ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचा जन्म ९ मे १९३७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात रेवंडी येथे झाला. ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक कांबळी यांच्या नाट्यप्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरले. ‘वात्रट मेले’हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेला ‘हसवा फसवी’ हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षात असेल. प्रभावळकर यांनी यात सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. कार्यक्रमात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नाटक तोलून धरणारी ‘वाघमारे ’ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांनी ती भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने खुलविली. म्हटले तर भूमिका ‘रिप्लेसमेंट’ची होती. कारण आधी ही भूमिका रमाकांत देशपांडे व नंतर डॉ. हेमू अधिकारी आलटून पालटून करत होते. या दोघांनाही काही कारणाने ती करणे शक्य झाले नाही आणि ती भूमिका लीलाधर कांबळी यांच्याकडे आली आणि कांबळी यांनी ती समर्थपणे पेलली.
व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचा प्रवेश ‘रिप्लेसमेंट’च्या भूमिकेतूनच झाला. अभिनेता म्हणून आपण काही करू असे लीलाधर कांबळी यांनाही वाटले नव्हते. पुढे लीलाधर कांबळी यांनी जी काही ‘नाटके’केली ती मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील आपली नोकरी सांभाळूनच. १९५५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा देऊन ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्टोअर डिपार्टमेंटला नोकरीला लागले आणि १९९२ मध्ये सेवेतून निवृत्त झाले.
‘कलावैभव’ नाटय़संस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर आणि लीलाधर कांबळी हे सॅण्डहर्स्ट रोड येथे ‘सोफिया मंझिल’ या एकाच चाळीत राहणारे. कलावैभवतर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रम/नाटके सादर व्हायची. कोकणात दौरे व्हायचे. लीलाधर कांबळी त्या वेळी तोंडवळकरांच्या दौऱ्यात व्यवस्थापक म्हणून सहभागी असत. संस्थेच्या ‘नयन तुझे जादूगार’या नाटकाचा दौरा होता. काही कारणाने नाटकात काम करणारे कलाकार जयंत सावरकर यांना चिपळूण येथील प्रयोगात सहभागी होता येणार नव्हते. त्यांनी तसे तोंडवळकर यांना कळविले आणि तोंडवळकर यांनी नाटकात लीलाधर कांबळी यांना उभे केले. लीलाधर कांबळी यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले. ‘काचेचा चंद्र’ या नाटकातही काही काळ ‘रिप्लेसमेंट’ केली. पुढे लीलाधर कांबळी यांनी मग मागे वळून पाहिले नाही. ‘हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका. लीलाधर कांबळी यांच्या अभिनय कारकिर्दीतील ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ हे एक महत्त्वाचे नाटक. या नाटकाने त्यांना अमराठी प्रेक्षकही ओळखायला लागले. कारण हे नाटक इंग्रजी होते. यात त्यांची ‘डिकॉस्टा’ ही गॅरेज मालकाची भूमिका होती. या नाटकाचे दोनशे प्रयोग त्यांनी केले. मालवणी नटसम्राट अशी ख्याती मिळवणारे दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत लीलाधर कांबळी यांनी अनेक नाटकांमधून भूमिका वठवल्या. त्यात वस्त्रहरण या नाटकाने सातासमुद्रापार छाप सोडली. वस्त्रहरण व हसवाफसवी या नाटकांच्या निमित्ताने लीलाधर कांबळी यांनी विदेशातही रसिकांना भरपूर मनोरंजन दिलं. भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्यांनी काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली आणि या मालिकेमुळे लीलाधर कांबळी यांना ओळख मिळाली. डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, प्रशांत दामले, रोहिणी हट्टंगडी, मच्छिंद्र कांबळी, भारती आचरेकर, सखाराम भावे, राजा मयेकर, सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. नाटक, चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकांमधून छोटय़ा-मोठय़ा भूमिका वाटय़ाला आल्या तरी त्याबद्दल लीलाधर कांबळी यांना कधी खंत वाटली नाही आणि आज आयुष्याच्या या वळणावरही वाटत नाही. ते एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, ज्या भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या त्यात मी जीव ओतून काम केले. ही लहान आहे की मोठी आहे, याचा विचारच मी कधी केला नाही. प्रत्येक भूमिका समरसून केली. विनोदी भूमिका करतानाही ती कुठेही अश्लीलतेकडे झुकणार नाही याची काळजी घेतली. वेडेवाकडे चाळे किंवा अंगविक्षेप न करताही अभिनयाच्या सामर्थ्यांवर ती भूमिका जिवंत करता येते, तुम्ही लोकांना हसवू शकता असे मला वाटते आणि मी ते करून दाखविले आहे. आजही अनेक ओळखीचे आणि अनोळखीही प्रेक्षक जेव्हा भेटतात आणि तुमचे काम आम्ही पाहायचो, आम्हाला आवडायचे, तुमच्या देहबोलीतून किंवा फक्त बोलण्यातून तुम्ही सहज विनोद निर्मिती करायचात, असे जेव्हा सांगतात तेव्हा आनंद तर होतोच, पण प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मन भरून येते.
कांबळी यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे ‘नाटय़संपदा’ पुरस्कृत ‘शंकर घाणेकर स्मृती पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले होते. नाटय़ परिषदेच्याच लीला मेहता पुरस्कृत ‘रंगदेवता’ या पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नाटय़ परिषदेचेच चिंतामणराव कोल्हटकर यांच्या नावाचे पारितोषिकही त्यांना मिळाले होते. तसेच २०१६ मध्ये लीलाधर कांबळी यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
‘पडदा उघडण्यापूर्वी’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र (शब्दांकन-महेंद्र कुरघोडे) ‘रूपरंग’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. यात त्यांनी आपल्या संपूर्ण नाटय़ कारकिर्दीचा पट उलगडला आहे.
लीलाधर कांबळी यांची कारकीर्द:
व्यावयिक रंगभूमीवर १०० हून अधिक प्रयोग केलेली नाटकं- काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, दुभंग, राम तुझी सीता माऊली, वात्रट मेले, केला तुका नि झाला माका, अखेर तू येशीलच, लेकुरे उदंड जहाली, बे दुणे पाच, चाकरमानी, हसवाफसवी, फनी थिंग कॉल्ड लव्ह, वस्त्रहरण, शॉर्टकट, प्रीतीगंध, प्रेमा तुझा रंग कसा, एक दिवस येईलच, वन रूम किचन, सासू पाहून लग्न करा, आमच्या या घरात, चला घेतला खांद्यावर.
उल्लेखनीय नाटकं- जिथे फूल उमलते, कथा नव्या संसाराची, नयन तुझे जादूगार, सगळे मेले सारखेच, विमानहरण, चला घेतला खांद्यावर, शहाण्यांनी खावं बसून, अशी ही फसवाफसवी, लफडं सोवळ्यातलं, चंपू खानावळीण. (मालवणी)
लीलाधर कांबळी यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं- केला तुका नि झाला माका, वात्रट मेले,चाळगती, मालवणी सौभद्र, तुझ्यात नि माझ्यात, सगळे मेले सारखेच.
स्पर्धासाठी लिहिलेल्या लीलाधर कांबळी यांनी एकांकिका-चौकट, असं घडलं रामायण, कांचनमृग, बुडबुडे, तितू, चौथा अंक.
दूरदर्शनसाठी केलेली नाटकं- सभ्य गृहस्थ हो, हसत हसत फसवूनी, रमल रफू, शिकार
दूरदर्शन मालिका- भाकरी आणि फूल, गोटया, बे दुणे तीन, पाऊस मृगाचा पडतो, कथास्तु, पोलिसातला माणूस, गिनीपिग, हसवणूक, सोनबाची शिदोरी, मेवालाल (हिंदी), नन्हे जासूस (हिंदी),महाबली,कॅलिडोस्कोप, मिसळ, हाऊस-मौज, कॉमेडी डॉट कॉम, थोरला हो, सांजभूल, दिशा, चला बनू या रोडपती, ही चाळ कुरूकुरू, एक वाडा झपाटलेला, गंगुबाई नॉन मॅट्रिक, भाग्यविधाता, गुण्यागोविंदाने, एक झोका नियतीचा टेलिफिल्म्स गणूराया, काज, कॅप्टन परत आलाय, धर्मा रामजोशी
लीलाधर कांबळी यांचे चित्रपट- सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या.
लीलाधर कांबळी यांचे निधन २ जुलै २०२० रोजी झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply