नवीन लेखन...

मर्चंट नेव्ही रँक्स

बऱ्याच जणांना मर्चंट नेव्ही म्हणजे काय असा प्रश्न पडतो. मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजे जी मालाची आणि प्रवाशांची ने आण करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये खालील प्रमाणे अनेक प्रकारची लहान मोठी जहाजे असतात,

जनरल कार्गो शिप – यामध्ये कोणत्याही मालाची ने आण केली जाते.

कंटेनर शिप – यावर शेकडो आणि हल्ली हल्ली तर तीन ते पाच हजार कंटेनर एकाच वेळी वाहून नेले जातात.

ऑइल टँकर – क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स यांची वाहतूक करणारी जहाजे.

क्रूज लायनर – टुरिजम प्रवाशी जहाजे .

रो – रो शिप – कार, ट्रक यांची वाहतूक.

कॅटल/ लाईव्ह स्टॉक कॅरियर – मेंढ्या, शेळ्या आणि गुरे ढोरे यांची वाहतूक करणारे जहाजे.

बल्क कॅरियर – कोळसा, कच्चे लोखंड व ईतर खनिजे वाहतूक करणारी जहाजे.

ड्रेजर/ बार्जेस – समुद्रात उत्खनन करणारी तसेच समुद्रात पाईप लाईन व केबल टाकणारी जहाजे.

साधारणपणे कोणत्याही जहाजावर सर्व अधिकारी व खलाशी मिळून पंचवीस ते तीस जण कामं करत असतात.

जहाजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास कार्यान्वयीत असतात, ज्यामध्ये सेलिंग म्हणजे जहाज समुद्रात किंवा नदीत मार्गक्रमण करत असते. खरे म्हणजे सेलिंग याचा अर्थ वाऱ्याच्या साहाय्याने शिडाच्या होड्या किंवा बोटी मार्गक्रमण पुढे जाण्याची प्रक्रिया, परंतु कापडी शिडे जाऊन वाफेवर आणि त्यानंतर इंजिनवर चालणारी जहाजे आली पण जहाजांचे समुद्रातील मार्गक्रमण हे आजही सेलिंग म्हणूनच संबोधले जाते.

लोडींग म्हणजे जहाजावर माल किंवा कार्गो चढवण्याची प्रक्रिया केली जाते.

डिस्चार्जिंग किंवा ऑफ लोडींग म्हणजे जहाजावरून माल खाली उतरवला जातो.

अँकरेज म्हणजे जहाज एखाद्या बंदरात नांगर टाकून लोडींग किंवा डिस्चार्जींग साठी टर्मिनल किंवा जेट्टीवर नंबर येईपर्यंत थांबावे लागते.

पोर्ट म्हणजे बंदर, जेट्टी म्हणजे जहाजाला उभं राहण्यासाठी समुद्रात बांधलेला धक्का.

जहाजावर डावी आणि उजवी बाजू अनुक्रमे पोर्ट आणि स्टारबोर्ड म्हणून ओळखली जाते.

जहाजाचा पुढील भाग फॉरवर्ड तर मागील भाग आफ्ट म्हणून तर मध्यभाग हा मिडशिप म्हणून ओळखला जातो.

जहाजावरील अधिकारी हे कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या तर खलाशी कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी जहाजावर पाठवले जातात.

प्रत्येकाला जहाज जिथे असेल तिथे विमानाने पाठवले जाते, कंपनीच्या सोयीच्या असलेल्या कोणत्याही देशात कर्मचाऱ्यांना पाठवले जाते, त्यांच्या येण्याजाण्याचा तसेच विजा व अन्य सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याचा खर्च व जवाबदारी ही कंपनी कडूनच केली जाते.

पांढऱ्या युनिफॉर्म मध्ये एखादा अधिकारी दिसल्यास किंवा आजकाल समाज माध्यमांवर प्रोफाईल पिक्चर बघितल्यावर तो कॅप्टन असावा किंवा एक ना एक दिवस हा कॅप्टन बनणार असा सगळ्यांचा समज होत असतो.

जहाजावर मुख्यतः दोन विभाग असतात, एक नेव्हिगेशन आणि दुसरा इंजिन.

नेव्हिगेशन डिपार्टमेंट मध्ये असणारे नेव्हिगेशनल ऑफिसर्स हे जहाजाचे लोडींग, डिस्चार्जिंग तसेच नेव्हिगेशन म्हणजे जहाज कोणत्या मार्गाने व किती वेगाने न्यायचे हे सर्व बघतात.

इंजिन डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर ऑफिसर्स जहाजावरील इंजिन सह इतर सगळ्या मशिनरी चोवीस तास किंवा गरज लागेल त्या वेळेला कशा चालू राहतील यासाठी काम आणि देखभाल करत असतात.

नेव्हिगेशन किंवा डेक डिपार्टमेंट मध्ये कॅडेट पासून करियरला सुरुवात झाल्यावर सेकंड मेटची परीक्षा द्यावी लागते ती परीक्षा पास झाल्यावर थर्ड मेट किंवा थर्ड ऑफिसर बनता येते. थर्ड ऑफिसर मध्ये अनुभवाच्या जोरावर सेकंड मेट किंवा सेकंड ऑफिसरचे प्रमोशन कंपनीकडून दिले जाते. चीफ मेट किंवा चीफ ऑफिसर बनण्या करिता चीफ मेट ची परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर जहाजाचा कॅप्टन बनण्यासाठी मास्टर्स ची परीक्षा द्यावी लागते. जहाजावर कॅप्टनला मास्टर असे सुद्धा बोलले जाते.

इंजिन डिपार्टमेंट मध्ये जुनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाल्यावर क्लास फोरची परीक्षा दिल्यानंतर फोर्थ इंजिनियर ऑफिसर बनता येते. त्यानंतर काही महिन्यांच्या अनुभवावर कंपनी थर्ड इंजिनियर ऑफिसर म्हणून प्रमोशन देते. सेकंड इंजिनियर बनण्यासाठी क्लास टू आणि चीफ इंजिनियर बनण्यासाठी क्लास वन ही परीक्षा द्यावी लागते.

जुनियर इंजिनियरला पांच साब, फोर्थ इंजिनियरला चार साब थर्ड मेट आणि थर्ड इंजिनियरला तीन साब, सेकंड मेट आणि सेकंड इंजिनियरला सेकंड साब तर चीफ इंजिनियरला बडा साब आणि कॅप्टनला कॅप्टन साब म्हणून बोलले जाते.

इंजिन डिपार्टमेंट मध्ये बत्ती साब नावाची इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून एक अत्यंत महत्वाची रँक असते.

जेवण बनवण्यासाठी एक किंवा दोन कुक आणि त्यांच्या हाताशी एक स्टीवर्ड असतो. दोन पैकी जो सिनियर कुक असेल तर त्याला चीफ कुक असे बोलतात व दुसऱ्याला सेकंड कुक.

खलाशांमध्ये डेक म्हणजे नेव्हिगेशन डिपार्टमेंट मध्ये तीन एबल सी मन (ए बी ), एखाद दोन ओ एस किंवा ऑर्डीनरी सी मन, एक पंप मन, दोन ट्रेनी सी मन आणि या सर्वांवर देखरेख आणि मार्गदर्शन करणारा एक अनुभवी खलाशी ज्याला बोसन असे बोलले जाते.

इंजिन रूम मध्ये तीन ऑइलर किंवा ज्यांना मोटरमन असे सुद्धा म्हटले जाते त्यांच्या जोडीला एखाद दोन ट्रेनी सी मन असतात. इंजिन डिपार्टमेंट मध्ये फिटर नावाचा एक खूप महत्वाचा खलाशी असतो ज्याला वेल्डिंग, गॅस कटिंग, लेथ मशीन चालवण्याचा अनुभव असतो.

जहाजावर चोवीस तासांची प्रत्येकी चार चार तासांच्या अशा सहा वॉचेस मध्ये विभागणी केली जाते.

सकाळी आठ ते बारा, दुपारी बारा ते चार आणि सायंकाळी चार ते आठ. तसेच रात्री आठ ते बारा, बारा ते चार आणि पहाटे चार ते आठ.

चार ते आठ वॉच मध्ये इंजिन रूम मध्ये सेकंड इंजिनियर आणि नेव्हिगेशन किंवा डेक वर चीफ ऑफिसर.

आठ ते बारा मध्ये इंजिन रूम मध्ये फोर्थ इंजिनियर आणि डेकवर थर्ड मेट.

बारा ते चार मध्ये इंजिन रूम मध्ये थर्ड इंजिनियर आणि डेकवर सेकंड मेट.

कॅप्टन आणि चीफ इंजिनियर हे ऑन कॉल किंवा गरज लागेल तसे सगळ्यांनाच अव्हेलेबल असतात संपूर्ण जहाजाची जवाबदारी कॅप्टन आणि इंजिन व मशिनरी संबंधित संपूर्ण जवाबदारी चीफ इंजिनियरवर असते.

थर्ड इंजिनियर आणि सेकंड मेट याच रँक अशा आहेत की जिथं प्रमोशन साठी परीक्षा द्यावी लागत नाही पण इतर सर्व रँक साठी परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागते.

डेक किंवा नेव्हिगेशनल ऑफिसर आणि इंजिनियर ऑफिसर होण्यासाठी लागणाऱ्या परिक्षांना कॉम्पेटन्सी एक्झाम किंवा सक्षमता प्रमाणपत्र परीक्षा म्हटले जाते. या लेखी व तोंडी स्वरूपाच्या परीक्षा असतात. भारतात या परीक्षा upsc सारख्याच कठीण असतात म्हणूनच प्रत्येक एक परीक्षा पास झाल्यावरच एक एक रँक आणि त्यानुसार खांद्यावर एक एक सोनेरी पट्टी किंवा गोल्डन स्ट्राईप वाढत जाते आणि त्यानुसार तशी जवाबदारी सुद्धा. फरक एवढाच असतो upsc पास झालेले थेट वरिष्ठ अधिकारी म्हणून कामं करतात पण जुनियर रँक सह जहाजावर प्रत्येक रँक वर कमीत कमी बारा महिने प्रत्यक्ष जहाजावर अनुभव घेतल्यावरच पुढल्या परीक्षेसाठी पात्र होता येते आणि परीक्षा पास झाल्यावरच प्रमोशन आणि रँक मिळवता येते.

इंजिनियर ऑफिसर्स साठी सोनेरी पट्ट्यांखाली जांभळा रंग तर इलेक्ट्रिकल ऑफिसर च्या पट्ट्यांखाली हिरवा रंग असतो.

इंजिनियर ऑफिसर्स च्या सोनेरी पट्ट्यांखाली असलेल्या जांभळ्या रंगाबद्दल बुडालेल्या टायटॅनिक जहाजाची गोष्ट आहे ती अशी की, टायटॅनिक बुडाल्यावर काही डेक ऑफिसर्स वाचले होते परंतु सर्व इंजिनियर्स जहाजाचे इंजिन चालू ठेवण्यासाठी इंजिन रूम मध्ये असल्याने, बाहेर पडता न आल्याने त्या सगळ्यांना जलसमाधी मिळाली. ब्रिटनच्या राणीचा आवडता रॉयल पर्पल रंग असल्याने तिने सर्व इंजिनियर्सच्या सन्मानार्थ हा रंग त्यांच्या खांद्यावर आदरपूर्वक दिला होता.

— प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B.E.(mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..