दिल्ली मध्ये जहाजावरुन मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर परतलेल्या कॅप्टनने मांडलेल्या त्याच्या व्यथेतील काही भागाचा केलेला अनुवाद…..
जहाजावर काम करणाऱ्या सिनियर अधिकाऱ्यांना तीन ते चार महिने तर जुनियर अधिकाऱ्यांना पाच ते सहा महिने कॉन्ट्रॅक्ट असते. तर खलाशांचे कॉन्ट्रॅक्ट हे आठ ते दहा महिने असते. मी एका लाखो टन क्षमतेच्या जहाजावरील कॅप्टन असून चार महिने पूर्ण झाल्यावर सुद्धा वेळेवर घरी परत जाऊ शकलो नाही कारण माझे जहाज खोल समुद्रात होते, अमेरिकन पोर्ट मध्ये लोडींग करण्यासाठी जहाज पोहचले तेव्हा माझे पाच महिने पूर्ण झाले होते. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जहाज अमेरिकेत पोचले होते. परंतु त्या पोर्ट मध्ये रिलिव्हर पोहचणे शक्य नसल्याने कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन आणि एक महिना उलटून गेल्यावर सुद्धा मला घरी जाता आले नाही. अमेरिकेत कार्गो लोड केल्यानंतर जहाज पुढील तीन आठवड्यात तुर्की मधील पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी पोचले. साधारण नऊ मार्चला माझा रिलिव्हर जहाजावर जॉईन झाला परंतु साइन ऑफ म्हणजे घरी जाण्यासाठी जहाजावरुन तुर्कीतील स्थानिक प्रशासनाने उतरू दिले नाही. यावर तीव्र आक्षेप नोंदवत तुर्कीतील आरोग्य खात्याशी संपर्क करून कसेबसे तुर्कीतील पुढील पोर्ट मध्ये साइन ऑफ ची परवानगी मिळवली. 16 मार्चला तुर्कीतील गाझीपसा विमानतळावरून इस्तंबूल साठी जाणारे विमान खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले, तेवढ्यात मला एक बातमी मिळाली की 18 मार्च रोजी इस्तंबूल हून भारतात जाणारी विमाने कोरोना इफेक्ट मुळे बंद करण्यात येणार आहेत. इस्तंबूल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचून दुसऱ्या दिवशी असणारे शेवटचे विमान पकडले जाण्यासाठी गझिपासा विमानतळ ते अंतालिया विमानतळ हा तीन तासांचा प्रवास कार ने कसाबसा पूर्ण करून अंतालिया विमानतळ गाठले. गझिपसा विमानतळावरुन रद्द झालेले विमानाचे बदल्यात विमान कंपनीने इस्तंबूल ला पोचण्यासाठी कोणतीही मदत न केल्याने अगोदरच मनस्ताप झाला होता. अंतालीया विमानतळावरुन जे विमान मिळाले ते इस्तंबूल साठी जाणारे शेवटचे विमान होते जे फक्त अर्ध्या तासाच्या फरकाने देवकृपेने पकडण्यात यश मिळाले. फक्त आणि फक्त नशीब जोरावर असल्याने 17 मार्च चे इस्तंबूल हून भारतात येणारे शेवटचे विमान मिळाले.
संपूर्ण विमानात चेहऱ्यावर गॅस मास्क आणि फेस शिल्ड लावल्याने प्रचंड डोकं दुखत असूनसुद्धा आपल्यासोबत कोरोना चे विषाणू घरी जाऊ नयेत म्हणून संपूर्ण साडेपाच तासाच्या प्रवासात खायचे तर जाऊ द्या पाणी प्यायचे सुद्धा टाळले.
चार महिन्या ऐवजी अडीच महिने अडकल्यानंतर सुमारे साडे सहा महिन्यांनी घरी जाण्याची उत्सुकता एका भयानक स्वप्नात बदलणार आहे याची मनात पुसटशी कल्पना सुद्धा आली नाही. कोरोना व्हायरस च्या भीतीमुळे मला नेहमी रिसिव्ह करायला येणाऱ्या फॅमिली ला विमानतळावर येऊ नका असे सांगितले. माझे स्वागत करण्यासाठी नेहमीच माझी पत्नी, आईवडील आणि मुले येत असत परंतु आज त्यांच्यापैकी कोणीही आज आले नाही आणि कोणी यावे अशी अपेक्षा पण नव्हती कारण तसही काही मिनिटांत त्या सर्वांना भेटणार होतो.
टॅक्सी मध्ये बसल्यावर मला पत्नीचा फोन आला आणि कोरोना संसर्गा बद्दल बोलणे झाले आणि त्यात काय काय आणि कशी काळजी घ्यायची याबाबत चर्चा झाली. माझ्या पत्नीने मी जणू काही कोरोनाचा कॅरियरच आहे अशी स्वतः ची खात्री करून घेतली आहे असं लक्षात आल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या बोलण्यावरून आता माझ्या घरात मी अस्पृश्य झालोय हा धक्का पचवणे माझ्यासाठी खूपच जड गेले. त्याच्याही पुढे गेल्यावर माझ्या पत्नीने मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिल्याचे कळले, तत्पूर्वी झालेल्या बोलण्या नुसार मी माझ्यासह आणलेल्या सामानाला पूर्णपणे निर्जंतुक करणार होतो परंतु नंतर परस्पर मुलांना दोन आठवडे माझ्यापासून लांब ठेवायचा निर्णय घेण्यात आला होता. पण माझी मुले तिच्या माहेरी राहायला नाखूष असल्याने केवळ दोनच दिवसात सगळ्यांचा विरोध आणि नकार पत्करून घरी बोलावून घेतले , क्वॉरंटाईन आणि सेफ डिस्टन्स ठेवून का होईना पण माझी मुले आता माझ्या डोळ्यासमोर आली होती.
दोन दिवस झाल्यावर सोसायटीतील सगळ्या लोकांना मी आलीय हे समजल्यावर मला माझ्या घरातून निघून 14 दिवस दुसरीकडे सोसायटी बाहेर राहायला जाण्यासाठी मागणी करू लागले. 14 दिवसांनी टेस्ट केल्यावर कोरोना कॅरीयर नसल्याचे सिद्ध केल्यावर सोसायटीत येण्यासाठी सांगितले. त्यांच्या या मागणीवर मी त्यांना तशाप्रकरची माझ्या नावे नोटीस काढायला सांगितली परंतु तशी नोटीस देणे बेकायदेशीर असल्याने ते तावातावाने निघून गेले.
ह्या सर्व प्रकरणात माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबीयांना आता अशी भीती आहे की मी जे योग्य आहे त्यासाठी आता जो विरोध केला त्याचे परिणाम मी जहाजावर गेल्यावर माझ्या कुटंबाला त्रास देण्यात तर नाही ना उलटणार. परंतु अजुन कोणाशी वाद नको म्हणून मी चौदा दिवसच काय पुढील महिनाभर पुरेल एवढं राशन आणि सामान एकदाच भरून घेतले आणि माझ्यासह माझ्या घरातील कोणीही सदस्य घराबाहेर पडणार नाही म्हणून दरवाजा बंद करून घेतला. बंद घरात माझे कुटुंब आणि त्यातसुद्धा एका बंद खोलीत मी असे दिवस काढत आहे. सोसायटी मध्ये असलेले माझे कित्येक मित्र माझे इतर नातेवाईक ज्यांना माझ्या नोकरीचे आणि माझे कौतुक वाटतं आणि ज्यांना हेवा वाटतो असे सगळेजण जहाजावरुन आल्यावर नेहमी चौकशी करायचे. परंतु यावेळी भेटून चौकशी तर जाऊ द्या पण साधे फोनवर ख्याली खुशाली विचारण्याचे सौजन्य सुद्धा कोणीही दाखवले नाही.
मागील वर्षात फॅमिली आणि मित्रांकडून मिळणारा आदर आणि प्रेम अनुभवल्या नंतर आज मी माझ्या घरातील एका खोलीत स्वतः ला कोरोना व्हायरस मुळे किंवा अन्य कोणतेही आजाराचे एकही लक्षण नसताना कोंडून घेतले आहे. जहाजावर प्रचंड ताण आणि तणावात काम करताना सुद्धा कोणत्याही परिस्थतीमध्ये एक सकारात्मकता प्राप्त होत असते. जेव्हा आपले जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र या सर्वांनाच आपण कोरोना चे वाहक असू शकतो म्हणण्यापेक्षा आहेच म्हणून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पाठ फिरवतात तेव्हा जी निराशा आणि नकारात्मकता येते ती मनामध्ये स्वतःच्या जवाबदारीवर आणि आयुष्यात कमावलेल्या कर्तृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. आपले खरोखरच आपले असतात की तो आपल्या मनाचा निव्वळ तसा समजच असतो असा वैचारिक आजार कोरोना व्हायरस ने मनात रुजवला आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply