१९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती. भुसावळला इन-मीन चार चित्रपटगृह त्यातील दोन अलिखित कारणांसाठी भल्या घरांना वर्ज्य ! सोलापुरात टॉकीज भरपूर, बऱ्यापैकी एका परिसरात. अनेक भाषिक चित्रपटांची मेजवानी- मराठी, हिंदी,इंग्रजी याबरोबर कानडी, तेलगू ! सगळ्या भाषा भगिनी सोबतीने नांदत होत्या आणि प्रेक्षकांचा सुजाण पाठिंबाही ! ( नाटक किंवा टीव्ही असे मनोरंजनाचे पर्याय त्याकाळी उपलब्ध नव्हते.)
दोन्ही चित्रपटांचा सुरुवातीचा प्रतिसाद सुस्त पण वर्ड ऑफ माऊथ ने पाचव्या-सहाव्या आठवड्यापासून दोघांनी उचल खाल्ली. होय, त्याकाळी चित्रपट हमखास २५-५० आठवडे हाऊसफुल्ल चालत मायबाप प्रेक्षकांच्या कृपाप्रसादावर ! तिकीटही अफोर्डेबल ( मॅटिनीला ५५ पैसे ते १ रू २५ पैसे अशी रेंज आणि रु १ ते रु ४ अशी नेहेमीच्या खेळांना )). सकाळी ऍडव्हान्स बुकिंगला ( होय,त्यावेळी असायचे) दिवसभराचे सारे शोज हाऊसफुल्ल ! मग दिवसभर ब्लॅक ( हाही धंदा त्याकाळी तेजीत असायचा.) वाल्यांची चांदी. कित्येक आठवडे “शोले ” बघायला मिळाला नाही. ( “त्यांत काय एवढे? ” इति पिताजी). मग शक्कल लढविली – शेजारच्या मावशी माझ्यासारख्याच चित्रपट शौकीन ! पण लहान मुले आणि चित्रपटांमध्ये रस नसणारे “आप्पा ! ” त्यांना आपली आवड मारायची सवय झाली होती. त्यामुळे मी कोठलाही सिनेमा पाहून आलो की मावशींना स्टोरी सांगणे हा प्रघात बनला. त्याही दुधाची तहान —- !
त्याकाळी चित्रपटगृहात महिलांसाठी तिकिटाकरिता वेगळी रांग असायची. आप्पांच्या एका सुटीच्या दिवशी मी आणि मावशी ऍडव्हान्स बुकिंगला जाऊन ” शोलेची ” लढाई जिंकली.
सायंकाळी सहाच्या शोला गेलो. प्रथमदर्शनी फार काही ग्रेट वाटला नाही “शोले “. किंचित तोंड वाकडं करीत परतलो. हळूहळू भान येत गेलं – शोले हे मनोरंजनाचे परफेक्ट पॅकेज आहे- सूड /विनोद, कथानक, संवाद, अभिनय साऱ्याच खात्यांमध्ये कमालीचा सुसंवाद, चित्रपटाची गती सुंदर ! थोडं उणं होतं ते आरडी चं संगीत. अन्यथा सर्वांभूती करमणुकीचा भक्कम प्याला. मी स्वतः तो अनेकदा प्राशन केला आणि अजूनही तृप्ती नाही.
” जय संतोषी माँ ” असाच धो-धो चालला प्रभातला. ऍडव्हान्स बुकिंग, ब्लॅक सगळं तेच ! महिलांची अफाट गर्दी- उषाताईंच्या आवाजातील भक्तिप्रद गीते . सारंच छप्पर फाडके ! बाकी कथानक,कलावंत साऱ्याच बाबतीत तोकडेपण. पण मीना आणि प्रभात टॉकीजच्या मालकांचे उखळ नक्कीच शिगोशीग भरले.
मला तो बघायची अजिबात असोशी नव्हती. यावेळी मावशींच्या लहान भगिनी ( गुंडा मावशी फ्रॉम विजापूर) संतोषी मातेच्या मदतीला धावल्या. त्या संतोषी मातेचे व्रत करीत असत आणि हा चित्रपट बघण्यासाठी खास सोलापूरला बहिणीकडे आल्या होत्या. सर्वानुमते त्यांना कंपनी देण्यासाठी माझी निवड झाली ती फक्त माझ्या पांढऱ्या पडद्याच्या प्रेमाने. पुन्हा मावशींनी ऍडव्हान्स बुकिंग केले आणि सायंकाळी महिलांच्या अलोट गर्दीत मी तो सिनेमा पाहिला. आवडणार नव्हताच.मात्र पब्लिक उधळलं होतं.
“शोले ” च्या अफाट यशानंतर त्याच्या कित्येक आवृत्त्या ( अगदी नंतरची फ्लॉप आवृत्ती – “शान”) आल्या आणि गेल्या. तेच “जय संतोषी माँ ” चे झाले. यच्चयावत देवी-देवता यांच्या ” जय ” प्रति निघाल्या. पण ध्रुवपद मिळाले ते “शोले ” आणि “संतोषी माँ ” ला ! भारतीय चित्रपट रसिकांच्या रसिकतेचे कूळ आणि मूळ शोधू नये हेच खरे !
पण यानिमित्ताने सुमारे ८-९ महिने आम्ही दोन चित्रपटांमधील स्पर्धा अनुभवली. हारजितीचा निर्णय काही झाला नाही हे अलाहिदा !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply