लेखक मारिओ पुझो यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२० न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथे झाला. कादंबरीकार व पटकथा लेखक म्हणून पुझो यांच्याइतकी प्रसिध्दी व यश क्वचितच कुणाला मिळाले असेल. मारिओ पुझो यांच्या ‘गॉडफादर’ कादंबरीने आणि चित्रपटाने इतिहास घडवला.
न्यूयॉर्क सिटी कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उपजीविकेसाठी ते लष्करीसेवेत दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन वायूसेनेच्या वतीने सहभागी होऊन त्यांनी कामही केले. पण दृष्टिदोषामुळे त्यांना लवकरच तेथून माघार घ्यावी लागली. त्यातूनच त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच आपण लेखक होणार असल्याचे जाहीर केले होते. १९५०-६० च्या दशकात पुझो यांनी एका प्रकाशनसंस्थेत लेखक/संपादक म्हणूनही काम केले. द डार्क एरिना ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर द फॉच्र्युनेट पिलग्रिम ही दुसरी कादंबरीही गाजली. पण पुझो यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं ते त्यांच्या जगप्रसिद्ध द गॉडफादर या कादंबरीने! या कादंबरीच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरबॅक आवृत्तीने त्यांना चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन मिळवून दिले. हे त्या काळातील लेखकांना मिळालेले सर्वाधिक मानधन होते. गुन्हेगारी विश्वातील माफियांवर आधारित द गॉडफादर ही त्यांची कादंबरी तर जगप्रसिद्ध ठरली! जगभरात प्रचलीत झालेले माफीया, गॉडफादर आदी शब्द ही त्यांचीच देण होय. संघटीत गुन्हेगारीबाबत विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीचे रेखाटन पुझो यांच्याइतके कुणालाही शक्य झाले नाही. याच कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांच्या सहकार्याने बनविलेल्या, चित्रपटाला सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी असलेला अॅकॅडमी पुरस्कारा ने (१९७२ व १९७४ साली) सन्मानित करण्यात आले. पण त्यावर आधारित द गॉडफादर या चित्रपटानेही घवघवीत यश मिळविले. या चित्रपटाला अॅकॅडमी पुरस्काराच्या ११ विभागात नामांकन मिळाले होते. त्यापैकी तीन विभागात त्यांना पुरस्कार मिळाले. सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी ऑस्कर अॅवॉर्डसही मारीओ पुझो यांना मिळाले. ‘गॉडफादर’ १९६९ मध्ये प्रथम प्रकाशित झाली होती. आजवर तिच्या दोन कोटी दहा लाख प्रतींची विक्री झालेली आहे.
मारिओ पुझो यांचे निधन २ जुलै १९९९ रोजी झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply