-सातपर्यंत सुटली तर लॉटरी लागल्याचा आनंद व्हायचा.

आई स्टँडच्या सिमेंटच्या बाकड्यावर बसली होती आणि मी इकडून तिकडे स्टँडच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बागडत होतो.
इतक्यात मला माझा मामा दिसला, इचलकरंजीला जाणाऱ्या एस टी लागतात त्या प्लेटफॉर्मवर !
मी हाक मारली…..मामा……

●मामा
स्थळ : निपाणीचे एस टी स्टँड
वेळ :  नेहमीप्रमाणे माझी वाईट
काळ: मला छळणारा

कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी गांव सोडून शहरात रहायच्या,बायकोच्या हट्टामुळे इचलकरंजी ला आलो, हातमाग आणि यंत्रमाग यामुळे सटक फटक आवाजात गुदमरून गेलेलं शहर तिथं केवळ दोन जातीची माणसं रहात, तळहातावर पोट घेऊन रात्रपाळी दिवसपाळी असे बारा बारा तास राबणारे, आठवड्याला पाच सहा रुपये मजुरी तरी मिळावी  या आशेवर जगणारे कामगार ! स्वतःचा उद्योग आहे याची दिखावेगिरी करता यावी म्हणून भाड्याच्या जागेत कर्ज काढून यंत्रमाग घालणारे, आणि मिटरला ४ पैसे मजुरी मिळेल की ५ पैसे या विवंचनेत असणारे कर्जबाजारी मालक आणि दुसरी कडे, हे कापड उधारीवर विकत घेऊन भरपूर नफा लावून विकणारे
गब्बर मारवाडी !
माझ्यासारख्या सरस्वतीपुत्राला या मारवाड्याकडे दिवाणजीची नोकरी करण्याशिवाय कोणताही पर्याय न्हवता.
येणारा पगार,घराचे भाडे, सांसारिक खर्च, पदरात ४मुले, थकलेली आई,या सगळ्यात पगार आला कधी आणि संपला कधी हेच कळायचं नाही.
गेल्या महिन्यात बबन भेटला.
अरे मन्या, हितं कसला दिवाणजी होऊन बसलायस, निपाणीत मोठे मोठे शेटजी हायेत, तंबाखूचा धंदा जोरात हाय, तिकडं जाऊन बघ, पगार भरपूर, शेटजी संग तंबाखू खरेदीला जायचं, नंतर चाकी, पाकी, काडी, माती हे शिकलास की पैशाचा पाऊसच मर्दा !

मी हरखून गेलो, आता निपाणीला जायचं, दोन चार शेटजींना भेटायचं आणि…मी मनातल्या मनांत इमल्यावर इमले बांधू लागलो. हिकडे तिकडे करत चार पाच रुपयांची सोय केली आणि एस टी ने निपाणीला आलो.एकेका शेटजी कडे ४-४ दिवाणजी, माझी तर पाचावर धारण बसली, बरं, त्यातून हे शेटजी उद्या भेटतील तर ते परवा अशी परिस्थिती. करणार काय राहिलो स्टँडवर दोन दिवस, काम काही झाले नाही,हिरमुसला होऊन परत निघालो,इचलकरंजी चे तिकीट होते १₹ चे, माझ्या कनवटी ला होते बारा आणे. विचार केला, सदलग्यापर्यंत जाऊ, तिथं ओळखीपाळखीतून उसने पैसे घेऊ नाहीतर शुगर मिल ला जाणाऱ्या उसाच्या ट्रक ने पुढे जाऊ.
आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.

आता दिलीप ने मला बघितलं, तर त्याला काहीतरी द्यावं लागणार, नाहीतर किमानपक्षी तोंड देखलं विचारावं लागणार आणि तो हो म्हणाला तर…..जवळ दमडी सुद्धा नाही, त्याचं तोंड चुकवाव हेच बरं असा विचार करुन मी वळलो, तर पाठीमागून दिलीपची हाक ऐकू आली, मामा……
आता जिवंतपणी मरण अनुभवावे लागणार, या पोरा पुढे मान खाली घालावी लागणार या विचाराने अंगावर शहारे आले, आणि पुरता गर्भगळीत झालो.

●मी
मामा ……मी हाक मारताना मनात आनंदाच्या लाटा आल्या. या मामाने मला रामरक्षा शिकवली,मला सायकल चालवायला शिकवली.मामा मला खूप आवडायचा, पण आई त्याला नावे ठेवायची, त्याचे बुड एकाजागी टेकत नाही म्हणायची.बायकोच ऐकून गावातली भिक्षुकी,पत, ऐपत वाऱ्यावर सोडून कारकुनी करतो म्हणून त्याच्यावर चिडायची.मामा भेटला की न चुकता मला एक गोष्ट सांगायचा, गावाकडील 30 एकर जमीन जाळपोळीनंतर रयताने कशी बळकावली, पुढे तो आपले मनसुबे हि सांगायचा, चार पाचशे ₹ जमले की त्या रयतावर कोर्टात केस घालणार आणि केस जिंकून शेती परत मिळाली की इंपाला घेणार ! मग त्या इम्पालाची रसभरीत वर्णन ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं नाही.
मामाने पहिली हाक ऐकली नाही, पण तोपर्यंत माझी दुसरी हाक आणि मी मामाजवळ पोचलो होतो.
मामा माझ्याकडे बघून हसला, आधी ओशाळवाण नंतर निर्मळ..
मी मामाचा हात धरला, चल मामा, आई आहे इथंच.

●मामा
दिलीपने मारलेली हाक ऐकू आली होती, पण माझ्या दारिद्र्याची मलाच किळस वाटून मी तोंड फिरवले होते, पण त्या किळसापेक्षा, भाच्याबद्दलची ओढ अनिवार होती, म्हणून तोंड फिरवले तरी पाय तिथेच होते, थिजलेले.
अरे, दिलु स्टँडवर काय करतोयस ?
मामा, आई आली होती सकाळी, ती परत चाललीय तिला एस टी मध्ये बसवायला आलो, चल आईकडे , दिलीप मला हाताला धरून ओढतच ताई कडे घेऊन गेला.
ताईने माझ्याकडे बघितले, हळुवार हसली, डोळ्यात प्रश्नचिन्ह होतेच.
अग, जरा नोकरी बघायला आलो होतो……
मनु तुझं एक ना धड भाराभर चिंध्या ! ताई खवळलीच.
तिला शांत करत जन लाजे पोटी म्हणालो, चल ताई चहा घेऊ या.
नकोरे बाबा मला चहा. ताईने तिच्या पद्धतीने विषय कटाप केला.

दिलीप, तू काय खाणार रे ? व्यवहारापोटी विचारले, तर तो लगेच म्हणाला चालेल. आता आली का पंचाईत ? कुठून विचारलं असं झालं, पण विचारून बसलो होतो आणि दिलीप ने होकार दिला होता
आता सत ना गत ! आलिया भोगासी असावे सादर म्हणत पाय फरफटत एस टी कँटीन कडे निघालो.

● मी
गेले सात आठ महिने निपाणीत रहात असलो तरी खानावळी पलीकडे मी कधी हॉटेलात पाऊल टाकले न्हवते. नव्याची नवलाई होती, कॅन्टीन मध्ये जाऊन आवडीचे कांही तरी खायला मामा देणार होता, मी आकाशात उडत होतो. डोळ्यासमोर पांढऱ्या शुभ्र , थुलथूलीत इडल्या,भोक पाडलेले उडीद वडे, वासावरून आस्वाद घेतलेल्या कांदाभजी, पाकात पोहणारे लठ्ठ, गुबगुबीत गुलाबजाम, खरपूस भाजून आत बटाट्याची भाजी भरलेली आंबोळी असे अनेक पदार्थ माझ्या नजरेसमोर हादगा खेळू लागले.
कॅन्टीन मध्ये जाऊन बसलो, वेटरने पूर्ण पाच बोटं बसवून पत्र्याच्या बॅरल मधील पाणी अल्युमिन च्या पेल्यातून आणून टेबलावर आपटलं.
खानेको ताजा क्या है ? मामानं हिंदीत इम्प्रेशन मारून घेतलं.
त्या वेटर नावाच्या कळकट झम्प्याने २०-२५ पदार्थाची नावे घेतली.मला एकसुद्धा कळलं नाही.
मामाने विचारले ड्रिंक्स मे क्या है?
तो म्हणाला …डिंक लाडू
मामा म्हणाला नको.
मामा:- पुरी भाजी
वेटर : कुरमा पुरी
मामा: नको, चिवडा है?
वेटर : न्हाई, भडंग है
मामा: नको, बटाटा भजी ?
वेटर : न्हाई, कांदा भजी
मामा: नको, वास येतो तोंडाला
दिलू, काय पाहिजे तुला ?

मला इतका वेळ वाटत होतं, मामा आणि वेटर होय-नाही असा गेम खेळतायत. आता मामानं मला विचारलं , म्हणजे आता सगळं माझ्या हातात! मी इतका खुश झालो की बोर्डाच्या परीक्षेत पहिला येऊनही झालो न्हवतो.

मला पूर्ण आठवतं होतं, वेटरने जी भलीमोठी आगगाडी सारखी पदार्थाची नावं घेतली होती, त्यात पहिलं इडली होतं ! टूम्म फुगलेली इडली ! पांढरी शुभ्र गुबगुबीत ! हात लावल्यावर तिचा स्पर्श कळेल ! मोहरीची फोडणी घातलेली चटणी आणि शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आमटी ( हो आमटीच, तेंव्हा सांबार, रस्सम हे माहीतच न्हवतं)
आता अशी अप्राप्य इडली मी खाणार होतो, मन सातवे आस्मान पर पोचले होते……
मी म्हणालो…..मामा, इडली सांबार !
मामा म्हणाला, छे, नको ते तेलकट.
माझा चेहरा पडला, तो जमिनीवर आपटण्यापूर्वी मामाच्या पुढच्या प्रश्नाने तो उचलला !
पेढा है क्या ? खवे का ? फिक्का ?
नरसोबा वाडीचा पेढा आठवून माझ्या जिभेवर वेलची नाचू लागली.
खेळातून बाहेर पडल्यासारखा वेटर म्हणाला है ना !
मला वेटर आणि मामाची नुरा कुस्ती संपल्याचा आनंद झाला.
आनंदी आनंद गडे, पेढे इकडे तिकडे चहूकडे अशी कविता मनात उमटली सुद्धा!!
मामा स्थितप्रज्ञ होता, म्हणाला कितनेका पाव किलो ?
वेटर म्हणाला, पचास पैसेका प्लेट !
मामा : प्लेट मे कितना ?
वेटर : दो
मामा : 3 रुपयको पाव किलो मिलता, तुम भौत जादा बोले

माझ्या डोळ्यासमोर आलेला पेढा प्रचंड वेगाने दूर दूर जात होता….पेढ्याचा मागे एक खूप मोठे, कृष्ण विवर तयार होत होते, मी त्या पेढ्याचा पाठलाग प्रकाशाच्या वेगाने करत होतो…..

दिलू, चोर आहेत सगळे ! मी तुला उन्हाळ्याच्या सुट्टीत किलोभर पेढे आणून देतो, चल, या चोराकडे काही खायला नको

मी हिरमुसलो होतो, पण मामा मे महिन्यात किलोभर पेढे देणार म्हणून खुश हि होतो.
घोड्यामागून टांग्याची की टांग्या मागून घोड्याची म्हणतात तशी माझी मामा मागून वरात निघाली होती! मी तरंगत तरंगत, मे महिन्याची वाट पहात मामाच्या मागे, आईकडे चाललो होतो..….

● मामा
कॅन्टीनमध्ये गेलो खरा, पण माझे लक्ष होते आतील त्या पत्र्याच्या बोर्डवर. जे कांही इथं होतं त्याची किंमत कमीतकमी २५ पैसे होती.
ते दिले तर एस टी ने मी अर्धी वाट पण जाऊ शकणार न्हवतो. तिथून पुढे चालत जायचे तर पायाला चट्टे आणि भोकं पडली असती.
पण दिलीपला इडली किंवा पेढा न देऊ शकल्याने अंतकरणाला भोके पडत होती.

दिसणाऱ्या भोकापेक्षा, न दिसणारी भोकं चांगली. कारण ती अब्रूचे धिंडवडे काढत नाहीत.

हे एक समाधान मनात ठेवून, मी दिलीप सोबत, ताईकडे गेलो, तिला एस टी मध्ये बसवायला.

ती एस टी ने तिच्या गावी पोचेल.
दिलीप मोठा होईल, हुशार आहेच, नक्की काहीतरी चांगले करेल.

प्रश्न एकच आहे, मला मार्ग कधी सापडणार किंवा सापडलेला मार्ग कधी कळणार ? की मार्ग न कळताच माझा या इहलोकीचा प्रवास एखाद्या किडा मुंगी सारखा, अनौरस….बेवारस असा संपणार….

— अरविंद हरिपंत टोळ्ये 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..