नवीन लेखन...

मेंदूवर क्ष-किरण

एका मोठ्या रुग्णालयात रुग्णावर एक अवघड शस्त्रकिया झाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी सर्जनला विचारले- “पुन्हा असे फायब्रॉईड नव्याने तयार तर होणार नाहीत ना?” सर्जन म्हणाले- ” माझ्याजवळ या प्रश्नाचे समर्पक उत्तर नाही. दुनियेतील सर्वश्रेष्ठ डॉक्टरलासुद्धा मानवी शरीरातील फक्त पंचवीस टक्के माहिती असते.”

हे जर सत्य असेल तर मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो.

मानवी शरीरात ५० लाख कोटी पेशी असतात आणि डॉ लिप्टन यांच्या मते प्रत्येक पेशीत साधारण १.४ व्होल्ट इतकी ऊर्जा असते. याचा अर्थ असा की आपल्या शरीरात ७० लाख कोटी व्होल्ट एवढी ऊर्जा असते. या पेशींची कंपनशक्ती सकारात्मक विचार, भावना आणि वर्तन याद्वारे वाढविणे हे केवळ आपल्या हातात असते. ती ऊर्जा टिकवून तिचा योग्य वापर करणे हेही आपल्याच हातात असते. मात्र याउलट नकारात्मकतेकडे आपण झुकलो की हीच ऊर्जा मंदावल्यासारखे जाणवते. टेस्लाने १९९० साली असे भाष्य केले आहे की सामान्य माणसाच्या मेंदूची ७२ मेगाहर्ट्ज विद्युत चुंबकीय लहरी इतकी कंपनशक्ती असते. सुदृढ आणि निरोगी माणसांच्या मेंदूची कंपनशक्ती ६२ ते ७८ मेगाहर्ट्ज या दरम्यान असते. त्यामुळे विश्वाचे गुह्य जाणून घ्यायचे असेल तर ऊर्जा आणि कंपने यांच्याच संदर्भात विचार करायला हवा. स्वतःची मूल्ये, श्रद्धास्थाने आणि अपेक्षा वारंवार तपासून बघावेत. वैश्विक शक्ती कायम आपल्यापाठी असते. त्यामुळे आपल्याला जे हवं,ते मिळतंच मिळतं (भलेही ते विध्वसंक असो) आणि त्यानंतरच्या भल्याबुऱ्या परिणामांना सर्वस्वी आपण असतो. आईन्स्टाईन याला मानसशास्त्र न मानता शुद्ध भौतिकशास्त्र मानतो.

आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या सर्व पेशींमध्ये ग्रे मॅटर असतं. त्या पेशींमधून न्यूरॉन्सची वाहतूक होत असते. न्यूरॉन्सला रसायनांचा पुरवठा सिनेप्सिस करीत असतात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता राखण्यासाठी यांची मदत होते. दिवसात तीस मिनिटे चालणे मेंदूतील न्यूरॉन्स आणि सिनेप्सिसच्या निर्मितीला हातभार लावते. व्यायामामुळे हिप्पोकैंपसमध्ये ग्रे मॅटर वाढते आणि स्मरणशक्ती शाबूत राहते. बुद्ध्यांक आजपर्यंत अपरिवर्तनीय मानला गेला होता, पण मेंदूचे प्रशिक्षण त्यांत वाढ करू शकते, हे आता सिद्ध झालं आहे. मेंदूशास्त्रज्ञ मान्य करतात की नवीन काही शिकण्यासाठी आणि हुशारी वाढण्यासाठी असं प्रशिक्षण आवश्यक असते.

मेंदूच्या मध्यभागी (सेरेब्रल हेमिस्फियर्स) असणारी शंकूच्या आकाराची ग्रंथी (पिनिअल ग्लॅन्ड) मेलॅटोनीन या स्त्रावाचा साठा करते आणि तिचा नैराश्याशी, वैफल्य भावनेशी प्रत्यक्ष संबंध असतो हेही आता सर्वमान्य झालंय.

मेंदूचा डावा हिस्सा विचार, विवेक, विश्लेषणाशी जोडलेला असतो तर उजवा भाग निर्मितीक्षम, सर्जनात्मक असतो. एकाचवेळी दोन्ही भागांचे संगोपन करता येते किंवा दोहोंपैकी एकाच भागावर काम करता येणे शक्य असते. आतल्या आत या दोन्ही कप्प्यांमध्ये सतत देवाण घेवाण सुरु असते. मात्र फक्त एकाच कप्प्यावर ताण आणणे आणि दुसऱ्याला अनुल्लेखाने मारणे हेही त्रास देणारे ठरते. वयाच्या दुसऱ्या ते आठव्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास होत असतो.

मानवी मेंदू इतर प्राणिमात्रांच्या मेंदूपेक्षा प्रगत आहे. त्याची विचार करण्याची क्षमता, भाषाज्ञान, माहिती साठविण्याची क्षमता अफाट असते. मेंदू मिळविलेल्या आणि साठवलेल्या माहितीचा वापर दैनंदिन जीवनात करत असतो. या साठवलेल्या माहितीला स्मृती (सोप्या भाषेत “स्मरणशक्ती”) म्हणतात.

स्मृती म्हणजे मज्जापेशींची जोडणी! मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्मृती निर्माण होत असतात आणि त्यांचा पंचेंद्रियांशी (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा) प्रत्यक्ष संबंध असतो.या पाचही स्रोतांकडून येणाऱ्या संवेदना / अनुभूती मेंदूत नोंदविल्या जातात. (एन्कोडिंग – सांकेतन) मज्जापेशींची जोडणी जितकी घट्ट तितकी ती घटना अधिक लवकर लक्षात येण्याची शक्यता असते कारण स्मृतीचा संबंध योग्यवेळी माहिती आठविण्याशी असतो. मेंदूत असंख्य स्मृतींची (जन्मल्यापासूनच्या) साठवण असते, त्याअर्थाने जगातील एकही प्रगत संगणक मेंदूच्या क्षमतांच्या आसपास जाऊ शकत नाही. आधी पाहिलेली वस्तू /व्यक्ती पुन्हा दिसल्यावर ओळखणे आणि त्या पूर्वभेटीशी जोडलेले तपशील आठवणे यालाच पुनःप्राप्ती (रिट्रायव्हल) म्हणतात. आणि हे मेंदूचे कार्य अव्याहत चाललेले असते.

यातील कोठल्याही टप्प्यावर बिघाड म्हणजे विस्मृती!

विस्मृतीचे वेगवेगळे प्रकार खालीलप्रमाणे –

१) विसरणे

वाढत्या वयपरत्वे स्मृती कमजोर होतात अथवा नष्ट होतात. काही व्यक्तींच्या मेंदूंमध्ये नव्या स्मृतींची निर्मिती होणे थांबते. उदा. ५० वर्षांपूर्वीचे लख्ख आठवते पण १० मिनिटांपूर्वीचे लक्षात राहात नाही.

२) लक्ष विचलित होणे – किल्ल्या हरवणे, घरातून निघताना दाराला कुलूप लावले आहे की नाही याबाबत असमंजस असणे असं विस्मरण बऱ्याच जणांना होत असते. मग सोबत यादी ठेवणे, पोस्ट-इट स्टिकर्स वापरणे असा मार्ग अवलंबावा लागतो.

३) अडखळणे – चेहेरा ओळखीचा पण नांव न आठवणे हा सर्वसामान्यतः येणारा अनुभव. विशेष नाम, सामान्य नाम, क्रियापद, विशेषणे पटकन ओठांवर येत नाहीत.

४) जुळणीतील गोंधळ– घटना, वेळ, परिस्थिती यांच्यातील ताळमेळ येथे बसत नाही. मेंदूतील एखाद्या भागाला इजा पोहोचली तर असे अनोळखीपण नजरेत येते.

५) पूर्वग्रह – आजवरच्या अनुभवांप्रमाणे स्मृती घडवत जाणे, एखाद्याबद्दल सतत पूर्वग्रहदूषित विचार करणे आणि त्यानुसार व्यक्त होणे!

६) सतत आठवणे– जबर मानसिक आघातानंतर प्रयत्नपूर्वकही एखादी गोष्ट विसरता न येणे, सारखं तेच तेच आठवत राहणे! अशा घटना भावनांशी जोडल्या गेलेल्या असतात.

स्मृती-विस्मृती यांच्यातील समन्वयासाठी काही हितकारक गोष्टी आवश्यक असतात-

१) व्यायाम– नियमित व्यायामाने मेंदूला सजग राहणे शक्य होते कारण हालचालींनी शरीराला संजीवनी मिळत असते.त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते.

२) एकाग्रता– कोणतीही नवीन गोष्टी शिकताना लक्ष दिले तर मेंदूतील साठवण वाढते. दीर्घपल्ल्याच्या आठवणी जतन करणे शक्य होते.

३) निद्रा– घटनांचे रूपांतर स्मरणात होण्यासाठी मेंदूला विश्रांती आणि सवड हवी असते. जर पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर मेंदूमधील सुसंगती बिघडते.

४) उजळणीची सवय– नवीन शिकत असलेल्या गोष्टींची उजळणी केली तर मेंदू मिळालेल्या माहितीचे संकलन चांगल्या प्रकारे करू शकतो.

५) प्रतीकांचा वापर– विस्मृतीत गेलेली गोष्ट आठवायचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्याशी संबंधित प्रतीके नजरेसमोर आणावीत.मग ती जोडणी विनासायास होते. उदा. रेडक्रॉस चे चिन्ह आपणांस दवाखाना, रुग्ण, उपचार आणि यासारख्या असंख्य गोष्टींपर्यंत नेऊन सोडते.

मेंदूचे हे चढते आणि पडते काळ असतात, पण हे आव्हान स्वीकारायलाच हवे. आपल्या मेंदूची क्षमता अमर्याद असते पण तिला अधून-मधून सुई टोचणे आवश्यक असते.

अतिविचार आणि नकारार्थी भावना मेंदूला सतत सुरु ठेवतात आणि त्रासदायक ठरतात. धावणाऱ्या मनाला या दोन बाबी ट्रॅकवरून हलवायला पुरेशा असतात. याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होऊ शकतो. भावनिक अस्थैर्य निर्माण होण्यास हे कारणीभूत असते, श्वासाच्या लयीत त्यामुळे भंग पावते.  अस्तित्वात नसलेल्या समस्या उकरून काढणे म्हणजे अतिविचार! हा भीतीचाच एक प्रकार असतो. त्यांत स्मृती, काल्पनिक गोष्टी, भावना, आणि अटकळी यांचा समावेश करून आपण परिस्थिती अधिक बिघडवतो. आपला बराचसा दिवस आपण मेंदूत व्यतीत करीत असतो. त्यामुळे मेंदूचे निर्विषीकरण करणे आवश्यक असते. त्यानंतर आनंदासाठी, सकारात्मकतेसाठी मेंदूला प्रशिक्षण देणे अपरिहार्य ठरते. संशोधन सांगते की ध्यान धारणा केल्याने मेंदू सिरोटोनिन नामक रसायन प्रवाहित करते ज्याद्वारे समाधानाची पातळी वाढते. त्यानंतर उर्जावान शांततेची एक अशी अवस्था येते, जिथे समतोल, उन्नयन आणि आशावाद यांची अनुभूती येते. ध्यानादरम्यान मेंदू शिथिल होतो आणि विश्रांतीची अनुभूती मिळते. मेंदू हा अवयव जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत कार्यरत असतो. त्याला क्षणभरही (अगदी झोपेतही) आराम नसतो.

वयाची तिशी ओलांडली की मेंदूतील चयापचय क्रिया मंदावते. अर्थात हे उशिरा लक्षात येते. एखाद्या जुनाट कारच्या इंजिन प्रमाणे हळूहळू यंत्रणा ढासळायला लागतात. गास्केटद्वारे गळती सुरु होते, गिअर बॉक्स मधील वंगणातील ओल कमी होऊ लागते, स्पार्क प्लग झिजतात तसेच मेंदूच्या रचनेतील लवचिकपणा उताराला लागतो. याचा परिणाम स्मरणशक्तीवर, अंतर्गत समन्वयावर, एकाग्रतेवर व्हायला सुरुवात होते. मात्र कारचे इंजिन बदलता येते तसे आपण मेंदू बदलू शकत नाही. अर्थात व्यायामाच्या काही कसरती/कवायती करून मेंदूला तजेलदार करता येते.

आपणा सर्वांना तरुण दिसण्याचे वेड असते याचा पुरेपूर फायदा करून घेत फार्मा कंपन्या वेगवेगळ्या क्रीम्सच्या संशोधनावर आणि ती तयार करण्यावर लाखो रुपये खर्च करीत असतात. मात्र गेली पंचवीसहून अधिक वर्षे मेंदूशास्त्रज्ञ अध्यात्मशास्त्राचा मेंदूवर होणारा सकारात्मक परिणाम शोधण्यात व्यस्त आहेत. प्रार्थना, ध्यान धारणा यासारख्या सुरक्षित आणि सोप्या मार्गाने स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार करता येतात आणि त्याद्वारे अशा रुग्णांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढविता येते. अँड्रयू न्यूबर्ग आणि मार्क वॉल्डमॅन या शास्त्रज्ञांनी या उपचारपद्धतीचे नांव “कीर्तन क्रिया” असे ठेवले. याचे मूळ १६ व्या शतकातील भारतीय अध्यात्मिक परंपरा आहेत ज्या १९६० च्या सुमारास अमेरिकेत स्थिरावल्या. सदर क्रियेत श्वसन कृती, नाद आणि हालचाली यांना एकत्र केले जाते. श्वासावर नियंत्रण हे पौर्वात्य ध्यानाचे परंपरागत वैशिष्ट्य आहे. योगासने आणि ध्यान धारणेतून ताण -तणाव, रक्तदाबाची समस्या आणि इतरही आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण शक्य होते, हे आता सर्वमान्य झाले आहे. अलीकडच्या अभ्यासाने हेही सिद्ध केले आहे की श्वास-नियमन माणसाच्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे, उतारवयाला थोपविणे, आणि पेशींची झीज यासारख्या गोष्टींवर मात करू शकते. कीर्तन क्रियेतील दुसरा घटक मंत्राचा नाद /प्रार्थनेतील शब्द! त्यांचे पवित्र अर्थ हृदयातील स्पंदने आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत /नियमित करण्यासाठी अतिशय प्रभावी असतात. तिसरा घटक – बोटांची विशिष्ट हालचाल. यालाच आपण मुद्रा असे म्हणतो. यामध्ये हात,चेहेरा आणि शरीराची विशिष्ट ठेवण अभिप्रेत असते.

प्रत्येक मुद्रा आणि मंत्रोच्चार अध्यात्मिक दृष्टिकोनातून वेदांताशी आणि तत्वज्ञानाशी जोडलेले असतात. शास्त्राच्या नजरेतून कोठलाही ध्वनी/ मंत्र आणि हालचाल यांची पुनरावृत्ती मन एकाग्र ठेवण्यास मदत करते. उतारवयात मज्जासंस्थेची होणारी झीज शरीरातील स्नायूंचा समन्वय आणि इतर मौखिक क्रियांवर दुष्परिणाम घडवून आणते. दिवसभरात फक्त बारा मिनिटे कीर्तन क्रिया केली तरी आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. आठ आठवड्यांच्या सरावाने मेंदूच्या प्री फ्रँटल कॉर्टेक्स मध्ये सुधारणा होतात आणि भावनिक नियमन, स्मरणशक्ती आणि अध्ययनक्षमता पूर्वपदावर येतात. नैराश्य आणि चिडचिड कमी होते आणि वाढत्या वयाबरोबर समाजात मिसळणे जे कमी झालेले असते तेही वाढते. मेंदूच्या संरचनेत निरनिराळ्या चिंतन क्रियांमुळे सकारात्मक बदल होत जातात आणि ते दीर्घकालीन असतात. पार्किन्सन आणि अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमधील मेंदूची कार्यक्षमता सुधारता येते. मेंदूतील अनेक छोट्या मोठ्या घटकांची परिक्रमा ठरलेली असते. त्यांतून जाणिवा, मनःशांती, समानुभूती, अनुकंपा यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते आणि भय,क्रोध अशा नकारार्थी भावना दडपता येतात. या चक्रात काही बाधा आली तर नैराश्य, चिंता, तणावामुळे येणारे विकार संभवतात.

हर्बर्ट बेन्सन यांनी हार्वर्ड विद्यापीठात १९७० मध्ये काही प्रयोग केले आणि सिद्ध केले की श्वास धीमा करून आपल्या श्रद्धेनुसार एखादा मंत्र अथवा शब्दसमूह उच्चारला ( उदा. ओम ) की शरीर शांत होते आणि ताण -तणाव हळूहळू मंदावतात. बेन्सन चे हे तंत्र आता वैद्यकीय आणि मानसोपचारात समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यायोगे रक्तदाब, जुनाट दुखणी, निद्रानाश, वंध्यत्व, वैरभावना इतकेच नव्हे तर कॅन्सर आणि एड्स च्या दुष्परिणामांवरही  उपचार केले जातात. या  सोप्या आणि प्रभावी उपचार पद्धतीत प्राणवायूचा वापर कमी होतो, श्वासोच्छवासाचा वेग कमी होतो, हृदयाची नाडी सुरळीत होते, आणि रक्तदाब नियंत्रणात येतो.

मेंदू पूर्णतया समजेल तेव्हा समजेल, पण सध्यातरी मेंदूमध्ये अध्यात्म सकारात्मक बदल घडवून आणते हे मेंदूशास्त्रज्ञ संशोधनांती सप्रयोग सिद्ध करीत आहेत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..