नवीन लेखन...

आठवणी… पैशांच्या

मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं.

कॅश काऊंटरवर काम न करावं लागल्यामुळे जनतेशी संपर्क आला नाही. त्यामुळे कॅश काऊंटरशी संबंधित अनुभव, आठवणी, किस्से कसे लिहिणार ना! पण नाणी, नोटा या संदर्भात काही वैयक्तिक अनुभव, किस्से जरूर आहेत, ते मी सांगू शकतो.

रिझर्व्ह बँकेतही त्या काळी पगार पाकिटातूनच मिळत असे. बँकेत आल्यावर नवीन करकरीत नोटांचा एक आगळावेगळा वास कळला. एक गंमत तिथेच कळली, ती म्हणजे 786 नंबरची. हा नंबर असलेली नोट जर कोणाच्या पगारात आली, तर तो स्वतःला फार भाग्यवान समजत असे. 786 नंबरच्या नोटा जमवण्याचा काहींना तर छंदच होता (1975 मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभचा ‘दीवार’ तर कारणीभूत नसेल!)

आरबीआयमध्ये माझा पैशांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला, तरीही परिचित यावर विश्वास न ठेवता विविध मागण्या करीत असत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे सुट्या पैशांच्या टंचाईच्या काळात सुटे पैसे आणून देण्याचा आग्रह; तसेच लग्नसराईत पाच-दहा रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटांच्या गठ्ठ्यांचा आग्रह, विशेषतः राजस्थानी आणि उत्तर प्रदेशी मंडळींकडून. अर्थात या मागण्या पूर्ण करणे माझ्यासारख्याला तरी शक्य नव्हते. त्यामुळे मी भाव खातो, असा गैरसमज पसरला होता चाळीत व परिचितांमध्ये. हरकत नाही, पैसे खातो यापेक्षा भाव खातो हे कितीतरी पटीने चांगलं नाही का! तुम्हाला काय वाटतं!

असंच एक धर्मसंकट माझ्यासमोर उभं ठाकलं होतं डोंबिवलीत रहात असताना. एके दिवशी, एरवी माझ्याकडे कधीही न येणारा, सोसायटीतील एक तरुण माझ्याकडे आला. तो लहानमोठे  व्यवसाय करणारा उद्योगी तरुण होता. लांबण न लावता म्हणाला, ‘काका, तुम्ही बँकेत ऑफिसर आहात. मला दहा, वीस रुपयांच्या नोटांची गरज आहे. तुम्ही व्यवस्था करू शकाल का?’ मी किती हवेत विचारताच ताबडतोब म्हणाला जास्त नाही, ‘रोज पंधरा-वीस हजार मिळाले तरी चालतील. तुमचं जे काही असेल ते मी देईन.’ हे ऐकताच हे मला जमणारं नाही असं स्पष्ट सांगितलं आणि त्याचाही राग ओढवून घेतला.

पण काहींना मात्र व्यवस्थित कायदेशीर मदत करता आली. एकच उदाहरण सांगतो. ठाण्यात रहात असताना शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले आमचे शेजारी मला भेटायला घरी आले.

आपल्या पगाराचं पाकिट दर महिन्याच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी देवापुढं ठेवलं आणि कसं झालं त्यांनाही माहीत नाही, पण कळेपर्यंत पाकीट एका कडेने पेटत होतं. जाळ विझवेपर्यंत बऱ्याचशा नोटा एका बाजूने जळल्या होत्या; काही निम्म्याहून जास्त तर काहींचे एका बाजूचे नंबर गेले होते. अशा नोटा बदलून देण्याची बँकेची एक पद्धत होती. बँकेने खास बनवलेल्या छापील पाकिटावर नोटांच्या डिटेल्स, नाव पत्ता लिहून, बंद करून बँकेत ठेवलेल्या एका खास पेटीमध्ये टाकावे लागे. त्यानंतर त्यावर निर्णय होऊन संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर मंजूर झालेल्या रकमेची पंधराएक दिवसात पे ऑर्डर जात असे. मी त्यांना तसे सांगितले, मिळतील ते तुमचे असेही सांगितले. त्यांनी ‘हो’ म्हणताच दुसऱ्या दिवशीच ऑफिसमध्ये गेल्यावर पाकीट भरून पेटीत टाकले.

कमाल म्हणजे पंधरा दिवसांऐवजी आठव्या दिवशीच त्यांना जवळपास 80 टक्के रकमेची पे ऑर्डर मिळाली.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पैशात मोजता येणारा नक्कीच नव्हता…….!

-विष्णु यादव

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..