शोक, चिडचिडेपणा, भूक आणि अतिकष्ट करणे ही स्तन्याचा नाश होण्याची कारणे आहेत असे आयुर्वेद सांगतो. वरवर केवळ मानसिक वाटत असलेल्या या सर्व गोष्टी बारकाईने पाहता; प्रामुख्याने पित्त आणि त्याखालोखाल वात वाढवणाऱ्या आहेत.
आधी गर्भिणी आणि मग मातेच्या सभोवताली प्रसन्न वातावरण असावे याबाबत आयुर्वेद आग्रही आहे तो यासाठीच. सध्याच्या काळात झालेली संशोधनेदेखील याच गोष्टीला समर्थन देतात. शरीराशी संबंधित गोष्ट ही केवळ शरीराशी संबंधित असते असं नसून तीचा मनाशीदेखील संबंध असतो. ताप आला की आपण किती अस्वस्थ आणि चिडचिडे होतो ते आठवा माझा मुद्दा लगेच पटेल!! याच पद्धतीने मानसिक आजारदेखील शारीरिक दुष्परिणाम करत असतात असा या दोघांचा निकटवर्ती संबंध आहे.
याच कारणास्तव पूर्वीच्या पिढीतील लोक गरोदर स्त्री वा बाळंतीण यांनी उत्तम प्रकारचे साहित्य वाचणे, विविध स्तोत्र पठण करणे वा ऐकणे यांबाबत आग्रही असत असे आपल्याला दिसते. या गोष्टीमागे केवळ देवभोळेपणा नव्हे तर आरोग्याचा संदेश दडलेला आहे. आम्ही मात्र अशा गोष्टींचा हेतू लक्षात न घेता; एकतर त्यांचाच उदोउदो करत बसतो किंवा त्यांना थेट थोतांड म्हणून मोकळे तरी होतो. ‘सुवर्णमध्य’ काढणे हाच यावरील इलाज.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 6, 2016
Leave a Reply